रूम नं. १६

हा आमचा पत्ता. जिथे आम्ही कधीच नसायचो. तिथे असायचा आमचा पसारा. होस्टेलचे दिवस धमाल होते असं नुसतं म्हणून चालणार नाही. काहीतरी भन्नाट सांगायलाच हवं नाही का? तर मी तिथे बाड्बिस्तरा हलविण्यापूर्वी इतर तिघीजणीं सेट झाल्या होत्या. मी तरंगत कधीतरी महिन्याभराने रहायला गेले. कारण मला रूमच मिळालेली नव्हती आणि तोपर्यंत माझा रूम द्याल कोणी एक रूम म्हणून नटसम्राट झाला होता. अखेर आणि एकदाची मला रूम मिळाली. बादलीत पुस्तकं, गादीच्या गुंडाळीत बारीक सारीक सामान सुमान आणि एक बॆग इतक्या मोठ्य सरंजामासहित रूम नं. १६ चं मी माप ओलांडलं. पावसाची रीप रीप चालू होती. "पारू" ला शोधायला अख्खं डिपार्टमेंट तुडवावं लागलं आणि ती चार इंचाची किल्ली घेउन मी खोलीत प्रवेश कर्ती झाले. ओळख पाळख झाली आणि माझ्या पारूकडून सगळ्यांनी चहा घेतला कारण तशी पध्दतच होती म्हणे. समोरा समोरच्या दोन खोल्यात आम्ही चारजणी रहायचो. शिस्त विचाराल तर सगळ्याजणी वरचढ, कमी कोणी नाही. म्हणजे आमच्या रूममध्ये आल्या आल्या बादलीत पाय जायचा आणि समोरच्या खोलीत गेलं की भांड्यात इतका फरक सोडला तर तपशिल सारखाच. कपड्यांचं प्रेम तर विचारू नका. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की वर्ष संपल्यावर सामान भरताना साधारणपणे मॆचिंग होणार्या जोड्या बनवून बॆगा भरल्या. कोणाचं काय कळायलाच मार्ग नाही. सलवार एकिची, टॊप सुदरीचा आणि ओढणी भलतीच कोणाची तरी असं आवरून आम्ही धावतपळत डिपार्टमेंट गाठायचो. सक्काळी सक्काळी पाच सहा वाजेपर्यंत उठलं तर गरम पाणी आंघोळीला मिळायचं. त्यावर मोठ्या मनानं पाणी सोडून आम्ही कोमट पाण्यावर समाधान मानून घेतलं. मध्येच कधी तरी अफवा उडाली की दुसर्या मजल्यावरच्या गिझरला दहा वाजेपर्यंत पाणी असतं. आम्ही खुशीत बादल्या हलवत गेलो आणि कसलं काय फाटक्यात पाय. थंडगार पाण्यानं आंघोळ करून खाली आलो. नंतर कधीही त्या फंदात पडलो नाही. चुकून कधी गरम पाणी मिळालं तर दचकायला व्हायचं.
 

2 comments:

नितिन चौधरी said...

सगळे भाग वाचलेत...अप्रतिम.
विषेशतः "तुमच्याकडे आलं की पाय बादलीत आणि समोरच्यांकडे भांड्यात" हे फार आवडलं.
* मराठीत "मॅ"डम लिहण्यासाठी m टाईप करा,Shift+e टाईप करा..

शिनु said...

@ नितिन
thanku. मॆडम लिहून पाहिलं पण ते "मॆ" असं उमटतंय...