जानुची गोष्ट

जानूनं दार उघडलं आणि रितूला "गुड नाईट" म्हणून निरोप दिला. रितूनं विचारलंही,"आर यू ओके बेबी?" त्यावर जानून हसत सांगितलं,"वन थाऊंजंड पर्सेंट, बा<<<य सी यू टु...मा....रो" म्हणत दार धाडकन लावून घेत ती तशीच भेलकांडत आत आली. तेव्हढ्या वेळातही बाजुच्या म्हातार्यानं दार उघडून तिच्या येण्याची दखल घेतल्याचं तिला जाणवलं आणि तोंडून कधी नव्हे ते प्रकट शिवी आली,"स्साला". कशीबशी आत येत ती बेडवर आडवी झाली आणि उलट सुलट विचारांच्या गरगरीनं झोपेच्या आधीन झाली. मनातले उलटे सुलटे विचार तिला झोपू देत नव्हते आणि मद्याचा अंमल तिला जागू देत नव्हता. अशाच भिरभिर अवस्थेत कधीतरी ती झोपून गेली. सकाळी जाग आली तेंव्हा सुलभामावशी घर आवरत होती. खरं तर तिला जाग आलीय की नाही हेच आधी समजलं नाही. तिच्या संवेदना जणू संपून गेल्या होत्या. मात्र "काफी करू का ताई?" असा सुलभामावशीचा परिचित आवाज कानावर पडला आणि खरंच जाग आलीय याची खात्री पटली. तिच्या अवताराकडे पाहून सुलभामावशी काळजिनं म्हणाल्या,"तब्येत बरी नाही का ताई?" तिला काही उत्तर न देताच जानू बाथरुममध्ये शिरली. गरम पाण्याच्या शॊवरखाली बरं वाटेल म्हणून उभी राहिली आणि उलट विचारांचा गुंता आणखिनच सुटा व्हायला लागला. सुधेंदू तर म्हणाला होता की,’एक दोन पेगनंतर यु विल बी ऒल राईट, ये गम, तकलिप सब हवा में उड जाएगा बेबी. हॆव इट’ रात्री काहीकाळ वाटलंही तसंच पण मग घरात आल्यावर पुन्हा त्याच गुंत्यात मेंदू गुरफटत गेलाच. आता अजून डोळे उघडले नाहीत तोवर परत तेच विचार आणि तेच कढ....रात्री गाडीत रितू विचारत होती,"तुला आशु गेलाय याचं वाईट वाटतंय की तो समरसारखाच गेला याचं? तू तुलना करतेयस तुझ्याच भूतकाळाची तुझ्या वर्तमानाशी. समर वॊज पास्ट आणि आशुही लवकरच तुझा पास्ट बनेल, कोणाच्या जाण्यानं कोणाचं आयुष्य थांबत नाही जान्हवी आणि ते थांबुही नाही. कोणा समर आणि आशुपुरतं आयुष्य जगायला देवानं तुला जन्माला घातलेलं नाही. जिसको जाना है बेबी वो जायेगाही तकलिफ में रहेगी तू. समरने अपनी जिंदगी ढुंढ ली आशुभी ढुंढही लेगा. तू अकेली हो जाएगी. ज्यादा सोच मत...." हे आणि असंच काही बाही रितू जानुला समजावत राहिली होती. त्यातलं काही डोक्यात शिरत होतं काही नव्हतं. सगळं पटत होतं आणि तरीही पटत नव्हतं. रात्री झोपेतही सतत आशु आणि समर आळीपाळीन दिसत राहिले. समर म्हणत होता,"कम ऒन जानू, तू एकटीच परदेशी सेटल होणार नाहीएस. तू तिकडे आलीस याचा अर्थ तू तुझी नाती तोडलीस, जबाबदार्या झटकल्यास असा होत नाही. थिंक शोनू. मी जाणार आहेच तुही बरोबर असावस असं वाटतं. आलीस तर तुझ्याबरोबर नाहीतर तुझ्याशिवाय....प्लिज जानू नाही म्हणू नको" समुनं लाख विनवण्या केल्य होत्या. पण त्यावेळेस आपल्याच डोक्यावर कसलं भूत चढलं होतं देव जाणे. भूत म्हणण्यापेक्षा जबाबदारी वाहून नेण्याची नशा चढली होती. बाबांच्यामाघारी बाबा बनून घराला सावरण्याची धुंदी. घरी येणारे जाणारे, नातेवाईक सगळेचजण नावाजत म्हणत, "जानू भक्कम आहे म्हणून बरं आहे." ते ऐकताना आणखी कणखर वाटायचं. धाकट्या भावाला, धनुला, शिकवायचं आणि त्याच्या पायावर उभं करायचं स्वप्न होतं. शिकवायचं म्हणजे खरं तर त्याचं शिक्षण शेवटच्या पायरीवर होतं. तरीही आपल्याशिवाय धनू आणि ममाला कोणी नाही ही जाणिव मनात कुठेतरी सुखीही करायची. त्याच धुंदीत तिनं समरला नकार दिला. धनुलाही भरून वगैरे आलं होतं, "यु डिझर्व्ह मच बेटर" म्हणत त्यानं धीर दिला होता. समरला नकार दिला तो दिवस जानू कधिही विसरली नाही. अखेरचा आणि निकराचा प्रयत्न करावा म्हणून समरनं तिला भेटायला बोलवलं होतं मात्र त्यावेळेस तर आणखिनच ठामपणानं नकार देउन जानू घरी आली होती. समरला ती म्हणाली होती,"मी पूर्ण विचारांती निर्णय घेतलाय समर. आता माझं पाऊल मागे ओढू नकोस" समर गेला त्या दिवशी तिला एक अनामिक रितेपणा जाणवायला लागला आणि नकळत डोळे घळघळा वहायला लागले. ममाला समजलं होतं कदाचित जानू रडतेय ते पण ती काही बोलली नाही. जानुला मनातून वाटत होतं की मामा येउन पाठीवरून हात फिरवून म्हणेल,"सगळं ठीक होईल बेटा" पण मामा खोलीत आली आणि जानुला झोपलेली पाहून दार ओढून घेउन परत गेली. त्यामुळे तिला आणखिनच तुटल्यासारखं झालं. समर गेल्यावर तो मेल करेल, फोन करेल याची तिला खात्री होती; पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही. जायच्या आदल्या दिवसापर्यंत तळमळणारा समर तिकडे गेल्यावर जणू हवेत विरघळून गेला. त्यानं सगळ्यांना मेल केले फोन केले पण जानुला एकही फोन कधिही केला नाही. जसं काही डायरीतलं नकोसं पान फाडावं तसं जान्हवी हे पान त्यानं काढून टाकलं असावं. हळूहळू हे शल्य जानुला बोचायला लागलं. एक दिवस बोलता बोलता ती निमाला बोललीही की समरनं तिला किमान एखादी मेल करायला हरकत नव्हती. त्यावर निमा म्हणाली,"हा निर्णय तुझाच होता जानू. समरला तू हवी होतीस तुलाच तुझा कोष तोडायचा नव्हता. आता तक्रार का करतेस? त्यानं तुझ्याशी संपर्क नाही ठेवला तरी खरं तर आता तुझं काही बिघडायला नकोय नाही का?"..................


