सिनेमा शिकायचे दिवस- - सत्यजीत रेंशी ओळख


खूप खूप पूर्वी म्हणजे सिनेमा काय असतो ते माहित नसता सत्यजित रेंचे सिनेमे नॆशनल चॆनवर पाहिले होते. मोठे बघतात म्हणून आपण बघायचे इतकंच त्यावेळेस  समजत होतं. एक दिवस सर म्हणाले,"चला आज तुम्हाला सिनेमा कशाशी खायचा असतो ते सांगतो". आम्ही उत्कंठतेनं आणि अर्थातच नेमहीप्रमाणे भक्तीभावानं टिव्हीसमोर बसलो. अरे हो, एक महत्वाचं सांगायचंच राहिलं. सिनेमाचा वर्ग चालू झाला तेंव्हा आम्ही सहाजण होतो आणि पहिल्याच इंट्रोनंतर गळती होउन तीघेच राहिलो.  सरांना सहाजण होते तेंव्हाही फरक पडला नव्हता आणि तिघे होतो तेंव्हाही फरक पडला नाही. पुढे पुढे तर मी एकटीच असायची तरी सर शंभरजणांना शिकवल्यासारखेच भक्तीभावानं शिकवायचे. शिकवायचे म्हणण्यापेक्शा ते सिनेमात रंगून जायचे, कधी कधी तास संपला तरी त्यांची दीएंडची पाटी यायचीच नाही. अखेर खालून क्लार्क सांगायला यायचा, सर, मॆडमना पुढच्या लेक्चरला बोलवलंय. इतकी फनी सिस्युएशन त्याआधी आणि नंतरही कधी आली नाही. असो. तर त्यादिवशी सर म्हणाले, सिनेमा काय असायला हवा 
आणि द्रुकश्राव्य माध्यम 
कसं हाताळायला हवं यांचा समग्र ग्रंथ म्हणजे सत्यजीतबाबुंचे चित्रपट. 
हे पहिलं वाक्य ऐकल्यावरच धडकी बसली. कसं झेपणार सगळं म्हणून
 स्वत:चीच काळजी वाटायला लागली. 
पहिलाच चित्रपट होता पाथेर पंचाली. पहिल्या फ्रेमपासून सरांच्या नजरेतून
 सिनेमा पहात गेल्यावर हळू हळू  
या भाषेशी ओळख होत गेली. समोर दिसतं त्यापेक्शा वेगळं, बिटविन द लाईन्स शोधण्याची सवय इथुनच लागली.
एका प्रसंगात नायिका शिवत असते आणि शिवता शिवता विचारात मग्न झालेली असते, मध्येच कधीतरी ती दातानं दोरा तटकन तोडते. इथे सरांनी फिल्म थांबवली आणि या द्रुष्या़चं स्पष्टिकरण द्यायला सांगितलं. तिघांनी तीन आकलनं सांगितली आणि माझं सरांशी मिळतं जुळतं आलं. सिनेमा बघायचा नवा चष्मा घालून त्यादिवशी वर्गातून आम्ही बाहेर पडलो. खाली आलो तर बाकिच्यांची लेक्चर कधीच संपली होती. आज आम्ही कोणता सिनेमा पाहिला याची उत्सुकता सगळ्यांनाच असायची. आम्ही पाथेर पांचाली सांगितल्यावर कोणी न सांगताही सगळेजण अम्र्याच्या टपरीवर चहा प्यायला गेलो. आज हाफच्याऐवजी चांगला अख्खा ग्लास भरून चहा प्यावा लागला तेंव्हा कुठे त्या क्रुष्णधवल चित्रचौकटीतून मन या रंगीत चौकटीत आलं.



छायाचित्र सौजन्य:  माहितीजालावरून तरंगत कोणा एकानं केलेल्या फॊरवर्ड मधून,
 

सिनेमा शिकायचे दिवस

पहिला दिवस होता, फिल्म जर्नलिझमच्या लेक्चरसाठी आम्ही जाम उत्कंठीत होतो. सरांची वाट बघत डिपार्टमेंटच्या बाहेर बाईकस्टॆंडवर बसलो होतो. समोरून एक उंचे पुरे छान छान कोणीतरी झप झप चालत आलं आणि थेट आमच्यासमोर उभं राहून म्हणालं,"चला" आम्हाला कळेचना की कुठे? मग लक्शात आलं हेच आमचे सर होते. सरांसारखे अजिबात न दिसणारे. मस्त पहिल्याच दिवशी एकही लेक्चर बंक करायचं नाही ठरवूनच टाकलं. सगळे मिळून खच्चून चार विद्यार्थी होतो पण सरांना याचा काही फरक पडलेला दिसला नाही. पहिल्यांदा खासफिल्मची लेक्चर व्हायची त्या खोलीत पाऊल टाकलं तेंव्हा तिथल्या काळ्या अंधारानं स्वागत केलं. ट्य्ब लावून प्लेयरम्नध्ये कॆसेट टाकली आणि भक्ते भावानं टिव्ही पुढे बसलो. पहिल्याच दिवशी मंथन पाहिला. प्रत्येक फ्रेमनंतर सर सिनेमा बघायचा म्हणजे काय हे सांगत होते. टिव्ही वर दोन चारदा पाहिलेला मंथन आज नवाच वाटत होता. नंतर समजलं की मंथन आणि पाथेर पांचाली ही आमची टेक्स्टबुकं होती. (वर्ष अखेरीपर्यंत हे दोन्ही चित्रपट फ्रेम टू फ्रेम पाठ झाले. आजही मी पूर्वीसारखा तटस्थपणानं मंथन पाहू शकत नाही.) लेक्चर संपलं तोपर्यंत लाय नशा आया मजा हे गाणं पाठ झालेलं होतं. मंथन ज्यांनी पाहिलाय ते विचार करतील की हे गाणं त्यात कधी आहे? हाच फरक आहे नां सामान्य सिनेमा बघणारांच्यात आणि अभ्यासपूर्ण दश्टिकोनातून सिनेमा बघणारांच्यात. :) असो. गाण्याची गंमत आणि या क्लासमधल्या आणखी काही गंमती पुढच्या पोस्टमध्ये.
 

मुझे जान ना कहो.......

सुंदर गाणं जमायला सूर लागावा लागतो, उत्तम पदार्थ बनण्यासाठी सगळे घटकपदार्थ अचूक पडावे लागतात आणि छान सिनेमा बनायला अभिनयापासून कथेपर्यंत सगळी भट्टी जमून यावी लागते. असा मस्त जमलेला चित्रपट आहे बासुदांचा "अनुभव". बासुदांच्या तीन चित्रपटांच्या सेरीजमधला हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. लग्नानंतर काही वर्षांनी स्थिरावलेलं पती पत्नीचं नातं आणि त्यात काही कारणानं काही काळ उठणारे तरंग असा कथाविषय असाणारा हा चित्रपट. ब्लॆक व्हाईट असुनही कमालिचा सुंदर बनल आहे. हा चित्रपट बघताना आतून एक बेचैन बुलबुला सतत अस्वस्थपणे हलत असतो, याचं कारण याची प्रत्येक फ्रेम चित्रपटाच्या कथेशी इमान राखून समोर येते. चित्रपट बघताना नक्की कसं वाटतं माहित आहे? भर दुपारी तुम्ही कधी एखाद्या निरव ठिकाणच्या डोहावर गेलाय? आजुबाजुला चिटपाखरू नसताना, कसलाही आवाज, हालचल नसताता तो गडद हिरवा खोल डोह कसा कंटाळवाणा चुपचाप पसरलेला असतो? आपल्याला ते पाहून खडा टाकून या चित्रात जरा जीवंतपणा आणावासा वाटतो. तसं हा चित्रपट पहाताना जाणवत रहातं. लग्नानंतर काही वर्षांनी पतीपत्नीचं काहिसं एकसुरी होणारं नातं अगदीं परफेक्ट समोर येतं की आपण या दोघांत तिसरे होउन फिरत रहातो. यातलं गीता दत्तचं वर सांगितलेलं गाणं चित्रपटात इतकं सहजपणानं येउन जातं की आपल्या लक्शातही येत नाही, आपण गाणं पाहिलं. घरकाम करताना एखादी ग्रुहिणी जसं गुणगुणत एका लयीत  काम आवरत असते तसं हे गाणं येतं आणि जातं.  
गाणं दोन भागात आहे, चित्रपटची एकदा नायिका ,म्हणजे तनुजा अंघोळ करताना गुणगुणत असते आणि दुसर्यांदा नायक नायिका म्हणजे संजीव कुमार आणि तनुजा खुप दिवसांनंतरचा जुना निवांतपणा अनुभवत असतात तेंव्हा. यातला दुसरा भाग जास्त तरल झाला आहे. अलिकडे एकमेकांसाठी रिकामा वेळच मिळत नाही अशी सल असणारं, तरूणपणाकडून प्रौढपणाकडे चाललेलं एक तरूण जोडपं, कार्यमग्न पती आणि कलाकार, रसिक पण रिकामपणानं घर सांभाळणारी ग्रुहिणी. सगळ निरस कंटाळवाणं चाललेलं आहे, एकमेकाविरूध्द तक्रार करण्याचंही आता रूटिन बनलं आहे, जे चाललंय त्यात आता काही बदल होणार नाही हे सत्य स्वीकारून एकमेकासोबत रहाणारे पती पत्नी आणि एक दिवस अचानकच तो चुकार निवांत दिवस या जोडप्याच्या आयुष्यात येतो.  ऊन्हाची तलखी पावसाच्या एका सरसरून आलेल्या सरीमुळं कशी धुवून जाते तसं होतं. सगळे शिकवे गिले दूर होतात, अगदी निवांत चाललेल्या या दिवसाची दुपार डोक्यावर येते आणि अचानक पाऊस बरसायला लागतो, बस्स! आणखी काय पाहिजे? बाहेर कोसळणार्या सरी, आणि खिडकीच्या तावदाना पलिकडून डोकावणारा निशिगंध, पाण्याचे टपोरे थोंब माळलेली निशिगंधाची ताजी फुलं आणि हे जोडपं.  केवळ केवळ आणि केवळ इतक्या भांडवलावर हे कमालिचं रोमॆंटिक गाणं येतं. तनुजाचे टाईट क्लोजअप फ्रेममधून हलूच देत नाहीत. गोड दिसणारी तनुजा या गाण्यात,"दो जुडवा होठों की बात कहो आंखो से...मेरी जान" असं म्हणताना आणखिनच खट्याळ गोड दिसलीय.
 

