इमोशनल अत्याचार.....

खरं तर या प्रकटनाला काय शिर्षक द्यावं हेच समजत नव्हतं. अचानकच हे शिर्षक सुचलं आणि डकवुन टाकलं. समजा विसंगत वाटलं तर जरा समजून घ्या म्हणजे झालं. असो, नमनाला अर्धा घडा तेल ओतल्यानंतर मूळ विषयाकडे गाडी वळवायला हरकत नाही (बरं तर बरं हा एक निरूपद्रवी लेख आणि याच्या नमनाला ओतलेलं तेलही व्हर्च्युअल आहे, हेच जर भाजीबाबतीत घडतं तर मी झुरळ दिसल्यावर किंचाळत नाही इतका नवरा घडाभर तेल हा शब्द ऐकुनही किंचाळला असता. नवरयाच्या या तेल द्वेषावर लिहावं काय? असा मोह होत आहे पण तो आत्ता आवरावा हे बरं. घ्या गाडी भरकटली की राव....चला आता कंसातून बाहेर पडून खरंच मूळ विषय सुरू.) हं. तर मूळ विषय तसा कॉम्लिकेटेडबिटेड नाही आणि "त्या" वाहिनिवरच्या (वाहिनिचं नाव आपल्या लेखात घेऊन त्यांची फ़ुकटच टीआरपी वाढवायची नाही असा आमचा नियम आहे)याच नावाच्या तथाकथित रिऍलिटी शो शी तर देणं घेणं काही नाही. काही संबंध असेलच तर तो अर्चना-मानव, झाशिची राणी, बाराबटा चो>>>बिस करोलबाग, छो<<<<टी बहू, अगले जनम मोहे बिटियाही किजो आणि असल्याच सगळ्या छळकुट्यांचा आहे.
प्रत्येक मालिकेआधी एक पाटी येते की यातली पात्रं खोटी आहेत वगैरे अगदी तस्संच या सगळ्याच्या सुरवातिला सांगायचं तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी या मालिका बघत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही (कोणाच्या पक्षी नवरा आणि त्याची आई, बोथ ऑफ़ यु "आय रिअली लव्ह यु").
तर आमच्या घरी नवर्याची आई म्हणजे माझ्या "आई"मुक्कामाला आल्या की झी ची टीआरपी वाढते आणि माझे वडिल आले की ई टिव्हीची. सध्या झी च्या टीआरपी वाढण्याचा सिझन आहे. सकाळी उठल्यावर आपण दात ज्या सवयीनं घासतो किंवा ते घासले नाहीत तर जे फ़िलिंग येतं ते बहुदा आईंना या मालिका नाही पाहिल्या तर येत असावं. असो. माझी काही तक्रार नाही कारण मुळात मी सगळ्याच मालिका पार्ट टाईम जॉब केल्यासारख्या पहाते. म्हणजे जेवण करताना किंवा इतर काही कारणानं टिव्ही लावला आणि साक्षात माझ्या हातात रिमोट असेल तर मी अर्ध्या तासात किमान दहा मालिका बघू शकते. तसं दैवी वरदान मला लाभलेलं आहे. विशेष म्हणजे एके ठिकाणी ब्रेकपर्यंत एखादी मालिका पाहिली की त्याचा शेवट काय, हे समजून घेण्याचा चमत्कारही मला करता येतो. पण आईंचं तसं नाहीए. त्यांना सगळ्या मालिका पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यात येणार्या ब्रेकसहित पहायला आवडतात. आता यातही माझी तक्रार नाही. तुम्ही म्हणाल तक्रार काहीच नाही तर हे किपॅड्ला बडवणं का? तर त्या नुसत्या मालिका बघत असत्या तर गोष्ट निराळी पण ते सगळ त्या प्रचंड मनाला लावून बिवून घेतात. बरं त्यातून या सगळ्या मालिका रात्री असतात आणि नेमका मालिकाद्वेष्टा नवरा त्याचवेळेस पंगतीला असतो. मग घरात सिन कसा असतो? तर .....
