रूम नं. १६ मधला "मेस" : काॅमेण्ट्रीचा शेवट

मॅडमचाही बिचारीचा जीव होता आमच्यावर, तिलाही पटलं. त्या म्हणाल्या,"काय तरीच बाई तुमच्या डिपार्टमेंटचा जगावेगळा अभ्यास. फार डोकं चालवावं लागतं नाही? इतर कन्या पुस्तकातून बघून अभ्यास करता पण तुमचं तसं नाही.  अगं पण आधी माझी आपली नाॅमिनल परवानगी घ्यायची नाही का? समजा आत्ता माझ्याऐवजी रेक्टर मॅडम आल्या असत्या आणि त्यांनी तुम्हाला विचारलं असतं की मला माहित आहे का म्हणून तर?" आम्ही साळसूदपणानं म्हणालो,"साॅरी मॅडम. आम्हाला माहितच नव्हतं की ,अशी परवानगी घ्यायची असते. इथून पुढे असं नाही होणार" तेव्हढ्यात संधी साधून एकजण म्हणालीच की "मॅडम आम्हाला गरज पडली तर आम्ही ट्रॅन्झिस्टर आणू शकतो ना?" मॅडम म्हणाल्या"आणा, पण उगाच सगळ्याजणींना जमवून बसू नका आणि आवाज तुमच्यापुरता ठेवा" सगळ सेटल झालंय असं वाटत असतानाच मॅडमचं मागे लक्ष गेलं, त्या ओरडल्या "काय गं चंदे तू यांच्या रूममध्ये काय करतेयस?" चंदा म्हणाली,"मी कुठे काय करतेय? तुमचा आवाज आला म्हणून आत आले." मॅडम कडाडल्या"माझा आवज ऐकून आत कशाला यायला हवंय? इथे काय चाललंय?पळ इथून" चंदा साळसूदपणानं म्हणाली,"मी इथेच नाही सगळीकडे जाऊन तुम्हाला शोधून आले. माझं गजराचं घड्याळ बंद पडलंय आणि रूमपार्टनर नाहीए, उद्या मला पहाटे उठायचंय. तुमच्याशिवाय दुसरं कोणी उठवेल यावर माझा विश्वास नाही. म्हणून ते सांगायला तुम्हाला शोधत होते. इथे तुम्ही पेटला होता. मध्ये बोलले असते तर माझ्यावरच रागवला असता म्हणून तुमचं संपायची वाट बघत होते." मॅडमला अर्थातच गहिवरून आलं. चंदाची सुटका झाली. तिच्यामागे असणारी "सू" दिसली तिच्यावर मॅडम खेकसल्या "तू गं कन्ये? तुझा काय निरोप?" बावरलेली सुवर्णा गप्पच उभी राहिली. तिच्या मदतिला आम्ही धावलो,"मॅडम सू ला आम्ही बोलवलं, तिला हे खेळाबिळातलं टेक्निकल समजतं नां? आम्हाला इतकं डिटेलमध्ये समजत नाही. बिचारीला आज लवकर झोपायचं होतं पण आमच्यासाठी बसलीय डोळे उघडे ठेवून" मॅडमला पुन्हा एकदा गहिवर आला. असं एक एक करत काहींना लटकावं लागलं
तर काही जणी सलामत शिरानिशी आपापल्या रूममध्ये गेल्या. जाताना मॅडम धमकी द्यायला विसरल्या नाहीत की ,उद्या जर खालच्या कप्यातला कपड्यांचा आणि भांड्यांचा ढीग स्वच्छ झाला नाही तर.....?असो. दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी लवकर येउन हे सत्कार्य उरकून टाकलं. जाऊदे आज काय आणि दोन दिवसांनी काय, कपडे धुवावे लागणारच होते नां!

..................
 

0 comments: