आपल्याला सिनेमा (मला मराठीतही याला सिनेमाच म्हणायला आवडतं कसं आपलं तुपलं वाटतं चित्रपट म्हटलं की....जाऊ दे)दोन कारणांनी लक्षात रहातो एक तर त्या सिनेमामुळेच आणि दुसरा म्हणजे त्या सिनेमाच्यासंदर्भात किंवा त्या त्या वेळेस बनलेल्या काही खास आठवणींमुळे. आजची ही पोस्ट अशाच आठवणींना पोस्त देण्यासाठी.....
सर्वात पहिली आठवण इथे अगदी समयोचीत वगैरे म्हणतात तशी आहे कारण आठवण आहे सिनेमाच्या पडद्याची आणि कोणत्याही नाटक सिनेमाची सुरवातही पडदा उघडूनच होते नाही का? माझ्या पिढीला (माझी पिढी म्हटल्यावर डोळ्यासमोर आजीबाईचा बटवा वगैरे आणाल तर खबरदार. माझी पिढी म्हणजे सिंगल स्क्रीन सिनेमावर पोसलेली आणि आजची पिढी म्हणजे पॉपकॉर्न चावत मल्टिप्लेक्समध्ये सिनेमे बघणारी) सिनेमा बघायला मिळायचा (त्यावेळेस सिनेमा सुरू झाला असं म्हणत नसत तर पाट्या पडल्या असं म्हणत)तो त्याच्या समोरचा पडदा दूर झाल्यावर (खरं तर त्याहीनंतर नाही. कारण विकोनं दात घासल्याशिवाय, लिरीलनं धबधब्याखाली न्हाऊन माखून झाल्याशिवाय, नाकाला/ छातीला विक्स लावल्याशिवाय, ड्युक्स किंवा तसलंच काही लिमका बिमका प्यायल्याशिवाय, इंदिरा गांधींची देशाच्या प्रगतीविषयीचं भाषण ऐकल्याशिवाय सिनेमा सुरू म्हणून व्हायचाच नाही. जाता जाता जरा विषयांतर करायची परवानगी मागते हं कधिचं मनात होतं लिहावं. आता संधी आहे तर लिहून घेते. ते सिनेमाच्या आधी दातानं आक्रोड फ़ोडणारे आजोबा आहेत नां, ते आमच्या लहानपणापासून अस्सेच दातानं आक्रोड फ़ोडतायत, आम्ही मारे अमिताभ बच्चन बघायला जावं तर हे आक्रोड फ़ोडत बसलेत. इतकी वर्षं झाली पण त्यांचा हा उद्योग अजून संपला नाही. धन्य आहे विको वज्रदंतीची! या अजोबांना कोणीतरी सांगा रे की, आताशा फ़ोडलेलेच काय पण बारीक तुकडे केलेले आक्रोडही बाजारात मिळतात कशाला उगाच म्हातारपणी असले भलते स्टंट करावेत म्हणते मी. उगाच काय एखादा दात बीत तुटला किंवा पडलाच तर काय विकोवाले भरून देणारेत? मग नंतर आज्जीचे रपटे मिळतील ते वेगळेच. असो तर आता मूळ विषयाकडे कंसाबाहेर) तर त्यावेळेस सांगलीत स्वरूप नावाचं नवं कोरं त्या काळातलं चकाचक थिएटर बनलं होतं आणि तिथे पहिलाच सिनेमा लागला होता लावारीस. दुपारी आईच्या महिलामंडळाचं अचानकच सिनेमा बघायला जायचं प्लॅनिंग बनलं अणि गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या न्यायानं अस्मादिकही गेले. बरं सिनेमातलं ओ की ठो कळायचं नाही (त्यावेळेस तर अमिताभ आणि झिनत अमान ही दोनच नावं माहित होती त्यामुळे सिनेमा कोणताही पाहिला तरी त्यात हे दोघेच असतात असा माझा ठाम समज होता) शिवाय ते ढिशुंम ढिशुम बघायला लागलं की जीव घाबरा व्हायचा ते वेगळंच. तिकडे बच्चन दे दणादण हाणतोय आणि इकडे मी हंबरडा फ़ोडतेय हा सीन कॉमन असायचाच. तर या सिनेमाला जाताना आईनं तंबी दिली की खरदार चोंबडेपणा करून ऑफ़िसमधून आल्या आल्या दादांना (वडिलांना) सिनेमा बघितलेला सांगशिल तर. जे काय सांगायचं ते मी सांगेन. संध्याकाळी दादा घरी आले, चहा पाणी खाणं झालं तरी सिनेमाचा विषय काही निघेना, मला तर जाम डुचमळायला लागलेलं की कधी एकदा सिनेमाच्या पडद्याची गम्मत दादांन सांगेन म्हणून. पण आई सांगायचं नाव घेईना म्हटल्यावर मी तोंडाचं कुलुप उघडलंच,"दादा, आम्ही नां आज नां दुपारी नां एक गम्मत पाहिली. तो अमिताभ आहे ना तो पहायला गेलो तर आधी पडदा कित्ती छान वर जात होता अस्सा (बोटानं अर्धगोल हवेत रेखाटत) आणि माहितीय सिनेमा संपल्यावरही तो अस्साच खाली आला (पुन्हा बोटानं हवेत अर्ध गोल रेखाटत) पण ना आईनं सांगितलंय की आम्ही सिनेमा बघितला हे सागायचं नाही म्हणून ते मी नाही सांगत, हो नां गं आई"? यानंतर आईची माझ्याकडे फ़ेकलेली नजर अजूनही आठवते आणि तिनं दादांना काही सांगायचं म्हणून सुरवात केली तर दादांनी फ़क्त कडक शब्दात "समजलं" असं सांगितलं. त्यानंतर अनेक वर्षं ही आठवण मला प्रत्येकानं सांगून बेजार केलेलं आहे.
दुसरी आठवण आहे भालू या मराठी सिनेमाची. हा सिनेमा बघायला मी आणि आई दोघीच गेलोलो होतो. सिनेमा सुरू झाल्यानंतर पाचव्या मिनिटाला मला आणि आईला समजलं की हे बघणं मला झेपणार नाही. आईनं युक्ती सांगितली की तिच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटून झोप. मी तसं केलं पण डोळे हळूच किलकिले होतच होते आणि कान कसे बंद करणार, ते सगळं ऐकत होते. त्यामुळे बघितला नाही तरी सिनेमा समजलाच. मात्र झालं काय की शेवटी शेवटी जरा झोप लागलीच. सिनेमा संपला तसं आईनं उठवलं. समोर पाहिलं तर अंधार गुडुप मी जे भोकाड पसरलं की काही विचारू नका. हमसून हमसून रडतेय म्हटल्यावर आईला वाटलं की अंधारात काही चावलं बिवलं की काय? तिनं चार पाच वेळा काय झालंय विचारल्यावर मी त्याच सुरात विचारलं "भालू कुठ्ठाय"? सुरवातिला आईनं पेशन्स राखत लॉजिकल उत्तर दिलं. नंतर मात्र ती वैतागली आणि म्हणाली "गप गं भालू गेला पडद्यामागे भाकरी खायला". आई शप्पथ त्यावेळेपासून मला त्या थिएटरच्या बाहेरचं प्रत्येक कुत्रं भालूच वाटायचं.
तिसरी मस्त धमाल आठवण माझी नाही तर बंधुराजांची आहे. एव्हाना शक्य असेल त्यावेळेस पोरांना घरीच ठेवायचं सिनेमाला न्यायचं नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला होता. मात्र एका दिवाळीच्या सुट्टीत जरा मोठी भावंडं आत्यांसोबत जंजीर बघायला गेली. तिकीटं काढून मंडळी आत गेली या मंडळात बिचारा माझा भैय्याच काय तो वयानं सर्वात लहान होता. त्याला धड सांगताही येईना की त्याला सिनेमा बघायची भिती वाटतेय म्हणून. त्यात आतून क्लायमॅक्सचं ढिशांव ढिशुम ऐकायला यायला लागल्यावर तर त्याचा निर्णय पक्काच झाला. मस्त एक आईस्क्रीम खाऊन झालं, हातात वेफ़र्सचं पाकीट घेतलं आता आत जायची वेळ आली म्हटल्यावर हा पठ्ठ्या जागून हलेचना. सीन कसा तर हा मागे रेटतोय आणि बाकीची भावंडं याचे हात ओढत याला चल रे काही होत नाही म्हणत पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. अखेर यानं भोकाड पसरलं आणि धमकी दिली की अजून जोरात ओढाल तर आणखी रडेन. झालं बाकीच्यांना आणखी चेव चढला. आत जाणार्यांना हा प्रकार जास्त मनोरंजक वाटल्यानं सगळे गंमत बघत उभे राहिले. अखेर आत्यांनी जरा मोठ्या चुलत भावाला भैय्याला घरी सोडून मग पुन्हा सिनेमाला यायला सांगितलं. उर्वरीत आम्ही मंडळी घरी काचाकवड्या खेळत असतानाच भैय्यामहाराजांचं बोचकं मोठ्या भावानं दणकन आत ढकलंलं आणि तो निघून गेला. त्यानंतर आम्हाला भैय्यानं आव आणून गोष्ट सांगितली आणि बाकीची मंडळी घरी आल्यावर सत्य की हकीकत समजली.
