जानुची गोष्ट : २

...........झालं ते झालं म्हणत त्या दिवसापासून जान्हवीनं घरातून लक्षच काढलं. एकाएकी तिला समरची आठवण यायला लागली. आपला निर्णय चुकला ही शंका ममाशी झालेल्या वादावादीनंतर पहिल्यांदाच आली आणि लग्नात कौतुकं पुरवून घेणार्या धनुला पाहून तिला खात्रीच पटली की आपण त्यागा बिगाच्या नशेतच होतो...फक्त आपण....धनू, आई, समर सगळे उघडे डोळे असणारे होते आणि आपल्याच डोळ्यावर गुंगी चढली होती. त्यानंतर पहिल्यांदाच तिनं कोणाकोणाकडून समरचा पत्ता घेतला, त्याचा ई-मेल मिळवला आणि थरथरत्या बोटांनी त्याला एका आवेशातच मेल लिहिली. तिच्या मेलला उत्तर म्हणून समरनं फोटो पाठवले होते, त्याच्या टुमदार बंगलिचे, ज्यात कदाचित जान्हवी राहिली असती, बंगलिसमोरच्या सुंदर बगिच्याचे, जो कदाचित जानुच्या हातांनी फुलला असता, सगळ चित्र समर-जान्हवीनं पाहिलेल्या चित्रासारखंच होतं, अचूक....मात्र त्यातल समरसोबतचा हसरा समाधानी चेहरा जान्हविचा नव्हता, त्या हसर्या चेहर्याशी चिमण्या मुठींनी मस्ती करणारा गोंडस जीव जान्हवीचा अंश नव्हता...चित्राची एक बाजू परिचित होती आणि दूसरी मन भयभित करणारी. तिच्या मेलला उत्तर देण्याची तसदिही समरनं घेतली नव्हती, तिनं जीव तोडून लिहिलेल्या शब्दांना उत्तर म्हणून त्यानं पाठवलेली चार छायाचित्रं तिला सैरभैर करून गेली. यथावकाश फोटोतल्या समाधानी चेहरयाचं आणि कडेवरच्या बाळाचं नावही समजलं. ज्यांच्या तिचा काहीच संबंध नव्हता. धनुच्या संसाराला मदत म्हणून गेलेली ममा तिकडेच रमली. तिच्या आयुष्यातलं धनुचं स्थान पहिल्यांदाच जानुला टोचायला लागलं. एरवी त्यांचं गुळपीठ हा तिच्या थट्टेचा विषय असायचा आता संतापाचा झाला.....