........दिवस भराभर उलटून गेले. धनूचं शिक्षण झालंे, त्याला दिल्लीत चांगली नोकरीही मिळाली. त्यानंतर सहा आठ महिन्यातच त्यानं छान स्थळं वगैरे बघून लग्न केलं. त्याच्या लग्नाच्यावेळेस जानू म्हणालिही की,"काय गडबड आहे धनू? अजून एखाद दोन वर्षांनी लग्न नाही केलं तरी चालेल" त्यावर धनूनं तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की,"मला एकटं रहायचा कंटाळा आलाय. तिकडे दिल्लीत मी एकटा असतो, माझे जेवणा खाण्याचे हाल होतात शिवाय आज काय आणि आणखी दोन वर्षांनी काय लग्न करायचंच आहे. मला तुझ्यासारखं आझाद पंछी रहायचं नाही बाबा". यावर जास्त वाद न घालता जानुनं रात्री जेवताना ममालां सांगितलं यावर कधी काही न बोलणारी ममा तिला तटकन म्हणाली,"हा ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे जान्हवी, त्यात एकमेकांनी तोंड खुपसू नये." हे वाक्य ममा ज्या पध्दतिनं बोलली त्याची धार जान्हविच्या मनाला झर्रकन कापत गेली. एक सेकंदभर तर ममा आपल्याला काही टोला हाणू पहातेय कां असंही वाटलं. एकंदर धनुचं लग्न तापदायक प्रकरणच झालं. धनू आठ दिवसांच्याच सुट्टीसाठी आला होता, तेव्हढ्यात ममानं चार चार मेरेजब्युरोत त्याचं नाव नोंदवलं. मैत्रिणिंना फोन करकरून सांगितलं. ममाची ही धांदल जानुला ठुसठुसत होती हे असं कां हे तिलाही उमगत नव्हतं आणि एक दिवस त्याचा उलगडा अगदी अचाकनपणानं तिला झाला. त्या दिवशी प्रभामावशिला मामा धनुला स्थळं बघण्याविषयी सांगत होती. प्रभामावशी ममाला म्हणाली एकदम धनुचं लग्न कसं काढलंस? जानुचं लग्न नको व्हायला? त्यावर ममा म्हणाली,"तिल नवरा बघणं माझ्या कुवतीबाहेरचं आहे. आम्ही काय बाई सामान्य माणसं." एकाएकी असा वर्मी घाव बसल्यानं जानू विचारात पडली, याचा अर्थ काय? ममाला तिनं प्रभामावशीसमोरच विचारलं तर ममा म्हण;ाली,"तुझ्या आयुष्यातले सगळेव निर्णय तुझे तू घेत आलीस जान्हवी. बाबा होते तोपर्यंत तुम्हा दोघांचं सगळं चालायचं. मला कधी विचारलंत? साधं शाळेतल्या स्पर्धेत भाग घ्यायचा झाला तरी मला विचारायची तसदिही घेतली नाही, समरशी नातं मोडलंस त्यावेळेसही आधी एका शब्दानं सांगितलं नाहीस आणि नंतरही काही बोलली नाहीस. कदाचित तू माझ्याशी असलं काही बोलावं इतकी माझी लायकी तुला वाटली नसेल." संतापानं थरथरणारी ममा मोठा श्वास घेउन थांबली. तिचं हे रूप प्रभाला नवं होतं आणि जान्हविलाही. दोघी आवाक होउन पहातच राहिल्या. ममा पुढे म्हणाली,"मी तुझी आई होते जान्हवी. पहिल्या पहिल्यांदा मलाही तुझ्यापासून तुटलं जाण्याचा त्रास व्हायचा, तुझ्यात ना माझं रूप आलं ना गुण. तू तुझ्या बाबांची डुल्पिकेट म्हणून जन्माला आलीस आणि बाकिच्यांनीही याची