गेला पेशन्स कुणीकडे?

आईशप्पथ मला नां माझ्या आजीचं अलिकडे जाम कौतुक वाटायला लागलंय. माझ्या आजीला एक नाही दोन नाही, तर सगळी मिळून मोजून आठ मुलं. पुन्हा सगळी शिकली बिकली छान. एकापाठोपाठ एक आलेल्या पोरांना तिनं कसं काय वाढवून मोठं केलं असेल, याचं राहून राहून कौतुक वाटतंय. आमची इथे दोन पोरातच छप्पर उडायची वेळ आलीय. तर मंडळी या पोस्टचा विषय एव्हाना समजला असेलच. सकाळ जशी चढत जाते तसे चढत्या क्रमानं डोक्यावरचे केस अनुक्रमे वैतागानं, चिडचिडीनं आणि अखेरीस संतापानं ताठ उभे रहायची वेळ येते. आमचा हा मॉर्निंग शो शांतपणानं पहाणार्‍या सासुबाई कपालभाती करत करतच म्हणतात, "अगं किती वैतागता गं पोरांवर? पोरंच ती. ती असं वागणार नाहीत तर कोण? चिडू नये असं सारखं सारखं त्यांच्यावर. बरं तर बरं तुमच्या मदतीला निदान बायका तरी आहेत, आमच्यावेळेस आम्ही एका वर्षाचं अंतर असणारी तीन तीन मुलं कोणाच्याही मदतीविना कशी मोठी केली असतील? मुलं मोठी झाली आता नातवंडं आली तरी आम्ही अजून उभे आहोत. तुमचं आत्ताच असं मग आमच्याएव्हढं झाल्यावर कसं होणार? (आता संयमासाठी अनुलोम विलोम करण्याची वेळ माझी असते). जे सासुबाईंचं तेच माझ्याही घरच्यांचं. एकूण सगळ्यांच्या मते आजच्या पिढीत पक्षी माझ्यात (असं थेट बोलण्याची हिंमत कोण दाखवणार नाही का?)पेशन्स नावाची गोष्टच नाहीए. त्यामुळेच मला आजकाल प्रश्नच पडायला लागलाय, "हे पेशन्स म्हणजे काय असते रे भाऊ"? या प्रश्नाला जे उत्तर सापडलं त्याचा मतीतार्थ असा आहे,
१-घड्याळाचा काटा पटापट पुढे चालला असताना रजईत गुरफ़टून झोपलेल्या पिल्लांना शाळेसाठी दर अर्ध्या मिनिटानं एक हाक या रेटनं वेळेत उठवणं म्हणजे पेशन्स.

२-कपभर दूध, आपलं पातेलंभर रक्त आटवून त्यांना प्यायला लावणं म्हणजे पेशन्स.

३-आदल्या रात्रीसापासून घसा खरवडून सांगुनही स्कूल बॅग भरलेली नसताना अखेरच्या क्षणाला ती आपण चपळाईनं भरणं म्हणजे पेशन्स (बाय दी वे, पोरांची स्कूल बॅग भरणं ही सहासष्टावी किंवा सदुसष्ठावी कला म्हणून मान्यता देण्यात यावी असा माझा आग्रह आहे)

४-बारा वीस अशी अगदी ठोक्याला दारात उभी रहाणारी स्कूल बस तुमच्या नशिबात असेल तर किमान बारा एकोणीसला आपण पायर्‍या उतराव्यात या किमान अपेक्षेला फ़ाट्यावर मारणारी पोरं बसमध्ये नेऊन बसवणं म्हणजे पेशन्स.

५-वेणी घालायला बसल्यावर, "पण आई माझी ब्लॅक रिबिन काल हरवली" असं निष्पापपणानं सांगणार्‍या लेकीवर न खेकसणं म्हणजे पेशन्स

