कसलं भारी!!!

Alice in Wonderland - If I had a World of my o...Image by Brandon Christopher Warren via Flickr


शुक्रवार म्हणजे लेकीच्या दप्तरातून घरी करण्यासाठी वर्कशिट येण्याचा दिवस. या शु्क्रर्वारी मशरूमचं चित्र होतं आणि नेहमीप्रमाणे ते रंगवून बिंगवून त्यासंदर्भातली पाच वाक्य लिहायची होती. कसंतरी करून तिच्या वयाला समजतील आणि पचतील इतपत चार वाक्यं सांगितली एक राहिलं होतं म्हणून म्हटलं की लिही, मला हे खायला खूप आवडतं. खल्लास! आमच्या अभ्यासाला ब्रेकच लागला. कन्यारत्न म्हणालं की,"मला मशरूम आवडत नाही मग मी असं कसं लिहिणार"? म्हटलं, "अगं लिहायचं असतं नुसतं." यावर क.र.-"असं कसं लिहिणार? मी कधी खाल्लेलच नाही तर ते आवडतं असं कसं लिहिणार आणि खोटं बोलायचं नाही असं मिस नेहमी सांगते, मी मिसला चीट नाही करू शकत"?(होय हो माझी लेक चक्क "शकत बिकत" असलं तुफ़ानी मराठी बोलते. म्हणजे मी खेळायला जाऊ? असला साधा सुधा प्रश्न ती "मी खेळायला जाऊ शकते का"? असा विचारते). मी-"मिसना काय माहित तू मशरूम खातेस की नाही? लिही पटपट आता", क.र.-"मिसला नाही पण मला माहित आहे नां" (मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफ़लं उचलणार नाही असाच बाणा अगदी) "मग तुला काय लिहायचं ते लिही" माझी शरणागती. कुठून मेल्या या मशरूमचा शोध लावला असं झालं.
पोरांच्या मेंदूत काय पाखरं भिरभिरत असतात काही सांगता येत नाही. मागे एकदा ओठांचा चंबू करून मन लावून चित्र रंगवत होती "काय गं काय रंगवतेयस" विचारल्यावर म्हणाली,"ऎप्पल" हातात खडू हिरव्या रंगाचा दिसत होता म्हणून विचारलं,"ऎप्पल रंगवतेयस मग हातात ग्रीन कलर कसा?" तर आता या आईचं करू काय अशा नजरेनं बघत तिनं शांतपणानं सांगितलं,"ऎप्पल अजून कच्चं आहे नां" म्हटलं बरोबर आहे माझे आई कच्च्या सफ़रचंदाचं चित्र काढू नये असा काही नियम नाही.
रोज झोपताना गोष्टिंचा रतीब घालाव तेंव्हा कुठी या बाईसाहेब डोळे मिटणार. रोज रोज गोष्टी सांगून सांगून कंटाळा आला एक दिवस लायब्ररीत चांदोबा दिसला आणि अगदी हौसेनं आणला. चला आता आठवडाभर तरी निश्चिंती असा विचार करून रात्री झोपताना त्यातली कोणती गोष्ट सांगू असं विचारलं, रंगीत चित्रं बित्रं बघून चिमणी भारीच खुष झालेली होती. पानं उलटवून बघून झाल्यावर त्यातली विक्रम वेताळाची गोष्ट सांगण्याची फ़र्माईश झाली. म्हटलं बघ हं भुताची गोष्ट रात्री झोपताना ऐकशिल आणि मग स्वप्न तसलंच पडेल. पण तिच गोष्ट ऐकायची तिची इच्छा बघून मी ती वाचायला सुरवात केली. एकच पान झालं असेल नसेल तर हिनं "आई ही नक्को दुसरी सांग" म्हणून भुणभुण सुरू केली. वाटलं घाबरली बिबरली की काय? म्हणून दुसरी एक गोष्ट वाचायला सुरवात केली. दोन मिनिटानं ही गोष्टही नको म्हणून पिरपिर चालू. आता मात्र वैतागच आला. म्हटलं ही नको ती, काय चाललंय काय? तर एव्हढुसं तोंड करून म्हणाली की,"आई हे मराठी मला समजतच नाहीय" मला ही गोष्ट "आपल्या मराठीत सांग" अक्शरश: मराठीतली गोष्ट मराठीतच भाषांतरीत करायची वेळ आली. तिचंही खरंच आहे म्हणा. आपणच म्हणजे माझ्या पिढीतले जवळपास सगळेच पालक शुध्द मराठी न बोलता त्यात हिंदी इंग्रजी शब्दांचा मुक्त वापर करतात. त्यात आता ही पोरं शाळेत इंग्रजी, मित्र मैत्रिणीत हिंदी आणि घरात मराठी बोलत असल्यानं सगळीच सरमिसळ. तेंव्हापासून मराठी पुस्तकं मराठीतच वाचायची आणि कठीण शब्द तिला समजणार्या भाषेत सांगायचे आम्ही ठरवलं आहे. त्यानिमित्तानं निदान मराठी शब्द कानावरून तरी जातील.
भाषेवरून आणखी एक गंमत आठवली. सोसायटीतली तमाम पटेल, अरोरा, अय्यर, शर्मा बच्चेमंडळी त्यांना मराठीत निबंध लिहून आणायचा झाला की आमच्या घराची बेल वाजवतातच आणि "आंटी प्लिज हेल्प करो नां" अशी गळ घालतात. मी एक नियम केलाय की मी सांगायचं आणि त्यांनी लिहायचं शिवाय झाल्यावर वाचून दाखवायचं.
रविवारी तीन विषय घेऊन ही भुतावळ आली. १- आजच्या जमान्यातलं स्त्रीचं स्थान,२-माझे आवडते प्रेक्शणिय स्थळ,३-अपंग व्यक्त आणि "मी"यातलं संभाषण. निबंध क्र.१ ची सुरवात "न स्त्री स्वातंत्र्य मर्हती"नं लफ़्फ़ेदार केली. पण वाचताना अरोरा कन्येची भलतीच तारांबळ उडाली. पुन्हा "च" चा उचार आपण दोन पध्दतीनी करतो तर हे एकाच. जे "च"च तेच "ज"चं. "ळ"ची भानगड तर विचारायलाच नको. पंजाबी उच्चारातनं आजच्या स्त्रीचं मराठीतून स्थान ऐकताना गंमतच वाटत होती. विषय क्र २- लिहिताना दक्शिणी कन्येनं पहिल्याच वाक्याला बल्ल्या घोळ घातला, माझे आवडते प्रेक्शणिय स्थळच्या ऐवजी, माझे प्रेक्शणिय स्थळ असं लिहून तिनं भलतंच मनोरंजन केलं. बरं पुन्हा यांच्या शाळेत काय म्हणे हे लिहून आणलेलं भर वर्गसमोर वाचूनही दाखवायचं असतं म्हणून लिहून काम भागत नाही तर "प्युअर मराठीत" लिहिलेलं कसं वाचायचं हेही शिकवावं लागतं. मला मजाच येते हा भाग वेगळा पण यांच्या मास्तरीणबाईंचीही हे सगळे निबंध ऐकताना जाम करमणूक होत असणार नाही?



