बायामाणसांचं ब्युटी पार्लर

माणूस नावाच्या प्राण्याला अन्न,वस्र, निवारा गरजेचा असतो तर बाईमाणूस नावाच्या प्राण्याला त्यासोबत ब्युटी पार्लर नावाची additional  असते. अर्थात याला अपवाद असतीलही पण हे सर्वसामान्य बाईमाणसांबद्दल आहे.
असो, तर ब्युटी पार्लरचं आपलं एक भारी जग असतं.
व्हरायटी तर किती? अगदी गल्लीबोळातल्या बटबटीत पार्लर्स  पासून हायफाय  ब्युटी सलोन पर्यंत. ध्येय एकच, खुर्चीतल्या स्त्रीला  यथाशक्ती मिस इंडिया, मिस युनिव्हर्स काहीच नाही जमलं तर मिस गल्ली बनवायचं. 
गल्लीवाल्या पार्लरचा मामला म्हणजे हात दाखवा बस थांबवा. अपॉईंटमेंट वगैरेचे नखरे नाहीत. डायरेक्ट आत घुसायचं मग आतली एखादी कोरीव भुवयावाली गालावर पिंपल असलेली मुलगी नखरा दाखवत विचारते,"क्या करने का है" (हे मुंबईतलं पार्लर त्यामुळे चिरफ़ाड राष्ट्र भाषेची...बाकी शहरात त्यांच्या त्यांच्या हेलमधल्या भाषा) मग आपण अगदी लाचारीनं सांगायचं सिर्फ़ आयब्रो...वॅक्सिंग..."वेट करना पडेगा. ये कस्टमरका अभी है फ़िर आपका" आपण- "कितना टाईम लगेगा" कोरीव भुवया आणि पिंपलवाली"कुछ बोल नहीं सकते...ये देखो ये आंटी का टच अप है फ़िर इनका आईब्रो फ़िर इनका हेअर कट है....ए कांचन तू लेती क्या रे? कितना टाईम है तेरेको" कांचन पडद्या आडून वसकन "मुझे टाईम लगेगा अभी ये दीदी का पेडिक्युअर भी है" मग कोरिव भुवया आणि पिंपलवाली आपल्याला सांगते,"अभी कम से कम आधा घंटा तो रूकना पडेगा" मग आपण त्या नऊ बाय नऊ मधे इतर आंट्या, म्यॅडमा आणि दीद्यांसोबत वेट करत स्वेटत बसायचं. यथावकाश आपला नंबर येतो. आईब्रोज करायला बसल्या बसल्या ती आपल्याला म्हणते,"दीदी लाश्ट टाईम किधर से करवाया, शेप बिगड गया" पूर्वी या वाक्याला मी घाबरायची आता सरावले आहे. आता सांगते बिनधास्त. तुझ्याचकडून तर केल्या. मग ती सटपटते आणि आठवायला लागते. मग आपण द्यायचं बिनधास्त ठोकून की, अगं नाही का रविवारी खूप कस्टमर होते तेंव्हा उभ्या उभ्या येऊन गेले. मग ती चुपचाप आपल्या आईब्रो दोर्‍यानं कोरायला लागते. मात्र जर तुम्ही माझ्यासारखे सरावलेले नसाल आणि भाबडेपणानं लाश्ट टाईम आईब्रो किधर से केले हे सागितलं की तुम्हाला ती बिघडलेल्या आकारातला केस न केस हिशेब करून दाखवणार म्हणून समजा.
इकडे ब्लिचिंग, फ़ेशियलला गेलं की धमाल असते. सुरवातीला उडप्याच्या हॉटेलसारखा मेन्यु तोंडीच फ़ाडफ़ाड  सांगतात. अमूक ब्लिच तमूक ब्लिच आणि मग अगदी त्वचातज्द्न्य झक मारेल अशा गंभीर थाटात आपल्य त्वचेला सध्या कोणत्या ब्लिचची आणि फ़ेशियलची गरज आहे हे सांगतात. जनरली हे ब्लिच किंवा फ़ेशियल त्या पार्लरमधे नवं आलेलं आणि खपवायचं असल्यानं किंवा महाग असलेलं असतं. आपण त्यांना बळी न पडता  आपल्याला हवं ते निवडलं की नंतर आपल्या स्किनचा पोस्ट मॉर्टेम ऐकावा लागतो. दीदी स्किन कितनी टॅन हो गयी है...दीदी स्किन बहुत ड्राय हो गयी है...दीदी डार्क स्पॉट कितने है...आणि जर त्यांच्या मर्जीनुसार निवड केली तर दीदी देखा स्किन कितनी ग्लो कर रही है हे दहा दहा वेळा ऐकावं लागतं. असो. तर आपलं फ़ेशिय होईपर्यंत त्या निर्मला, विमला, कांचन, प्रिती यांच्या गॉसिप गप्पा ऐकायच्या....त्यात दुपारच्या जेवणानंतर गेलं तर या गप्पांना  त्यांच्या ढेकरांच्या पार्श्वसंगीचा वेगळाच साज चढवलेला असतो. त्यांच्या घरातले प्रॉब्लेम, पार्लरवाल्या मालकिणीचा जाच, आजूबाजूच्या दुकानदारांची लफ़डी....हे सगळं ऐकता ऐकता डोळा लागला तर उत्तम नाही तर तुका म्हणे करत ऐकायचं सगळं...बरं दुसरीकडे एफ़  एम सुंदरी आपली आपणच एकटीच कोकलत असते, जमतील तशी बकवास गाणी लावत असते...कधी कधी आपल्यासोब आणखी एकदोन कस्टमर चेहरे घासून घ्यायला आलेले असतात. त्या दोघी मैत्रिणी असतील तर मग त्यांच्या सोसायटीतल्या माता का जगराता पासून झुंबा क्लासपर्यंतच्या गप्पा ऐकाव्या लागतात.  तासा दोन तासाच्या घासाफ़ुसीनंतर आपण ऐश्वर्या काय दिसेल इतक्या सुंदर होऊन बाहेर पडतो. साधारण हजारच्या आसपास बिल होतं आणि पार्लरबाहेर आल्यावर काळं कुत्रंही हिंग लावून विचारत नाही.