६-शनिवार रवीवार आरामात घालवल्यावर सोमवारी सकाळी सव्वाअकरावाजता शाळेत बाईनी अमूक प्रोजेक्ट बनवून आणायला सांगितलाय असं थंडपणानं सांगणारी लेक आईला सुपरवुमन समजते यात तिचा काय दोष? पुन्हा हे प्रोजेक्ट म्हणजे अमकी स्टिकरं चिकटवा तमक्या प्रिंट मारा, क्लेपासून अमकं आणि ढमकं काहीतरी बनवा असले वेळखाऊ असतात. (हा मुद्दा जरा विस्तारानं सांगायचा मोह होतो आहे)(म्हणजे सिन कसा? तर सकाळी अचानकच लेकीला आठवतं की, रेसलर्सची माहिती आणि फ़ोटोग्राफ़्सचा प्रोजेक्ट सांगितलाय. [इकडॆ आपली वेळेशी कुस्ती सुरू होते]मग इकडे दप्तरात सगळं कोंब, तिकडे ते करत असतानाच नेट चालू करून गुगल्यावर माहिती शोध, ते करताना धाकटं पिल्लू चारवेळा बटनांवर हात मारून वैताग आणत असतं. मध्येच शाळेत जाणार्‍या लेकीला जेवायला वाढणं आणि ते ती पटापट खाईल हे पहाणं असलं अत्यंत कौशल्याचं कामही करावं लागतं. ती जेवत असतानाच तिच्या वेण्या घालतानाच धाकटं येऊन मागून ड्रेस ओढत, "आई च्ची च्ची" म्हणून दात काढून हसतं. अधीक माहितीसाठी- च्ची च्ची म्हणजे शी प्रकरण. तर तो उपक्रम पार पडल्यानंतर लगेचच भरपाई म्हणून त्याला खाऊ घालण्याचं काम, जे घरातून चारी ठिकाणी धावत करावं लागतं, अंगाशी येतं. इतकं होईपर्यंत ते प्रिंट ब्रिंट सगळं बदबदा टेबलवरून खाली आलेलं असतं. ते निटपणानं ठेवून शुज पासून रूमालापर्यंत सगळं शोधून काढून, अगदी ट्रेजर हंट खेळल्यासारखं,लेकीला तयार करून धाकट्याला काखोटीला मारून अखेरीस तिला बसमध्ये बसवून हात हलवून हुश्श करत परत यावं तर शु रॅकवर ती प्रोजेक्ट फ़ाईल तशीच बिचार्‍यासारखी पडलेली असते. की पुन्हा धावाधाव सुरू. हाताला येईल ती पॅंट आणि त्यावर हाताला येईल ते टॉपसारखं घालून शाळेकडे गाडी पिटाळावी लागते. बसवाल्याला गाठून फ़ाईल लेकीपर्यंत पोहोचवण्याचं काम पारपडेपर्यंत दिवस डोक्यावरून पुढे गेलेला असतो.) तर हे सगळं तोंडाचा पट्टा सुरू न करता शांतपणानं करणं म्हणजे पेशन्स.

७- शाळेचे शुज घातल्यानंतर त्याचा तुटलेला बेल्ट, क्लिप किंवा असलंच काही दुरूस्त करण्यासाठी बस येण्यापूर्वी दोन मिनिटं कोपर्‍यावरच्या कॉबलरकाकाकडे (हे लेकीनं दिलेलं नाव) धावत सुटणं आणि हे सगळं शांतपणानं पार पाडणं म्हणजे पेशन्स राखणं.

असो. तर मंडळी, माझ्यासारखाच थोड्याफ़ार फ़रकानं सगळ्यांचा पेशन्स कणाकणानं संपत असणार याची मला खात्री आहे. एकवेळ या यादीत भरच पडेल पण कमी नाही होणार. पुन्हा गंमत काय आहे माहितीय कां, या सगळ्या घडामोडीत नवरा कधीच मोडत नाही. चुकून एखाद्या दिवशी तो असेल तर तोही वर आपल्यालाच सांगणार, "अगं किती चिडचिड करतीयस, हॅव सम पेशन्स" त्याला कळकळीनं सांगावसं वाटतं की मी ढीग हॅवींग रे पेशन्स पण ते आणायचे कुठून तो पत्ता सांग नां.
 

14 comments:

रोहन... said...

धमाल... :) खरच भयंकर संयम हवा... :) शुभेच्छा...

तू ठाण्यात राहायला आहेस काय? कुठेशी?

हेरंब said...

जबरा जबरा भन्नाट !!! खरंच आम्हीही नेहमी हाच विचार करतो.. माझ्या पणजीला १२ मुलं, आजीला ४.. कसं केलं असेल त्या लोकांनी !! आमचं छप्पर उडवायला तर एकच ध्यान पुरं पडणार आहेसं दिसतंय..

>> या सगळ्या घडामोडीत नवरा कधीच मोडत नाही.

