ना नन्नाचा पाढा

वैताग, चिडचिड, फ़्रस्ट्रेशन आणि सगळं काही......अरे एखाद्याच्या नशिबात अडचणी याव्यात म्हणजे किती? गेले कित्येक दिवस बोटं किपॅड बडवण्यासाठी आसुसली होती; पण बाशिंगबळ जड असलेल्या पोरीच्या लग्नात अडचणी याव्यात तशा एकामागोमाग अडचणीच अडचणी. विषय तर किती सुचले होते पण बटणं बडवायचा योग काही केल्या येत नव्हता.
धाकले अंबानी म्हणजे तर रूसल्या जावयाच्या वरताण झालेत. एकवेळ रूसलेल्या नवरदेवाला घोड्यावर बसवता येईल पण अंबानिचा सिग्नल मिळणं कठीण झालंय (सरळ अर्थ काढा, अर्थाचे अनर्थ नकोत). नेटकनेक्टचं डबडं बदललं, आणि लॅपटपचं डोकं भडकल्यासारखी अचानकच हार्डडिस्क उडाली. सगळे यच्चयावत आळशी, चोर आणि महामुर्ख आमच्या राशीत दाटीवाटीनं बसलेले असल्यानं आम्हीही डोक्यावर दगड पडल्यासारखे अशाच लोकांकडे कामांसाठी जातो. लॅपटॉप आपल्याकडे होता याचं विस्मरण जवळपास झालं होतं इक्ते दिवस तो दुरूस्त करणार्‍यानं घेतले. बरं तो आला तर कसा तर डॉनमधल्या स्मृती गेलेल्या शाहरूखसारखा डोकं करकरीत रिकामं असल्यानं पुन्हा बरहा टाका, यांव टाका त्यांव टाका असं करेपर्यंत बरेच दिवस गेले. दरम्यान विषय सुचत होते पण एकतर बालबुध्दी बनलेला कॉम्प्युटर आणि एकामागेएक (सिध्दीविनायकाला लोकं कशी रांग लावून उभी असतात नां तशीच) आलेल्या "डोमेस्टिक अडचणी"......वात आला. सगळ्याचा. एक दिवस भल्या पहाटे साधारण नऊ दहा वाजता सगळं जमून येऊन लिहिण्याचा चानस आला तर कन्यारत्न लाडात येऊन गळ्यात पडताना नेमका अंबानिना धक्का लागला आणि हाय रे दुर्दैवा पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्न....हरिदासाची कथा मूळ पदावर येऊन अनुक्रमे अमुक ठिकाणची ब्रॅन्च तमुक ठिकाणची ब्रॅन्च करत एकदाची बोट सर्व्विस सेंटरच्या धक्क्याला लागली. (इथे पुन्हा एकदा वरचं वाक्य वाचा, तेच ते-सगळे यच्चयावत महामुर्ख, आळशी आणि चोर..वगैरे वगैरे)ती बया म्हणजे, सर्व्हिस ठेसनवाली ....(बायका उगाचच आणि निर्थक अखंड बडबडतात असा तमामत पुरूष मंडळीचा लाड्का आरोप सिध्द करायला बसल्यासारखी ती तारस्वरात आणि उगाचच मारक्या म्हशीसारखी अंगावर आल्यासारखी बोलत होती. देवा कसं व्हायचं रे स्त्री जातीचं)...तर तिनं एक चपटं डबडं हातात दिलं (बाय दि वे, त्याचवेळेस मला समजलं म्हणजे सर्व्हिस ठेसन सुंद्रीनं तसं सांगितलं की म्हणे अशी बिघडलेली यंत्र आपण ज्या स्थितीत त्यांना देतो त्याच स्थितीत ते आपल्याला ते परत करतात. म्हणजे कसं तर आता आमचं यंत्र त्याच्या वॉरंटीत होतं म्हणून मग दुकानवाला पोट्ट्या आमच्या खिशाची दया येऊन म्हणाला की हे म्हणे बदलून दुसरं मिळेल, नवं. तर ते देताना त्याची टोपी आम्ही दिली नाही म्हणून स. ठे. सुं. नं पण टोपी का बदला टोपीसे लेत आम्हाला टोपी न घालताच "नवं" यंत्र दिलं. तिला विचारलं की अगं बाई, हे नवं आहे तर त्याचे बाकीचे अवयव कुठेत? तर म्हणाली तुम्ही जस देता तसं कंपनी तुम्हाला देते. असो. माणून अनुभवातून शिकतो म्हणतात नां, आता पुढच्यावेळेस टोपीच काय हातमोजे, पायमोजेसुध्दा घालून यंत्र दुरूस्तीला देईन) असो. तर दुर्दएवाचे दशावतार म्हणजे रिक्शावाल्याच्या खिशात तीन तीन खेपांचे तीनशे रूपये आणि तीन तीन वेळा त्या स. ठे. सुं. चा किणकिणारा आवाज ऐकूनही हे यंत्र आमच्या लॅपटॉपबरोबर नांदायलाच तयार नाही. तेव्हा नवरोबाला ठणकावून सांगितलं की, "बाबा रे आता बास झालं तुझं हे गाढवी प्रेम आपुनका व्होडाफ़ोनच सही है." आता तुम्ही म्हणाल की हे आधीच नाही का करायचं पण इतकं सरळ असेल तर आमचं नशिब कसं? आमचं धाकटं न्यु अराईव्हल म्हणजे कुंबळे बिंबळेला कोळून प्यायल्यासाखं हातात दिसेल त्या वस्तूला बॉल आणि जमिनिला पिच समजून बॉलिंग टाकत असतं. त्यातून अशी टाकाटाकी करायला त्याला प्रचंड आवडणारी गोष्ट म्हणजे अस्मादिकांचा मोबाईल. मोबाईल टाकून टाकून त्याची इतकी वाट लागली की साक्शात मोबाईलसुध्दा तो मोबाईल आहे हे विसरून गेला. आधी बटणं, मग डिस्प्ले असं करत करत बिचार्‍यानं अखेर बॉडी टाकली. त्यानंतरचा हॅ्ण्डसेट दुसर्‍या कंपनिचा घेतला मारे ऐटीत पण हाय रे रामा त्याच्यावरून नेट कनेक्ट होईना. (लोकांना नेटची हौस किती असते नां) मग अखेर घरात आवरावरी करताना असाच एक जुना सेट सापडला त्यात कार्ड घातलं आणि जोडलं तर जमलं की राव! आत्ता या क्षणाला मला काय लिहू आणि किती लिहू असं झालंय. स्मृती गेलेल्या डॉन्याची स्मृती परत आल्यावर त्याला कसं किती बोलू आणि काय बोलू झालं नां तसंच होतंय. तर मंडळी बर्‍याच दिवसांनी लिहितेय त्यामुळे जरा जास्तच उत्साह फ़ुटलाय. काय चुकलं बिकलं असंल तर माफ़ी करा आणि घ्या सांभाळून.


ता.क. - लॅपटॉपचा पडदा प्रकाशमान झाल्या झाल्या सत्यवान आणि तन्वीबाईंना मस्त ब्लॉगचं बक्षिस मिळाल्याचं वाचलं. लय भारी मंडळी हो! मज्जा. अभिनंदन तुम्हा दोघांचं आणि जिंकलेल्या सगळ्यांच.
 

11 comments:

aativas said...

Welcome after 'such' a break!

meg said...

masta... tumcha net set go adaklyamule aamhala hi blog cha upaaas ghadla hota... maza aali barrrrrrrrrrrech divsanni vachun!.

bara zala 'nannacha padha' sampla ekdacha... aata chalu dya gadi full speed madhe!

हेरंब said...

चला कित्येक दिवसांनी पिंपळपान आठवणीतून बाहेर येऊन प्रत्यक्ष कागदावर आल्याचं पाहून बरं वाटलं.. :) .. नन्नाच्या पाढ्याची चांगलीच घोकंपट्टी चाललीये तर :)

अग आणि खरं अभिनंदन तन्वीचं.. आम्ही आपले काय उत्तेजनवाले ;)

Anonymous said...

बाई अगं कूठे गं हरवली होतीस... किती दिवसाने हसले गं बयो!! त्या धाकट्या अंबानीचा आम्हा सगळ्यांतर्फे तीव्र निषेध...

त्याच्यापायी ’पिंपळपानाची’ तूला आठवण करून देण्याची आमच्यावर वेळ येते...

आणि आभार गं बयो!!

आता लिहा पटापट... कसल्या कसलेल्या उपमा एकाच पोस्टेत भसाभस ओतल्या की वाचता वाचताना वाक्या वाक्याला हसत होते मी!!! त्या सुंद्रीला माझ्याकडून आभार सांग हो!! :)

आता मी चालले पोस्ट पुन्हा वाचायला... :)

Anonymous said...

माते अगं तुझा ब्लॉग मराठी ब्लॉगविश्वावर दिसत का नाहीये?

शिनु said...

धन्यवाद मंडळी.

शिनु said...

@ aativas
धन्यु. तुमच्या सगळ्यांची नावं वाचून कित्ती बरं वाटलं म्हणून सांगू!

शिनु said...

meg
हो गं हो. बला टळली एकदाची.

शिनु said...

@हेरंब
हो नं, फ़ायनली ग्रहण सुटलं. बटणं बडवताना काय मज्जा आली म्हणून सांगू. आणि न न्नाच्य पाढ्याचं म्हणशिल तर तो घोकून घोकून पाठही झाला.

शिनु said...

तन्वी,
थान्कु गं बयो.
माझा ब्लॉग "तिकडे" दिसत नाही म्हणतेस?....काय की बुवा. अगं माझं म्हणजे मुकबधिरासारखच चाललं होतं इतके दिवस. आता बघते जरा निवांतपणानं

आनंद पत्रे said...

मस्त खुसखुशीत लेख.. अंबानींचा सिग्नल.. हाहा भारी!! ;)