धनाची पेटी

आज माझी धनाची पेटी पाच वर्षांची झाली. पहिली बेटी धनाची पेटी म्हणण्याची पध्दत आहे आपल्याकडे. कोणत्या अर्थानं ते माहित नाही; पण माझ्यापुरतं बोलायचं तर ती माझी खरी खुरी धनपेटी आहे. हिची चाहूल लागली त्या क्शणापासून आम्ही, देवा मुलगीच दे रे बाबा म्हणून विनवत होतो. कारण सांगता येणार नही; पण मुलगीच हवी हा हट्ट होता. लक्श्मी रस्त्यावरच्या लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानात लावलेले इवले इवले फ्रोक आम्ही खुळावल्यासारखे उभे राहून बघायचो. मोठ्या जाणत्या बायका अंदाज लावायच्या की हिला मुलगाच होणार "लक्शणं" मुलाची आहेत. पहिलटकरीण म्हणून डोहाळजेवणं तर दणक्यात झाली. त्यात ते खीर की लाडू प्रकरण प्रत्येक ठिकाणी झालं आणि ठोंब्या लाडूच दरवेळेस पुरीखालून निघायचा. माहेरचं शेवटचं डोहाळजेवण दत्तगुरुंच्या अंगणात केलं या इथे मात्र त्यांच्यासाक्शीनं खीरीनं दर्शन दिलं आणि ती खीर मी मन लावून चाटून पुसून खाल्ली. ज्या क्शणाला डॊक्टरनी सांगितलं "गॊड ब्लेस्ड यु विथ लिटिल प्रिन्सेस" तेंव्हा डोळे वहायलाच लागले. तिचं आणि माझं पहिलं दर्शन झकास झालं आम्ही  एकमेकीला चक्क ओळखलं. मी तिला पाहिलं तर गुलाबी दुपट्यात गुलाबी झबल्यात गुंडाळलेलं हे ध्यान माझ्याकडे टुकू टुकू बघत चक्क हसलं. त्या क्शणाला सगळं विसरुन माझा नवा जन्म झाला. आई होणं हा कोणत्या अर्थानं दुसरा जन्म असतो माहित नाही 
पण माणूस म्हणून पुन्हा एकदा जन्म होतो हे नक्की. कोणाला तरी आपली सर्वार्थानं गरज आहे ही भावनाच ऊर भरून आणणारी आहे.
 इतके सुंदर सुंदर क्शण गेल्या पाच वर्शांत आम्ही एकत्र घालवले की ते ठेवायचे म्हटलं तर बॆंकेची लॊकर तुडुंब वहायला लागतील. ती पोटात असताना "तोत्तोचान"ची पारायणं केली होती कारण मला तशीच चिमखडी हवी होती. आज पुस्तकातली तोत्तोचान घरात बागडताना, चुरू चुरू बोलताना, प्रश्न विचारून भंडावून सोडताना,  मिट मिट डोळ्यांनी "आई तू कित्ती ब्लिलियंट आहेस?" असं कौतुकानं आणि अभिमानानं म्हणताना देवाशप्पथ खुप छान वाटतं. शाळेत आलेल्या पहिल्या नंबर पेक्शाही तिच्या तोंडून तू कित्ती हुशार आहेस. जगात माझ्या मम्मुडीसारखी हुशार कोणी नाही. हे ऐकताना जास्त अभिमान वाटतो. मोठ्ठी झाल्यावर तू कोण होणार? असं विचारलं की मला तूच व्हायचं आहे असं जेव्हा ती प्रचंड अभिमानानं म्हणते तेव्हा आपण जगातल्या हुश्शार बायकांपैकी एक आहोत असं वाटायला लागतं.(आणखी काही वर्शांनी तिचा विचार कदाचीत बदलेल म्हणा! पण सध्या तरी मला मजा वाटते). मुलगा की मुलगी? या प्रश्नाचं खरं सांगायचं तर आजही नेमकं उत्तर देता येणार नाही; पण एक नक्की की आपल्या मनासारख दान आपल्याला मिळणं यासारखं दुसरं सुख नाही.
 

नव्हाळी

गेल्या उन्हाळ्यात
माझ्या दारासमोरचं झाड वठलं
म्हटलं, आता याचं आयुष्य सरलं

वठलेला परतीचा प्रवास
त्यानं मुकपणानं चालू केला
ना तक्रार ना खंत
ना फांदीवरल्या पिलांची ओढ
म्हटल, याला लागली पैलतिराची आस...

अचानकच मग
एक दिवस मेघ सरसरुन बरसले
उन्हाळाही सरुन आता बरेच दिवस झाले
सहजच परवा माझं लक्श त्याच्याकडे गेलं
तर, त्याच्या अंगाव शेवाळलेला हिरवागार कोट!
वठलेल्या झाडाच्याही चार दोन फांद्या
अजून होत्या ओल्या
किलबिलणार्या पाखरांची
चिमण्या बोटात घट्ट धरुन ठेवलेल्या
 

