धर्म, संस्कार इत्यादी

हा लेख म्हणजे कोणत्याही धर्मावर, त्यांच्या चालीरीतिंवर, संस्कारांवर टिपण्णी नाही. असेलच आपल्याच माणसांचा (आपल्या म्हणजे हिंदू वगैरे) असणारा गोंधळ आहे. गेली काही वर्ष सातत्यानं ही गोष्ट जाणवत होती आणि डाचतही होती. निमित्त झालं गुढीपाडव्याचं. सर्वधर्मसमभावाची व्याख्या दुसर्‍या धर्माला आपलं म्हणत आपल्याच धर्माला आणि त्याअनुषंगानं येणार्‍या संस्कारांना दूर लोटणं आहे का?

प्रसंग पहिला-ख्रिसमसला दोन दिवस आहेत. घाईनं आणि लगबगीनं सोसायटीतल्या उत्साही मैत्रिणींनी गाठलं,"अगं यंदा ख्रिसमसचं काय करायचं आहे? तुम्ही कल्चरलवाले काही करणार नसाल तर आम्हीच करू पुढाकार घेऊन सगळं. अखेर आपल्याच मुलांना मज्जा येणार आहे ना? त्यांना आवडतं गं असं सांताक्लॉज वगैरे सगळं". ख्रिसमच्या आदल्या रात्री खंजिरी वाजवत एक सांताक्लॉज सोसायटीतल्या एका कॅथलिक घरात गेला. ज्या दोन तीन पोरांनी सांताक्लॉजला पाहिलं ती धावत खाली गेली तर हा सांता चक्क दूर्लक्ष करून चालता होत होता अखेर पुन्हा मागे येऊन टेकवल्यासारखी दोन चॉकलेटं देऊन गेला. असो. ख्रिसमसची पोरांची पार्टी जोरदार झाली. यानिमित्तानं मफ़िंग्ज, कोल्ड्रींग, स्नॅक्स असा जोरदार कार्यक्रम आयांनी स्वखर्चानं केला. गंमत म्हणजे सोसायटीत तीन ख्रिश्चन घरं पण यातलं एकही मूल किंवा आई या सेलिब्रेशनमध्ये नाही. असो. तर ख्रिसमस जोरदार साजरा झाला.

थर्टीफ़र्स्ट- अरे आपली सोसायटी काही करणार आहे की नाही? किंवा आपण जाऊ नां कुठेतरी एखाद्य रिसॉर्टमध्ये किंवा किमान "डिनर"तरी एकत्र घेऊ. प्लॅन खटाखट बनतात आणि एरवी बिझी असणारी मंडळी या रात्री आवर्जून येतात. खान पान, मौज मस्ती, नाच गाणं धमाल मस्ती पहाटे कधीतरी घरी येऊन पाठ टेकली जाते आणि नव्या वर्षाची सुरवात जड अंगानं आणि आळसटलेपणानं.

गुढी पाडवा- आदल्या दिवशीपर्यंत सगळेच अनुत्साही. ज्या चारजणी कल्चरलमध्ये आहेत त्याच धावाधाव करून काठी आण, कापड आण, मिठाई आण असं करत आहेत. सकाळीही सगळ्यांना या या म्हणून निमंत्रण द्यावं लागतंय. घरांच्या खिडक्यांतून सगळे डोकावून बघत आहेत मात्र खाली येऊन कोणी सहभागी होत नाही. जणू काही हे सगळं करण्याची जबाबदारी केवळ कल्चरलवाल्यांचीच आहे. कशाला लागतात आमंत्रणं? होळी खेळायला, गरबा नाचायला, ख्रिसमस साजरा करायला लागतं का आमंत्रण? तिथे अगदी आपण नाही गेलो तर जगबुडी होईल असा आव आणि इथे आपली परंपरा, रीत साजरी करायला आमंत्रण कशाला लागतं? हे सगळीकडेच पहायला मिळू लागलं आहे. आपलं सगळंच टाकावू आणि इतरांचं सगळं ग्रेट असं का? आपली संस्कृती रसातळाला जाण्यासाठी बाहेरच्या कोणाची गरजच काय? आपल्यातलेच हे पुढारलेले महाभाग बास आहेत. विचारानं पुढारलेलं असणं म्हणजे आपल्या रितीभाती सोडणं असतं कां? आता हे सगळं वाचून मी कोणी कट्टर शेंडीवाली आहे असं वाटून घेऊ नका. माझ्या आईनं, माझ्या सासूबाईंनी जितक्या कसोशिनं सगळं जपलं तितकं तर मलाही (कोणालाही) करता येणार नाही पण जे आपण करू शकतो ते आवर्जून करायला, जपायला काय हरकत आहे? पुढच्या दोन पिढ्यांनतरचा विचार केला तर चित्र काय दिसेल? आपल्याच मुलांना काही पायाच नसेल. आपला धर्म,जात आणि संस्कृती आपल्याला एक भक्कम पाया देते हे तर नाकारता येणार नाही? आपण कितिही आव आणला तरी या सगळ्यापासून पूर्ण अलिप्तता बाळगणं कठीण आहे. असो. एकच सांगावसं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करता येत नाही आणि ज्याचं सेलिब्रेशन करता येत नाही ते हद्दपारच करायचं असंही नाही. आपणच आपल्या रिती जपल्या पाहिजेत अगदी कडवेपणानं नाही मात्र जसं जमेल तसं, पण जपायला हवं. अर्थात यावर मतं मतांतरं असतीलच पण मला जे जाणवलं ते प्रकट करावसं वाटलं.
 

4 comments:

हेरंब said...

आणि अशा विषयांवर बोलायला लागलं की लोक तुम्हाला मागासलेले, हिंदुत्ववादी वगैरे समजतात हहा तर अजून एक कहर !!

meg said...

Kiti mazya manatala bollis! aga... mhanunach tar especially mumbai madhe marathi mansachi kimmat kami vhayla marathi manusach karnibhoot aahe.

tumhi swatach abhiman balagla nahi, swatachya rudhi, paddhathi sodun dilyat tar baherche yeun atikraman karnarach.

aaj nonveg khayla brahman manus saglyat pudhe!! :)

शिनु said...

हेरंब,
हो नां रे हे तर आणखी भलतंच दुखणं. म्हणजे आपलीच संस्कृती मिरवणं, तिचा अभिमान बाळगणंही कसलातरी वादी बनवतं. म्हणजे इतरांचं आपण कौतुक केले की आपण कसले भारी लिबरल आणि आपल्या संकृतीचं जतन करू म्हटलं की लग्गेच ही लेबलं येऊन चिकटतात, शिवाय आमची संस्कृती अशा थोतांडात नाही ती व्यापक आहे वगैरे बुडबुडेही सोडले जातात. खुप वाईट वाटतं.

शिनु said...

मेघना,
खरंय. इथे आल्यापासूनच मुंबई ही महाराश्ट्रात वाटतच नाही, ती एक वेगळीच संस्कृती असणारी "सिटी" वाटतेय. एरवी गुढीसाठी साखरेच्या माळा "शोधाव्या" लागल्या यातच काय ते आलं. इथे नां एकच संस्कृती आहे, "मॉल". इथे ज्या गोष्टीचं मार्केटिंग होऊ शकतं अशाच सणांचं सेलिब्रेशन आणि माहौल होतो. ठीकच आहे म्हणा पण आपण नेटानं चालूच ठेवू की, नको मिळू देत साखरेच्या माळा थर्माकोलच्या आणून गोड मानू त्यात काय? आपण महाराष्ट्रात रहातो आहोत नां अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे.