मस्त, जबरदस्त कहानीकसं असतं नां की आपण रोज तेच ते जेवत असतो कधी भाजी चांगली जमते तर कधी कोशिंबीर एखादा रविवार असा उजाडतो की रोजचाच सगळा स्वयंपाक पंचपक्वानांइतका रूचकर बनतो मग आपण तो तुडुंब जेवतो आणि तृप्तीचा ढेकर देतो. कहानीच्याबाबतीतही असंच झालंय. सगळं नेहमीचंच असलं तरिही त्याची भट्टी इतकी छान जमलिय की थिएटमधून बाहेर येऊनही त्याचा प्रभाव उतरत नाही. चित्रपटाचं समिक्षण वगैरे इथे अजिबात करणार नाहीए मात्र हा चित्रपट बघताना खुप दिवसांनी जो मस्त अनुभव आला नां तो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावासा वाटला.
एव्हाना या चित्रपताबाबत भरपूर लिहूनही आलेलं आहे आणि जबरदस्त हिटचा दर्जाही त्याला मिळालेला आहे, मात्र हिटच्या स्टार्सच्याही पलिकडचा एक अनुभव हा चित्रपट देतो. विद्या बालन ही बाई आता एक जबरदस्तच प्रस्थ झालेली आहे. इश्किया, पा, जेसिका, डर्टी पिक्चर आणि आता कहानी. इतकी जबरदस्त रेंज असणारी आजच्या पिढीत ती एकमेव अभिनेत्री आहे (अर्थात असं माझं वैयक्तिक मत आहे). द डर्टी पिक्चरचा अंमल अजून पुरता ओसरला नसताना, कहानी तिची ती डर्टी इमेज कुठच्या कुठे घेऊन गेलाय. या चित्रपटात पहिल्या फ़्रेमपासून अखेरच्या फ़्रेमपर्यंत तिनं जे काही साकारलंय ते मस्त आहे. हा सिनेमा म्हणजे अक्षरश: रोलर कोस्टर राईड आहे. थोडा सुखावह, थोडा पोटात गोळा आणणारा, नको नकोसा तरिही हवाहवासा वाटणारा अनुभव देणारी ही राईट अजिबात चुकवू नये अशीच आहे.
कथानकाबद्दल बोलायचं तर चित्रपटभर "बिद्या मॅडम" आहेत त्यांच्यासोबत असणारा इस्पेक्टर आहे, ऑफ़िसर मिस्टर खान आहे, विमा एजंट बॉब आहे, हॉटेलमधला पोर्‍या आहे, दर दोन मिनिटांनी संवादातून येणारा मिलान दाबजी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोलकता आहे. तरिही या चित्रपटात दोनच मुख्य भुमिका आहेत एक बिद्या बाकची आणि दुसरं "कोलकोता".
कोणताही चित्रपट दोन अर्थांनी "दिसतो". एक म्हणजे समोर जे कथानक साकारलं जात आहे ते आणि दुसरं म्हणजे तो चित्रपट आपल्याला जो "फ़िल" देतोय ते. हा फ़िल शब्दात पकडता येण्यासारखा नसतो, प्रत्येकाला अनुभवाला येणारा तरिही त्याची व्याख्या न करता येणारा हा फ़िल चित्रपटातून त्याच्या रंग-रूप-गंधासह भिडत रहातो आणि असा भिडणारा फ़ील चित्रपटाला वेगळा परिणाम प्राप्त करून देतो. "कहानी"तला कोलकता शहराचा जो फ़ील आहे तो असाच भिडतो (ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांना मला नेमकं काय म्हणायचं आहे समजेल). या शहरातल्या अरूंद गल्ल्या, वहानांच्या विविध हॉर्नचे एकाचवेळेस येणारे आवाज, माणसं-वाहनं यांची एकच कचकच गर्दी आणि या गर्दीत एकटी भिरभिर फ़िरणारी बिद्या बाकची.
रहस्यमय चित्रपटाचं यश असतं ते म्हणजे कथानकात प्रेक्षकाला गुंतवत असतानाच त्याचा अंत काय असेल, रहस्यभेद काय असेल याचे अंदाज लावायला भाग पाडणं. या फ़्रंटवर चित्रपट शंभर टक्के यशस्वी झालाय. मध्यंतरानंतर पाच दहा मिनिटांनी साधारण कल्पनाही येऊन जाते तरिही कथानकातला इंटरेस्ट तसुभरही कमी होत नाही हे कौतुकास्पदच आहे. याला कारण आहे कथानक सांगण्याचा वेग. त्यात घाईही नाही आणि उगाच रेंगाळलेपणाही नाही. मध्येच हा सयको-थ्रिलर असावा की काय असा अंदाज करायलाही कथानक भाग पाडतंच. चित्रपटातलं प्रत्येक पात्र त्याची भक्कम कामगिरी करतं विशेषत: विमा एजंट इतका छान नीच वठवला आहे की त्याला जाऊन चार रट्टेच घालावेत असं वाटतं. तरिही यापैकी कोणत्याही पात्राला बिद्या बाकचीच्या "कहानी"वर वरचढ होऊ न देण्याची किमया दिग्दर्शकानं साधली आहे. या सगळ्या सुंदर प्रवासावर कथाकथनावर कळस चढविला आहे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातल्या रविंद्रनाथ टागोर यांच्या "एकला चलो रे" या गाण्यानं आणि त्यांच्या नॅरेशननं. इतक्या नेमकेपणानं हे गाणं कथानकात येतं की त्याची मग एक धुंदीच चढते. विद्या बालनच्या अभिनयाबाबत काहीच बोललं नाही तर ते पाप होईल. विद्या डोळे, ओठ, भुवया, नाक या सगळ्यांसहित सुंदर डॊयलॊग डिलिव्हरी करते. तिची बिद्या मॅडम इतकी कन्व्हिसिंग आहे की डर्टी पिक्चरमधली सिल्क एका क्षणासाठीही तिच्यात दिसत नाही. या दोन भिन्न व्यक्ती असाव्यात इतका वेगळेपणा दिसण्यापासून अभिनयापर्यंत आणि व्यक्त होण्यापर्यंत आहे. अखेरच्या प्रसंगातले तिचे डोळे आणि त्यातले भाव चित्रपट पाहून बाहेर आल्यावरही आठवत रहातात. अख्खा चित्रपट तिनं एकहाती तोलून नेलाय. सोन्यासारख्या गोष्टीला तिनं सोन्यासारखा बावनकशी अभिनय दिलाय. हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला ती आवडून घ्यावीच लागेल.

एकला चलो रे.....
 

3 comments:

सचिन उथळे-पाटील said...

जबरदस्त पोस्ट झालीये.

लवकरच पाहवा लागणार आहे सिनेमा.

shinu said...

kharach bagh khupch jabari jamalay :)

प्रज्ञा said...

मलाही ’कहानी’ खूप आवडला. खरंतर मला थिएटरवर जाऊन हा पिक्चर पहायला जमले नव्हते. मागच्या महिन्यात सलग दोनदा एका चॅनलवर हा पिक्चर पहायला मिळाला. पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी त्या पिक्चरच्या धुंदीतून बाहेरच पडले नव्हते. बिद्दा बागची , तिचा सारथी , विमा एजंट आणि कोलकत्ता.... डोक्यात नुसता कल्लोळ माजला होता. पण त्याच वेळेला पुन्हा हा पिक्चर पहायला पाहिजे असं वाटत होतं. ‘एकला चलो रे’ तर गाण्ं तर नुसतं मनात घुमत होतं. त्या पिक्चरमध्ये दुर्गापूजा , लाल काठाच्या पांढ्र्‍या साड्या नेसलेल्या स्त्रिया आणि तो माहौल काय जबरदस्त घेतलाय्‌. ते प्रसंग अगदी अंगावर येतात. अगदी सेम माझ्या मनातल्या भावना तू व्यक्त केल्या आहेस.
परत एकदा ‘कहानी’ पाहिल्याचा फील आला.