दुसरं जरा याच्या वरचं पार्लर तिथे फ़ोन करून वेळ सांगून जावं लागतं. आकारानं हेही फ़ार मोठं नसतं पण जरा बरी टापटीप असते. अटेंडंटनां युनिफ़ॉर्म असतात. आतलं इंटिरियर बरं असतं. बचबचा कोणी बोलत नाही. आपण जायचं जितकं सांगाल तितकं ते करतात आणि पैसे देऊन शांत डोक्यानं त्यांच्या नव्या पॅकेजचा कागद पर्समधे घालून परत यायचं. इथेही बाकी तपशिल सोडला तर आपल्या स्किनला आणि केसांना नेमकी कशाची गरज आहे हे आवर्जून सांगितलं जातं
तिसरा प्रकार म्हणजे स्टायलिश सलून. इथे कम्पलसरी बाय अपॉईंटमेंटच. ती नसेल तर दारावर टकटकही नाही करायची. यांच्या रितसर मेंबरशिप असतात, त्याचे डिस्काऊंट असतात. आपण आपल्या वेळेत जायचं. साधं सुधं काही असेल म्हणजे आईब्रो वगैरे तर थेट करून मोकळं पण केसाशी त्वचेशी संबधीत काही असेल तर मात्र रितसर एक्झमाईन वगैरे केलं जातं. मग जी करणारी असते ती थेरपिस्टला सूचना देते, काय काय करायचं याच्या. इथेही पर्याय असतातच पण त्याचं स्टायलिश रेटकार्ड असतं. आपण निवडयाचं आणि शांतपणे त्यांच्या सपूर्द व्हायचं. पुढचा तास दोन तास आपल्याला हवं त्या टेम्प्रेचरचं पाणी, कॉफ़ी, चहा, म्हणजे हवा तो चहा हं, अगदी ब्लॅक टी, हर्बल टी काहीही, सॅंड्वीच - तेही हवं तसं, म्हणजे ब्राऊन ब्रेड, डाएट बटर (?) वगैरे सहितचं मिळत रहातं. इथल्या थेरपिस्ट तुमच्याशी गरजेपुरतं बोलतात. सर्वत्र अंधार वाटावा असा उजेड असतो. मंद संगीत असतं. सगळीकडे उगाचच साठलेला उच्चभ्रुपणा असतो. इथेही आपल्या स्किनला आणि केसाला नेमकी कशाची गरज आहे हे सांगितलं जातंच. पण आव असा की बघा बुवा आम्ही काही गळ्यात मारत नाही तुम्हीच निवडा. काही काही सलोन ही युनिसेक्स असतात. ज्यांना आपलं डोकं कोणी बाप्या चेपून देतोय किंवा आपल्या टाचा घासून पेडिक्युअर करून त्याच्या नखांना नेलपॉलिश लावतोय यानं संकोचल्यासारखं होत नाही त्या जातात बिनधास्त अशा सलोनमधे. मात्र मेलस्टायलिस्ट कडून केस कापून घेणं, केस शॅम्पू करून घेणं किंवा केसांच्या ट्रिटमेंट घेणं नवखं राहिलेलं नाही. असो. यावर एक स्वतंत्र पोस्ट होईल इतकी मोठी या विषयाची व्याप्ती आहे :D
 याशिवाय आणखि एक पार्लर प्रकार म्हणजे फ़िरतं पार्लर. घरोघरी जाऊन सौंद्यर्यसेवा देणार्‍या पार्लरवाल्या. यांना फ़ोन केला की सांगितल्या वेळेला मोठी पिशवी खांद्याला लटकावून या दारात हजर होतात. या पिशवीत सगळी अस्त्रं, शस्त्रं असतात. मग आपल्याला सुंदर करता करता यांच्या घरगुती गप्पा सुरू होतात. जनरली अशा घरी येतात त्या मुली वर्षानुवर्ष येऊन ओळखिच्या झालेल्या असतात. त्यामुळे मग अगदीच घरगुती वातावरणात हा सौंदर्यवृध्दी सोहळा पार पडतो. आपल्या घरात लहान मुलगी किंवा सासू, किंवा आई असेल तर त्यांच्या नखांवर कॉम्ल्पिमेंटरी नेलपॉलिश चढतं. हा प्रकार त्यातल्या त्यात दोन कारणांसाठी सर्वात जास्त सुसह्य असतो कारण एकतर एफ़ एम न लावायचा निर्णय आपल्या हातात असतो. दुसरं म्हणजे कोणतंही गल्ली किंवा सोसायटी गॉसिप ऐकण्याची सक्ती नसते. पण ब्युटी पार्लरमधे जाऊन त्या नंदा, कांचन किंवा प्रितो कडून आईब्रो कोरून घ्यायची मजाच वेगळी असते हे मात्र खरं. तुम्ही त्वचा तज्ञ  असाल तरिही तुमच्या त्वचेबद्दल न्युनगंड तयार करण्याचा जबराट आत्मविश्र्वास या मुलिंत असतो. यातली एखादी आपल्याला खूप आवडत असते (सहज हं) किंवा एखादी डोक्यात जात असते (उगाचच हं) कोणीतरी किती वचवच करते असं वाटत असतं तर कोणीतरी मंदा (मंद हालचालवाली) वाटत असते. मग अचानकच एखाद्या भेटीत या मुलितली एखादी गायब होऊन दुसरी आलेली असते. हळूहळू या सगळ्याचजणी गायब होतात. दुसर्‍या येतात. नावं वगळली किंचित स्वभाव सोडले तर बाकी सगळं आहे तसंच असतं. वर्षानुवर्ष. मग कधीतरी कुठेतरी दुसर्‍या एखाद्या पार्लमधे इकडची एखादी मुलगी भेटते. नाव माहित नसतं पण चेहरा ओळखी ओळखीचा वाटत असतो. ती मात्र आपल्याला बरोब्बर ओळखते आणि म्हणते"अरे दीदी इधर? मुझे पेहेचाना क्या? मैं वो शीतल म्यॅडमके पार्लरमे थी नां" मग आपली ट्युब पेटते (कधी पेटतही नाही पण ती इतकी आपुलकीनं बोलत असते की आपण तिला ओळखलं नाही हे सांगवत नाही) आपण तिला विचारलं की ते पार्लर का सोडलंस तर तिच्याकडे शीतलम्यॅडच्या तक्रारींचा पाढा असतो. हा पाढाही जनरली तोच असतो म्हणजे, देखो नां, वो म्यॅडम पैसे बढाकरही नहीं देती थी,.उपर से छुट्टी के पैसे काटती थी, नऊ नऊ घंटा काम करती थी मैं सिझन में फ़िर भी ओव्हर टाईम आधाही देती थी. अब इधर अच्छा है असं म्हणत पाढा संपतो. तिकडे शितलम्यॅडमकडे आलेली एखादी नवी प्रितो एखाद्या दीदीला आधीच्या पार्लरवाल्या म्यॅडमबद्दल हेच सांगत असते.....








