मनातल्या मनात


आपल्या प्रत्येकाच्या आत एक गलगल्या असतोच असतो, अखंड बकबक करणारा, या विषयावरून त्या विषयावर माकडासारख्या उड्या मारत भटकणारा, उडाणटप्पू, गुंड, गोड, निष्पाप, विचारी, अविचारी इत्यादी इत्यादी. "व्हाय वुमन...."मध्ये वाचलं होतं की म्हणे, बायका दिवसाकाठी वीसहजार शब्द किमान बोलल्याखेरीज तोंड बंद करत नाहीत (श्शी फ़क्त?) तर हे झालं प्रकट शब्दांचं अकाऊंट पण मनातल्या मनात जे अखंडीत चालू असतं त्याचं काय? असो. विषय उगाच गंभीर होण्याआधी पुन्हा आपल्या मूळ पदावर यावं झालं. तर मुद्दा काय? की मनातल्या मनात बोलण्याचा. या बोलण्याला नां कसला काही ताळच नसतो. कुठून विचार सुरू होतात आणि कुठे फ़िरत, भटकत जातात...सगळंच गमतिचं. कधी कधी वाटतं या मनातल्या संवादाची फ़ोटोकॉपी काढता आली तर दुसरं विनोदी लिखाण वाचण्याची गरजच नाही. तसं कशाला? हा एक मासलाच घ्या नां, उगाच आपलं नमनाला घडा कशाला? नाही का?
चला मग गलगले निघाले.......
गलगले थांबा. निघालात काय असे गडबडीनं. वाचकांना संदर्भसुची नको का द्यायला? त्यांना काय समजणार हे सगळं काय चाललंय ते? तर नमुना म्हणून दर शनीवारची मुलीला शाळेत सोडून येईपर्यंतची तीस मिनिटं इथे दिलेली आहेत. तसं सगळंच डिट्टोसेम लिहिलेलं नाही, जरा एडिटिंग केलेलं आहे (गलगले मनातल्या मनात झालेल्या संभाषणाचं कसलं आलंय डोंबलाचं एडिटिंग?) तर गलगले कंसातून बाहेर आलेले आहेत आणि गलगल्यांनी सूचना संपविल्या आहेत.......