......आयुष्य कोणासाठी थांबतं? आपल्या गतीनं त्याला जितकं पुढे सरकायचं तितकं ते सरकतच रहातं. जानुचं आयुष्यही सरकत राहिलं, तिला नकोसं झालेलं असलं तरी. धनुचं लग्न झाल्यावरचा रितेपणाही हळू हळू सवयिचा झाला. आपली गरज खरं तर कोणालाच नसते हे सगळे आपण निर्माण केलेले पाश असतात....धनुच्या बायकोचं आणि ममाचं रितीप्रमाणे पटेनासं झालं. सुरवातिला त्यांना ममाची गरज होती. तितके दिवस त्यांनी तिच्याशी गोड बोलून काम साधून घेतलं. नंतर नंतर वाद व्हायला लागले. धनुची बायको, श्र्वेता, त्याला सुचवू लागली की तिकडे जानू एकटीच आहे. सगळ्या घरावर कब्जा करेल आपल्या माघारी, मग काय कराल? त्यापेक्षा तुमच्या आईला तिकडे पाठवा, त्यांच्यावर वचक राहिल. धनुलाही हे पटलं त्यानं निमित्त काढून आईला परत पाठवलं. तिला समजलं नव्हतं असं नाही पण धनुशिवाय तिच्या असण्याला तिच्यालेखी काही किंमत नव्हती. सगळं आयुष्य त्याच्याकडे पाहून काढल्यावर आता ती कोणासाठी जगणार होती? जानुकडे ती परतल्यावर या दोघिंचं असं आयुष्य पहिल्यांदाच चालू झालं. दोन टोकांवर रहाणार्या दोघीजणी आधीच एकमेकीसाठी परक्या होत्या. त्यात ममाला अलिकडे काय झालं होतं कोणास ठावून जानुचे पैसेही ती घरासाठी वापरायची नाही. धनुच्या पैशांची वाट पहात रहायची. सगळ्याचा एकीकडे त्रास होत असतानाच सवयही होत होती. श्र्वेताला दिवस गेल्याचे कळल्यावर ममा त्या आनंदाच्या भरात चक्क जानुशी चांगलं बोलली, गोड जेवण बनवलं आणि तिच्याचसोबत जेवायला बसली. दुसर्या दिवशी सकाळी उठून तिनं बॆग भरली, जानुनं विचारलं की बॆग का भरलीस? तर म्हणाली, धनुचा कधिही फोन येईल, तिच्या मदतिला जायला नको? जानूनं विचारलं,"अगं तिची आई आहे नां करायला? तू कशाला दगदग करतेस?" यावर कुठेतरी हरवलेली ममा म्हणाली,"एकच एक मुलगा, त्याचं सगळं व्यवस्थित झालं की मी डोळे मिटायला मोकळी"......
श्र्वेताला मुलगी झाली आणि आईनं तिच्या गर्भारपणातल्या तिसर्या महिन्यापासून सगळं घर सांभाळलं. श्र्वेताच्या आईनं बाळंतपण करायला जमणार नाही म्हणून सांगितलं तर हिनं आनंदानं केलं. बाळाला सांभाळणं, स्वयंपाक सगळं ममा जातिनं करायची. धनुची मुलगी, ईशा वर्षाची झाली. तिच्या वाढदिवसाला गेलेली जानू धनुच्या संसारात पहिल्यांदाच जात होती. बारशाच्यावेळेस अनोळखी माणसांच्या गर्दित हरवलेली जानू अंधार्या गॆलरीत एकटिच उभी होती आणि तिच्या कानावर आतल्या खोलितले संवाद पडले, आतल्या लोकांना बहुदा जानुच्या तिथं असण्याची कल्पना नसावी."अजून किती दिवस सासुला ठेवून घेणार आहेस? आलिय नां तुझी नणंद तिच्यासोबत पाठव तिला." एका पोक्त बाईचा आवाज होता."हो, नां, अगदी गळ्यातच पडल्यात लग्न झाल्यापासून. जरा म्हणून मोकळीक नाही. सतत आपलं धनू धनू करत यांच्यापाठी असतात. उगाच एका माणसाचा जास्तिचा खर्च आम्हीच काय म्हणून सोसायचा? तिकडे त्या मॆडम घरखर्चाला पैसेही देत नाहीत बहुतेक. सतत यांना फोन करत असतात, इतके पैसे दे आणि तितके पैसे दे. यावेळेस मी सरळ सांगणार आहे की आई दोघांची आहे नां, मग खर्चही निम्मा करा. शिवाय आमच्या घरावर कब्जा करून बसल्यात ते वेगळंच. आता या तिथे आयुष्यभर रहाणार म्हणजे ते घर विकताही येणार नाही आणि आम्ही तिकडे जाणार नाही म्हणजे आम्हाला त्याचा काही उपयोगही नाही. इकडे जरा मोठं घर घ्यायचा विचार होता पण तिकडचं घर विकलं तर पैसे वरच्यावर उभे रहातील नां, कुठलं काय या बाईसाहेब जोवर त्या घरात आहेत तोवर आम्हाला काही एक पैसा मिळू द्यायच्या नाहीत." हा आवाज नक्की श्र्वेताचा होता. खरं तर इतकं ऐकल्यावर संतापानं जानुच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलं होतं. एकदा वाटलं सरळ समोर जाऊन जाब विचारावा पण मग तिनं ठरवलं की इथेच उभं राहून आणखी काय गरळ ओकतायत ते ऐकावं. आता श्र्वेताची आई म्हणाली,"तरी बरं, अधून मधून गोड बोलून तुम्ही दोघांनी सासुचे दागिने तरी किमान तुमच्याजवळ ठेवून घेतले ते. नाहितर सगळंच तुझी देखणी नणंद हिरावून घेउन