लहानपणाच्या आठवणींतून बाहेर येण्याआधी त्यावेळेस पडणारा एक गमतप्रश्न आणि त्याचं माझ्यापरीनं मी शोधलेलं उत्तर, त्यावेळेस म्हणजे जिंतेंद्रनं श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यासोबत दक्षीणछापातले सिनेमे काढण्याचा सपाटा लावला होता त्यावेळे एका गाण्यात नायक आणि नायिका असंख्य कपडे बदलतात असं दिसायचं. मला नेहमी प्रश्न पडायचा की हे लोक गाणं गाता गाता, नाचता नाचता असे फ़टाफ़ट कपडे कसे बदलतात? नायकाचं एकवेळ ठीक आहे की त्याला काय शर्ट पॆंटच घालायची आहे पण हिरोईन इतक्या झटपट साड्या बदलून पुन्हा मॅचिंगचं सगळं घालून पुढची ओळ म्हणायला कशी काय हजर असते? मला वाटायचं की गाणं म्हणायला बागेत जाताना हे लोक बहुदा कपड्यांची बॅग सोबत घेऊन जात असतील.
सिनेमाशी संबंधीत सर्वात जास्त धमाल आठवणी असतात त्या तरूणपणातच असं आपलं माझं मत आहे. म्हणजे या वयात पाहिलेले सगळे सिनेमे गाण्यांमुळे, कथेमुळे लक्शात रहाण्यापेक्षा त्या त्या वेळेस घडलेल्या काही ना काही प्रसंगांमुळेच लक्षात राहिले आहेत. कॉलेजमध्ये गेल्यावर सर्वात पहिला बंक मारून पाहिलेला सिनेमा परिंदे(दुसर्यांदा लागलेला). गाव तसं लहान त्यामुळे हे अॅडव्हेंचर आम्ही घरी पोहोचण्याआधीच समजलं होतं आणि आम्हाला शिस्त लावण्याची सर्व जबाबदारी भैय्यामहाराजांच्या खांद्यावर असल्यानं त्यांनी घराबाहेरच उभं केलं. बरं तर बरं अंगठे वगैरे धरून उभी रहा असं काही त्यानं सांगितलं नाही. ते काही बरं नसतं दिसलं. असो. बंधुराजांचा नियम काय? तर म्हणे, आधी तो स्वत: सिनेमा बघणार आणि मग मी तो बघण्यासारखा असेल तर परवानगी देणार. म्हणजे या उद्योगामुळे हा स्वत: झाडून सगळे सिनेमा बघणार हा त्याचा कावा माझ्या वेळीस लक्षात आला म्हणून बरं. नंतर नंतर त्यानं ही सेन्सॉरशिप काढून टाकली पण यामुळे सौदागरसारखा पानपत्ती सिनेमाही (बाय दी वे त्यातला विवेक मुश्रम क्युट हं)लपून पहावा लागला.
साजन लागला त्यावेळेसची धमाल तर विचारूच नका. एकतर कॉलेजचं नव्हाळीचं वर्ष, साजनला जायचं ठरलं, मी माझी एक मैत्रीण आणि आमच्यासोबत माझी मावशी असं जुगाड ठरलं. तिकीटं काढून झाल्यावर पाहिलं तर अजून अर्धा तास हातात होता. मग मावशीबाईनी फ़र्मान काढलं की चला तोपर्यंत पलिकडच्या मंडईतून भाजी घेऊन येऊ. म्हटलं चला (न चलून करता काय स्पॉन्सरशिप होती ना) भाजी घेऊन आलो तर सिनेमा सुरू झालेला होता. अंधारात धडपडत बाल्कनिच्या पायर्या चढू लागलो, बॅटरी पुढे, त्याच्यामागे मावशी आणि तिच्या मागे आम्ही दोघी अशी यात्रा एक एक पायरी वर चढत होती. मध्येच कधितरी या दोघी सुळकन आपल्या खुर्चीत जाऊन बसल्या आणि मी माधुरीकडे वळून पहाण्याच्या नादात पाय अडकले आणि धमकन अर्धी मुर्धी आडवी झाले. आता हे फ़ारसं कोणाला समजलं नसतं पण मावशीनं तिकडून विचारलं,"शिल्पे कार्टे धडपडलीस काय"? आता मावशिचाच आवाज तो, मस्त खणखणीत. अख्ख्या बाल्कनीत खसखस पिकली. असो तर जागेवर जाऊन पुढ्चा सिनेमा शांतपणानं पाहिला आणि इंटर्व्हल झाल्यावर आजुबाजुला बघितल्यावर असली लाज वाटली, अर्धं कॉलेज बाल्कनीत समावलं होतं. काय झालं असेल शरमून ते विचारूच नका. त्यानंतर मावशीनं कितिही उदारपणानं तिकीटं काढली तरिही तिच्यासोबत सिनेमा बघायचाच नाही हा पण केला.
डर सिनेमा बघेपर्यंत आम्ही रितसर बंक करून सिनेमा बघण्याइतके सरावलो होतो. एका रविवारी चक्क इमानदारीत डर बघितला. मात्र झालं काय की या सिनेमाच्यावेळेस बजेट जरा पातळ होतं म्हणून मग खालची तिकीटं काढली. माझी एक मैत्रीण मस्त मांडी घालून सिनेमा बघत होती. इंटरव्हल झाल्यावर चपला घालायला म्हणून पाय खाली केले तर चप्पलच नाहीत. देवळातून चपला चोरीला जातात हे माहीत होतं पण थिएटरमधून? खुर्ची खाली गेल्या असतील, इकडे तिकडे असतील म्हणून शोधल्या, अखेरीस बॅटरीलाही बोलावलं पण चप्पल मिळाल्याच नाहीत. पुढचा अर्धा सिनेमा असा तसाच घालमेलीत बघितला कारण उरलेला पूर्ण वेळ आता काय करायचं याचा खल करण्यातच गेला. सिनेमा झाल्यावर उरलेल्या पैशातून तिच्यासाठी निळ्या पट्याच्या पांढर्या स्लिपर्स घेतल्या आणि चुपचाप घरी आलो. रस्ताभर तिच्या स्लिपर्सकडे पाहून पाहून सगळे हसत होतो. आजही मला एक प्रश्न सातवतो की हिच्या पायाखालच्या चपला गेल्याचं हिला समजलं कसं नसेल?
दोन सिनेमांच्या आठवणी तर कायमस्वरूपी मेंदुच्या मेमरीतून फ़ॉरमॅट करता येतील तर बरं अशा आहेत
पैकी पहिल्या सिनेमाचं नाव आहे "कॅप्टन प्रभाकर" आणि दुसरा आहे "कालापानी".