एक विशेष सूचना- १-लेखाला ड्कवलेल्या फ़ोटोचा संबंध लेखाशी असेलच असं नाही.
२-हे आपलं उगाचच सगळे म्हणतात की लेखासोबत फ़ोटू बिटू असला की जरा बरं वाटतं म्हणून.
३-"भुंग्या"नं त्याच्या ब्लोगवर झिमट्याची युक्ती सांगितलेली होती, म्हटलं चला यानिमित्तानं वापरून पाहू. तेंव्हा इथून पुढच्या लेखात विषयाशी फ़टकून असणारे फ़ोटे असतील तर बिचकू नका.

 

4 comments:

Deepak said...

मस्त झालाय लेख!
मुलांचे होमवर्क घेण्याची माझी कधी वेळ नाही आली... हा ते काम माझी "ही" फार चोख बजावते. मी कधी - कधी माझ्या मुलीबरोबर पेंटींग करतो. काही पेंटींगचे फोटो काढलेत आणि अर्धा लेखही लिहिलाय.. या विकेंडला पुर्ण करीन म्हणतो.
मुलांची तर्क बुद्धी मात्र वाखाणन्याजोगी असते. आमच्यावेळी - आम्ही असं क्रीएटेव्ह नव्हतो.. म्हणजे अ‍ॅपल काढायचं ते लालच.. मास्तरही लाल अ‍ॅपललाच चांगले मार्क्स द्यायचे. आता त्यांना कोण सांगणार की मी काढलेलं अ‍ॅपल अजुन कच्चं आहे!!

आणि हो, ग्राफिक्स - फोटोज नक्कीच तुमच्या पोस्टला शोभा आनतात... मात्र ते त्या त्या पोस्टला शोभुन दिसणारे [संबधित] असावे, हे बरं!

क्रांति said...

भारी आहे लेख आणि लेक!

शिनु said...

@ bhunga


"मुलाचे होमवर्क घेण्याची माझी कधी वेळ आली नाही...हे काम माझी फ़ार चोख बजावते..." कसं काय जमतं बुवा तुम्हा नवरेमंडळींना हे. :)

हेच प्रशस्तीपत्रक मलाही अगदी दर आठवड्याला न चुकता मिळतं म्हणून म्हटलं. :)

शिनु said...

@ भुंगा आणि क्रांती

thank you.