बसली असती. स्वत:च्या रूपाचा इतका गर्व आहे तर लग्न का करत नाही? अजुनही किमान एखादा बिजवर तरी नक्की मिळेल" यावर श्र्वेता म्हणाली,"अगं त्यांना म्हणे कोणीतरी मुलानं धोका दिला त्यामुळे यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अगदी लग्नापर्यंत प्रकरण आलेलं असताना तो पळून गेला म्हणे परदेशात, प्रकरण इतकंच होतं की पुढे गेलं होतं कोणास ठावूक" "तरी बरं बाई श्र्वेता तू बाळंतपण सगळं तुझ्या सासुच्या गळ्यात घातलंस, शिवाय वर्षभर बाळही सांभाळायला लावलंस. तेव्हढेच पैसे वाचले बेबीसिटिंगचे"यावर दोघी खिदळत बाहेर पडल्या. संतापानं लाही लाही झालेली जानू बाहेर आली. चार लोकांत मिरवणार्या श्र्वेताला बघून तिला तिडिक आली. एरवी वन्सं वन्सं करत गोड बोलणार्या श्र्वेताचा खरा चेहरा असा असेल याची तिला कल्पनाही नव्हती. कार्यक्रम संपल्यावर सगळे बसलेले असताना तिनं धनुला सांगितलं की सकाळी ती जाणार आहे आणि सोबत ममालाही घेउन जाणार आहे, हे सांगताना तिनं श्र्वेताकडे सहेतूकपणानं पहात म्हटलं की,"नाही तरी आता दुसरं मूल होईपर्यंत बेबीसिटिंगचं काम संपलेलंच आहे नाही का? शिवाय तिकडे माझ्याकडे आणि घराकडे लक्ष द्यायला आई हवीच नाही का?" माझ्याकडे आणि घराकडे यावर विशेष जोर देत तिनं श्र्वेताच्या आईकडेही जळजळीत नजरेनं पाहिलं. धनूला काहिच कल्पना नसल्यानं तो आपला म्हणत राहिला की,"पहिल्यांदाच आली आहेस तर रहा की आणखी काही दिवस. आलीस तेंव्हा तर म्हणत होतीस की निवांत राहिन म्हणून आता एकदमच काय झालं?" यावर काही न बोलता तिनं आईला बॆग भरायला सांगितली आणि अचानक आठवल्यासारखं धनुला म्हणाली की," धनू , इतके दिवस का माहित नाही पण ममा तू पाठवलेले पैसेच वापरायची, मी तिला दिलेले पैसे तिनं तिच्या कपाटात जसेच्यातसे ठेवले आहेत. पण आता तूच तिला सांग. महिन्याचा घरचा सगळा खर्च मी पाहिन आणि तिला खर्चाचे पैसे दोघेही निम्मे निम्मे देत जाऊ" आता मात्र श्र्वेता आणि तिची आई चपापल्या आणि सरळ स्वयंपाकघरातच निघून गेल्या. आईच्या मनात तिथेच रहायचं होतं पण जान्हविच्या रेट्यापुढे तिचं काही चाललं नाही आणि धनू किंवा त्याची बायकोही तिला रहा म्हणाले नाहीत तेंव्हा नाईलाजानं ती यायला तयार झाली. प्रवासात जानुनं ममाला श्र्वेता आणि तिच्या आईच्यातला संवाद जसाच्या तसा सांगितला त्यावर ममा म्हणाली,"तुझं आपलं काहीतरीच जान्हवी. चार माणसं म्हटली की चार तर्हा आल्या, त्याचा इतका बाऊ करू नये. त्या काही वेगळं बोलत असतील आणि तू आपलं अर्धं काही ऐकून डोक्यात राख घालून घेतली असशिल. धनुच्या सासुरवडिच्या लोकांना तुझ्यापेक्षा जास्त मी चांगलं ओळखते. सोन्यासारखी माणसं आहेत. तू ऊगाच नाही त्या शंका पसरवू नको" हे ऐकून जानुच्या डोक्यात तिडिकच गेली. ती ममाला म्हणाली,"तू, तुझा धनू आणि त्याची बायको, खड्ड्यात जा. मला वाईट वाटलं म्हणून बोलले. आज बोलले ते अखेरचं समज." त्या दिवसापासून जानुच्या आयुष्यातून घरगुत समस्यांना पूर्णविराम मिळाला....
 

7 comments:

यशोधरा said...

avadali jaanuchi goshta

यशोधरा said...
This comment has been removed by the author.
शिनु said...

@ यशोधरा

thx.

मन कस्तुरी रे.. said...
This comment has been removed by a blog administrator.
शिनु said...

@ ashini-creations
निंदकाचे घर असावे.....
चुका दाखवल्याबद्दल धन्यवाद. एकूण चारवेळा आलेली श्रुती आला श्र्वेता झालेली आहे. नजरचुकीनं कधी कधी सामान्यांच्या हातून होतात अशा चुका. तुमच्यासारख मोठ्या आणि जाणत्या माणसांची नजर राहिली तर आम्हीही बनू जरासे जाणते. कळावे लोभ असावा.

शिनु said...

@ ashwini creations
घिसेपिटे कथानक......


नायिका कथेतली असली म्हणून काय झालं? ती चंद्रावर रहात नाही. ती इथेच तुझ्या माझ्यासारख्या सामान्य माणसांत रहाते त्यामुळे चारजणांना सहन करावे लागणारे घिसेपिटे मन:स्ताप तिलाही होणारच. असो.

प्रसाद हरिदास said...

pudhe kay ???? katha purna kar aa