दिवसभरात दोन चार क्लासेस असायचे त्यामुळे दिवसभर इकडून तिकडे धावणं सुरू असायचं. सर्वात शेवटचा क्लास अकांऊंटसाचा. त्याची लेजर्स वाहून न्यायची म्हणजे एखादं लहान पोर मागे बसल्यासारखं वाटायचं. त्या दिवशी माझी सायकल नव्हती म्हणून मग आमची सगळ्यांच्या वह्या एकीच्या सायकलवर आणि आम्ही ड्बलसीट असे चाललो होतो. वाटेत अंतर पडलं, दिवस पावसाळ्याचे होते, अचानकच धुमधुम पाऊस पडायला लागला. आम्हाला थांबायला आडोसाच सापडेना, इतक्यात कडेकडेने चालत आम्ही एका थिएटरच्या समोर जाऊन थांबलो. बराचवेळ झाला तरी पाऊस थांबायची लक्षणं दिसेनात एव्हाना आता क्लासही चुकल्यातच जमा होता. काय करावं बरं असा विचार चाललेला असतानाच मैत्रीणीनं सुचवलं की इथे उभंरहाण्यापेक्षा आत जाऊन एखादा सिनेमा बघू तोपर्यंत पाऊसही थांबेल. कल्पना वाईट न वाटल्यानं आम्ही कोणता सिनेमा लागलाय हे पाहिलं तर "कॅप्टन प्र्भाकर". योगायोगानं याच सिनेमाविषयी भावाच्या एका मित्रानं दोनच दिवसांपूर्वी अरे मस्त आहे असा शेरा दिल्यानं बिनधास्त तिकीटं काढली. अवघ्या पाच मिनिटात काय पाप केलंय हे लक्षात आलं आणि थोड्या वेळानं इंटरव्हल झाल्यावर आजुबाजुला पाहिलं तर अख्ख्या थिएटरमध्ये आम्ही दोनच कन्या होतो.सगळे आमच्याकडे बघतायत... जी धुम ठोकली बाहेर, विचारायची सोय नाही. भर पावसात घाम फ़ुटला. घरी गेलो. दुसर्या दिवशी क्लासमध्ये आणखीनच गोंधळ. काल आम्ही नव्हतो मात्र आमच्या जागा पकडून आमच्या वह्या तासभर इमानदारीत बसल्या होत्या. त्यामुळे सरांनी विचारलं कुठे होता काल? (काय सांगता कप्पाळ?) त्याच दिवशी संध्याकाळी ज्यानं उत्तम चित्रपटाचा शेरा दिला होता तो वाघ भेटला. त्याला म्हटलं काय रे कसला सिनेमा आहे टुकार तर म्हणाला? तुम्ही पाहिला? आम्ही हो म्हटल्यावर तर हसून आडवा पडायचा बाकी राहिला होता. वर म्हणतो कसा, मी हा सिनेमा पाहिला आणि जाम पकलो म्हणून ठरवलंच होतं कोणालातरी हा बघायला लावायचाच. कालापानीची आठवण तर काळ्यापाण्यासारखीच भयानक आहे. कोल्हापूरमधली गोष्ट. तिथे दोन थिएटर आहेत जी पाठीला पाठ लावून आहेत. म्हणजे इकडे सिनेम बघायचा आणि तिकडे दुसर्या थिएटरमधून बाहेर पडायचं (अर्थात हे सुरवातिला माहितच नव्हतं). एका रविवारी मी आणि माझी रूमपार्टनर कालापानी बघायला गेलो, बाहेर पडताना मागच्या थिएटरमधून बाहेर आलो आणि सहज वर बघितलं तर मागच्या थिएटरमध्ये एकदम "ई’ ग्रेड सिनेमाचं पोस्टर, त्यात भर म्हणजे अगदी समोर रस्त्यावर दोनचार ओळखिचे चेहरे, बाप रे! आता यांना वाटणार आम्ही हा असला सिनेमा बघितला की काय? पुन्हा आता त्यांना ओळखिचं हसू द्यायचं की असंच हळूच सटकून जायचं हे समजेना. कसलं काय अन फ़ाटक्यात पाय असला प्रकार सगळा.
तर अशा या सिनेमाच्या आठवणी त्या त्या वेळेस नाही म्हटलं तरी तापदायकच ठरलेल्या मात्र आता मस्त हसवणार्या.
सिनेमाच्या आठवणींची आठवण
चॊकलेट क्रीमी नटी कप

आजपासून हा विषयही लिहणं सोडायचा नाही असं ठरवलंय. कारण खाणं कोणाला चुकलंय सांगा? अखेर माणूस जगतो का? तर खातो म्हणूनच ना? मग खायचंच तर चवीचं का नाही? हे माझं साधं सोपं तत्व आहे. (खाण्यावरून आठवलं बरेचजण पॅसिव्ह स्मोकींग असतं तसं पॅसिव्ह खाणं (खरं तर हादडणं) असतंच की. अशा विषयाला वाहिलेले ब्लॉग, साईट फ़ोटोबिटोसहित सजवलेल्या थाळीसारखे समोर येतात तेंव्हा वजन वाढतं का?)असो. तर असे बघितलेले पदार्थ जसेच्या तसे न करण्याची खोड असल्यानं हा एक सततचा उद्योग सुरूच असतो. घरात हौसेनं खाणारी आहेत म्हणून हा उद्योग अजुनतरी सुरू आहे. मग विचार केला की चला ही हौस इथेही पुरवून घेऊच. कोणत्याही नव्या गोष्टीची सुरवात गोडानं करतात मग "भरपेट" लेबलाची सुरवातही गोडानं.
चॊकलेट क्रीमी नटी कप
मूळ पदार्थ संजीव कपूर यांच्या एका शोमध्ये बघितला होता त्यात त्यानी केवळ हे कप कसे करायचे दाखवले आणि हे कप पूर्णपणे चॉकलेटनं भरण्याचा पर्याय सुचवला होता. मी थोडा बदल करून त्याला नटी-क्रिमी बनविला. यातला कोणताही पदार्थ तापदायक नाही म्हणजे प्रमाण कमी झालं जास्त झालं तर पदार्थ बिघडेल अशी एक धास्ती असते ती इथे अजिबात नाही त्यामुळे बिनधास्त प्रयोग करून पहा. अगदीच सगळंच बिघडलं तरी "लिक्विड क्रीमी नटी चॊकलेट" या नावाखाली चॉकलेटचं पिठलं बिनधास्त खपवता येतं याची गॅरंटी आहे. चला मग किचनमध्ये-
साहित्य-चॉकलेट बार (हव्वे तितके), आक्रोड-बदामकाप-काजूकाप (हव्वे तितके), व्हॅनिला क्रीम (पिल्सबरीच रेडीमेड मिळतं. ज्यांना इसेन्स वगैरे घालून बनविण्याइतका उत्साह आणि उरका असेल त्यांनी तसं बनवावं), पिठी साखर (जसे गोड खाणारे असाल तितकी)
इतर साधनं- काचेचा जाड बाऊल, पाणी, प्लॅस्टिकचे छोटे ग्लास (वापरून फ़ेकून द्यायचे असतात ते) किंवा कॅण्डी कप.
कृती-काचेच्या बाऊलमध्ये चॉकलेट बारचे तुकडे करून घाला आणि हा बाऊल एका दुसर्या मोठ्या भांड्यात ठेवा या मोठ्या भांड्यात कडेनं हळू हळू पाणी ओता आणि ते गॅसवर ठेवा. आता हळू हळू काचेच्या बाऊलमधलं चॉकलेट वितळू लागेल ते सत चमच्यानं हलक्या हातानं हलवत रहा. पूर्ण वितळलं की गॅस बंद करा आणि बाऊल बाहेर काढून घ्या. ते थोंड साधारण तापमाना येऊ द्या, आता प्लॅस्टिकच्या ग्लासला वरच्या बाजुनं कट मारा आणि त्यात चॊकलेट ओता आता जास्तीचं चॊकलेट चमच्यानं बाहेर काढा आणि एका ट्रेमध्ये ठेवून द्या. हे कप बनविण्याची दुसरी सोपी पध्दत म्हणजे कपमध्ये१/३ चॉकलेट भरायचं आणि मग स्वच्छ पेंटब्रश घेऊन त्यानं कपला चक्क चॉकलेट पेंटसारखं लावायचं मात्र असं करताना ते एकसारखं लागेल याची काळजी घ्यायची. असे हवे तितके कप बनवून घ्या आणि ते फ़्रीजमध्ये सेट करायला ठेवा. अर्धात तास ते एकतासात छान सेट होतील. आता दुसर्या बाऊलमध्ये व्हॅनिला क्रीम, साखर, सगळे ड्रायफ़्रुट एकत्र करा. चॉकलेटचे कप बाहेर काढा आणि त्याच्या आतला प्लॅस्टिकचा ग्लास फ़ाडून बाहेर काढून टाका आता या चॉकलेटच्या कपमध्ये क्रीम भरा आणि पुन्हा एकदा फ़्रीजमध्ये थोडावेळ सेट होण्यासाठी ठेवा. खायला देताना बटरपेपरवर ठेवून द्या.
जास्तिच्या सूचना-व्हॅनिला क्रीमाइवजी चॉकलेट क्रीमही वापरा येतं किंवा संजीव कपूर यांच्या सुचनेनुसार ते पूर्ण चॊकलेटनं भरता येतं.
-कोणत्याही फ़्वेवरचं क्रीम भरून वैविध्य आणता येतं.
-वितळवलेलं चॉकलेट बटरपेपरव पातळ पसरवा आणि त्याच्या पट्ट्या कापा. क्रीमवर सजविण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
-मी एकदा यात चॉकलेट नटी आईस्क्रीम भरलं होतं तेदेखिल धमाल लागतं.
-वाढदिवला (अर्थात लहान मुलांच्या) आलेल्यांना चॉकलेट देण्याची पध्दत आहे त्यावेळेस हे छोटे कप ड्रायफ़ुट कॆरेमलाईज करून घालून भरावेत आणि द्यावेत पोरं खुष. आया खुष (काहीतरी पौष्टिक खाल्लं म्हणून)
सर्वात महत्वाची सूचना-आत्ता पोस्ट लिहिताना हे मी केलेले नाहीत म्हणून त्याचा फ़ोटो साभार आहे. उगाच फ़ोटो पाहून माझ्या फ़ोटोग्राफ़ीकौशल्याच्या प्रेमात पडू नका.
सगळ्या सूचना संपल्या. आता नक्की करा हं चॉकलेट आणि इथे परतून नक्की सांगा कसं बनलं.