गलत जवाब !!!!!!

aativas said...

'पेशन्स'च्या नव्या व्याख्या चांगल्या आहेत..
पण जुन्या लोकांच मला ते एक आवडत! त्यांना पर्याय नव्हते म्हणून पेशन्स जास्त होता अस मला वाटत .. आपलाही तेच होत .. एकदा एखादी गोष्ट अपरिहार्य आहे अस कळल की आपला पेशन्स वाढतो!

शिनु said...

@ रोहन

धन्यवाद. प्रतिक्रीयेबद्दल आणि शुभेच्छांबद्दलही. :)

शिनु said...

@हेरंब...हो रे हो.....होच्च. तु अजून एकुलत्या एका पिल्लाचा बाबा आहेस नां म्हणून. बायको दोनाची तीन झाली की त्या तिकडीच्या गोंधळानं नवरा बिचारा जास्तच बावरून जातो. (माझा तरी :)) त्याला बिचार्‍याला बर्‍याचदा समजतच नाही की पोरं आवरावीत की बायकोला....:))))

शिनु said...

@ aativas
बरोबर आहे. पर्याय नसला की मग पेशन्स वाढवावेच लागतात. :)

meg said...

ekdam best!

btw aaji aajobankade mottha satha asto patience cha.. sadhya amchyakade patience cha pooor aalay!

2 taas manasokta TV baghun, khelun zalyavar ratri 11 vajta lekini te project prakaran baher kadhla! mag kay... aajoba aajincha ch patience panala lavla!

भानस said...

शिनू, लेख एकदम मस्तच.

सेम पिंच. तेव्हां मुलं जास्त म्हणून कामे जास्त. प्रत्येकाची वेगळी तर्‍हा त्यामुळे त्यानुसार संयम. हल्ली एक दोन मुलं त्या आठ-दहांची कसर काढत असतात. :D

या सगळ्या घडामोडीत नवरा कधीच मोडत नाही. +१२३४५६७८...

आता जरा हुश्श कर, पंखा फिरव आणि मस्त आल्याचा चहा चवीचवीने पी. :)

शिनु said...

भानस,


थॅन्कु गं. आल्याच्या चहाची सूचना पुढच्यावेळेस लक्षात ठेवून अंमलात आणली जाईल. :))

शिनु said...

मेघ,
अगं बाई! :))) कमालच आहे लेकीची :))) साडेअकरा हा काय शुभ मुहुर्त आहे कळत नाही. एक तर रात्रीच्या साडेअकराला किंवा सकाळच्या....या पोरींना हिच वेळ कशी काय साधता येते? आणि आज्जी आजोबांच्या पेशन्सचं म्हणशिल तर ते विचारूच नकोस त्यातून या सगळ्या दूधावरच्या सायी......पेशन्सच पेशन्स....जय हो!!!:))

Onkar Danke said...

जोरदार झालाय लेख आज खूप दिवसांनी तुमचा ब्लॉग वाचला... मला माझे लहाणपण आठवले. लहाणपणी किंवा (अगदी आजही) मी आईला असंच छळलंय.

शिनु said...

@ omkar

thanku and welcome again.

Anonymous said...

बायो गं.... कहर गं कहर... अगं घाईच्या वेळेस नेमके शु साठी म्हणून पिल्लांनी जाऊन आणि आत गेल्यावर तिथेच अजून काही वेळ काढण्याची उर्मी दाटल्यासारखे ’पॉट्टी’ ओरडत निवांत तो कार्यक्रम उरकणे घरोघरी सारखेच गं....

>>>हाताला येईल ती पॅंट आणि त्यावर हाताला येईल ते टॉपसारखं घालून शाळेकडे गाडी पिटाळावी लागते.

यातलं ते ’टॉपसारखं’ हे विलक्षण भावलं, तरी बरं आपलीच पात्र तेव्हा घाईत असतात नाहितर ड्रेसिंग सेन्स बद्दल तेच चारचौघात बोलतात गं..

शिल्पा अगं पेशन्स वाढवण्याखेरीज हातात काही नाही गं आपल्या, अजून तर एक जावई आणि एक सुन येणार आहे गं... देवा!!!!

प्रसाद हरिदास said...

baaapare baap.. Kasa kay lihit ayar tumhi??? I can't catch hese things in words...

Mazya bhachyabarobar 3 mahine hech kel ami.. enjoyed sutti long back in 2003