गृहित

आपण कुठेतरी बाहेर जाण्यासाठी अगदी छान वेळ घेऊन तयार झालेलो असतो. बर्‍याच दिवसांनी आरशासमोर वेळ घालवलेला असतो, कपाट उघडून एरवी हाताला येईल तो ड्रेस घालणं सोडून आज कपाटात शिरून आवडीची, बरेच दिवसांत न नेसलेली साडी आपण काढतो. मायेनं त्या इस्त्रीत घट्ट बसलेल्या मऊ घडीवरून हात फ़िरवतो. मॅचिंगचं ब्लाऊज आणि गळ्यातलं घालून अगदी तब्येतीत तयार होतो. डोळ्यात काजळाची स्टिक फ़िरवत असतानाच डोअरबेल वाजते. घाईत जाऊन दार उघडतो तर बाहेर पाहुणे उभे असतात.
“काय येऊ का?” कृत्रिम आपुलकीनं कोलगेटचे दात विचकत केलेलं एक स्माईल आपल्याला सेफ़्टी डोअरच्या डिझाईन पलिकडे दिसतं
आपण सेफ़्टी दार उघडून त्यांना आत घेतो. मघासचा तयार होतानाचा फ़सफ़सलेला मूड आता किंचीत डाऊन झालेला असतो
पाहुणा सोफ़्यात रूतून बसतो त्यावरूनच आपण अंदाज लावतो की किमान तासभर तरी इथे जाणार आहे.
“अगं इकडून चाललो होतो, म्हणलं चक्कर टाकावी तुझ्याकडे”
“कशाला? आणि येण्याआधी किमान फ़ोन तरी करायचा” असं काहिसं कुजकट बोलायचा आपला मनापासून मूड असतो मात्र तरिही वरवर बुळबुळीत हसत आपण कसंनुसं म्हणतो,
“हो का? चांगलं झालं की”
“अगं मी मुद्दामच फ़ोन नाही केला. म्हणलं तू काय घरीच असतेस, तुझी गाठ पडणारच”
आपण घरात असतो हा आपण सोडून इतर सगळ्यांसाठी नेहमीच सोयीचा आणि गहित धरण्याचा मुद्दा असतो. नोकरदार माणसाकडे अचानक टपकता येत नाही कारण दाराला कुलूप दिसण्याच्या शक्यता असतात. घरीच रहाणीरीकडे तसं नसतं नं.
आपण घरात रहातो याचा अर्थ पाहुणेरावळे, आप्तेष्ट आणि कुटुंब या सगळ्यांनी आपला चोवीसच्या चोवीस तासांचा वेळ गृहितच धरावा असं असतं का? घरात रहाणारीला तिचे म्हणून काही उद्योग नसतात?
आपणा छान तयार झोलोय याचा अर्थ आपली बाहेर जायची तयारी चालू आहे, हे सरळ दूर्लक्ष करत समोरचा ऑर्डर सोडतो,
“मस्त आलं घालून चहा कर. बरेच दिवसांत तुझ्या हातचा चहा नाही प्यायलो.”
आपण किचनमधे जाऊन चहा करतो आणि मनातून कितिही चरफ़डलो असलो तरिही गृहिणीधर्माला, अतिथीधर्माला जागत बिस्किटांसोबत चहाचा वाफ़ाळता कप समोर आणून ठेवतो.


