
काल झी वर लिमयेकाका आंब्यापासून घरी बनवायच्या रेसपिज दाखवत होते. "आंबा स्पेशल" एपिसोड असल्यानं हाताला लागेल ते पदार्थ आणि आंब्याची पेटी घेऊन आंबा स्पेशल सुरू झाली. पहिल्याचपदार्थात घालायला आपल्या हापूस सोबत ग्लासभर (छोटासाच ग्लास बरं का, ते पटियाला वगैरे नाही (पटियाला: कर्टसी: सिंग इज कींग:)) कसलंस मद्य, मिरच्या, नारळाचं दूध....बाई गं.....अहो हे पदार्थ पाहिले आणि वाटलं या सगळ्याच्या मिश्रणातन जे काही बनू पहातंय ते पहाण्यापेक्षा "पवित्र रिश्ता" बघायला काय हरकत आहे? गेला बाजार निदान सांस भी कभी बहू थी सुध्दा परवडेल.
मला नां कमालच वाटते लोकांची. म्हणजे निरनिराळे पदार्थ करून बघणार्यांची. करा की बाबांनो तुम्हाला कशात काय घालायाचं ते घालून काय हवं ते करा. पण या राजस फ़ळाचा हा असा पाण उतारा नका करू. ज्याच्या नुसत्या वासानं छातची निर्वात पोकळी भरून निघावी, ज्याच्या केवळ एका रसाळ तुकड्यानं जिभेचं कैवल्य व्हावं, ज्याच्या दर्शनानंही बेहोश व्हायला व्हावं (ज्याच्या दर्शनानंही किलोभर वजन वाढावं :() त्या आंब्यापुढे इतर पदार्थांची काय मिजास? ज्याच्या नुसत्या असण्यानच इतर घटक पदार्थांचा उ्ध्दार होतो तिथंयाच ्यात त्याच्यात मिसळून त्याला बिचार्याला बापुडवाणा का करून टाकतात कोण जाणे?
आईस्क्रीममध्ये आंब्याच्या फ़ोडी इथं पर्यंत ठीक आहे पण भातात आंबा, पिठात आंबा, दूध, दही दगड आणि माती. हे म्हणजे दिसला आंबा की घाल कशात तरी आणि बनव नवी पाककृती असं झालं.
हे असं भाता बितात आंबा घालून काहीतरी बनवण्यापेक्षा मला सोपी कृती माहितिय, मस्त वासाचा गोजिरा आंबा घ्यावा, तो धुवावा (बरं असतं पोरा टोरांना हायजिन बियजिन सांगायला), नंतर (जर पेशन्स असतील तर) सुरी घेऊन आंब्याचे अवघे दोन तुकडे करा(भारी नजाकतीचं काम आहे हो!) (पुन्हा पेशन्स असतील तर) डिश मध्ये हा आंबा घ्या, जवळपास कोणी नाही असं बघा आणि डोळे मिटून हाणा.(जास्तिची आणि अर्थात अगाऊ (पणाची) सूचना- कृपया आंबा खाताना, मोबाईल स्वीच ऑफ़ ठेवा आणि डोअरबेल बंद ठेवा)आंबा खायला इतका सोप्पा असताना त्याला ढवळायचा, शिजवायचा, थापायचा, बडवायचा....सांगितलंय कोणी? मुळात समोर घमघत असलेला आंबा ठ्वून असल्या पाककृती करणार्यांचंच मला कौतुक वाटतं. कोठून आणतात इतका पेशन्स वगैरे काय की. आम्हाला म्हणजे साधा पातेलंभर आमरस करायचा म्हटला तरी मनावर, उरावर, जिवावर जडशिळ धोंडा ठेवावा लागतो.आंब्याचा रस काढणार्या हातांना मनातल्या मनात हज्जारदा दटावावं तेंव्हा कुठे वाटीत आमरस पडतो. (सोप्पं नाही हं हेसुध्दा)
आजच्या घडीला मला विचाराल की, जगी सर्वसुखी असा कोण आहे? तर त्याचं उत्तर म्हणजे आंबा खाणार्यांना (खाऊ शकणार्या.) सर्वसु्खीचा किताब द्यायला हवा.