भेटलेले निवारे - आठवणीतल्या जागा

एखादी गोष्ट आपल्याला आवडते..... तुफ़ान आवडते .....कारण ती आवडण्याचा क्षण भारी असतो. म्हणूनच आपल्याला आवडलेली गोष्ट इतर कोणाला आवडेलच असं नाही.... सगळं अचूक जेंव्हा जुळून येतं तेंव्हा हे आवडणं घडतं. मग ते उगाचंच आवडणारं एखादं गाणं असेल, कोणाच्या तरी हातचा एखादा पदार्थ असेल, कोणाचं तरी दिसणं असेल किंवा एखादी जागा असेल. अशीच एक जागा परवा अवचीत भेटली....हो भेटलीच! आणि मग त्यानिमित्तानं आठवल्या अशा अनेक भेटलेल्या जागा  ......  आज ही आठवणींची पोस्ट त्या सगळ्या आठवणींतल्या ऊबदार निवार्‍यांसाठी..  ..सगळ्या म्हणणं खरं तर योग्य नाही कारण ही यादी खरंच खूप मोठी आहे. ही काही मोजकी ठिकाणं...आत्ता या क्षणाला आठवली म्हणून....                                                                               सुट्टीतली भटकंती अनेकांना अनेक गोष्टींसाठी हवी असते, बहुतेकांना रूटीनमधून ब्रेक हवा असतोच पण हा ब्रेक कसा असावा याची मागणी प्रत्येकाची निराळी. कोणाला फ़ाईव्हस्टार आदरातिथ्य हवं, कोणाला डोंगर दर्‍यातली भटकंती हवी तर कोणाला कौटुंबिक स्नेहमेळावे. मुळात काय तर एक चांगला मनासारखा ब्रेक हवा. सुट्टीबाबतीत माझी आपली माफ़क अपेक्षा आहे, रात्री डेडलाईन्सची स्वप्नं न पडता छान शांत झोप लागावी, सकाळी घड्याळाच्या गजराविना जाग यावी, मुळात गजराचा काच नसावाच. अमूक वाजता उठलंच पाहिजे ही धास्ती नसावी, उठल्या उठल्या छान वाफ़ाळता योग्य चवीचा चहा मिळावा, गाड्या आणि माणसांचा कोलाहल नसावा, छानपैकी प्रसन्न सकाळ घराबाहेर पसरलेली असावी आणि टपोरलेल्या मोगर्याचा वास घेत आरामात घुटके घेत चहा संपवावा. एकूण अशी शांत, गारवा पांघरलेली रेंगाळलेली सकाळ असावी. चार आठ दिवसच का असेना ही सकाळ वर्षातून एकदा मिळाली की मग वर्षभरातल्या सगळ्या धावपळींच्या सकाळींना अंगावर घ्यायची ताकद जमा होते.
                                                                  म्हणूनच कितिही स्टार खांद्यावर असले तरिही इमारतींचा गोतावळा जमा करून उभी असणारी किंवा असंख्य कृत्रिम दिव्यांच्या टिमटिमाटानं भगभगलेली हॉटेल्स बघायलाही नकोशी होतात. छान आटोपशिर टुमदार कॉटेज हा म्हणूनच एकदम आवडता प्रकार. हॉटेल खांद्यावर भले एखादा तारा कमी असला तरिही चालेल, अगदी नसला तरिही चालेल पण हा मनाजोगता निवांतपणा मिळाला पाहिजे. अर्थात दरचवेळेस तो मिळतो असंही नाही. कधी कधी अपेक्षाभंग होतोही... कधी कधी मात्र अनेपेक्षीतरित्या उम्मीद से ज्यादा म्हणतात तसं मिळतं आणि एकदम भारी होतं.
आजवर अनेकदा अशा मस्त मस्त जागा भेटल्या आणि त्यांनी सुट्टी, ब्रेक सार्थकी लावला...
माझ्याबाबतीत अनेकदा असं झालंय की मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत मिट्ट रात्र झालेली असते, प्रवासाचा शिणवटा असतो....हॉटेलचा रस्ता खूप लांबलचक वाटत असतो...आणि प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावर जे समोर येतं त्यानं प्रवासाचं सार्थक होतं...असेच सार्थकी लागलेले आठवणीतले निवारे आणि प्रवास....
