प्रचंड हुशार माणूस

ज्यांची मुलाखत घ्यायची ती माणसं दोन प्रकारची असतात एक तर ती खरोखरच हुशार असतात आणि आपल्याला त्यांच्याशी गप्पा व्हाव्याशा वाटतात. दुसरा प्रकार म्हणजे ही माणसं "भयंकर हुशार" असतात आणि आपण त्यांच्याशी गप्पा माराव्यात असं त्यांना वाटत असतं. अशा दुसर्या प्रकारातली माणसं भेटली की, "हेल" समजतो. असाच एक भयंकर हुशार प्राणी एकदा भेटला. (या माणसांचिही एक गंमत असते, त्यांची शिफ़ारस करणारी इतरच कोणीतरी असतात आपण बेसावधपणानं बळी पडतो आणि मग या माणसांच्या कचाट्यात सापडतो.) या प्राण्यानं कसलं तरी संशोधन केलेलं होतं, प्रसिध्दीला लाथाडणारा अशी त्याची ओळख माझ्यापर्यंत आली आणि अशा माणसाचं कार्य लोकांसमोर येणं किती गरजेचं आहे मला अगदी बेसावध क्षणाला पटलं. एका रम्य सकाळी (तेही रविवारच्या हो!) हे महाशय त्यांच्या लॆपटॊसह प्रकटले. प्रसिधिला लाथाडणारे हे महाशय अगदी तयारीनं आलेले होते. त्यांच्या संशोधनातलं काय काय प्रसिध्द व्हावं हे तर त्यांनी सविस्तरपणानं आणलंच होतं त्याशिवाय ते कोणत्या भाषेत मांडलं जावं याचंही त्यांच्याकडे टिपण होतं. प्रत्येक मुद्द्यानंतर ते तो मुद्दा नेमक्या कोणत्या शब्दात मांडला जावा याची माहिती देत होते. सुरवातीला मी दूर्लक्ष करत राहिले कारण ते माझ्या खास ओळखितल्यांचे नातलग होते. असं एकदम ताडकन बोलणं मला प्रशस्त वाटलं नाही म्हणून मी शालजोडीतली हाणायच्या उद्देशानं त्यांना म्हटलं, असं करा नाही तरी मला सध्या अजिबात वेळ नाही, तुम्हीच तुमची सविस्तर मुलाखत तयार करा आणि मला द्या पुढे काय करायचं मी बघेन. हा जोडा त्यांना बहुदा समजलाच नाही, ते म्हणाले की त्यापेक्षा तुम्हीच मुलाखत लिहून मला वाचायला द्या, त्यात बदल करून "सुधारून" मी तुम्हाला पाठवेन. साधारण दीड तासानंतर सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर त्यांना सांगितलं की हे सगळं छापायचं झालं तर एक पान भरेल आणि त्यासाठी जाहिरात विभाग तुमच्याकडून कॊलमसेंटीमिटरच्या रेटनं बिल वसूल करेल. आत्मस्तुतीत मग्न झालेल्या या महाशयांना कोणताच जोडा लागत नव्हता, बायकोला दणदणीत पगार असल्यानं त्यांचं संशोधन कार्य चाललेलं होतं, बाता जगाला सुधारण्याच्या आणि घराचा भार बायकोच्या डोक्यावर देऊन हे महाशय असे मोकाट. बरं संशोधन म्हणाल तर ते ही भरीव नाही. उथळ पाण्याचा हा खळखळाट काही मिनिटात लक्षात आल्यावर पुढे बोलण्याची उमेदच संपली. एरवी अनोळखी माणसाच्या बाबतीत असं झालं असतं तर त्याला कटवणं फ़ार कठीण नव्हतं पण इथे मामला दगडाखाली हात सापडल्यासारखा झालेला होता. संशोधनकार्याची सविस्तर माहिती झाली, कौटुंबिक माहिती झाली, तथाकथित समाजकार्य झालं आणि इतकं सगळं झाल्यावर त्यांना त्यांच्यातल्या कलागुणांचीही तारीफ़ हवी असल्यानं त्यांनी त्यांच्या मोजक्या कविता दाखवल्या, वर म्हणाले बघा असा संशोधक तुम्हाला भेटला होता का कधी? जो इतक्या रूक्ष संशोधनकार्यातही त्याच्यातल्या काव्यप्रतिभेची पालवी अलवार हातानं जपतो आहे (हे सगळे शब्द त्यांचेच आहेत) कमालिच्या थकव्यानं म्हटलं नाही "तुमच्यासारखा" माणूसच मला पहिल्यांदा दिसतो आहे. यावर ते जाम उत्साहीत झाले आणि म्हणाले, मग याचा उल्लेख करायला विसरू नका. दोन तासांचे टोले देऊन काटा पुढे जायला लागला तसा मला इतका मानसिक थकवा आला की अखेरीस सगळे शिष्टाचार विसरून त्यांना म्हटलं सध्यासाठी ही मुलाखत इथे थांबवुया बाकीचं जरा सविस्तर नंतर बोलू. अगदी सुदैवानं त्याचवेळेस मोबाईल वाजला, त्यावर फ़ोनकंपनिची सुंदरी केकटत होती की अमूक रिंग टोन घ्या आणि तमूक घ्या. संधीचा फ़ायदा उचलत मी अगदी घाईत उठले आणि मला जायला हवं जरा तातडीचं काम आहे म्हणून या भयंकर हुशार माणसाच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्या दिवशी पहिल्यांदाच मला वेळीअवेळी केकाटणार्या मोबाईल सुंदरीबद्दल माया दाटून आली.
 

4 comments:

यशोधरा said...

>> त्या दिवशी पहिल्यांदाच मला वेळीअवेळी केकाटणार्या मोबाईल सुंदरीबद्दल माया दाटून आली.

:D

देविदास देशपांडे said...

बेस्ट आहे. मलाही असा अनुभव आहे.

shinu said...

@ yashodhara and dewidas


dhanyawad

अजित said...

Nice!