मालिका आहे पवित्र रिश्ता, सिन आहे,वंदुचं अजितशी लग्न झालेलं आहे आणि तिची सासू अर्चना-मानवला रात्री घरी बोलावून त्यांच्या कानफ़ाटात वाजवायला सांगतेय. आई गं. मुळात प्रचंड मेलोड्रामा असणारी ती मालिका आणि त्यातलं ढांग ढां म्युझिक आता ते समोर चाललेलं कमी म्हणून इकडे आमच्या हॉलमध्ये आई प्रचंड इमोशनल तर नवरा प्रचंड इरिटेट झालेला....वंदूची सासू तिला म्हणतेय,"मारो वंदू" अर्चना म्हणतेय "मारो वंदू" वंदू नाही नाही म्हणतेय मागे म्युझिक वाजतंय....हे सगळं दहा पंधरा मिनिटं चाललेलं आहे...आणि इकडे आई म्हणतायत,"या अजितलाच लगावल्या पाहिजेत चार चांगल्या" यावर नवरा,"ए बदला ते, काही तरी बघत जाऊ नका"(अर्चनाच्या बदाबदा वहाणार्या डोळ्यांशी या निष्ठुर नवर्याला काही एक घेणं नाही. जात जाता उगाच आपलां सहन होत नाही म्हणून...अर्चना आणि मुंबई-ठाण्यातल्या जलवाहिन्या यांच्यात साम्य काय????उत्तर सोप्पंय, दोघी सतत बदबदा फ़ुटून वहात असतात) अगले जनम मधल्या लालीवर होणार्या अन्यायानं आईंचा जीव तीळ तीळ तुटत असतो तर याचं आपलं सुरू, कसल्या कसल्या सिरीयल बघता गं? काही तरी चांगलं बघा (म्हणजे काय तर कसल्या तरी मॅचा नाहीतर शेअर फ़िअरचे भाव) ती लाली जातीय न जातीय तर आपली बारा बटातली सिम्मो येते. तिचं तर काय विच्चारूच नका. एखाद्याच्या पत्रिकेतला मंगळ आणि साडेसातीतला शनी वात आणनार नाही एव्व्हढा ताप या बिचारीच्या डोक्याला. आधी बिचारीचं लग्न ठरत नव्हतं तेंव्हा आईंच्या जिवाला ते कधी जमेल याचा घोर, बरं झालं एकदाचं लग्न तर नवरा नेमका "अल्पवयीन". हिच्या मागचे ताप संपायचं नाव घेत नाहीएत आणि आईंच्या जिवाच ताप काही कमी होत नाहीए. त्यात अर्चना काय आणि सिम्मो काय यांच्या वहिन्या म्हणजे नगच आहेत हॅण्ड्वॉशनं हात धुवून या मागे लागल्यात. त्या आल्या रे आल्या की इकडे सुरू, "काय तरी बरी या बायका, असं वागवतंच तरी कसं यांना" इत्यादी इत्यादी. त्यांच्या या प्रत्येक वाक्यानंतर नवरा आपला इमानेइतबारे,"अगं आई ती सिरीयल आहे, बघायची तर शांतपणान बघ, त्यात इतकं गुंतून कशाला बघायला पाहिजे. ते बघून आपल्या डोक्याला ताप करून घ्यायची काही गरज आहे का? त्या एकता कपूरला नाही डोकं आणि तिच्या भंपक सिरीयल बघणार्या तुम्हाला तर अजिबातच डोकं नाही" असं बजावत टीव्ही समोरच काहीतरी खुडबुड करत उभा असतो. इकडे त्या सिम्मोचा रडका चेहरा दिसत नाही म्हणून आईंची घालमेल सुरू होते. हे सगळं इतकं नेमानं घडतं की मला तर सिरीयल बघण्यापेक्षा यांच्या प्रतिक्रीया बघण्यातच जास्त मजा यायला लागली आहे. ही दोघं कमी म्हणून आता माझी बाळीही आज्जीच्या बरोबरीनं या सगळ्या सिरीयल बघत असते. परवा, "आई अजितकाकाचं लग्न झालं" असं ती मला सांगत होती तर नवरा माझ्यासमोर चेहर्यावर भलं मोठ्ठं प्रश्नचिन्ह घेऊन उभा होता. त्याला म्हट्लं अरे ती पवित्र रिश्ताबद्दल बोलतेय तर तडकलाच. म्हणाला आजपासून सगळ्या सिरीयल बघणं बंद करा. त्याच्या चिडचिडीला कंटाळून एक दिवस टिव्हीच लावला नाही तर जेवताना स्वत:च म्हणाला ते तुमचं पवित्र रिश्ता बिश्ता काही नाही वाटतं आज? लाव बरं जरा पुढे काय झालं बघुया. मग काय विचारता पडत्या फ़ळाची आद्न्या. समोर पुन्हा ती अर्चना डोळ्यात गंगा जमुना घेऊन उभी आणि आईंच सुरू झालं,"किती सहनशिल आहे ही, अलिकडच्या मुली अशा असतात तरी का?" यावर लगेच मागून बाण आलाच,"ते सगळ खोटं असतं, बड्बड न करता बघ".........हे असं सुरू आहे सध्या.
 