चला आवरा आवरा धावा...उशिर झाला, गाडी अजिबात सुरू नाही होत...झाली झाली चला आता सुसाट....आली कुत्री आडवी आलीच लगेच. मनेकाला काय सांगायला होतं कुत्री बिचारी असतात म्हणून इथे अंगावर धावून येतात तेंव्हा पाय वर घेऊन गाडी चालवायची वेळ येते त्याचं काय?.....परवा अशी आली धावत गाडीकडे....घाबरून पाय पोटाशी घेतले आणि मग लक्शात आलं की अरेच्चा, आपण तर कारमध्ये आहोत आणि काचा वर आहेत. पण श्र्वास थांबला नां सेकंदभर, त्याचं काय?......ओढणी बांधलीय नां मागे? नाहीतर अडकायची कुठेतरी.....अरे हा रस्त्याकडेचा पत्रा काढला की, आत केव्हढी दाट झाडी आहे....झाडं का तोडतात?.....अरे देवा, आता इथेही ट्रॅफ़ीक जॅम....चल बाबा लवकर पुढे, ये बाईकवाल्या तुलाही आत्ताच मध्ये तडमडायचं होतं?....हं सुटलो एकदाचे, पाच मिनिटाच्या रस्त्यावर पंधरा मिनिटाचा प्रवास....रस्ते काय उकरतात सारखे, पुन्हा खड्डे बुजवतही नाहीत.....आता वळायचंच की उजवीकडे....हा पॅच बाकी मस्त आहे. शांत, थंड. व्वा, काय बरं वाटतंय मनाला. तसा काही फ़ार उशिर नाही झालेला..... आज आता पुस्तक वाचून संपवायलाच हवं घरी जाऊन मस्तपैकी संपवून टाकू, काम बिम राहिलं बाजुला. कित्ती दिवस झाले असे निवांत घालवून....आई गं काय मस्त ड्रेस आहे. तिला छान दिसतोय....आला आणखी एक खड्डा आला. किती वर्षं झाली हा खड्डा इथेच आहे.....आता गाडी कुठे लावावी? कधीच का जागा मिळत नाही इथे? कसे लावतात लोक गाड्या? फ़टकवायला हवं सगळ्यांना.....भाजीपण घ्यायचीय जाता जाता....कोणती भाजी घ्यावी बरं? पालेभाजीच घ्यावी एखादी......मिळाली की जागा पार्किंगला.... चला सुटले बाई एकदाचे.......आई गं...घरातून निघाल्यापासून किती बोलले मनातल्या मनात. यावर एकदा लिहायला हवं. किती दिवस झाले ब्लॉग लिहून.किती विषय नुसतेच सुरू करून सेव्ह करून सोडून दिलेत. ते काही नाही आता ते सगळे विषय पूर्ण करायचेच. होतं काय की असं काहीतरी लिहायचं सुचतं आणि मग सुचतच जातं पण त्यावेळेस ब्लॉग लिहिण्याइतका वेळ नसतो आणि लिहिण्यासाठी आवर्जून बसलं की हे इतकं सगळं सुचत नाही. आजकाल जरा कंटाळाच येतोय नाही पण? पूर्वी नियमानं लिहिलं जायचं...आता का असं झालंय?तसं तर तो पण विषय राहूनच गेलाय लिहायचा, तो फ़सवणुकीचा, मग तो ढापूगिरीचा, ती घरसाजवटीची एक लिंक शेअर करायची होती तीपण राहिली. काय मस्त होतं पण ते बाथरूम, काय मस्त फ़ील होता, रोजवालीचं इंटिरीयरपण मस्त आहे नाही? शांत आणि थंडावा देणारं. प्रभानं या आठवड्यात बाथरूम घासून घेतलं नाही का? उद्या नक्की विचारायला पाहिजे. प्रभा बरी आहे. टिकली आहे कामावर. काम ठीक ठीक करते पण नियमीत तर आहे. कामवाल्या बायका हा पण एक स्ट्रेस ट्रिगर आहे हं. असल्या तरी वैताग नसल्या तरी. स्ट्रेसवरचं ते आर्टिकलपण भारी होतं. त्यावरपण लिहायचं राहिलंच की. उत्साहानं लिहायला घेतलं तर इंटरनेटनं दगा दिला. कॊम्प्युटरवाल्याला आता घरी बोलावून एकदा काय ते बघायलाच हवं. अ‍ॅण्टीव्हायरसपण संपलाय...ई हे म्हणजे घरातली साखर संपलीय असं म्हटल्यासारखं वाटलं. अग्गं बाई खरंच की घरातली साखर संपलीय आता जाता जाता घेऊनच जाऊ. काय करावं ईडनमध्ये घ्यावी का? की डी मार्टमध्ये एखादी चक्कर टाकावी? नकोच डीमार्टमध्ये गेलं तर आणखी दहा गोष्टी घेण्याचा मोह होणार. नकोच. किंवा सरळ संध्याकाळी मोअरमध्ये चक्कर मारावी नाहीतरी परवा लॉक न लॉकचे डबे घ्यायचे राहिलेच होते. जरा वेळ काढून जावं म्हणजे निवांतपणानं बघता येईल. कोणी सोबत येतंय का विचारावं का? तेव्हढाच टाईमपास.....अरे देवा या सगळ्यात गेलं ना ईडन मागे जाऊ दे आता घरूनच मागवावं...घराची किल्ली घेतली ना मघाशी गडबडी? आई गं..घरातून निघताना गॅस बंद केला होता नां? आता घरी गेल्यावर काय दिसणार आहे कोणास ठाऊक? नाही नाही केला होता वाटतं बंद.....बघा आजपण वॉचमन गायब आहे मस्त गेट उघडं टाकून. कोणी आत घुसलं, काही झालं तर काय करणार? आई गं काय ऊन अर्ध्या तासात झीट निघाली नुसती. व्वा. लॉबीत आल्यावर कसं मस्त थंडगार वाटतंय......

हुश्श...आता बास झालं. मनातल्या मनात बोलायचा कंटाळा नाही येत पण बोटं वैतागली बटनं बडवून.

अरे हो जाता जाता सांगायचंच राहिलं. उपरोक्त मनोगताला कसलेही साहित्यिक नियम लावू नका. ही एक चम्मतग आहे. वाचा सोडून द्या. नाही समजली तर आणखिनच गम्मत. शिवाय नेहमीप्रमाणेच मनालाही लावून नका घेऊ.
 

4 comments:

Abhi said...

सुंदर लेख.
मज्जा आली.
आणखी येऊ द्यात.

अभिजीत

भानस said...

चम्मतगं मस्त! शब्दांचं अकाऊंट सुसाट सुटलंय की. येऊ देत अजून.

बाकी मनातल्या मनात झालेल्या शब्दांचं, विचारांचही एडिटिंग करावं लागलं असतं तर...

शिनु said...

अभिजीत, धन्यवाद, मलाही लिहिताना मज्जा आली. :)

शिनु said...

भानस, सुसटलंय खरं सुसाट. होतंय काय की सध्या बोलायचं म्हटलं की मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देणं असं झालंय त्यामुळे स्वत:साठी बोलायची हुकमी जागा नवरा किंवा मनातल्य मनात तो तरी बिचारा किती ऐकणार नां? म्हणून ही सगळी गम्मंत.
आणि तुझा मनातल्या शब्दांचं एडिटिंग करायचा मुद्दा तर धमालच. करूय करूय असंही करूया :))