मनातल्या मनात

आपल्या प्रत्येकाच्या आत एक गलगल्या असतोच असतो, अखंड बकबक करणारा, या विषयावरून त्या विषयावर माकडासारख्या उड्या मारत भटकणारा, उडाणटप्पू, गुंड, गोड, निष्पाप, विचारी, अविचारी इत्यादी इत्यादी. "व्हाय वुमन...."मध्ये वाचलं होतं की म्हणे, बायका दिवसाकाठी वीसहजार शब्द किमान बोलल्याखेरीज तोंड बंद करत नाहीत (श्शी फ़क्त?) तर हे झालं प्रकट शब्दांचं अकाऊंट पण मनातल्या मनात जे अखंडीत चालू असतं त्याचं काय? असो. विषय उगाच गंभीर होण्याआधी पुन्हा आपल्या मूळ पदावर यावं झालं. तर मुद्दा काय? की मनातल्या मनात बोलण्याचा. या बोलण्याला नां कसला काही ताळच नसतो. कुठून विचार सुरू होतात आणि कुठे फ़िरत, भटकत जातात...सगळंच गमतिचं. कधी कधी वाटतं या मनातल्या संवादाची फ़ोटोकॉपी काढता आली तर दुसरं विनोदी लिखाण वाचण्याची गरजच नाही. तसं कशाला? हा एक मासलाच घ्या नां, उगाच आपलं नमनाला घडा कशाला? नाही का?
चला मग गलगले निघाले.......
गलगले थांबा. निघालात काय असे गडबडीनं. वाचकांना संदर्भसुची नको का द्यायला? त्यांना काय समजणार हे सगळं काय चाललंय ते? तर नमुना म्हणून दर शनीवारची मुलीला शाळेत सोडून येईपर्यंतची तीस मिनिटं इथे दिलेली आहेत. तसं सगळंच डिट्टोसेम लिहिलेलं नाही, जरा एडिटिंग केलेलं आहे (गलगले मनातल्या मनात झालेल्या संभाषणाचं कसलं आलंय डोंबलाचं एडिटिंग?) तर गलगले कंसातून बाहेर आलेले आहेत आणि गलगल्यांनी सूचना संपविल्या आहेत.......
चला आवरा आवरा धावा...उशिर झाला, गाडी अजिबात सुरू नाही होत...झाली झाली चला आता सुसाट....आली कुत्री आडवी आलीच लगेच. मनेकाला काय सांगायला होतं कुत्री बिचारी असतात म्हणून इथे अंगावर धावून येतात तेंव्हा पाय वर घेऊन गाडी चालवायची वेळ येते त्याचं काय?.....परवा अशी आली धावत गाडीकडे....घाबरून पाय पोटाशी घेतले आणि मग लक्शात आलं की अरेच्चा, आपण तर कारमध्ये आहोत आणि काचा वर आहेत. पण श्र्वास थांबला नां सेकंदभर, त्याचं काय?......ओढणी बांधलीय नां मागे? नाहीतर अडकायची कुठेतरी.....अरे हा रस्त्याकडेचा पत्रा काढला की, आत केव्हढी दाट झाडी आहे....झाडं का तोडतात?.....अरे देवा, आता इथेही ट्रॅफ़ीक जॅम....चल बाबा लवकर पुढे, ये बाईकवाल्या तुलाही आत्ताच मध्ये तडमडायचं होतं?....हं सुटलो एकदाचे, पाच मिनिटाच्या रस्त्यावर पंधरा मिनिटाचा प्रवास....रस्ते काय उकरतात सारखे, पुन्हा खड्डे बुजवतही नाहीत.....आता वळायचंच की उजवीकडे....हा पॅच बाकी मस्त आहे. शांत, थंड. व्वा, काय बरं वाटतंय मनाला. तसा काही फ़ार उशिर नाही झालेला..... आज आता पुस्तक वाचून संपवायलाच हवं घरी जाऊन मस्तपैकी संपवून टाकू, काम बिम राहिलं बाजुला. कित्ती दिवस झाले असे निवांत घालवून....आई गं काय मस्त ड्रेस आहे. तिला छान दिसतोय....आला आणखी एक खड्डा आला. किती वर्षं झाली हा खड्डा इथेच आहे.....आता गाडी कुठे लावावी? कधीच का जागा मिळत नाही इथे? कसे लावतात लोक गाड्या? फ़टकवायला हवं सगळ्यांना.....भाजीपण घ्यायचीय जाता जाता....कोणती भाजी घ्यावी बरं? पालेभाजीच घ्यावी एखादी......मिळाली की जागा पार्किंगला.... चला सुटले बाई एकदाचे.......आई गं...घरातून निघाल्यापासून किती बोलले मनातल्या मनात. यावर एकदा लिहायला हवं. किती दिवस झाले ब्लॉग लिहून.किती विषय नुसतेच सुरू करून सेव्ह करून सोडून दिलेत. ते काही नाही आता ते सगळे विषय पूर्ण करायचेच. होतं काय की असं काहीतरी लिहायचं सुचतं आणि मग सुचतच जातं पण त्यावेळेस ब्लॉग लिहिण्याइतका वेळ नसतो आणि लिहिण्यासाठी आवर्जून बसलं की हे इतकं सगळं सुचत नाही. आजकाल जरा कंटाळाच येतोय नाही पण? पूर्वी नियमानं लिहिलं जायचं...आता का असं झालंय?तसं तर तो पण विषय राहूनच गेलाय लिहायचा, तो फ़सवणुकीचा, मग तो ढापूगिरीचा, ती घरसाजवटीची एक लिंक शेअर करायची होती तीपण राहिली. काय मस्त होतं पण ते बाथरूम, काय मस्त फ़ील होता, रोजवालीचं इंटिरीयरपण मस्त आहे नाही? शांत आणि थंडावा देणारं. प्रभानं या आठवड्यात बाथरूम घासून घेतलं नाही का? उद्या नक्की विचारायला पाहिजे. प्रभा बरी आहे. टिकली आहे कामावर. काम ठीक ठीक करते पण नियमीत तर आहे. कामवाल्या बायका हा पण एक स्ट्रेस ट्रिगर आहे हं. असल्या तरी वैताग नसल्या तरी. स्ट्रेसवरचं ते आर्टिकलपण भारी होतं. त्यावरपण लिहायचं राहिलंच की. उत्साहानं लिहायला घेतलं तर इंटरनेटनं दगा दिला. कॊम्प्युटरवाल्याला आता घरी बोलावून एकदा काय ते बघायलाच हवं. अॅण्टीव्हायरसपण संपलाय...ई हे म्हणजे घरातली साखर संपलीय असं म्हटल्यासारखं वाटलं. अग्गं बाई खरंच की घरातली साखर संपलीय आता जाता जाता घेऊनच जाऊ. काय करावं ईडनमध्ये घ्यावी का? की डी मार्टमध्ये एखादी चक्कर टाकावी? नकोच डीमार्टमध्ये गेलं तर आणखी दहा गोष्टी घेण्याचा मोह होणार. नकोच. किंवा सरळ संध्याकाळी मोअरमध्ये चक्कर मारावी नाहीतरी परवा लॉक न लॉकचे डबे घ्यायचे राहिलेच होते. जरा वेळ काढून जावं म्हणजे निवांतपणानं बघता येईल. कोणी सोबत येतंय का विचारावं का? तेव्हढाच टाईमपास.....अरे देवा या सगळ्यात गेलं ना ईडन मागे जाऊ दे आता घरूनच मागवावं...घराची किल्ली घेतली ना मघाशी गडबडी? आई गं..घरातून निघताना गॅस बंद केला होता नां? आता घरी गेल्यावर काय दिसणार आहे कोणास ठाऊक? नाही नाही केला होता वाटतं बंद.....बघा आजपण वॉचमन गायब आहे मस्त गेट उघडं टाकून. कोणी आत घुसलं, काही झालं तर काय करणार? आई गं काय ऊन अर्ध्या तासात झीट निघाली नुसती. व्वा. लॉबीत आल्यावर कसं मस्त थंडगार वाटतंय......
हुश्श...आता बास झालं. मनातल्या मनात बोलायचा कंटाळा नाही येत पण बोटं वैतागली बटनं बडवून.
अरे हो जाता जाता सांगायचंच राहिलं. उपरोक्त मनोगताला कसलेही साहित्यिक नियम लावू नका. ही एक चम्मतग आहे. वाचा सोडून द्या. नाही समजली तर आणखिनच गम्मत. शिवाय नेहमीप्रमाणेच मनालाही लावून नका घेऊ.