मै और मेरी रेसेपी

लग्न जमवताना आपल्याकडे कुंडली पहायची किंवा जमवायची पध्दत आहे. अगदी तसंच  एखादा पदार्थ बनवण्यासाठी आपलं आणि त्याचं कितपत जमणार आहे हे पहावं की काय या विचारापर्यंत मी आता आले आहे. एक तर हे असे नवीन नवीन पदार्थ बनवायची हौस दांडगी आणि त्यात भर म्हणजे ते कौतुकानं दुसर्याला खाऊ घालायची हौस तर त्याहुन भारी. मुळात रोजचा स्वयंपाक मी करणं आणि इतरांनी खाणं हीच एक रीस्क त्यात नवीन पदार्थ म्हटला की तो बरा बनावा म्हणून माझा मनातल्या मनात देवाचा धावा चालू होतो तर "देवा ही जे काही बनवणार आहे ते खरंच बरं बनु दे" असा घरच्यांचाही  धावा, कारण अखेरीस जे काही बनेल ते चावायचं त्यांनाच असतं नां? बरं नशिब तरी असं दगा दणारं की जो पदार्थ जसा होणं अपेक्शित असतं बरोबर त्याच्या विरुध्द का बरं घडत असावं? म्हणजे चकली हटकून मऊ होते आणि लाडू....जाऊदे काय बोलावं आपल्याच तोंडानं? नशीब कोणी अजून तो फेकून मलाच मारलेला नाही.  
                                      ढोकळा नावाचा पदार्थ तर मोगॆम्बो आहे मेला. कध्धी म्हणून माझ्यावर खुश होत नाही. इतरांचे छान छान जाळीवाले ढोकळे खाताना माझ्या जीवाला जी घरं पडतात ती मलाच माहित. काय नाही केलं याच्यासाठी. जितके म्हणून उपाय सांगितले ते सगळे करुन झाले. अगदी सोड्याची बाटली ओतून झाली, ताकं बरं पासून आंबटढाण पर्यंतच्या सगळ्या प्रकारचं घेउन झालं, चितळेंपासून गिटस फिट्स सगळे यच्चयावत रेडीमेड पीठं वापरुन झाली पण आजही माझा ढोकळा कुकरमध्ये गेला की परतताना पिठलं की वडी? अशा संभ्रमात असल्यासारखा बाहेर पडतो.  त्यावरुन आठवलं, पहिल्यांदा उत्साहानं गुलाबजाम केले होते.  सगळी रेसेपी पुस्तक समोर ठेवुन बनवली असल्यानं जाम कॊन्फिडन्स होता. जेवायला सगळे बसल्यावर गुलाबजामच्या पातेल्यावरचं झाकण दूर करुन भैय्यानं डाव हलवला....खरं तर डाव हलविण्याचा "फर्स्ट ऎटेम्प्ट" केला. डावानं गुलाबजामाच्या पाकाशी इतकी घट्ट दोस्ती केली होती की या प्रेमी युगुलाला एकमेकापासून दूर करण्यासाठी आम्ही सगळे शर्थीचे प्रयत्न केले. अखेर जवळपास फोडून काढावे लागले. ते कडक गुलाबजामही सगळ्यांनी वा मस्त म्हणून खाल्ले. आता वाटतं तिथेच मला सांगायला पाहिजे होतं की बाई गं झालं एव्हढं पुष्कळ झालं पुन्हा या अशा वाटेला तू जाऊ नको. त्यांनी माझा उत्साह वाढवयची चूक केली आणि त्यांच्या खाण्यामुळेच माझा करण्याचा सोस वाढला.  मी काय करु? भोगा (पक्शी खा)आता आपल्याच कर्माची फळं. मध्यंतरी मोमो नावाच्या पदार्थाच्या मागे मी हात धुवून लागले होते. मी नक्की काय करणार आहे बाकीच्यांना लक्शात न आल्यानं सगळे माझी नजर चुकवून मोमो नावाचा गनीम इंटरनेटवर गाठ पडतोय का? ते पहात होते. म्हणजे आपल्याला नक्की कशाला तोंड द्यावं लागणार आहे याचा बिचारे अंदाज घेत होते. शेवटचा प्रयत्न म्हणून बारीक आवाजात म्हणूनही झालं की अगं तो पदार्थ नॊनव्हेज असतो म्हणे, आपण शाकाहारी नां?मी पण किती तयारीची म्हटलं, मी त्याची शाकाहारी रेसेपी मिळवली आहे. करतात काय? केलं की खातात चुपचाप हे इतक्या दांडग्या अनुभवानंतर मला बरोब्बर समजलं आहे. कधी तरी हौसेनं यांना विचारलं की आज काय करु जेवायला? तर म्हणतात "पचण्यासारखं काहीही कर" मी मात्र त्यांच्या या असल्या टोमण्यांना अजिबात भीक घालत नाही माझा नवे पदार्थ करण्याचा उपद्व्याप चालूच ठेवते. रविवार जवळ आला की या रविवारी काय बेत करायचा या विचारानं शुक्रवारपासूनच माझी झोप उडते. बाय दी वे, या रविवारी आमच्याकडे फक्कड बेत आहे, येताय जेवायला?