धनाची पेटी

आज माझी धनाची पेटी पाच वर्षांची झाली. पहिली बेटी धनाची पेटी म्हणण्याची पध्दत आहे आपल्याकडे. कोणत्या अर्थानं ते माहित नाही; पण माझ्यापुरतं बोलायचं तर ती माझी खरी खुरी धनपेटी आहे. हिची चाहूल लागली त्या क्शणापासून आम्ही, देवा मुलगीच दे रे बाबा म्हणून विनवत होतो. कारण सांगता येणार नही; पण मुलगीच हवी हा हट्ट होता. लक्श्मी रस्त्यावरच्या लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानात लावलेले इवले इवले फ्रोक आम्ही खुळावल्यासारखे उभे राहून बघायचो. मोठ्या जाणत्या बायका अंदाज लावायच्या की हिला मुलगाच होणार "लक्शणं" मुलाची आहेत. पहिलटकरीण म्हणून डोहाळजेवणं तर दणक्यात झाली. त्यात ते खीर की लाडू प्रकरण प्रत्येक ठिकाणी झालं आणि ठोंब्या लाडूच दरवेळेस पुरीखालून निघायचा. माहेरचं शेवटचं डोहाळजेवण दत्तगुरुंच्या अंगणात केलं या इथे मात्र त्यांच्यासाक्शीनं खीरीनं दर्शन दिलं आणि ती खीर मी मन लावून चाटून पुसून खाल्ली. ज्या क्शणाला डॊक्टरनी सांगितलं "गॊड ब्लेस्ड यु विथ लिटिल प्रिन्सेस" तेंव्हा डोळे वहायलाच लागले. तिचं आणि माझं पहिलं दर्शन झकास झालं आम्ही  एकमेकीला चक्क ओळखलं. मी तिला पाहिलं तर गुलाबी दुपट्यात गुलाबी झबल्यात गुंडाळलेलं हे ध्यान माझ्याकडे टुकू टुकू बघत चक्क हसलं. त्या क्शणाला सगळं विसरुन माझा नवा जन्म झाला. आई होणं हा कोणत्या अर्थानं दुसरा जन्म असतो माहित नाही 
पण माणूस म्हणून पुन्हा एकदा जन्म होतो हे नक्की. कोणाला तरी आपली सर्वार्थानं गरज आहे ही भावनाच ऊर भरून आणणारी आहे.
 इतके सुंदर सुंदर क्शण गेल्या पाच वर्शांत आम्ही एकत्र घालवले की ते ठेवायचे म्हटलं तर बॆंकेची लॊकर तुडुंब वहायला लागतील. ती पोटात असताना "तोत्तोचान"ची पारायणं केली होती कारण मला तशीच चिमखडी हवी होती. आज पुस्तकातली तोत्तोचान घरात बागडताना, चुरू चुरू बोलताना, प्रश्न विचारून भंडावून सोडताना,  मिट मिट डोळ्यांनी "आई तू कित्ती ब्लिलियंट आहेस?" असं कौतुकानं आणि अभिमानानं म्हणताना देवाशप्पथ खुप छान वाटतं. शाळेत आलेल्या पहिल्या नंबर पेक्शाही तिच्या तोंडून तू कित्ती हुशार आहेस. जगात माझ्या मम्मुडीसारखी हुशार कोणी नाही. हे ऐकताना जास्त अभिमान वाटतो. मोठ्ठी झाल्यावर तू कोण होणार? असं विचारलं की मला तूच व्हायचं आहे असं जेव्हा ती प्रचंड अभिमानानं म्हणते तेव्हा आपण जगातल्या हुश्शार बायकांपैकी एक आहोत असं वाटायला लागतं.(आणखी काही वर्शांनी तिचा विचार कदाचीत बदलेल म्हणा! पण सध्या तरी मला मजा वाटते). मुलगा की मुलगी? या प्रश्नाचं खरं सांगायचं तर आजही नेमकं उत्तर देता येणार नाही; पण एक नक्की की आपल्या मनासारख दान आपल्याला मिळणं यासारखं दुसरं सुख नाही.
 

4 comments:

Vishal Khapre said...

मुलगी हि धनाची पेटी हे खरे. माझी मुलगी ३ महिन्यांची आहे. मी आणि माझी अर्धांगी तुम्ही म्हटलेल्या पुर्वार्ध अनुभवातुन आताच पार झालो.

छान लिहिलं आहे.

शिनु said...

thanku. and njoy d perenthood

desertrose said...

sab marathi hai hindi mai kuch nahi hai kya

शिनु said...

ब्लॊग मराठी है इसलिए सब मराठी में है.