कानकोरणी

वेळ सकाळची अर्थात गडबडीची (पक्षी बुडाला आग लागल्याची).......ओ बेखबर ओ बेखबर....(ही मोबाईलची रिंगटोन आहे).....फ़ोन कुठल्यातरी चिवित्र (हा शब्द डॉ. गिरीश ओकांच्या सौजन्यानं)अॅन्गलमध्ये कानाल चिकटतो.....गॅसवर काहीतरी भाजण्याची सीमा ओलांडत, करपण्याचा टप्पा गाठत जवळपास जळण्याची सम गाठण्याच्या तयारीत....पायाला लटकलेलं वयवर्षं दोन.समथिंग (२ पॉईंट समथिंग) आतून आई>>> आई गं.....ची आर्त आळ्वणी करणारं वय वर्षं आठ.समथिंग.....फ़ोनवरची सखी (कानकोरणं क्रमांक तीन -खालून वर असं मिस इंडियासारखं...)अरे सून नां......(न सुनून करते गं काय बयो तू सुरू हो)....वो कल टिचर ने क्या बोला? (आता सव्वा ते सव्वापाच टिचर काही ना काही बोलतच असते; पण म्हणून मी काय शब्दा शब्दाचा हिशोब मागायचा की माझ्या बाळीकडून? बिचारी वर्गात सगळं इमानदारीत लिहिते आणि टिचर सांगते ते हावभावासहित घरी आल्यावर बदबदा ओतते, म्हणून इतरांनी, म्हणजे ज्यांची पोरं वर्गात लक्श देत नाहीत त्या आयांनी माझा असा छळ मांडावा?)......मी गॆसवर ते मघासचं "काहीतरी" खसाखसा हलवत..."क्या बोला था?"...सखी- [काको ४ (लक्शात ठेवा काको म्हणजे कानकोरणं)]अरे कुछ स्टिकर लाने केलिए बोला था, कैसे स्टिकर? मी सानुला-काय गं बाई टिचरनी काय मागवलंय? सानू शांतपणानं-स्टिकर नाही गं आज न्यायचे. ते फ़्रायडेला. आज मराठीच्या पोएममधलं चित्र ड्रॊ करून न्यायचंय....जसाच्या तसा निरोप काकोला दिल्यावर अरे ये मेरा लडका देख नां हमेशा कुछ अलगही सुनके आता है.....एव्हाना तव्यातल्या पदार्थानं जळून खाक होण्याचं चरण गाठलेलं असतं, वैतागून पोरानं पायाशी फ़तकल मांडलेलं असतं, सानू समोर येऊन अगम्य हातवारे करत असते, माझ्या थोबाडावर प्रश्नचिन्ह वैताग चिड चिड यांची मिक्स फ़्रुट मस्तानी पसरलेली असते.....पलिकडून सखी बोलायची थांबायचं नाव घेत नसते....मी काकुळतीन, सुन...सुनो....अरे हां....सून नां....पण समोरची त्रस्त सखी तिचं बोलून झाल्याशिवाय फ़ोन कट करणार नसतेच. शाळेतल्या बाईनी साधी चित्रं काढायलाच सांगितलेली असतात; पण ही पार शाळेच्या शैक्शणिक धोरणावरही बोलून घेते. अखेर मीच मोबाईलवर दया दाखवत (कारण तो चिवित्र अॅंगलमध्ये कानाशी चिकटून असतो) गॅस बंद करून पोराला मांडीवर घेऊन सोफ़्यात बैठक मारते अणि तिला बोलून देते. सगळं झाल्यावर अखेरचं वाक्य ती अगदी घाई घाईत बोलते, अरे चल मैं अभी रखती हूं. चल अभी टाईम नहीं है. मेरी बाई आई है. चल रख. अभी बाद में बात करेंगे. तपशिलातला फ़रक सोडला तर आठवड्यातून जवळपास पाच दिवस तरी हे सगळं घडतं. म्हणजे कधी कसली स्टिकर आणायची म्हणून हिला प्रश्न तर कधी क्लास टेस्टला नक्की काय विचारणार आहेत याचं प्रश्नचिन्ह. बरं तोडून टाकणं जमत नाही म्हणून ऐकायचं तर किती?
परिहार-१ अरे मी काय चौकशी खिडकी आहे का? रोज रोज अगदी नेमानं असं फ़ोन करून कान खात बसणं हिला जमतं कसं? जरा पोराना लावावी की शिस्त बिस्त की काय ती.
२-आधी स्वत: फ़ोन करायचा आणि मग तो कट करताना आव असा आणायचा की जणू काही हिला जबरदस्तीनं फ़ोनवर बोलायला लावलं आहे. अपमान अपमान आहे हा नुसता.
रात्री साडे अकरा वगैरे असली खतरनाक वेळ.खतरनाक यासाठी की पोरं झोपवण्याच्या प्रयत्नात नुकतंच यश आलेलं असतं. आता जरा निवांतपणानं चार पानं वाचून निद्राधीन व्हावं म्हटलं तर अशा वेळेस मोबाईलची रींग वाजते. फ़ोनवरचं नाव कमालिचा ताप देणारं असतं. पण फ़ोन टाळणं जिवावर येतं. कारण तेच जुनं. मुखदूर्बळता. कितिही ठरवलं की नाही करायचे असले लोक एंटरटेन. तरिही ते जमतच नाही. मनात शिव्या मोजतच फ़ोन कानाला लावून हॅलो म्हटलं जातं. साडे अकरावाजता ही सखी (कानकोरणं क्रमांक दोन) कोणत्याही कारणासाठी फ़ोन करू शकते. म्हणजे आजवर अशा अपवेळी मी तिच्या घरातली भांडणं सोडविण्यापासून तिला डायपरसारखी जिवनावश्यक गोष्ट देण्यापर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आहेत. कसं असतं नां की काही लोकांच्या बॉयोलॉजिकल घड्याळाचा पत्ता बेपत्ता असतो. म्हणजे ती रात्री बेरात्री कधिही वटवाघळासारखी भटकतात तर दिवसभर झोपा काढतात किंवा कधिही काहीही. कधी, काय, कोणती गोष्ट करावी याचं भान नसलेली ही लोकं आपल्यासारखीच इतरांना समजतात की काय कोण जाणे? म्हणजे अकरा ही हिच्यासाठी अत्यंत रम्य आणि छानसा फ़ेरफ़टका मारू गडे! अशी वेळ असली तरी इतर सामान्य म्हणजे, आमच्यासारख्या जीवजंतूंसाठी झोपेच्या आधीन होण्याची वेळ असते. हे हिला मान्यच नाही. म्हणून तर अकरा काय बारा काय एक काय आणि दोन काय रात्रीचा कोणताही प्रहर माझ्या मोबाईलची आणि घराची बेल वाजवण्यासाठी हिला निशिध्द नाही. बरं थेट बोलणं जमत नाही म्हणून आडून आडून सांगितलं तर वर पुन्हा अरे आप बहोत गुड गर्ल बनते हो. ग्यारा सोने का टाईम थोडेही है. मै आपकी वजह से गाली खाती हूं हे आणखी वर. बरं पुन्हा हिचे प्रश्न आणि समस्या इतक्या सुरस असतात की त्यावरची उत्तरं साक्षात ब्रह्मदेवही देऊ शकणार नाही तिथे म्या पामराचा काय ठाव? पुन्हा गेले अनेक वर्षं हिच्या समस्या संपत नाहीत हे आणखी वेगळं दु:ख. सुरवातिच्या काळात नवर्याशी जमवून घेतानाचा ताप (तिला जितका तितका मला. कारण सतत कौन्सेलिंगचं काम सुरू). त्यानंतर मूल झाल्यावर त्या अनुषंगानं जितका ताप देता येईल तितका देऊन झाल्यावर मग अजून नवनवीन समस्या आहेतच. वेळ काळ न बघता कधिही येऊन कान खाण्याचा अधिकार स्वत:हून तिनं घेतल्यानं मी हताश, हतबल वगैरे. बरं पुन्हा तोंडी लावायला सासूच्या समस्या आहेतच (सगळ्याच सुनांच्या आपल्या सास्वांबद्दल तक्रारी असतात पण हिच्याइतकं वैविध्य मी आजवर पाहिलं नाही. उदा.- सासू पदरचे पैसे देऊन कोणालातरी हिच्यावर पाळत ठेवायला सांगते, सासू कसले कसले तंत्र मंत्र करते आणि असंच ब्ला ब्ला बरंच काही) तिकडे जरा खुट्ट झालं की ही आलीच पळत. बरं आली की तीन चार तासांची बेगमी. तिच्याशी बोलून बोलून आणि तिला समाजावून माझ्या तोंडाला फ़ेसच काय पण आणखिही बरंच काही येऊन जातं. पण ही म्हणजे दुखियारी बहू बेचारीचा चेहरा सोडायलाच तयार नाही. आजवर इतक्या समस्या असणारा जिवंत माणूसच मी पाहिलेला नाही. पुन्हा हिच्या समस्यांवर तोडगा सांगयचा की नाही हा एक वेगळाच प्रश्न. कारण कोणत्याही समस्येवरचा तोडगा हिच्या ट्रान्सपरंट मेंदूतून आरपार. म्हणजे कसं नां भोक पडलेल्या मडक्यात पाणी भरावं तसं. वरून कितिही बिसलेरीच्या बाटल्या का ओतेनात पण खालून पाणी छू मंतर. सुरवातीला मी तिच्या समस्यांनीच चकीत व्हायची (हबकायची हा शब्द जास्त अॅप. कारण कोणीतरी माझ्यावर मोहिनीमंत्र घातलाय असं तुम्हालाही कोणी सांगितलं तर तुमचं जे होईल तेच माझंही व्हायचं) म्हणून मग हातातलं काम सोडून मी तिच्या समस्यांशी झुंजायची. म्हणजे सीन कसा तर आधी दोन तीन तास ही सगळं ऐकवणार (त्यात पुन्हा शब्दात शब्द नाही म्हणजे आपणच साधारण सत्य ओळखून त्यावर तोडगा सुचवायचा) मग आपण (अर्थात मी) तिच्याशी संवाद साधत आणखी तासभर घालवणार आणि ती गेल्यावर पुन्हा तिच्याच विचारात पुढचे काही तास जाणार तर त्यानंतर ही मस्त टुणटुणीत भटकत असते आणि तिच्या समस्येची काळजी आपल्या चेहर्यावर. आता सरावानं किमान इतकं तरी समजलंय की तिच्या समस्याच मुळात फ़ार कानात घुसवायच्या नाहीत. पण त्या मुळातच इतक्या खतरनाक असतात की कानाला गिरमिट लागल्यासारखंच होतं.