सर्व  छायाचित्रं  गुगलच्या  सौजन्यान.

 

12 comments:

Sangitha Aanand said...

Loved the post Neha... Felt as if I just visited one and came back!Truly engaging and humorous as well.

शिनु said...

Thank you Sangita Anand. Such nice words always inspire me:);>

arogya.com said...

Aksharshaha ..... Asach asta sagla !!

शिनु said...

थॅन्क्यु कीर्ती. खरंच एक अजब जग असतं.... :)

तृप्ती said...

Loved the post. Could relate very well :)

Unknown said...

Wah kharach mast lihilay...agdi purn satya...aatach koriv bhuvya ani pinpal valya mulila la bhet deun alyasarkh vatatay. :)

शिनु said...

धन्यवाद तृप्ती.

शिनु said...

धन्यवाद ज्योती.
ब्लॉगवर स्वागत.
वाचते रहो.कॉमेण्टते रहो. :)

Unknown said...

खूपच छान.��������

शिनु said...

ब्लॉगवर स्वागत बागेश्री. :)
धन्यवाद.

meg said...

Hahahaha... mobile peksha motthya screen var vachala ki mala jaast majaa yete... toch blog pan navyane khup hasvun gela...
aaj khup divsanni nivaant chakkar maarli...purviche divas athavle... agdi gulabjam chya blog wale..
to ek audio pan eikaycha yashwant cha...

Srikant Kekare said...

हाहाहा,
मस्त जमलंय! जवळपास असेच अनुभव असतात आम्हालाही। आता एनरीच वगैरे आल्याने दुसऱ्या बाजूच्या गवतालाही तेवढीच हिरवळ असल्याचं जवळून बघता येतंय।