13 comments:

हेरंब said...

सॉ....... लि......... डड !!! सही लिहिलं आहेस. जाम आवडलं. आमच्या घरी पूर्वी हे सेम असेच prompting चे प्रकार चालू असायचे.

परवा "आई अजितकाकाचं लग्न झालं" असं ती मला सांगत होती हे तर कायच्याकाय भन्नाट !!!

Unknown said...

सही गं एकदम सही.....अर्चनाच्या डॊळ्यातले पाट तर खरचं गं ....शुटिंग नसताना काय डोके दुखत असेल तिचे....

आमच्याही ’आई’ अश्याच... आणि ते आय रिअली लव्ह यू!!! भन्न्नाआआआटटट...
(भापो ना!!!!)

आयला पण तू NDTV नाही का पहात... तिथेही ज्योती, देवी वगैरे ढिनच्याक प्रकार आहेत हो!!!

शिनु said...

@ हेरंब
ते prompting बंद कसं केलंस त्याची टीप दे नां. :D

शिनु said...

@ tanvi
अगं तेपण सगळं असतं जो्डीला. काही म्हणून सुटत नाही. बाय दि वे, टिव्हीवर सिरीयलमधल्या पाण्याचा परिणाम होत नाही म्हणून बरंय नाहीतर ज्योती, अर्चना, सिम्मोच्या अश्रुपातांनं टिव्हीला मोड आले असते असं वाटतं कधी कधी. :D

भानस said...

मी सुटलेय्य्य्य्य्य्य्य्य बाबा या सा~या साळकयांच्या कचाट्यातून... जेव्हां जेव्हां आईकडे येते तेव्हां मी टीवीकडे पाठ करून आईकडे चेहरा करून बसते. तिच्या चेह~यावरचे बदलणारे भाव-रडारड, चडफडाट.... मस्त टीपी होतो. थोड्यावेळाने ती पण हसू लागते. सहीच लिहीलेस गं. आधीच हा अत्याचार चालू आहे त्यात ही तन्वी बघ... तुला ज्योती, देवी पाहा म्हणतेय.... देव तुला शक्ती- सॉरी... सहनशक्ती देवो... :D

शिनु said...

@ भानस

हो गं हो अगदी खरं आहे. आणि हो तुझी टिव्हीकडे पाठ करून बसायची आयडिया भन्नाट आहे. ट्राय करायला हरकत नाही :D

Unknown said...

अगं टिव्हीला ’मोड’ काय..... कसली भन्नाट कल्पना आहे.... बाई गं कठीण!!!! काल हेरंब म्हणत होता तुमची दोघींची लिहिण्याची ईस्ष्टाईल जरा सेम आहे... म्हटलं उगाच नाही काही ’सेम वळकट्यांचा म्येंदु आहे आमच्या डोक्यात’ हेहे.....

शिनु said...

@ tanvi

he he he

अपर्णा said...

शिनु तुपलं मपलं शेम हाय बघ...फ़क्त तू तिथे आहेस म्हणून अजुन या कचाट्यात आहेस आम्ही सुटलोय..(म्हणजे इथे निदान मी, हेरंब आणि भा...तन्वी पाहातेय पण त्याबदल्यात तिने एकता वर एक मस्त पोस्ट टाकली होती वाचली नसशील तर जाऊन वाच...) अगं अशा बाया आणि बाप्ये आहेत हेच आता कळलं पण मला तुझी (आणि तुझ्या सेम वळकट्यावालीची) ईश्टाइल आवडते म्हणून खास वाचून प्रतिक्रिया देतेय...आणि हो ही प्रतिक्रिया वाचेपर्यंत टिआरपी खाली आला असेल किंवा किमानपक्षी बदलला असेल अशी अपेक्षा....
अगं किती दिवस झाले तुला सांगायचं राहिलं होतं..ब्लॉगला नवे कपडे(म्हणजे टेम्प्लेट) शोधत होते तेव्हा जे आवडलं ते कुठे पाहिलंय पाहिलंय करता करता नेमकं तू एक पोस्ट टाकलीस आणि लक्षात आलं की हेच होतं ते पाटीवालं..मग काय मुकाट्याने दुसरं शोधलं....असो..लिहित जा गं मालिका पाहुदेत पाहणार्‍यांना...

शिनु said...

@ अपर्णा आर्जवून प्रतिक्रीया दिल्याबद्दल थेंक्यु.

अगं वाचली ना मी तन्वीची ती एकता कपूरवरची पोस्ट. बाकी मला एक प्रश्न आहे की सगळ्याच हिरोईन अशा रडक्या का? जरा हसावं बिसावं तर ते नाही.

meg said...

This blog was just too much! Jara Anubandh var lihi na please..! pan khara sangu mazi avastha tuzya aainsarkhich hote Anubandha baghtana.. (but only 1 serial ha)
gele 4 divas sasri hote tar 7pm to 10.30pm...full2 entertainment hoti.. eka mansachya aayushyat ekach veli khoon, atiprasanga, kidnapping, affairs, logic haa shabdach nahi dictionary madhe hyanchya!

शिनु said...

@ meghana

he he he he....अगदी खरंय. अगं पण ती एक अनुबंद आजकाल अख्खी एकता कपूरला भारी पडतेय. काय काय दाखवतायत....

Anonymous said...

Hi,

We have shortlisted this article for Netbhet eMagazine Nov 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.
Please provide your full name and email id.
Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary - 09819128167 for more information.

Regards,
Sonali Thorat
www.netbhet.com