.....एका प्रोजेक्टसाठी त्यावेळेस नवरा सतत काल्काला जायचा. त्याच्या तोंडून सतत टिंबर ट्रेलचं वर्णन ऐकायला मिळायचं...पिल्लू लहान होतं त्यामुळे प्रवासाचा विचारही नको वाटायचा. जरा मोठं झालं आणि मग शिमल्याची ट्रीप ठरली...अर्थात वाटेत हा टिंबर ट्रेलचा स्टॉप निश्चित होता.....तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ गडद झालेली....रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारं खेड्यातलं टिपिकल  मार्केट...घरांच्या बाहेर बसलेली पहाडी वेशातली आणि चेहर्‍याची मंडळी...सगळीकडे कसा छान निवांतपणा...टिंबर ट्रेलला पोहोचलो तोपर्यंत आणखि थोडा अंधार व्हायला लागला होता...अखेर केबलकार मधे बसून त्या सुप्रसिध्द हॉटेलमधे पोहोचलो...नवरा त्या ठिकाणाच्या प्रेमात का होता ते अक्षरश: समजलं.. जिकडे नजर जावी तिकडे छान डोंगर...एक मस्त निवांतपणा आणि मोकळेपणा...काही वेळ तिथे घालवून मग पुढच्या प्रवासाला लागलो...थोडा वेळ म्हणता म्हणता आम्ही बराच वेळ तिथे घालवला होता त्यामुळे सिमल्याला पोहोचेपर्यंत बरीच रात्र झाली होती....गारठलेले रस्ते गुडुप झोपले होते. आजूबाजूला कोणिही नाही...एक आमची गाडीच लाईट फ़ेकत रस्ता कापत चाललेली....हॉटेल कुठे आहे हे समजायला मार्ग नव्हता...बरं त्या वेळेस जीपीएसची सोय नव्हती... पत्ता विचारायलाही कोणी नाही...बरोबर चाललो आहे का नाही इथून सुरवात...मधेच एक माणूस दिसला त्याला विचारलं तर त्यानं ज्या धक्का बसलेल्या नजरेनं आम्हाला पाहिलं ते पाहून पोटात गोळा आला...बहुत आगे बहुत आगे...इतकंच समजलं...गोंधळात भर म्हणजे ज्या एजंटनं बुकिंग केलेलं त्यानं हॉटेलचा फ़ोननंबरही दिला नव्हता...मग त्यालाच रात्री उठवला आणि फ़ोन घेऊन हॉटेलमधे फ़ोन लावला....एका पेंगुळलेल्या आवाजानं माहिती दिली...आम्हाला विचारलं आत्ता कुठे आहात सांगा...काय सांगणार? दगड? बाहेर मिट्ट अंधार...आजूबाजूला डोंगर (असावेत)...किंवा दर्‍या (असाव्यात)...विचारायला माणूस नाही वाचायला पाटी नाही....कसं बसं जिथून जिथून आलो त्या रस्त्याचं वर्णन केलं आणि त्यानं सांगितलं बरोबर रस्त्यावर आहात फ़क्त अजून तास दीडतास लागेल....
....अखेर आम्हाला हॉटेलमधून सांगितलेली ओळाखिची खूण दिसली...घड्याळात पाहिलं साडेबारा वगैरे वाजून गेलेले...गाडीनं अनेक वळणं पार केली आणि एका हॉटेलसमोर येऊन ब्रेक लागला,"सरजी, मॅडमजी आ गया हॉटल,"अंगाला आळोखे पिळोखे देत ड्रायव्हरनं सांगितलं....सगळा परिसर, हॉटेल चिडीचुप झोपलेलं...स्वेटरमधे गुरफ़टलेल्या लोकांनी आम्हाला आणि सामानाला आत घेतलं...भूकेनं पोटात कल्लोळ केलेला आता लक्षात येत होता...इतका वेळ टेन्शनमुळे समजलं नव्हतं...हॉटेलमधलं एकूण वातावरण बघता खायला काही मिळेल का शंकाच होती...धाडस करून मॅनेजर नावाच्या रजईच्या डोंगराला विचारलं, "भैय्या....खाना है क्या?..." भैय्या थंडीनं जवळपास गोठला होता, आणि त्याला या भुकेल्या बहिणीची काहीएक पडली नव्हती. त्यामुळे त्यानं सांगितलं,"सॉरी मॅडमजी नऊ बजे किचन बंद होता है. अभी कुछ करना पोसिबल नहीं, तंदूर गरम होगा ही नही जल्दी ये ठंड में" बहिण भुकेनं कळवळली पण करता काय...मग विचारलं,"भैय्या हमे कुछ मत देना, बच्ची है, छोटी है...कुछ भी गरम देना...दूध बिस्किट भी चलेगा" आम्ही दोन कुटुंब मिळून सहा मोठे आणि दोन छोटी मुलं होतो....भैय्याचं लक्ष आता माझ्या मागे लपलेल्या माझ्या बिचार्‍या भुकेल्या पिल्लाकडे गेलं (तसंही प्रवासात असताना अर्धवट पेंगुळलेली छोटी कोकरं बिचारी दिसतातच) तो म्हणाला ठीक है..हम गुडीया के लिए कुछ होता है क्या देखते है...गुडिया मॅगी चलेगी?
गुडीयाला मॅगी न चालण्यासारखं काही नव्हतंच..
रूममधे सामान लागलं...हिटर सुरू झाले....अंगात आता ऊब आली....अपरात्रीही वाट न चुकता बरोबर पत्त्यावर आलो म्हणून हुश्श झालं होतं....आम्ही गप्पा मारत होतो, नवरा म्हणाला आजची रात्र आता सोबत आणलेल्या चिवड्यावर काढू....मी म्हणलं त्याला मॅगीच जरा जास्त करायला सांगू...यावर नवर्‍यानं व्वा? असं पाहिलं....थोडया वेळानं दारावर टकटक झालं...दार उघडलं आणि काय सांगू घशाशी हुंदका वगैरेच आला....त्या गारठलेल्या भैय्यानं काय जुगाड केला होता माहित नाही पण समोर रोट्यांची थप्पी आणि दाल होती...सोबत गुडियाचं वाफ़ाळतं मॅगी...सगळं अन्न एकदम गरम....
कसानुसा चेहरा करत त्यानं सांगितलं,"सॉरी मॅडमजी अच्छा नहीं लग रहा. आप मेहमान हो और आपको सिर्फ़ रोटी दाल ही दे सकते है"...मनातून इतका आनंद झाला होता काय सांगू....म्हटलं अरे सॉरी बिरी को मारो गोली...इतकं दिलंयस ते काय कमी आहे? नाहीतर चिवडा चावत झोपायला लागलं असतं....असली भारी झोप लागली त्या दिवशी....सकाळ झाली आणि नेहमीप्रमानं सवयीनं लवकर जाग आली....डोळॆ चोळत खोलीला लागून असणारं भलं थोरलं काचेच दार आणि त्याला असणारा गडद पडदा बाजूला केला.....काय सांगू...वर्णनातीत होतं सगळं....सिमल्यानं मस्त गुडमॉर्निंग केलं होतं....दार उघडून बाहेर आल्यावर समजलं आपण कसल्या भारी ठिकाणी रहायला आलोय....नजर जाईल तिकडे फ़क्त डोंगर....अधून मधून बर्फ़ाचे सुळके...खाली दरीत आरामात पसरलेलं छोटं देखणं गाव...तिथे शेतात काम करणार्‍या बायका...अरे एखादं जिवंत चित्र सुंदर असावं तरी किती!! अशा अनवट ठिकाणी हॉटेल होतं म्हणून सापडायला उशिर लागला.... नजरबंदी झाल्यासारखं बघतच राहिले...मागून जरासा ओळखिचा आवाज आला,"मॅडमजी कैसा लगा होटल"?
काल एजंटला लाखोली मोजत आलो होतो...कुठलं हॉटेल दिलंय म्हणून...आज त्याचं कौतुक करताना शब्द थांबत नव्ह्ते....ती जागा, ती रात्र....ती थंडी आणि कोण्या पहाडावरच्या त्या कोण्या रजईत गुरफ़टलेल्या भैय्यानं मध्यरात्री उठून या भुकेल्या बहिणीला रून खाऊ घातलेलं गरम जेवण....कसं विसरायचं सगळं?...शक्यही नाही म्हणून लक्षात राहिलं...कायमचं....