परिहार-१-अरे का म्हणून आम्ही तुझ्या न संपणार्या समस्या सतत सतत ऐकायच्या. त्या संपवायच्या कशा हे तू पण शिक नां बयो. इतर अनेक कौशल्य जशी अंगात आहेत तसंच हे आणखी एक शिक बाई तेव्हढं.
२-एखादं माणूस इतक्या समस्या घेऊन जिवंत कसं राहू शकतं? मुळात हिच्याच आयुष्यात लोकं समस्या का निर्माण करतात? म्हणजे हिच्याच सासुला स्पायगिरी का कराविशी वाटते? किंवा असेच काही अचाट प्रसंग (जे साधारणपणे एकता कपूरच्या मालिकांत असतात) हिच्याच संसारात कसे?
३-आम्ही आपले संसार टुकिनं करण्याचे मर्ग शोधत असताना तुझ्या समस्यांनी आमचे कान का कोरून कोरून घ्यावेत. नाही म्हटलं तरी दुसरा पर्याय काय?
आता माझ्या आयुक्शातलं सर्वात वैतागवाणं कानकोरणं. एक आंटी, आपलं आयुश्य उमेदित घालवलेल्या घालवणार्या. असो बापडं. पण यांचा एक भयानक गैरसमज असा आहे की जी काय उमेद आहे ती यांच्याकडेच. जे काय छान छान गुण-कौशल्य आहेत ती यांच्याच अंगी. आम्ही सगळ्याजणी अगदी गरीब बिचार्या. आयुष्यात आनंद न पाहिलेल्या. अगदी अंडर प्रिव्हेज म्हणाव्यात अशा. पुन्हा हे सगळं त्यांचं त्यांनिच ठरवलेलं. म्हणजे समोरच्याला तोंड नावाचा अवयव असतो यावर त्यांचा अजिबात विश्र्वास नाही. (बहुदा) त्यांच्या मते ईश्र्वरानं देह बनविण्याचा कारखाना टाकला त्यावेळेस तोंड (विशेषत: बोलण्यासाठी जेंव्हा याचा वापर करायचा असतो) बसवलेला एकमेव पीस म्हणजे आंटी. त्यांच्यानंतर त्या वरच्याकडे तोंडच उरली नाहीत त्यामुळे सगळ्या जगाचं बोलण्याचं काम आंटीना करावं लागत असल्याचा एकूण अविर्भाव. एकदा का त्या सुरू झाल्या की कोणाच्या नाहीत. त्यांच्या मेंदूत किंवा जिथे शब्द तयार होतात तिथले सगळे शब्द, अक्षरं, काने, मात्रे, वेलांट्या, उकार संपल्याशिवाय त्या बोलायचं थांबतच नाहीत. समोरचा ऐकून ऐकून घामाघुम या बोलून बोलून घामाघुम पण यांचं आपलं सुरूच असतं. शिवाय ऐकून कान आणि मग डोकं तापतं ते वेगळंच. (मी विचार करतेय आता आंटी बोलायला लागल्या की कानात थंड पाण्यात बुडवलेले कापसाचे बोळेच घालावेत सरळ) बरं बोलणं म्हणजे काय विचारावं. भारतीय संस्कती केवळ यांच्या जिवावर भिस्त ठेवून असल्यासारखी. हिंदी म्हणून नका इंग्लिश म्हणू नका आता आम्हालाच तामिळ येत नाही म्हणून नाहीतर त्याही भाषेतलं भाषण ऐकायची सक्ती झाली असती. आंटी म्हणजे अक्शरश: "व्हर्बल डायरिया" आहेत. आता यावरूनच त्यांच्या संभाषणाची भयानकता लक्शात यायला हरकत नाही. कोणी बोलल्यावर कानात गिरमिट फ़िरवल्यासारखं होतं, कोणी बोलताना कानात नकोसा डास घुंईं घुईं करत असल्याची ईरिटेटिंग भावना येते तर आंटी बोलायला लागल्या की पंचेद्रियांवर बुल्डोझर फ़िरवून सगळे सेन्स जमिनदोस्त केल्यासारखं बधिर व्हायला होतं. नशिब शब्दाच्या धबधब्यात जीव बिव जात नाही नाहीतर त्यांना एकांतवासात सक्तीनं घालवावं लागलं असतं.
परिहार-१-तुम्ही वयानं, अनुभवानं आणि सर्वार्थानं मोठ्या आहात हे अगदी मान्य. पण म्हणून आम्ही गरीब बिचारे कसे? बरं समजा असलो तरी आमच्या उध्दाराचं काम तुम्ही का म्हणून करावं?
२-आपण बोलल्यावर समोरच्यानं अगदी चुप बसून ऐकावं ही कोणती सक्ती? अशा माणसांनी आरशात बघून बोलावं म्हणजे त्यांना समजेल की ती किती बोलतात
३- त्यांनी बोलत असताना समोरच्यानं काहीही मत व्यक्त करायचं नाही अशीच जर सक्ती असेल तर किमान ते कागदावर तरी उतरवून हातात द्यावं म्हणजे किमान ते आपल्या सवडीनं वाचायची संधी तरी मिळेल.
४-बोलण्याची हौस वगैरे सगळं ठीक असलं तरी ऐकणार्याचा किमान माणूस म्हणून का विचार करू नये. आपल्या तोंडाला भलेही विश्रांती नको असेल पण ऐकणार्याच्या कानाला विश्रांती लागते ही नैसर्गिक अडचण त्यांना कधी समजणार?
जाता जाता हळूच- माझं एक प्रचंड लाड्कं स्वप्न आहे की या सगळ्यांनी एकदा तरी किमान तोंड बंद ठेवून समोरच्याचं फ़क्त ऐकावं. आणि कानकोरणं क्रमांक एकच्या बाबतीत तर एकदम किलर स्वप्न आहे, अख्खा दिवस यांना महाराष्ट्रीय संस्कृतीपासून मनात जे येईल ते सगळं ठणकावून सांगावं.
