सिनेमाच्या आठवणींची आठवण

आपल्याला सिनेमा (मला मराठीतही याला सिनेमाच म्हणायला आवडतं कसं आपलं तुपलं वाटतं चित्रपट म्हटलं की....जाऊ दे)दोन कारणांनी लक्षात रहातो एक तर त्या सिनेमामुळेच आणि दुसरा म्हणजे त्या सिनेमाच्यासंदर्भात किंवा त्या त्या वेळेस बनलेल्या काही खास आठवणींमुळे. आजची ही पोस्ट अशाच आठवणींना पोस्त देण्यासाठी.....
सर्वात पहिली आठवण इथे अगदी समयोचीत वगैरे म्हणतात तशी आहे कारण आठवण आहे सिनेमाच्या पडद्याची आणि कोणत्याही नाटक सिनेमाची सुरवातही पडदा उघडूनच होते नाही का? माझ्या पिढीला (माझी पिढी म्हटल्यावर डोळ्यासमोर आजीबाईचा बटवा वगैरे आणाल तर खबरदार. माझी पिढी म्हणजे सिंगल स्क्रीन सिनेमावर पोसलेली आणि आजची पिढी म्हणजे पॉपकॉर्न चावत मल्टिप्लेक्समध्ये सिनेमे बघणारी) सिनेमा बघायला मिळायचा (त्यावेळेस सिनेमा सुरू झाला असं म्हणत नसत तर पाट्या पडल्या असं म्हणत)तो त्याच्या समोरचा पडदा दूर झाल्यावर (खरं तर त्याहीनंतर नाही. कारण विकोनं दात घासल्याशिवाय, लिरीलनं धबधब्याखाली न्हाऊन माखून झाल्याशिवाय, नाकाला/ छातीला विक्स लावल्याशिवाय, ड्युक्स किंवा तसलंच काही लिमका बिमका प्यायल्याशिवाय, इंदिरा गांधींची देशाच्या प्रगतीविषयीचं भाषण ऐकल्याशिवाय सिनेमा सुरू म्हणून व्हायचाच नाही. जाता जाता जरा विषयांतर करायची परवानगी मागते हं कधिचं मनात होतं लिहावं. आता संधी आहे तर लिहून घेते. ते सिनेमाच्या आधी दातानं आक्रोड फ़ोडणारे आजोबा आहेत नां, ते आमच्या लहानपणापासून अस्सेच दातानं आक्रोड फ़ोडतायत, आम्ही मारे अमिताभ बच्चन बघायला जावं तर हे आक्रोड फ़ोडत बसलेत. इतकी वर्षं झाली पण त्यांचा हा उद्योग अजून संपला नाही. धन्य आहे विको वज्रदंतीची! या अजोबांना कोणीतरी सांगा रे की, आताशा फ़ोडलेलेच काय पण बारीक तुकडे केलेले आक्रोडही बाजारात मिळतात कशाला उगाच म्हातारपणी असले भलते स्टंट करावेत म्हणते मी. उगाच काय एखादा दात बीत तुटला किंवा पडलाच तर काय विकोवाले भरून देणारेत? मग नंतर आज्जीचे रपटे मिळतील ते वेगळेच. असो तर आता मूळ विषयाकडे कंसाबाहेर) तर त्यावेळेस सांगलीत स्वरूप नावाचं नवं कोरं त्या काळातलं चकाचक थिएटर बनलं होतं आणि तिथे पहिलाच सिनेमा लागला होता लावारीस. दुपारी आईच्या महिलामंडळाचं अचानकच सिनेमा बघायला जायचं प्लॅनिंग बनलं अणि गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या न्यायानं अस्मादिकही गेले. बरं सिनेमातलं ओ की ठो कळायचं नाही (त्यावेळेस तर अमिताभ आणि झिनत अमान ही दोनच नावं माहित होती त्यामुळे सिनेमा कोणताही पाहिला तरी त्यात हे दोघेच असतात असा माझा ठाम समज होता) शिवाय ते ढिशुंम ढिशुम बघायला लागलं की जीव घाबरा व्हायचा ते वेगळंच. तिकडे बच्चन दे दणादण हाणतोय आणि इकडे मी हंबरडा फ़ोडतेय हा सीन कॉमन असायचाच. तर या सिनेमाला जाताना आईनं