भुताटकी??????

आत्ताच डीडीचा ब्लॊग वाचला आणि त्यातल्या कोकणातल्या भुतांवरून मला आमच्या बाबतीत घडलेला काही वर्षांपुर्वीचा किस्सा आठवला.
आम्हा सगळ्यांनाच कोकणाचं भयंकर आकर्षण आहे. ब्रेक हवाय, बोअर झालंय म्हटलं की फ़्रेश व्हायला कोकणासारखं दुसरं ठिकाण नाही. तर असेच एकदा भटकायला म्हणून सहकुटुंब आंबोलिला गेलो होतो. रात्री मुक्काम करायचा आणि सकाळी लवकर निघायलं असं ठरलेलं असल्यानं रात्रीपुरती पथारी पसरायला हॊटेल शोधत होतो. एका बर्या अशा हॊटेलमध्ये एकच भलीमोठी खोली घेऊन राहिलो. गप्पांत रात्र घालवायची असल्यानं एका रात्रीसाठी कशाला दोन दोन खोल्या? असा इकॊनॊमी विचार करून त्या भल्या मोठ्या खोलित बॆगा भिरकावून पोरांना झोपवून आम्ही पाय पसरून मस्त गप्पा मारत बसलो. सकाळ झाल्यावर सगळं आवरून पटपट निघायच्या बेतात होतो. बंधुराज त्यांच्या युवराजांसमवेत प्रात:कालच्या भटकंतीला गेलेले होते. लेक स्वत:चे केस पिंजारून तिच्या बाहुलिचं आवरण्यात गुंग झालेली होती. बाकिचे आम्ही एका रात्रीतही सवयीनं भारंभार पसारा करून ठेवला होता तो एकमेकांवर डाफ़रत आवरत होतो, दादा खोलितच मॊर्निंग वॊक [:)]करत आम्हा मुलांना अजिबात शिस्त कशी नाही हे पुन्हा एकवार पटवून देत होते. हे सगळं कमी म्हणून टिव्हीवर काहीतरी ब्ला ब्ला चालुच होतं. काहीही मदत न करण्याचा निश्चय केलेला नवरा बेडवर पसरला होता, तो मध्येच म्हणाला,"काय गरम होतंय? कोण आहे रे तिकडे? महारांसाठी जरा फ़ॆन चालू करा" त्याच्या बोलण्यावर आम्ही अजून हसावं की चिडावं हे ठरवतोय तोवर खरोखरचं चांगला मोठ्ठा "खट्ट" आवाज होऊन खोलितला छताला टांगलेला पंखा आपोआपा सुरू झाला. पंखा कोणी सुरू केला याचा उलगडा होईना. कारण सगळी बटणं दाराजवळ होती आणि तिथे त्यावेळेस कोणिच नव्हतं. मग फ़ॆन चालू कोणी केला? सगळे तर्क करोन झाले पण उत्तर मिळालं नाही. सगळ्यांना संशयाच्या दायर्यात घेऊन झालं पण सगळे मासूम साबित झाले. मध्येच कोणितरी म्हणालं की, "कोकणात भुतं असतात". त्यावरून चर्चा रंगली आणि मंडळी गाडीत सामान सुमान टाकायला रवाना झाली. मात्र पंखा चालू कोणी केला हा माझ्या आणि राणिच्या डोक्यातला किडा काही जाईना. सगळे खाली गेल्यावर आम्ही चक्क बेड पुढे ओढून मागे बटनं आहेत का हे तपासलं (न जाणो बेडवर पसरलेल्या नवर्यानच आमची थट्ट करायची म्हणून हळूच बटन दाबलं असेल) पण सगळी भिंत स्वच्छ होती. दाराजवळची बटनं सोडली तर खोलित कसलंच बटण नव्हतं. नंतर राणिला आठवलं की रात्री माडीवर दोन खोल्या आहेत असं मॆनेजरनं सांगितलं होतं त्यावेळेस आम्हाला मागची खोली हवी होती तर यानं आग्रहानं पुढचीच खोली देऊ केली होती. त्यावेळेस त्याच्या या वागण्याचं काही वाटलं नव्हतं मात्र आता त्याचाही संशय यायला लागला. आमचं हे सगळं बोलणं चालू होतं आणि त्याचवेळेस सगळ्या खोलिची तपाणी करणंही चालू होतं. त्याचवेळेस एक रूमबॊय खोलीत आला, त्याला आम्ही पलिकडची खोली बंद का आहे याबाबत फ़िरवून फ़िरवून प्रश्न विचारले पहिल्यांदा त्यानं उत्तरं दिली नंतर तो (बहुदा आमच्याकडे संशयानं बघत) चक्क निघून गेला. गाडीत जाऊन बसल्यावर "इतका वेळ काय करत होता?" या प्रश्नावर आम्ही खरोखरच काय करत होतो हे सांगितलं. त्यावर "या बायका म्हणजे...." असं काहीतरी बोलून सगळे आमची टर उड्वायला लागले. पण खरंच सांगते "कोणितरी पंखा लावा रे" असं म्हटल्याबरोबर नेमका पंखा कसा सुरू झाला याचं गुढ आजही उकलेलं नाही.
 

0 comments: