आमचा पहिला वहिला युथ फेस्टिव्हल

आमच्या डिपार्टमेंटनं आजवर कधिही युथफेस्टिव्हलमध्ये भाग घेतला नव्हता. त्यावर्षी आमच्यातलं "टॆलेण्ट" विभागातल्या एका उत्साही सरांच्या लक्षात आलं आणि ठरलं की युथ फेस्टिव्हल मध्ये यंदा आमच्या विभागाची टिम पाठवायचीच. दुसर्या एकाउत्साही सरांनी एकांकिका लिहायचं शिवधनुष्य उचललं. कलाकारांची निवड झाली. अर्थात अस्मादिक त्यात होतेच. ऐनवेळेस सगळं ठरल्यानं खुपच घाई झाली पण आम्ही माघार घ्यायला तयार नव्हतो. होस्टेलमधून खास परवानगी मिळवून तालिमीसाठी सगळ्याचजणी जायला लागलो. रात्री दहा साडेदहा पर्यंत तालमी चालू झाल्या. इथे भ्रष्टाचार करून मेलेले आणि नंतर स्वर्गात जाऊन तिथेही हा रोग पसरवणारे राजकिय नेते आणि त्यांच्या मागोमाग स्वर्गात गेलेल्या त्यांच्या बायका असा सगळा सावळा गोंधळ कथेत होता. सगळं धमाल जमलं होतं. त्यात सगळे हौशी कलाकार असल्यानं तालमिंच्यावेळेस धमाल यायची. इतकं सगळं करून, रात्री जागल्यानं पित्त वाढवून घेउनही काही फायदा झाला नाहीच. निवडचाचणित आम्ही बाहेर फेकलो गेलो.तरीही आम्ही शस्त्रं टाकली नाहीत. त्याच कथेत फेरफार करून दुसर्या एका स्पर्धेसाठी नाव दिलं. तिथेही आम्हाला फुटाची गोळी दिली. आता तर आमच्यावरचा अन्याय दूर करण्याचा किडा जोरात चावला. त्याच कथेत फेरफार करून तिथल्यातिथे तासाभरात आम्ही पथनाट्य बसवलं आणि चाचणीसाठी उभे राहिलो. इथे चक्क आमची निवड झाली कारण दुसरं कोणी आलेलंच नव्हतं. काही का असेना, आम्ही "आत" होतो हेच आमच्यासाठी महत्वाचं होतं. आता तालमी चालू झाल्या. पूर्वीचा बाज बदलून थोडं लाऊड करताना खुपच गंमती जमती व्हायला लागल्या. संवाद बोलताना मध्येच पुर्वीचा सूर धरला जाऊ लागला. हे सगळं घोटवत बसायला वेळही नव्हता कार अवघ्या काही दिवसांवर युथफेस्टिव्हल येउन ठेपला होता. अखेरच्या दिवशी आम्हाला एक चांगली बातमी समजली की आमची एकांकिकेसाठीही निवड झालेली आहे. एकच स्क्रिप्ट आम्ही दोन ठिकाणी दोन पध्दतिंनी सादर करणार होतो. आम्ही सगळे स्मिता पाटील, नासिरूद्दीन शहा यांचे बाप असल्यानं अभिनय करायला डगमगत नव्हतो. सांगा फक्त काय करायचंय? या आवेशात होतो. कळस म्हणजे युथफेस्टिव्हलच्या दिवशीही सकाळी एका मैत्रीणीच्य घराच्य गच्चीवर आमची तालिम रंगली होती. तिच्याच घरातलं कपाट उघडून ऐनवेळेस आम्ही कपडेपट बनवत होतो. कारण आमच्याकडे साड्या वगैरे आणि मुलांकडे झब्बे असायचं काही कारणच नव्हतं. त्यातून सगळेच होस्टेलवर रहाणारे त्यामुळे उत्साहाच्याभरात कपड्यांचं काय करायचं या मुख्य मुद्द्याकडे दूर्लक्ष झालेलं होतं. मैत्रीणिच्या आई, भाऊ आणि वडिलंनी उदार मनानं त्यांची कपाटं आम्हाला उघडून दिली म्हणून बरंय नाही तर पुढार्यांच्या बायका थेट जिन्समध्ये स्वर्गात गेल्या असत्या. एकिकडे संवादांची तालिम चालली होती तर दुसरीकडे ब्लाऊज दोन इंच धरावं की तीन याचा खल चाललेला होता. ते सगळं ऐकणं खुपच मौजेचं होतं. एकिकडे भारतातल्या भ्रष्टचारावर आसूड ओढले जत होते आणि त्याचवेळेस पलिकडे लांब पायजमा जरा आखुड कसा करता येईल याबाबत चर्चा चालू होती. आमच्यामते आमची तयारी झकास झालेली होती. सगळं सामानसुमान घेउन आम्ही नाट्यगरुहात पोहोचलो. तिथे आमच्यासाठी टाळ्या वाजवायला आलेली आमची दोस्त मंडळी हजर होती ती आम्हाला पाहून युरेका युरेका करत धावत आली आणि म्हणाली होत कुठे तुम्ही? म्हटलं कां? तर त्यांनी सांगितलं की ऐनवेळेस वेळापत्रकात बदल करून एकांकिका सकाळी घेतल्या आणि संध्याकाळी पथनाट्य आहे. त्यातून आमच्या गटाची एकांकिका पहिलीच होती आणि चार पाच वेळा आमचं नाव पुकारून अखेर पुढच्या गटाला बोलविण्यात आलं होतं. आता आत शेवटची एकांकिका चालू होती. पाय गळले काय करावं सुचेना. आमच्या मित्रमंडळानं आम्हाला सगळीकडे शोधलं होतं. आम्ही मात्र रंगीत तालिम करत होतो. ते तर झालंच आणि मग लक्षात आलं की, अरे देवा! कपड्यांची तासभर केलेली टाचाटाची फुकटच गेली म्हणायची. आम्ही संयोजकांना विनंती करून पाहिली पण काही उपयोग झाला नाही. अखेर संध्याकाळच्या पथनाट्यावर लक्ष केंद्रीत केलं. एव्हाना डोक्याचा भुगा झालेला होता. काही सुधरत नव्हतं. नक्की काय करायचं हा गोंधळ झाला होता तो वेगळाच. दोन दोन गोष्टी एकाचवेळेस करायला गेल्यानं संवादांची सरमिसळ झालेली होती. आम्ही अखेर रंगमंचावर गेलोच आणि पथनाट्य म्हणून आम्हाला जे योग्य वाटलं ते सादर करून परतलो. निकाल बिकाल ऐकायचं धाडसही केलं नाही. हे सगळं झालं तरी एक गोष्ट मात्र नक्की झाली की विभागात आम्ही एक इतिहास बनविला.आमची पहिलीच बॆच होती जी युथफेस्टिव्हलमध्ये गेली. तिकडे काय झालं याला इतरांच्या लेखी फार महत्व नव्हतं. असतं तरी काय फरक पडला असता म्हणा.....:)
 

0 comments: