सिनेमातलं गाव

बरेली की बर्फ़ी,  बद्री की दुल्हनिया, शुभमंगल सावधान, तन्नू वेडस मन्नू, मेरे ब्रदर की दुल्हन, शुध्द देसी रोमान्स या सगळ्या सिनेमात किंवा दिल्ली ६, बेवकुफ़ियां,  वेक अप सिद,  सत्या, मेरी प्यारी सुलू, कहानी  या सगळ्या सिनेमात काही साम्य वाटतंय का तुम्हाला? जरा नीट विचार केला तर लक्षात येईल की, या सगळ्या सिनेमांच्या कथानकातलं शहरही एक "कॅरेक्टर" आहे. महत्वाची भूमिका बजावणारं. त्या त्या शहराच्या लहेजासहित अवतरणारी पात्रं आणि म्हणून पडद्यावर साकारत जाणारं कथानक प्रेक्षक "रिलेट" करायला लागतात. गंमत म्हणजे शहरं त्यांची ओळख दाखवत कथानकात आली ती अगदी अलिकडे. नेमकेपणानं सांगायचं तर नव्वदीच्या दशकानंतर. आत तुम्ही म्हणाल वरच्या उदाहरणातला सत्या तर नव्वदमधलाच आहे. पण अपवाद वगळे तर सिनेमाची गोष्ट ही साधारणपणानं एखाद्या "आटपाट नगरात" घडायची. त्या गावाला, शहराला नाव नसायचं त्याही आधी म्हणजे साधारण सत्तरच्या दशकात तर ठरलेला साचा होता. सिनेमातला "गांव" हा उत्तरभारतीय पेहरावातला असायचा, पात्रांची भाषा उत्तरभारतीय हिंदीशी साधर्म्य दाखवणारी असायची. घागरा चोलीतली नायिका तर हिंदी सिनेमाचं प्रतिक बनली होती. गांव की गोरी म्हणलं की म्हणूनच आजही डोळ्यासमोर येते ती पत्थर के सनम मधली वहिदा, कारवांतली आशा किंवा मधुमतीमधली वैजयंती.
ऐंशीच्या दशकात गांव की गोरी शहरी बनली मात्र तरिही गोष्ट कोणत्या गावार, शहरात घडतेय हे गुलदस्त्यातच राहिलं.  यशचोप्रांचे सिनेमेही एखाद्या ला ला ला लॅण्डमधे घडायचे. (अजूनही त्याच्याच स्कूलमधे तयार झालेल्या करण जोहरचे सिनेमेही असेच अगम्य शहरात घड्त असतात. )  गाण्यातून, कथानकातून कश्मिर, शिमला, स्वित्झरलॅण्ड दिसायच मात्र ते केवळ एखाद्या चित्राची पार्श्वभूमी असावी असं. त्याचा कथानकाशी बरेचदा काही संबंध नसायचा.
नव्वदच्या दशकात तर सगळंच फ़ॅण्टासीलॅण्डमधे घडायला लागलं होतं. मागे एकदा एका मुलाखतीत मसानचा लेखक वरून ग्रोव्हरनं खूप छान सांगितलं होतं, की नव्वदीच्या दशकात बाहेरच्या शहरातून मुंबईत लेखक आले. याआधीही जे होते ते एकतर पार्टीशनच्या काळात आलेले होते, जे डिनायल मोडवरच होते. ज्यांना घडलेल्या घटनाच विसरायच्या होत्या. म्हणून त्यांनी काल्पनिक शहरं उभी केली जिथं बहुतांश सिनेमाची कथानकं घडली. नव्वद सरताना मात्र मुंबईबाहेरचा आणि आपल्या स्थानिक जाणिवा असणारा लेखकवर्ग मोठ्या प्रमाणात मुंबईच्या सिनेमा क्षेत्रात आला आणि येताना आपल्या कथानकांतून तिथली शहरं, तिथलं वातावरण, संस्कृती घेऊन आला. म्हणूनच सुधीर मिश्रा, अनुराग कश्यपचे रांगडे सिनेमे एकदम वेगळे दिसले, विशाल भारद्वाजच्या सिनेमांनी लक्ष वेधून घेतलं. कारण यांच्या कथानकातली गावं ही नावापुरती नव्हती तर ती एक चेहरा घेऊन कथानकांसोबत चालली.
उदाहरणच द्यायचं तर बरेली की बर्फ़ी मधे उत्तर भारतातली घरं, गल्ल्या, तिथले स्थानिक लोक आणि अगदी गाड्यांवर विकले जाणारे पदार्थही सिनेमाच्या रंगात भर घालणारे होते. तर कहानी मधे विद्या बागची कोलकत्त्यात मिशनसाठी येऊन पोहोचते आणि ट्राम पासून मेट्रोपर्यंतचं, दुर्गापूजेसाठी सज्ज असलेलं कोलकता बघताना कथानकाची ऑथेण्टिसिटी वाढवतं.
कथानक नेमकं कुठे घडतंय हे दिसणं फ़ार महत्वाचं आहे. सेटवरच्या बंदिस्तपणापेक्षा जिवंत लोकेशन्सवरचं कथानक जास्ती खुलून येतं. म्हणूनच आजा नच ले मधला नायिकेचा संघर्ष बेगडी वाटतो. कारण असं गावच रिलेट करता येत नाही. माधुरीसारखा हुकमी एक्का असूनही चित्रपट पडण्यामागे जी अनेक कारण आहेत त्यातलं हे एक आहे, कारण संपूर्ण कथानक ज्या गोष्टीभोवती घडतं ते गाव आणि त्यातलं सांस्कृतिक केंद्रच खोटं वाटत रहातं.
तलाशमधली रेडलाईट मुंबई खरी खुरी मुंबई वाटते आणि म्हणूनच तिथल्या मुलिंचं आयुष्यही अंगावर येतं. वेक अप सिद मधे मुंबईत लाईफ़ बन जाएगी असं स्वप्न घेऊन बाहेरचे आणि त्यांच्या नजरेतून दिसणारी मुंबई इतकी सुंदर दिसते की आपल्याच शहराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडायला होतं.
दिल्ली, मुंबई असो की वाराणसी, बनारस, लखनौ हिंदी सिनेमात ही शहरं, इथल्या  गजबजलेल्या जिवंत गल्ल्या, गर्चीचा भाग असणारे चेहरे, लोकांची बोलायची, जगायची पध्दत सगळं प्रतिबिंबीत होतंय. आठवा तुम्हारी सुलू मधल्या सुलूचं  मुंबईच्या उपनगरातलं अगदी टिपिकल मध्यमवर्गीय घर. छोट्याशा बाल्कनीत झोपाळ्यापासून कुंडितल्या बगिच्यापर्यंतची पूर्ण केलेली हौस. सेफ़्टी डोअरपासून कुकरपर्यंत सगळं कथानकाची पार्श्वभूमी देणारं आणि म्हणूच सुलूचं मध्यमवर्गीयपण ओघात येत जातं आणि पटतंही. एरवी मधल्या काळात एकता कपूरनं मध्यमवर्गियांची संकल्पनाच बदलून टाकली होती.
तर थोडक्यात काय तर आजचा सिनेमा अधिकाधिक लोकांच्या जवळ जाणारा होत चाललाय. एकिकडे यश चोप्रा, करण जोहर सारखे निर्माते ला ला लॅण्डवर वर्चस्व राखून आहेत तर दुसरीकडे वास्तव शहरं मोठ्या प्रमाणात कथानकांतून दिसायला लागली आहेत.