चिक्कार डोकं खाणारी मिटिंग करून आपलं डोकं ठणकत असतं आणि बसमधल्या कलकलाटात आपण डोळे मिटून डोक्याला आराम देण्याचा प्रयत्न करत असतो. जरा बरं वाटावं असं फ़िलिंग येतच असतं की फ़ोन वाजतो. घरचा नंबर बघून आपण तात्काळ उचलतो कारण पिल्लं घरात सोडून कामं करणारीचं अर्धं लक्ष घरात असतंच. फ़ोन टाळणं सिस्टिममधेच नसतं कारण नेमका टाळलेला फ़ोनच काहीतरी इमर्जन्सी सांगणारा निघालेला असतो कधीतरी. आपण फ़ोन घेतो,
“आई गं, येताना माझं उद्याचं प्रोजेक्टचं सामान आणशिल?”
या प्रश्नाला उत्तर होच असतं.
मात्र तो होकार देताना आपली चिडचिड होते कारण एक स्टॉप आधी उतरून स्टेशनरीचं दुकान गाठावं लागणार असतं. मग आता आलोच आहोत तर म्हणत घरात संपलेल्या भाज्या वगैरे घेतलं जातंच. बरं अंतर इतकं अडनिडं की रिक्षावाले यायला सहजी तयार होत नसतात. आपण ठणकतं डोकं आणि हातातल्या पिशव्या सांभाळात रस्त्यावर रिक्षा शोधत फ़िरत रहातो. खरं तर या क्षणाला आपल्याला घरी जाऊन एक कप कडक चहाची आणि उशीवर डोकं टेकायची फ़ार गरज असते.

लग्न ठरलेलं असतं, आपण रजा वगैरेचं प्लॅनिंग करतो. नवे दिवस असतात. त्यामुळे कोणत्याच गोष्टीला पटकन नकार  देता येत नाहीत. रूटीन सुरू झालेलं असतं. आपणा ऑफ़िसच्या गडबडीत आवरत असतो आणि आपली सासू आपल्याला सहजपणानं येऊन सांगते,
संध्याकाळी जरा लवकर ये. माझ्या भजनीमंडळातल्या बायका घरी बोलवल्यात मी. घरातच खायचं करायचं म्हणतेय, जरा मदतीला ये
खरं तर अशा सवलती आता ऑफ़िसमधे मागायचिही चोरी झालेली असते कारण ऑलरेडी लग्नाच्या शॉपिंगच्यावेळेस, होणार्‍या नवर्‍याला भेटायचं म्हणून बरेचदा या सवलती घेऊन झालेल्या असतात. आता खरं तर जास्त वेळ थांबून ते कॉम्पेनसेट करायची वेळ आलेली असते. पण आपण हे काही बोलू शकत नाही. चरफ़डत, शेलक्या नजरा झेलत ऑफ़िसमधून निघतो आणि घरी येऊन धुसफ़ुसत सासूच्या हाताखाली कामं करायला लागतो.

मैत्रिणीसोबत मुव्ही प्लॅन होत असतो. मुलांची सोय बघत, सगळ्या लेकुरवाळ्यांना सोयीची पडेल अशी एक वेळ अगदी मुश्किलीनं निवडलेली असते. प्रचंड ऍडजेस्टमेंट करत आपण हे सगळं जमवून आणतो. संध्याकाळच्या शोला जाण्यासाठी दुपारपासून घरच्यांच्या खाण्याची व्यवस्था किचनमधे करत असतो आणि नवर्‍याचा फ़ोन येतो.
“अगं भूषण आलाय ऑस्ट्रेलियाहून. आज यायचं म्हणतोय घरी. एक काम कर भाज्या अआणि बिर्याणी घरातच कर. मी पोळ्या आणि स्वीट बाहेरून घेऊन येतो”
भराभर प्लॅनिंग केलेल्या नवर्‍याला आपण आपल्या मुव्हीप्लॅनची आठवण करून देण्याचा क्षीण प्रयत्न करतो. त्यावर तो सहजच म्हणतो
“आज जाणार होता नाही का तुम्ही? माझ्या डोक्यातूनच गेलं बघ. काय करूया आता? मी तर त्याला ये म्हणून बसलोय. तू जा, आम्ही बाहेरच भेटतो डिनरला कुठेतरी”
हा पर्याय मनापासून दिलेला नाहीए हे कळण्याइतके आपण संसारात मुरलेलो असतो. शिवाय हा डिनरला गेला तर मुलं घरात एकटीच रहाणार असतात. सगळा विचार करून आपण म्हणतो
“असूदेत. मी परत कधीतरी जाईन तू बोलवलयंस तर असूदे. तो काय रोज रोज येतो का?”