जाणिव मला सतत करून दिली. मी अगदी सामान्य रूपाची आणि गुणाची होते पण मी तुझी आई होते याची जाण ना इतरांनी राखली ना तू. माझ्या आयुष्यातून तुला वजा करायला मला खुप कष्ट पडले जान्हवी पण तुला तर तो त्रासही झाला नाही कारण मी तुज्या आयुष्यात कधी नव्हतेच." इतकं बोलून ममा तिच्या खोलीत निघून गेली. आज पहिल्यांदाच जान्हविला आपल्या आयुष्यात काहीतरी विसंगती होती हे जाणवलं. विचार केला तर ही वस्तुस्थिती होती. तिनं ममाचा "आई" म्हणून विचार कमीच केला होता. ममाला "ममा" म्हणायचं हे देखिल बाबानंच ठरवलं होतं. बाबा दिसायला खुपच देखणा होता, हुशार होता आणि त्याच्या घरची परिस्थिती सधन होती याऊलट आई दिसायला अगदीच सामान्य म्हणावी अशी. शिक्षण म्हणायचं तर बीएची पदवी होती पण परिक्षा दिली आणि लग्न झाल्यानं तिनं बाहेरचं जगही पाहिलं नव्हतं. पहिल्याच वर्षात जान्हवी झाली. दिवस गेले तेंव्हा बाबानं खरं तर आईला खुपच झापलं होतं. इतकी कशी वेंधळी म्हणून हिणवलं होतं. इतकंच नाही तर हे मूल नको असंही सांगितलं होतं मात्र ममानं सगळा त्रास सहन करत जानुला जन्म दिला. बाळाला बघायला अनिच्छेनं आलेला बाबा बाळाचं गोंडस रूप पाहून हरवूनच गेला. बाळ बघायला येणारा प्रत्येकजण "बाबांसारखीच गोरीपान झालीय" म्हणून कौतुक करत होता. सुरवातिला ममलाही याचं काही वाटत नव्हतं पण जानू मोठी व्हायला लागली आणि तिच्या आयुष्यातलं बाबाचं स्थान पाहून मनात कुठेतरी झुरत राहिली. धनू झाल्यावर ती सावरली. धनू दिसायला ममासारखाच झाला होता. शिक्षणातही अगदी हुश्शार नाही पण ठीकच होता. नातेवाईक, सासूबाई सतत धनू आणि जानूची तुलना करत. जानू त्या स्तुतीनं सुखावत असे तर धनू आत येउन आईला बिलगत असे. धनू अगदी ममाज बॊय होता. सुरवातिला जानुचा तिरस्कार करणारा धनू वय वाढलं तसा जानुचा चांगला मित्र बनला. म्हणजे जनुला तसं वाटत राहिलं. बाबा असेपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. पण अचानकच बाबा गेला आणि घडी विस्क्टली. ती सावरायची जबाबदारी कोणी न सांगता जानुनं स्वीकारली. त्यावेळेस तिनं असंच ग्रुहित धरलं होतं की बाबा गेल्यावर ममा एकटी सगळं सांभाळुच शकणार नाही. हे घर सांभाळणं आणि चालवणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्यावेळेस आपण ममावर कुरघोडी करतोय असं तिला जाणवलंही नाही आणि आज ममानं इतक्या स्पष्टपणानं सगळं बोलल्यावर तिला आजवरचं तिचं जबाबदार असणं फुकाचं वाटायला लागलं. त्या दिवसांनंतर सगळं बिनसतच गेलं......
 

2 comments:

Alok said...

wa sunder pudhacha bhag wachanyachi utsukata ahe

shinu said...

@ alok
thx alok. lawakarach pudhache bhag taken.