 

खट्टा मिठा

बिंदिया गोस्वामी. ऐंशीच्या सिनेमांतलं एक मॅटिनीस्टार नाव. येता जाता आवर्जून दखव घ्यावी असं काही तिच्या नावार फ़ार नाही, पण तिचा उल्लेख केल्याविनाच ऐंशीच्या दशकाचं पान उलटावं अशिही परिस्थिती नाही. तिचे सगळे सिनेमे अगदी निखळ मनोरंजन करणारे होते. हलके फ़ुलके विषय, खुसखुशित मांडणी असलेले. बच्चन-विनोद खन्ना छाप मसाला सिनेमातही ती दिसली मात्र अभिनेत्री म्हणून खुलली ती मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या सिनेमांमधे. बिंदिया गोस्वामी ही हेमा मालिनिच्या आईचं फ़ाईंड आहे. झालं असं की, एका पार्टीत त्यांनी बिंदियाला पाहिलं आणि त्यांना वाटलं की अरे ही तर अगदी डिट्टो आपल्या हेमाचं रूप आहे. चौदा वर्षाची बिंदिया सिनेमात चांगलं काम करू शकेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी तिची शिफ़ारस केली. बिंदियाचा पहिला सिनेमा जिवन ज्योती (१९७५). यात विजय अरोरा तिचा नायक होता. सिनेमा अर्थात फ़्लॉप झाला पण बिंदिया मात्र निर्माता-दिग्दर्शकांच्या नजरेत आली. तिचा दुसरा सिनेमा खट्टा मिठा (१९७८) आणि इथून तिला सूरही सापडला आणि तिच्या टाईपच्या भूमिकांची जागाही.
काल रात्री एफ़एम वर अभिमन्यूनं खट्टा मिठा मधलं तुमसे मिला था प्यार गाणं लावलं आणि पुन्हा एकदा बिंदीयाची आठवण झाली. टिपिकल रेट्रो लूक असणारी बिंदिया फ़ार उच्च प्रतिचा अभिनय वगैरे करायची नाही पण तिच्या भूमिकंत एक साधेपणा असायचा आणि ती त्या भूमिक तितक्याच साधेपणानं करायची. बासू भट्टाचार्यांचे दोनही सिनेमे मला बिंदियासाठी आवडतात पैकी एक खट्टा मिठा आणि दुसरा हमारी बहू अलका. 
बासूदांनी ह्रषिकेश मुखर्जींकडे उमेदवारी केलेली असल्यानं बासूंदांच्या सिनेमांवरही ह्रषिदांची एक छाप आहेच. पिया का घर, हमारी बहू अलका तर अगदी ह्र्षिदा स्कूलची छाप असलेले बासूदांचे सिनेमे आहेत. 

एक पारसी विधुर आणि पारसी विधवा यांच्या लग्नाची गोष्ट असलेला खट्टा मिठा (१९७७) खट्टा कमी आणि मिठा जास्त होता. लग्नाच्या वयातली मुलं असणारं हे जोडपं भावनिक आधारासठी लग्न करतं. नवपरिणीत जोडपं आणि त्यांची लग्नाळू वयातली मुलं यांच्यातली गोड नोंकझोक म्हणजे खट्टा मिठा सिनेमा इंग्रजी  Yours, Mine and Ours वर आधारीत होता. (याच प्लॉटवर आधारीत गोलमाल रिटर्नस-करिना, अजय देवगण, मिथून- रत्ना पाठक यांचा अलिकडेच आलेला सिनेमाही सुपरहिट ठरला)  खट्टा मिठा मधली दोन गाणी हिट झाली. थोडा है थोडे की जरूरत है आणि तुमसे मिला था प्यार. संगीत होतं राजेश रोशन यांचं अआणि गीतं गुलझार यांची होती.


 ...पूछेंगे एक बार कभी हम तुमसे रूठकर
हम मर गये
हम मर गये अगर तो आप कैसे जियेंगे
वो ख़्वाहिशें अजीब थीं सपने अजीब थे
जीने को तेरी प्यार की दौलत मिली तो थी
जब तुम नहीं थे उन दिनों हम भी ग़रीब थे
तुमसे मिला था प्यार कुछ अच्छे नसीब थे
हम उन दिनों अमीर थे जब तुम क़रीब थे

हे असलं केवळ गुलझारच लिहू जाणे. एकुणात गोडवा ठासून भरलेलं हे गाणं आजही ऐकायला तितकंच फ़्रेश वाटतं.




 