"मे"ची भाषा
"बाबा बाबा पोई पोई क्क...बाबा क्क...बाबा क्क्क न्नां"...."ओरे पिल्लू आत्ता पोली नाय कलायची, आई पोली करेल हं"...."बाबा पोई<<<<" हा संवाद साधारण पाच सहावेळेस रिपिट झाल्यावर पिल्लाचं शहनाईवादन सुरू आणि बाबाची सपशेल हार. मी कामात आणि कान माझ्या दोन आणि सासुबाईंच्या एका पोराकडे. पिल्लू नंबर दोन बाबाला रिबिट मारत असतं आणि मोठ्ठं पिल्लू बाबाची गंमत ऐकत फ़िदी फ़िदी हसत असतं. अनुभवानं तिलाही माहित झालंय की या दोघांत पडायचं नसतं. नुसती गंमत बघायची. अखेर बाबा मला शरण येतो (तो येणारच असतो, चोवीस तासातून साडे चार तास पोर सांभाळून ते काय बोलतंय हे समजणार नसतंच),"ए, अगं हा काय म्हणतोय? याला भूक लागलीय का? तो पोळी मागतोय"....."अरे बाबा त्याला पोळी नकोय, तो म्हणतोय की रोली पोली गाणं म्हण", "ह्हे क्काय तरीच, कशावरून?" म्हटलं बघ तो हात असा गोल गोल फ़िरवतोय म्हणजे रोली पोली आणि पोळी हवी असेल तर तो आत येऊन डिश दाखवून पोली दे म्हणेल. त्याचं काय झालंय की पिल्लू आता जाम बोलायला लागलंय, इतकं की तिन दुणे सहा कान दुखायला लागलेत (अर्थात माणशी दोन कान) सकाळी डोळे उघडले की जे पिटपिटायला सुरवात होते ती झोपल्यावरच शांत. एरवी अखंड बडबड सुरू. (कधी कधी याच्या अखंड बडबडीला सानू वैतागते तेंव्हा माझ्याकडे येऊन म्हणते की आई याचं बोलायचं बटन जरा बंद कर नां गं, म्हटलं बयो असं बटन असतं तर आधी तुझं नसतं का बंद केलं? आणि बाबानं माझं बटन बंद करून वर ते फ़ेकून दिलं असतं. घरात कशी शांतता नांदली असती) नव्वद टक्के ओ की ठो समजत नाही, बाकी अंदाज मेरा मस्ताना...म्हणजे अंदाजानं समजून घ्यायचं. परवा बाहेर जेवायला गेलो होतो. सगळं झाल्यावर "एक्स्युज मी असं म्हणून बिल मागवलं" त्यानंतर हा अखंड काहीतरी ओरडत होता. खुर्चीवरून उठायलाही तयार नाही, त्याला काय म्हणायचं आम्हाला समजत नव्हतं तर आता यांना कसं समजावू असं त्याला झालेलं होतं. पाच दहा मिनिटांनी डोक्यात उजेड पडला की तो "एक्स्युज मी बिल लाव" असं म्हणत होता. पुरता बोबडकांदा असल्यानं त्याचं ऐकताना धमाल येते, सानुच्यावेळेस रिपिट टेलिकास्ट सुरू असल्यासारखं. एखादा शब्द यानं पहिल्यांदा उच्चारला की (म्हणजे तो आधिपासूनच उच्चारत असतो पण एखाद्या दिवशी आम्हालाच साक्षात्कार होतो की अरे याला हे म्हणायचं होतं होय?). मला लहान मुलांची ही स्टेज खुपच आवडते, म्हणजे नुकतीच तोंड फ़ुटल्यानंतरची. त्यांनी आपल्याला काहीतरी म्हणायचं आणि आपण "ओळखा पाहू बरे" चा खेळ खेळत रहायचं. सानुची "बोबलकांदा डिक्सनरी" बनवल्यानंतर आता शर्मनची बनविण्याचं काम सुरू आहे. "मे कूल जातो"- म्हणजे शर्मन स्कूलमध्ये जातो (मे= शर्मन) "आई क घे"- म्हणजे आई कडेवर घे (क=कडेवर) दादा च्च- म्हणजे "ताई" चल (ताई=दादा, मात्र हे केवळ सानुच्याच बाबतीत) मेंगा- मेघना चिचु- चिनू नॅन- स्वयम घू- ध्रुवल भेबे- बैरवी मुन्ना- मुद्रा श्याऊं- सानू पुहा-स्पृहा कोका- किल्ली का फ़ास्ट- गाडी फ़ास्ट चालव गो गो बसव - म्हणजे वर बसव (गोगो- वर) आई मी तु थ्ली पाच- म्हणजे मला एक पेन आणि कागद दे त्यावर मला वन टू थ्री लिहायचं आहे. मी बात्त ग्यातो बेबा- म्हणजे मी बॊटल घेतो मी बाबा बोनाई- मी बाबाशी बोलणार नाही गुडीत- म्हणजे गुडनाईट. गुम्मा- गुड मॉर्निंग बेव्वर- बेडवर आजोबा- अगं (महत प्रयासानं सध्याच आजोबा व्हाया आबा अशी प्रगती आम्ही साधली आहे) कोम्बाटी कोम्बाटी- कॊम्प्युटर (दोन इटुकले हाताचे पंजे छातीवर समोरच्या दिशेनं सरळ धरून डोळे मोठ्ठे करून)घाब्बं- म्हणजे मी घाबरलो चन्ना- चल नां मी सध्या खुष आहे, कधी कधी त्याच्या तापदायक वाटणार्या खोड्यांसहीत. त्याच्यासोबत ब्ला ब्ला बॅकशिप म्हणताना, नॊनी म्हणजे जॉनी जॉनी किंवा चांदोबा चांदोबा म्हणताना त्याला सरळ बोल शिकवताना त्याचे बोबडे बोल बोलावेसे वाटतात. त्याच्या सुरात सूर मिसळवून नानी तेरी मोन्नी को चोन ले गये म्हणताना त्याच्या इतकाच आनंद मलाही होत असतो.
मस्त दिवस
....आज सकाळी उठायचा कंटाळा आला होता. तरिही हिय्या करून उठले आणि पंधरा मिनिटात आवरून टेरेसवर धूम ठोकली. (अलिकडे आम्ही टेरेसवरच विकएंड योगा क्लास सुरू केला आहे. एक गुरूजी येऊन शिकवतात आणि अधून मधूनजोक बिकही सांगतात. सक्काळी सक्काळी तेव्हढीच मजा.) तर वर गेले आणि दुसर्याच सेकंदाला उठतानाचा कंटाळा गायब झाला. आज चक्क धुकं पसरलं होतं. एरवी डोंगरावरची झाडं, दूरवरचे हायटेन्शनचे टॉवर आणि बाजुच्या रोहाऊसेसची रांग अगदी चित्रासारखी ठळक दिसते आज सगळी मंडळी धुक्याच्या दाटसर कॅंडी फ़्लॉसमध्ये गायब झाली होती. टेरेसवर पाय ठेवला आणि तो ओलसर श्र्वास नाकपुड्यातून थेट मनात आणि डोळ्यातून सगळीकडे पसरत गेला. तोंडातून अगदी सहजणानं आलं,"वॉव्व, चक्क धुकं" (थॅन्कु नवरोजी दामटून उठवून क्लासला पाठवणी केल्याबद्दल. लोळत पडले असते तर दिवसाची ही अशी मस्त सुरवात कशी झाली असती?) सहाजिकच क्लास मस्त झाला. शवासन तर ग्रेट (गुरूजी हे फ़ारच छान करवतात, जवळपास संमोहित अवस्थेत [सेल्फ़ हिप्नॉटिझम] मनातले विचार बाजुला होऊन जो एक नवेपणा मिळतो तो झकास) डोळे उघडल्यावर पुन्हा एकदा तोच नजारा समोर आल्यानं शवासनातली शांतता मनात उतरली. घरी येईपर्यंत तसा उशिरच झालेला होता, आज डब्बा प्रकरण नसल्यानं रमाबाईंनी साहेबांच्या फ़र्माईशीवरून कांदेपोहे अगदी मूडमध्ये येऊन केले होते. त्याचा दरवळ दाराबाहेरच नाकात शिरला, क्या बात है, मिसेस कुलकर्णी तुमचा आजचा दिवस बाप्पाजिंनी अगदी "डिझायनर" करून टाकलेला दिसतोय.....शनिवारची सुट्टी पोरं गाढ झोपेत हसत साजरी करत होती....एरवी ऊठा ऊठाची भुपाळी म्हणत तासभर त्यांना जागवण्यात जातो, आज विचार केला जाने दो, एंजॉय करने दो. माझा मनसोक्त पेपर वाचून झाला आणि मग छोटा हूड रॉबिन दारातून खिदळत बाहेर आला. झोपेतून आज स्वारी न रडता बाहेर म्हणजे झोप झकास झाल्याचं लक्षण.....मग त्याच्या दादासोबत आत जाऊन भरपेट मस्ती (बाय दी वे माझा मुलगा माझ्या मुलिला अजुनही दादाच म्हणतो) करून मंडळी दिवसभर पिडायला फ़ुल्ल चार्ज झाली. सानू सायकल धुवायला खाली गेली तर शमु पण तिचं शेपूट धरून खाली जाण्यासाठी तयार झाला. एरवी अशा धांदलिच्या वेळेत तो खाली जायचा हट्ट धरून बसला की मला जाम वैताग येतो पण आजच्या दिवसाची गोष्टच वेगळी होती. विचार केला की चला आज आपणही खाली जाऊ. सगळा जामा निमा करून आम्ही सायकली धुवायला खाली उतरलो. पोरांनी काय एंजॉय केलं सगळं. शर्मनसाठी तर चक्क सरप्राईजच होतं. एरवी आई पाण्यात खेळू नको म्हणून ओरडत असते आणि आज चक्क पाण्यात खेळायला मुभा मिळाली म्हटल्यावर त्यानंही मापात पाप न करता मनसोक्त सायकल धुवून काढली. थोड्यावेळानं मलाही गंमत वाटून सुरवातिला त्याला मदत म्हणून आणि नंतर त्यात मजा यायला लागली म्हणून सायकल घासून पुसून लख्ख केली. काय मजा आली म्हणून सांगू! कित्ती वर्षांनी सायकल बियकल धुतली!......गेले काही दिवस एकेठिकाणी जरा ठणकावून नकार द्यायचा होता.....नको तिथे मुखदूर्बळपणा दाखवल्यानं नेहमी मी गोत्यात येते....आजच्या दिवसाच्या एनर्जिनं तो नकारही ठामपणानं कळवला आणि वाटलं, अरे कित्ती सोप्पं होतं हे, मी आपली उगाचच धड इकडे ना तिकडे करत हेलपाटत होते. गुड "नकाराचं सामर्थ्य यायला हवं" असले मथळे देऊन छापलेले लेख आठवले आणि नर्मदेतला पाषाण आपण आहोत हे समजलं.....असो. तर आजचा दिवसच इतका छान होता की वाटलं मी आज जे मनात आणेन ते करून दाखवेन.....संध्याकाळी याच मस्त मुडमध्ये चक्क आपणहून पोट्टेकंपनिला मॅगीचे नुडल्स खाऊ घातले. एरवी नुडल्स म्हटले की चवताळणारी मी आज आपणहून ते खाऊ घालतेय म्हटल्यावर पहिल्यांदा सानू जरा बिचकली (माझी आपली शिक्षेची पध्दत आहे, एखादी खुपवेळा सांगुनही नाही ऐकली तर मग आपणही तसंच वागायचं. ही मात्रा बर्याचदा लागू पडते) मग मात्र कंपनी तुटून पडली. खाताना म्हणाली की,"ओह, आई आज सॅटरडे ट्रीट म्हणून तू मॅगी केलीस"? (आमच्यात करार झालाय की आठवड्यातले पाच दिवस तिनं मी जी करेन ती भाजी चुपचाप खायची आणि शनिवार, रविवारी तिच्या आवडीच्या भाज्या आणि पदार्थ करायचे).....त्याच आनंदाच्या झटक्यात चक्क मुलांच्या बांबा न मागता चहाही मिळाला. तो पण आश्चर्यचकीत झाला.