तंबी दिली की खरदार चोंबडेपणा करून ऑफ़िसमधून आल्या आल्या दादांना (वडिलांना) सिनेमा बघितलेला सांगशिल तर. जे काय सांगायचं ते मी सांगेन. संध्याकाळी दादा घरी आले, चहा पाणी खाणं झालं तरी सिनेमाचा विषय काही निघेना, मला तर जाम डुचमळायला लागलेलं की कधी एकदा सिनेमाच्या पडद्याची गम्मत दादांन सांगेन म्हणून. पण आई सांगायचं नाव घेईना म्हटल्यावर मी तोंडाचं कुलुप उघडलंच,"दादा, आम्ही नां आज नां दुपारी नां एक गम्मत पाहिली. तो अमिताभ आहे ना तो पहायला गेलो तर आधी पडदा कित्ती छान वर जात होता अस्सा (बोटानं अर्धगोल हवेत रेखाटत) आणि माहितीय सिनेमा संपल्यावरही तो अस्साच खाली आला (पुन्हा बोटानं हवेत अर्ध गोल रेखाटत) पण ना आईनं सांगितलंय की आम्ही सिनेमा बघितला हे सागायचं नाही म्हणून ते मी नाही सांगत, हो नां गं आई"? यानंतर आईची माझ्याकडे फ़ेकलेली नजर अजूनही आठवते आणि तिनं दादांना काही सांगायचं म्हणून सुरवात केली तर दादांनी फ़क्त कडक शब्दात "समजलं" असं सांगितलं. त्यानंतर अनेक वर्षं ही आठवण मला प्रत्येकानं सांगून बेजार केलेलं आहे.
दुसरी आठवण आहे भालू या मराठी सिनेमाची. हा सिनेमा बघायला मी आणि आई दोघीच गेलोलो होतो. सिनेमा सुरू झाल्यानंतर पाचव्या मिनिटाला मला आणि आईला समजलं की हे बघणं मला झेपणार नाही. आईनं युक्ती सांगितली की तिच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटून झोप. मी तसं केलं पण डोळे हळूच किलकिले होतच होते आणि कान कसे बंद करणार, ते सगळं ऐकत होते. त्यामुळे बघितला नाही तरी सिनेमा समजलाच. मात्र झालं काय की शेवटी शेवटी जरा झोप लागलीच. सिनेमा संपला तसं आईनं उठवलं. समोर पाहिलं तर अंधार गुडुप मी जे भोकाड पसरलं की काही विचारू नका. हमसून हमसून रडतेय म्हटल्यावर आईला वाटलं की अंधारात काही चावलं बिवलं की काय? तिनं चार पाच वेळा काय झालंय विचारल्यावर मी त्याच सुरात विचारलं "भालू कुठ्ठाय"? सुरवातिला आईनं पेशन्स राखत लॉजिकल उत्तर दिलं. नंतर मात्र ती वैतागली आणि म्हणाली "गप गं भालू गेला पडद्यामागे भाकरी खायला". आई शप्पथ त्यावेळेपासून मला त्या थिएटरच्या बाहेरचं प्रत्येक कुत्रं भालूच वाटायचं.
तिसरी मस्त धमाल आठवण माझी नाही तर बंधुराजांची आहे. एव्हाना शक्य असेल त्यावेळेस पोरांना घरीच ठेवायचं सिनेमाला न्यायचं नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला होता. मात्र एका दिवाळीच्या सुट्टीत जरा मोठी भावंडं आत्यांसोबत जंजीर बघायला गेली. तिकीटं काढून मंडळी आत गेली या मंडळात बिचारा माझा भैय्याच काय तो वयानं सर्वात लहान होता. त्याला धड सांगताही येईना की त्याला सिनेमा बघायची भिती वाटतेय म्हणून. त्यात आतून क्लायमॅक्सचं ढिशांव ढिशुम ऐकायला यायला लागल्यावर तर त्याचा निर्णय पक्काच झाला. मस्त एक आईस्क्रीम खाऊन झालं, हातात वेफ़र्सचं पाकीट घेतलं