कच्ची धूप

ऐंशीचं दशक हे टीव्हीचं नव्हाळीचं दशक होतं. नुकता रूजलेला इडियट बॉक्स मनोरंजनाचे मोजके तास घेऊन यायचा आणि ते तास दोन तास मुलं टिव्हीला चिकटलेली बघून घरातले मोठे टीव्ही ला इडियट बॉक्स म्हणून हिणवायचे. (तेच मोठे आता आज्जी आजोबा झालेत आणि अहोरात्र डेलीसोपचा रतीब पहातायत हा भाग अलहिदा 😜).  रविवार हा सुट्टीचा आणि म्हणूनच मनोरंजनाचा दिवस असायचा. खास सुट्टीच्या दिवशी प्रसारीत होणार्‍या मालिका असत. त्यापैकी एक होती "कच्ची धूप". सकाळी प्रसारीत होणारी ही मालिका सुरवातीला चर्चेत होती ती अमोल पालेकर या नावामुळं. हिंदी चित्रपटात मॅटिनीस्टार म्हणून ख्याती मिळवलेल्या पालेकरांची ही मालिका. लिहिली होती त्यांचीच पत्नी चित्रा पालेकर यांनी. या मालिकेची कथा सुप्रसिध्द इंग्रजी कांदंबरी "लिटिल वुमन" वर आधारलेली होती. या कादंबरीनं वाचकांवर गारूड केलं  होतं (आहे) त्यामुळे यावर आधारीत मालिका करणं धाडसाचंच म्हणलं पाहिजे.
एक सिंगल मदर आणि तिच्या तीन मुली , या कुटुंबाच्या अवती भवती असणारे शेजारी. यांचे आपापसातले संबंध यावर हे कथानक बेतलं होतं.
बालपण सरत असतं, तारूण्य येऊ घातलेलं असतं आणि सगळं आयुष्य रंगीबेरंगी आणि त्याचवेळेस प्रचंड गोंधळलेलं असतं अशा अडनिड्या वयातल्या मुलांचं भावविश्र्व म्हणजे कच्ची धूप. लहान मुलांत तर ही मालिका विशेष लोकप्रिय झाली होती. अशा प्रकारच्या अनेक मालिका त्यानंतर आल्या. अगदी जस्ट मुहब्बत असो किंवा अलिकडेच आलेली परवरीश असो  पण नव्वद्च्या दशकातली कच्चीधूप तिचं स्थान टिकवून आहे.
तारूण्यात पदार्पण केलेल्या मुलांचं भावविश्र्व, त्यांची प्रेम या भावनेशी ओळख होण्यातली नव्हाळी, त्यांचे छोटे छोटे त्याग,   त्यांचे आनंद, जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन या सगळ्यावर अगदी सहज आणि सोप्या भाषेत या मालिकेनं भाष्य केलेलं होतं.
 पौगंडावस्थेतली मुलं आणि  सिंगल मदर पेरेंटिंग हा विषय हाताळलेली ही मालिका लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे प्रेक्षकांनी ती कथा, पात्रं "रिलेट" केली. आजही सिंगल पेरेंटिंग हा टास्किंग जॉब आहे.
दूरदर्शनच्या काळात मालिकांचे डेलिसोप झाले नव्हते त्यामुळे कथानक ठरलेलं असायचं आणि त्यातले टप्पेही, विशिष्ट भागांत मालिका संपत त्यामुळे कथानक जेवढ्यास तेवढं असायचं. लांबवणं, वाढवणं हे प्रकार नव्हते. त्यामुळे मालिका क्रिस्प होत. दर भागात काहीतरी घटना घडायची आणि कथानक पुढे सरकलेलं असायचं. म्हणूनच एखादा भाग बघायचा चुकला तर एकमेकाला विचारून स्टोरी अपडेट व्हायची. कच्ची धूपचेही चौदा भागच होते.
 चित्रा पालेकरांनी कथा लिहिली होती आणि अमोल पालेकरांनी दिग्दर्शन केलं होतं. अमोल मालेकर हे ऐंशीच्या दशताकलं मॅटिनी प्रेमींचं सुपरस्टारडम लाभलेलं नाव होतं.
या मालिकेतून भाग्यश्रीनं पदार्पण केलं होतं. शुटिंगच्या आदल्या दिवशी तिचं कास्टिंग झालं आणि ती या भूमिकेसाठी निवडली गेली.  अमोल पालेकर आणि पटवर्धन कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध असल्यानं तिची या भूमिकेसाठी निवड केली गेली. तिच्यासोबत या मालिकेत तिची लहान बहिण पौर्णिमा पटवर्धन आणि अमोल-चित्रा पालेकरांची मुलगी शाल्मली पालेकरही होती.
या मालिकेनं लोकप्रियतेचा इतका उच्चांक गाठला होता की बडजात्या फ़िल्मसचा नव्या पिढीचा निर्माता सुरज यानं ही मालिका पाहून भाग्यश्री- आशुतोष ही जोडी मैने प्यार किया साठी निश्चित केली होती मात्र नंतर भाग्यश्रीचं नाव टिकून राहिलं आणि आशुतोषची जागा सलमाननं घेतली.
दूरदर्शनवरच्या कोणत्या जुन्या मालिका पुन्हा यायला हव्यात? असा प्रश्न विचारला तर कच्ची धूपचं नाव खूप वर असेल हे निश्चित.