पुन्हा तेच?

मुंबईच्या माथीच इतकी संकटं का? या शहराला कोणी वाली आहे की नाही? इतजे दिवस बॊम्ब फ़ुटत होते सामान्य चाकरमन्याच्या पायात यावेळेस मात्र सोकॊल्ड एलाईट क्लासही या शहरात सुरक्षित नाही हे जाणवल्यावर पायाखालची जमिन नव्यानं सरकली. रोज सकाळी लोकलसाठी धावताना आजचा दिवस कसा जाईल याची चिंता पोटात दडपत धावणं कधी संपणार आहे की नाही? असं काही घडलं की घराबाहेर असणारया आपल्या माणसांची खुशाली समजेपर्यंतचे क्षण आणि ते माणूस घरी परतेपर्यंतचे तास मुंबईकर जीव मुठीत घेऊन घालवतात. दुसरया दिवशी नाईलाजानं पुन्हा त्याच रूटिनमध्ये परतावं लागतं आणि सगळं जग याला मुंबई स्पिरिट म्हणून नावाजतं. कसलं आलंय स्पिरिट? या शहरात कोणाच्याही पुढच्या मिनिटाच्या श्वासाची शाश्वती राहिलेली नाही. निर्लज्ज पुढारी आणि त्यांचं आंधळं सरकार यांनी सगळा देश जणू विकायला काढलाय. सगळ झाल्यावर पाकिस्तानला तंब्या दिल्या आणि दाऊदच्या अटकेची मागणी केली की कडा जवाब दिल्याच्या मस्तीत हे लोक पुढे चालत रहातात. दाऊदच्या गोवरया मसणात जायची वेळ आली तरी यांना तो सापडत नाही. तिकडे अमेरीका सद्दामला मुसक्या बांधून आणते. या देशातले सगळेच्या सगळे राजकारणी देश विकून विमान पकडून दाऊदप्रमाणेच एक दिवस फ़रारी होतील. एखाद दुसरा नेता सोडला तर सब घोडे बारा टक्के असा प्रकार झालाय. कोणाकडे पहायचं आम्ही? आम्ही निवडून दिलेल्या नेत्यांची वैयक्तिक प्रगती होत असताना आम्ही मात्र जिथे होतो तिथेच आहोत. यांना ए पासून झेड पर्यंतच्या सुरक्षा आहेत त्यामुळे यांच्या बुडाला काय आच लागणार? जीव जातो तो सामान्यांचा. यावेळेस तर बर्ड फ़्ल ची साथ आल्यासारखे सगळे राजकारणी बाश्कळ पकपक करत आहेत. एकेकाचा उद्दामपणा माणूसकिला लाज आणणारा आहे. वर जे वागतोय, बोलतोय त्याबद्दल ना खंत, ना खेद ना लाज. लाज वाटते आम्हाला अशा माणसांना आमचा "प्रतिनिधी" म्हणविण्याची. आम्ही असे नाही. शेजारच्या घरी मयत झालं तर आमच्या चेहरयावर चार दिवस हसू येत नाही आणि हे नेते खुशाल हसरया चेहरयानं बाईट देत सरेआम फ़िरत आहेत. अशा वेळेस खरं तर संयमानं परिस्थिती हाताळायला हवी. सामान्यांचा संताप लक्षात घेऊन त्यावर समजुतदारपणानं फ़ुंकर घालायला हवी. उलट यांचा उद्दामपणाच दिसून येतोय. तुम्हाला खुर्ची दिलिय ती आमच्या हितांचं रक्षण करण्यासाठी याची जाण ठेवा. या नेत्यांच्या लाल दिव्यांच्या गाड्या काढून घेऊन त्यांना लोकलनं प्रवास करण्याची सक्ती करायला हवी. मुंबईकरांवर झालेल्या या आणखी एका हल्ल्यानं चीड आलीय आणि कमालिचं हताशही वाटतंय? आम्हाला खरंच कोणी वाली राहिला नाही का?
 

1 comments:

Alok said...

agadi mazya manatla lihalayas