अचानक एक दिवस एखादा फ़ोन येतो फ़लाण्या नातेवाईकाचा
सुरवातीला अगदी गोड शब्दात आपली विचारपूस होते. काहीही कारण नसताना कौतुक होतं.
“ऐक नां, शिशिरला अगं तिकडे एण्टर्नशिप मिळतेय. सहा आठ महिने आहे. आणि जर सगळां नीट झालं तर तिथेच जॉब लागण्याचिही शक्यता आहे. मी म्हणलं परक्या शहरात एकटा नको राहूस. मावशी आहे आपली. तिच्याकडेच रहा. तुझ्याकडे तो असला की मला काळजी नाही गं”
या विचारण्यात आपल्या नकाराची शक्यताही गृहित धरलेली नसतेच हे उघडच असतं. शिवाय हे सहा आठ महिने वर्षं दोन वर्षं होण्याच्या शक्यता आपल्याला ठळकपणानं दिसत असतात. आपली चिडचिड होते. घरातले मात्र आपलीच समजूत घालतात.
“असूदेत गं. उद्या आपली मुलं अशी कुठे पाठवायची वेळ आली तर?”
“मी नाही माझ्या मुलांना कोणत्याही नातेवाईकाकडे ठेवणार. त्यांनी त्यांची सोय स्वत:च केली पाहिजे. टक्के टोणपे नाही खाल्ले तर तयार कशी होतील?”
“हो, अगं पण हे तुझे विचार झाले. प्रत्येकाचे तसे नसतात आणि मोठा मुलगा आहे. तुला काय करायचं आहे त्याचं? जास्तीच्या चार पोळ्या फ़क्त”
जास्तीच्या चार पोळ्यांचा प्रश्न असतो का फ़क्त?आणि मुळात पोळ्या वगैरे करावं लागणं हा मुद्दाच नाहीए. त्या जास्तीच्या चार पोळ्या लाटायची माझी तयारी आहेच हे तुम्ही गृहित धरता त्याचा जास्त त्रास होतोय हे दिसत नाहीए का तुम्हाला?

किती अनावधानांन आणि बरेचदा कळून सरून न कळल्यासारखं दाखवत लोक आपल्याला गृहित धरत जातात. पूर्वी म्हणजे वीशी पंचविशीत असताना याचा खूप त्रास व्हायचा. “मला होकार नकाराचं स्वातंत्र्य आहे की नाही?” असं ओरडून विचारावसं वाटायचं. पण पस्तिशीच्या अलिकडं पलिकडं, चार पावसाळे वगैरे बघितल्यावर आता या गृहित धरण्याचा त्रास बोथट मात्र झालाय. पूर्वी होणारी तडतड, मनातल्या मनात शेकडो वेळा केलेली चिडचिड, त्रागा आता थंडावलाय हे खरं! वायानुरूप येणारी समज म्हणायचं, समंजसपणा म्हणायचा की, कशाचंच काही न वाटण्याचा बधिरपणा? की, आपल्याला गृहित धरलं जातंय, जाणारच हे आपणही आता गृहित धरायला शिकलोय?



 

6 comments:

Unknown said...

अगदी खरे 😐😐

शिनु said...

धन्यवाद बागेश्री

shradha thatte said...

खूप छान!!

शिनु said...

ब्लाॅगवर स्वागत श्रध्दा.
प्रतिक्रियेबद्दल धन्वाद

Rajat Joshi said...

विचार करायला लावणारी पोस्ट.
छान!

शिनु said...

धन्यवाद रजत जोशी. ब्लॉगवर स्वागत.