आता आत जायची वेळ आली म्हटल्यावर हा पठ्ठ्या जागून हलेचना. सीन कसा तर हा मागे रेटतोय आणि बाकीची भावंडं याचे हात ओढत याला चल रे काही होत नाही म्हणत पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. अखेर यानं भोकाड पसरलं आणि धमकी दिली की अजून जोरात ओढाल तर आणखी रडेन. झालं बाकीच्यांना आणखी चेव चढला. आत जाणार्‍यांना हा प्रकार जास्त मनोरंजक वाटल्यानं सगळे गंमत बघत उभे राहिले. अखेर आत्यांनी जरा मोठ्या चुलत भावाला भैय्याला घरी सोडून मग पुन्हा सिनेमाला यायला सांगितलं. उर्वरीत आम्ही मंडळी घरी काचाकवड्या खेळत असतानाच भैय्यामहाराजांचं बोचकं मोठ्या भावानं दणकन आत ढकलंलं आणि तो निघून गेला. त्यानंतर आम्हाला भैय्यानं आव आणून गोष्ट सांगितली आणि बाकीची मंडळी घरी आल्यावर सत्य की हकीकत समजली.
लहानपणाच्या आठवणींतून बाहेर येण्याआधी त्यावेळेस पडणारा एक गमतप्रश्न आणि त्याचं माझ्यापरीनं मी शोधलेलं उत्तर, त्यावेळेस म्हणजे जिंतेंद्रनं श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यासोबत दक्षीणछापातले सिनेमे काढण्याचा सपाटा लावला होता त्यावेळे एका गाण्यात नायक आणि नायिका असंख्य कपडे बदलतात असं दिसायचं. मला नेहमी प्रश्न पडायचा की हे लोक गाणं गाता गाता, नाचता नाचता असे फ़टाफ़ट कपडे कसे बदलतात? नायकाचं एकवेळ ठीक आहे की त्याला काय शर्ट पॆंटच घालायची आहे पण हिरोईन इतक्या झटपट साड्या बदलून पुन्हा मॅचिंगचं सगळं घालून पुढची ओळ म्हणायला कशी काय हजर असते? मला वाटायचं की गाणं म्हणायला बागेत जाताना हे लोक बहुदा कपड्यांची बॅग सोबत घेऊन जात असतील.
सिनेमाशी संबंधीत सर्वात जास्त धमाल आठवणी असतात त्या तरूणपणातच असं आपलं माझं मत आहे. म्हणजे या वयात पाहिलेले सगळे सिनेमे गाण्यांमुळे, कथेमुळे लक्शात रहाण्यापेक्षा त्या त्या वेळेस घडलेल्या काही ना काही प्रसंगांमुळेच लक्षात राहिले आहेत. कॉलेजमध्ये गेल्यावर सर्वात पहिला बंक मारून पाहिलेला सिनेमा परिंदे(दुसर्‍यांदा लागलेला). गाव तसं लहान त्यामुळे हे अ‍ॅडव्हेंचर आम्ही घरी पोहोचण्याआधीच समजलं होतं आणि आम्हाला शिस्त लावण्याची सर्व जबाबदारी भैय्यामहाराजांच्या खांद्यावर असल्यानं त्यांनी घराबाहेरच उभं केलं. बरं तर बरं अंगठे वगैरे धरून उभी रहा असं काही त्यानं सांगितलं नाही. ते काही बरं नसतं दिसलं. असो. बंधुराजांचा नियम काय? तर म्हणे, आधी तो स्वत: सिनेमा बघणार आणि मग मी तो बघण्यासारखा असेल तर परवानगी देणार. म्हणजे या उद्योगामुळे हा स्वत: झाडून सगळे सिनेमा बघणार हा त्याचा कावा माझ्या वेळीस लक्षात आला म्हणून बरं. नंतर नंतर त्यानं ही सेन्सॉरशिप काढून टाकली पण यामुळे सौदागरसारखा पानपत्ती सिनेमाही (बाय दी वे त्यातला विवेक मुश्रम क्युट हं)लपून पहावा लागला.
साजन लागला त्यावेळेसची धमाल तर विचारूच नका. एकतर कॉलेजचं नव्हाळीचं वर्ष, साजनला जायचं ठरलं, मी माझी एक मैत्रीण आणि आमच्यासोबत माझी मावशी असं जुगाड ठरलं. तिकीटं काढून झाल्यावर पाहिलं तर अजून अर्धा तास हातात होता. मग मावशीबाईनी फ़र्मान काढलं की चला तोपर्यंत पलिकडच्या मंडईतून भाजी घेऊन येऊ. म्हटलं चला (न चलून करता काय स्पॉन्सरशिप होती ना) भाजी घेऊन आलो तर सिनेमा सुरू झालेला होता. अंधारात धडपडत बाल्कनिच्या पायर्‍या चढू लागलो, बॅटरी पुढे, त्याच्यामागे मावशी आणि तिच्या मागे आम्ही दोघी अशी यात्रा एक एक पायरी वर चढत होती. मध्येच कधितरी या दोघी सुळकन आपल्या खुर्चीत जाऊन बसल्या आणि मी माधुरीकडे वळून पहाण्याच्या नादात पाय अडकले आणि धमकन अर्धी मुर्धी आडवी झाले. आता हे फ़ारसं कोणाला समजलं नसतं पण मावशीनं तिकडून विचारलं,"शिल्पे कार्टे धडपडलीस काय"? आता मावशिचाच आवाज तो, मस्त खणखणीत. अख्ख्या बाल्कनीत खसखस पिकली. असो तर जागेवर जाऊन पुढ्चा सिनेमा शांतपणानं पाहिला आणि इंटर्व्हल झाल्यावर आजुबाजुला बघितल्यावर असली लाज वाटली, अर्धं कॉलेज बाल्कनीत समावलं होतं. काय झालं असेल शरमून ते विचारूच नका. त्यानंतर मावशीनं कितिही उदारपणानं तिकीटं काढली तरिही तिच्यासोबत सिनेमा बघायचाच नाही हा पण केला.
डर सिनेमा बघेपर्यंत आम्ही रितसर बंक करून सिनेमा बघण्याइतके सरावलो होतो. एका रविवारी चक्क इमानदारीत डर बघितला. मात्र झालं काय की या सिनेमाच्यावेळेस बजेट जरा पातळ होतं म्हणून मग खालची तिकीटं काढली. माझी एक मैत्रीण मस्त मांडी घालून सिनेमा बघत होती. इंटरव्हल झाल्यावर चपला घालायला म्हणून पाय खाली केले तर चप्पलच नाहीत. देवळातून चपला चोरीला जातात हे माहीत होतं पण थिएटरमधून? खुर्ची खाली गेल्या असतील, इकडे तिकडे असतील म्हणून शोधल्या, अखेरीस बॅटरीलाही बोलावलं पण चप्पल मिळाल्याच नाहीत. पुढचा अर्धा सिनेमा असा तसाच घालमेलीत बघितला कारण उरलेला पूर्ण वेळ आता काय करायचं याचा खल करण्यातच गेला. सिनेमा झाल्यावर उरलेल्या पैशातून तिच्यासाठी निळ्या पट्याच्या पांढर्‍या स्लिपर्स घेतल्या आणि चुपचाप घरी आलो. रस्ताभर तिच्या स्लिपर्सकडे पाहून पाहून सगळे हसत होतो. आजही मला एक प्रश्न सातवतो की हिच्या पायाखालच्या चपला गेल्याचं हिला समजलं कसं नसेल?
दोन सिनेमांच्या आठवणी तर कायमस्वरूपी मेंदुच्या मेमरीतून फ़ॉरमॅट करता येतील तर बरं अशा आहेत
पैकी पहिल्या सिनेमाचं नाव आहे "कॅप्टन प्रभाकर" आणि दुसरा आहे "कालापानी".