खिडक्या

............रात्री झोपता झोपता विषय सुचला म्हणून सक्काळी सकाळी लिहायला घेतला तर आता सुरवात कुठून करायची हेच समजेनासं झालंय. कित्ती विचार दाटीवाटीनं उभे आहेत....मी आधी, नाही मी आधी असं चाललंय सगळं........निमित्त कशाचं? तर रात्री झोपताना खिडकी बंद करताना नेहमीप्रमाणे नजर समोरच्या वॉचमनच्या केबिनकडे गेली, तिथे जाग दिसली आणि रोजच्या निश्चिंत मनानं झोपायला गेले.....आणि विचार आला की केवळ त्या खिडकीतून येणार्या उजेडाची ही कसली सुरक्षितता?....पण वाटतं खरं निश्चिंत. मग वाटलं की समजा आपल्या घराला खिडकी नसतीच एकही तर??? तर काय झालं असतं? शी, किती बंद बंद कोंडून ठेवल्यासारखं वाटलं असतं.....कित्ती साधी गोष्ट, आपण घर घेतानाही पहिल्यांदा काय बघतो तर खिडक्यांमधला "व्ह्यु"....खिडकी म्हणजे काय आहे मग? तर मोकळा श्र्वास.....खुलेपणाचा मोकळा ढाकळा अनुभव....नाहीतर सगळं बंद बंद असल्यासारखंच वाटलं असतं....आपल्या नेहमिच्या कामातूनच अगदी सेकंदभाराची नजर बाहेर टाकली तरी कित्ती बरं वाटतं, आयुष्य वहातं असल्यासारखं....खरं तर खिडकीतून रोज काही ग्रेट दिसत नसतं...रोजचाच नजारा सगळा... पहाटे येणार्या दुधाच्या व्हॅन, त्यांच्यानंतर गाड्या पुसायला येणार्या मुलांची लगबग....त्यांचे अगदी ठरलेले कपडे, डोक्याला बांधलेले उलटे रूमाल.....पेपरवाले, दूधवाले, कामवाल्या बायकांची इकडून तिकडे चाललेली धावपळ, चहाच्या कपासोबत, ताज्या वर्तमानपत्रासोबत, भाजी चिरताना, डबा भरताना हात कामात आणि नजर सवयीनं अधून मधून बाहेर......मग सुरू होते शाळेच्या बसची ये-जा.... अगदी मिनिटाच्या हिशोबावर घड्याळाचा काटा सांभाळत येणार्या बस आणि त्यात चढणारी मुलं....काही बस येतात आणि निघतात तर काही कर्कश्श हॉर्न वाजवत ताटकळत उभ्या.....वेळेत येणारी बस आणि उशिरा पोहोचणारी तीच मुलं.....हे असंच दहावीपर्यंत चालणार बहुतेक.....नेहमिच्यातला एखादा चेहरा आणि त्याला सोडायला येणारी आई दिसली नाही की डोळे आणि मन नोंद घेऊन ठेवतं.....काय झालं बरं? आज शाळेला का दांडी?....ऑफ़िससाठी धावत पळत बस गाठणारे नेहमिचे "तसे ओळखिचे" चेहरे....सकाळ चढत जाऊन बारा साडेबारापर्यंत सुस्तावते....थोडावेळापुरता तुरळक बसचा, रिक्षांचा आवाज...एखादा खडखडत जाणारा ट्र्क, रिक्षा बोलवण्यासाठी वॉचमनची वाजलेली शिट्टी....चार वाजून दिवस उतरायला लागला की परत परतिची सुस्त धांदल....बसमधून मळलेले, चुरगळलेले युनिफ़ॉर्म घालून उड्या मारून बाहेर पडणारी खिदळती मुलं....हातात भाज्यांच्या पिशव्या सांभाळत त्यांना न्यायला आलेल्या आया.....बसमधून, रिक्षामधून परतणारी ऑफ़िसवाली मंडळी.....खेळायला बाहेर आलेली सुळसुळणारी छोटी छोटी पोट्टे मंडळी.......सायकल, फ़ूटबॉल....हसण्याचे, गप्पांचे आवाज, गाड्यांचे बाईकचे इकडून तिकडे, तिकडून इकडे सततचे येणे जाणे......अगदी रात्री बारा एक वाजेपर्यंत असणारी वर्दळ......हे सगळं डोळ्यातून मनापर्यंत पोहोचतं खिडकीच्या माध्यमातून.....अशी सतत बाहेरच्या जिवंत जगाशी बांधून ठेवणारी ही खिडकीच नसती तर?......
....अशिच आणखी एक बांधून ठेवणारी खिडकी......कॉम्प्युटरवर काम करता करता नजर खालच्या खिडकीत जाते.....कोणी ना कोणी या खिडकीत अधून मधून डोकावत असतं....अगदी भिंतीपलिकडे असणार्या मैत्रिणीपासून सातासमुद्रापलिकडच्या मैत्रिणीपर्यंत.....जुन्या शाळुसोबत्यांपासून भावंडांपर्यंत.....मामा, काकांपासून नेटवर ओळख जालेल्या "चिल्लर पिल्लर" पर्यंत.....कोणी ना कोणी घंटी वाजवून हाय हॅलो करत असतं.....कधी मजा मस्ती, कधी हवापाण्याच्या गोष्टी तर कधी अगदी आतला संवाद.....या सगळ्यांशी गप्पा मारता मारता काम कसं युं संपून जातं....काम संपल्यावरही गप्पांचा फ़ड इतका रंगुन जातो की खिडकी बंद करणं अगदी जिवावर येतं.......सगळं मित्रमंडळ एका टिचकीच्या अंतरावर ठेवणारी ही खिडकी कट्टा गप्पांचा फ़ड मस्त रंगवून ठेवते.....रात्री अपरात्री काम करतानाचा एकटेपणा चुटकीत घालवणारं हे मंडळ असं खिडकीतून डोकावत रहातं आणि घड्याळाचा काटा कुठे चाललाय याच्याशी देणं घेणं रहात नाही.....कधी कधी मात्र या खिडकीत कोणी डोकावतच नाही....आलं तरी गप्पा जमत नाहीत.....खिडकी उघडीच असते....सगळे आपल्या कामात व्यग्र असतात....अशावेळेस मिनिटा मिनिटाला कोणी आलं कां म्हणून खिडकीवर टिचकी पडते.....या दोन खिडक्यांत डोकावणं हा दैनंदिनिचा भाग बनलाय......या पोस्टचा अखेर काय असावा म्हणून कधिची विचार करतेय....मग विचार केला की ज्याची सुरवातच नाही केली त्याचा शेवट तरी कशाला? अखेर हा काही ललित लेख वगैरे नाही....मनात डोकावलेले विचार उतरवावेसे वाटले इतकंच......
Subscribe to:
Posts (Atom)