                      .....    श्रीलंकेतल्या सहलीदरम्यान नुवाराएलियाला पोहोचेपर्यंत रात्र झालेली. दुपारी प्रवास सुरू केलेला. प्रवासात थोडा डोळा लागला आणि मध्येच जाग आली तर गच्च ढगांनी भरलेल्या घाट रस्त्यावरून प्रवास चालला होता. शेकडो एकर पसरलेल्या चहाच्या मळ्यांमधून वळणं घेत गाडी चालली होती.
तिन्हीसांजेला कधीतरी ती माथ्यावरच्या गावातल्या छान ब्रिटीशकालीन तोंडावळा असणा~या रस्त्यावर ट्राफ़ीकजाममधे अडकून उभी होती. त्या दिवशी गावात कसला तरी उत्सव होता आणि त्याची मिरवणून या रस्त्यावरून जाणार होती म्हणून सगळी वाहतून अडवून ठेवलेली. तास दीड तास झाला. एव्हाना प्रवासाचा शिणवटा आला होता. कधी एकदा हॉटेलमधे जाऊन फ़्रेश होईन असं झालेलं.  अखेर गच्च अंधारात पुढचा प्रवास सुरू झाला. रस्त्याकडेचे मिणमिणते लाईट आणि आजूबाजूची गच्च झाडी यातून जात गाडी एका मोठ्या गेटमधून आत गेली. समोर प्रशस्त पोर्च, वर चढून जाण्यासाठी तितक्याच प्रशस्त पायर्या. जुनी ब्रिटीशकालीन हवेली हॉटेलमध्ये रूपांतरीत केलेली.  वर चढून गेल्यावर स्वागत कक्षात असणारं खास जुन्या धाटणीचं फ़र्निचर, गेरूच्या रंगाची जमिन आणि भिंतीपासून दारापर्यंत चढलेला उबदार पांढरा रंग. प्रवासा शिणवटा कुठच्या कुठे पळून गेला. जागोजागी पितळेच्या घंगाळ्यात तरंगणारी ट्पोरी  विविधरंगी श्रीलंकेची खासियत असणारी कमलं आणि त्या हवेलीचे, परिसरातल्या चहामळ्याचे भिंतीवर लटकवलेले जुन्याकाळातले फ़ोटे. हे सगळं पहात असतानाच कोणतंतरी अगम्य मात्र अत्यंत चविष्ट असं
वाफ़ाळतं सूप पांढर्या कपांमधून समोर आलं आणि आहाहा हे सगळं वर्णनाच्या पलिकडचा आनंद देऊन गेलं! एकदा हे असं करेक्ट प्रमाणातलं आदरातिथ्य वास्तूच्या उबदारपणासहित भेटलं की पुढचा निवास छान
असणार हे जाणवतं. सकाळ झाल्यावर या हॉटेलचं खरं सौंदर्य समोर आलं. आजूबाजूला असणारे कॉफ़ी आणि चहाचे मळे, त्यात उभी ही वास्तू आणि बगिच्यात फ़ुललेले गुलाब. बाहेरच्या ऊबदार उन्हात असणारं कॅनपी...आणि ताजी  ग्राईंड करून बनविलेली वाफ़ाळती कॉफ़ी...त्या कॉफ़ीच्या वासासहित, कोवळ्या उन्हाच्या किरणांसहित लक्षात राहिलेलं हे ब्रिटीश धाटणी जपलेलं गाव...
                                                   



 कुर्गला जायचं ठरल्यावर अनेकांनी अनेक पर्याय सुचवले.  मुळात हा सगळा परिसर निसर्गानं भरभरून दान दिलेला .... घनदाट जंगल असणारा... हे हॉटेल ते हॉटेल...होमस्टे असं करत कुठूनतरी एका होमस्टे ची कुंडली जुळली....पुन्हा सगळं तेच आणि तसंच...बेंगलोर सोडलं आणि रस्ता संपता संपेना.... बेंगलोर कासवाच्या ट्रॅफ़िकसाठी बदनाम ...त्याचा पुरेपूर अनुभव आला....रेंगाळणारा रस्ता अगदीच बेचव जेवणासारखा होता...खिडकीबाहेर बघत मन रमवावं तर तसंही काहीही नव्हतं....ना निसर्गाचा ओलावा ना डोळ्यांना सुखद चित्र...कंटाळून सगळ्यांनीच डोळे मिटले..हॉटेलचं नाव जरी ग्रीन ड्रीम्स असलं तरिही ते हिरवं स्वप्न नजरेला पडायची चिन्ह दिसत नव्हती....हळूहळू रस्ता निर्जन व्हायला लागला आणि जरा कुर्ग बिर्गला चालल्यासारखं वाटायला लागलं...आता वस्त्या नव्हत्या की गजबजलेले रस्ते....दोन्ही बाजूनं झाडं दिसायला लागली...हळूहळू अंधारत जाऊन मिट्ट काळोख पडला....पुन्हा एकदा याला विचार त्याला विचार असं करत होमस्टे शोधणं सुरू झालं...यावेळच्या अण्णा ड्रायव्हरकाकांना रस्ते माहित होते पण या हॉटेलकडे ते बर्‍याच महिन्यात फ़िरकले नव्हते त्यामुळे नेमका रस्ता माहित नव्हता...हळूहळू हवेतला गारठा वाढायला लागला....आजूबाजूची झाडी गच्चा व्हायला लागली.....कुठे चाललोय किती जायचंय काही पत्ता नाही...पुन्हा तीच परिचीत धडधड...बाप रे सापडेल नां? नाही सापडलं तर? किती रात्र होईल पोहोचायला?...अनेक प्रश्न....समोर एक लोखंडी गेट दिसलं...आतले अण्णा          बाहेरच्या अण्णाशी खुडबुड खुडबुड गाडगी वाजवल्यासारखे बोलले आणि मागे वळून बोलले,"स्यर्र धीश इज द होट्टल...." पेंगुळलेले डोळे खाडकन उघडले...समोर, बाहेर बघत अंदाज घेतला जाऊ लागला...नेमके कुठे आहोत, हॉटेल कसं आहे? पण काहीच बरं दिसत नव्हतं...नव्हे काहीच दिसत नव्हतं...नुसतीच झाडं....मग बाहेरच्या अण्णानं या अण्णाला पुन्हा काहीतरी सांगितलं आणि ड्रायव्हर अण्णा म्हणाले,"स्यर्र होटल तोडा आगे...बैठो" मनातल्या मनात च्या मारी करत बसलो पुन्हा....आता अजून किती जायचंय याचा अंदाज घेईपर्यंत मिणमिण दिवा मोठा होत गेला आणि गाडी थांब्ली."स्यर्र होटल आया"...नळ फ़ुटल्यासारखे सगळे बदाबदा गाडीतून उतरलो....समोर पाहिलं आणि पहात राहिलो....वर्णनापेक्षा फ़ोटो बघा म्हणजे समजेल....जेवणाच्या जागेसमोरच गाडी उभी होती. बाहेर सायकली लावल्या होत्या. आतल्या फ़िरायला सायकल होत्या. सगळी पोरंटोरं सायकलवर बसली...आम्ही आपापल्या कॉटेज ताब्यात घेतल्या....उम्मिदसे चौगुना काय असतं ते समजलं...
१००% होममेड
उच्च अभिरूचीनं मालकानं स्वत: सजविलेल्या कॉटेज....आजूबाजूला विविध फ़ुलझाडं आणि नजर टाकेल तिथंपर्यंत फ़क्त निसर्ग....जेवायला गेलो....टिपिकल कुर्ग चवीचे पदार्थ आणि ते आग्रहानं वाढणारे मालक....काही खास पदार्थ मालकिणबाईंच्या घरच्या किचनमधून त्यांनी स्वत: बनवून पाठविलेले...अरे एखाद्यानं मायाळू असावं म्हणजे किती? हे मालक मिस्टर नरेंद्र पोरांचे मामाच बनले, पोरं त्यांच्या हाताला लटकत काय होती, त्यांच्याशी खेळत काय
मिस्टर नरेंद्र...आदरातिथ्याचा कहर
 होती...अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत आम्ही घरासारखे स्थिरावलो होतो...पुढचे चार दिवस अक्षरश: माहेरपण अनुभवलं....अत्यंत हुशार माणसानं केवळ छंद म्हणून हे हॉटेल सुरू केलं.पैसा कमवायचा हव्यास आणि घाई दोन्ही नसल्यानं फ़ालतूची व्यावसायिकता नाही. बाथरूममधला हॅण्डमेड साबण किती छान म्हणून कौतुक केलं तर घेऊनच जा म्हणाला...एरवी चेक आऊटच्यावेळेस तपासण्या करणारी सोकॉल्ड तारांकीत हॉटेल आठवली....या हॉटेलमधे रहाणं हीच एक वेगळी ट्रीप होती. सगळं ऑर्गॆनिक...होममेड...नाचणीच्या ब्रेडपासून टोमॅटो सॉसपर्यंत....अत्यंत नेटकी आणि स्वच्छ वास्तू....कितिही आणि केंव्हाही मिळणारी अगदी आपल्याला हवी तशी कॉफ़ी....आवारातल्याच लाकडापासून बनविलेल्या आराम खुर्च्या....सुट्टीतला रेंगाळलेला मस्त निवांतपणा  सोबतीला आरती, कौस्तुभसारखी लईभारी दोस्तमंडळी....अजून काय हवं असतं आनंदी रहायला?....

आराम खुर्च्या....कॉफ़ी...अखंड गप्पा....

 

5 comments:

Unknown said...

ताई मस्त...यातल्या २ सहलीची मी साक्षीदार आहे....पण अकबर राहिला की...आणि byntota पण...
पुढच्या वेळी...मजा आली वाचताना...

शिनु said...

हो हो बेण्टोटा राहिलंच की आणि अकबरभाईवर तर स्पेशल पोस्ट बनती है...अकबर , गुलझार आणि फ़रहान अख्तर ;)

arogya.com said...

Khup masta varnan !

शिनु said...

धन्यवाद....!! :)

Unknown said...

वा मस्त आठवणी👌