दिवसभरात दोन चार क्लासेस असायचे त्यामुळे दिवसभर इकडून तिकडे धावणं सुरू असायचं. सर्वात शेवटचा क्लास अकांऊंटसाचा. त्याची लेजर्स वाहून न्यायची म्हणजे एखादं लहान पोर मागे बसल्यासारखं वाटायचं. त्या दिवशी माझी सायकल नव्हती म्हणून मग आमची सगळ्यांच्या वह्या एकीच्या सायकलवर आणि आम्ही ड्बलसीट असे चाललो होतो. वाटेत अंतर पडलं, दिवस पावसाळ्याचे होते, अचानकच धुमधुम पाऊस पडायला लागला. आम्हाला थांबायला आडोसाच सापडेना, इतक्यात कडेकडेने चालत आम्ही एका थिएटरच्या समोर जाऊन थांबलो. बराचवेळ झाला तरी पाऊस थांबायची लक्षणं दिसेनात एव्हाना आता क्लासही चुकल्यातच जमा होता. काय करावं बरं असा विचार चाललेला असतानाच मैत्रीणीनं सुचवलं की इथे उभंरहाण्यापेक्षा आत जाऊन एखादा सिनेमा बघू तोपर्यंत पाऊसही थांबेल. कल्पना वाईट न वाटल्यानं आम्ही कोणता सिनेमा लागलाय हे पाहिलं तर "कॅप्टन प्र्भाकर". योगायोगानं याच सिनेमाविषयी भावाच्या एका मित्रानं दोनच दिवसांपूर्वी अरे मस्त आहे असा शेरा दिल्यानं बिनधास्त तिकीटं काढली. अवघ्या पाच मिनिटात काय पाप केलंय हे लक्षात आलं आणि थोड्या वेळानं इंटरव्हल झाल्यावर आजुबाजुला पाहिलं तर अख्ख्या थिएटरमध्ये आम्ही दोनच कन्या होतो.सगळे आमच्याकडे बघतायत... जी धुम ठोकली बाहेर, विचारायची सोय नाही. भर पावसात घाम फ़ुटला. घरी गेलो. दुसर्‍या दिवशी क्लासमध्ये आणखीनच गोंधळ. काल आम्ही नव्हतो मात्र आमच्या जागा पकडून आमच्या वह्या तासभर इमानदारीत बसल्या होत्या. त्यामुळे सरांनी विचारलं कुठे होता काल? (काय सांगता कप्पाळ?) त्याच दिवशी संध्याकाळी ज्यानं उत्तम चित्रपटाचा शेरा दिला होता तो वाघ भेटला. त्याला म्हटलं काय रे कसला सिनेमा आहे टुकार तर म्हणाला? तुम्ही पाहिला? आम्ही हो म्हटल्यावर तर हसून आडवा पडायचा बाकी राहिला होता. वर म्हणतो कसा, मी हा सिनेमा पाहिला आणि जाम पकलो म्हणून ठरवलंच होतं कोणालातरी हा बघायला लावायचाच. कालापानीची आठवण तर काळ्यापाण्यासारखीच भयानक आहे. कोल्हापूरमधली गोष्ट. तिथे दोन थिएटर आहेत जी पाठीला पाठ लावून आहेत. म्हणजे इकडे सिनेम बघायचा आणि तिकडे दुसर्‍या थिएटरमधून बाहेर पडायचं (अर्थात हे सुरवातिला माहितच नव्हतं). एका रविवारी मी आणि माझी रूमपार्टनर कालापानी बघायला गेलो, बाहेर पडताना मागच्या थिएटरमधून बाहेर आलो आणि सहज वर बघितलं तर मागच्या थिएटरमध्ये एकदम "ई’ ग्रेड सिनेमाचं पोस्टर, त्यात भर म्हणजे अगदी समोर रस्त्यावर दोनचार ओळखिचे चेहरे, बाप रे! आता यांना वाटणार आम्ही हा असला सिनेमा बघितला की काय? पुन्हा आता त्यांना ओळखिचं हसू द्यायचं की असंच हळूच सटकून जायचं हे समजेना. कसलं काय अन फ़ाटक्यात पाय असला प्रकार सगळा.
तर अशा या सिनेमाच्या आठवणी त्या त्या वेळेस नाही म्हटलं तरी तापदायकच ठरलेल्या मात्र आता मस्त हसवणार्‍या.
 

5 comments:

सचिन उथळे-पाटील said...

:)

meg said...

chhanach! cinemachya athavanich pushkalda cinema peksha jaast majeshir astat...

nostalgic zale lekh vachun!

meg said...

chhanach! cinemachya athavanich pushkalda cinema peksha jaast majeshir astat...

nostalgic zale lekh vachun!

आनंद पत्रे said...

:-) हाहा .. सजा-ए-कालापानी

Anonymous said...

wa