Showing posts with label ललीत. Show all posts
Showing posts with label ललीत. Show all posts

कृष्ण धवल ते ब्लॅक व्हाईट

कशी गंमत असते नां...सगळं फ़िरून फ़िरून वर्तुळातच संपतं किंवा नव्यानं सुरू होतं....एक जमाना होता ब्लॅक व्हाईट फ़ोटोंचा....म्हणजे त्या काळात तसेच असायचे फ़ोटो...आता तसे इफ़ेक्ट असतात. परवा आवरावरीत जुना अल्बम सापडला आणि ते सगळे फ़ोटो त्यातला इनोसन्स पाहून मज्जा वाटली.
                                                    माझ्या लहानपणी फ़ोटो काढणं ही जवळपास चैन होती...पुन्हा फ़ोटोही अगदी टिपिकल असयाचे...स्टुडिओतल्या भिंतभर चित्रासमोर उभं राहून काढलेले....कधी एखादा अलिशान बंगला असायचा...कधी तळ्याच्या काठचा निसर्ग....सगळ्यांच्या अल्बममधे हेच आणि असेच फ़ोटो. शिवाय फ़ोटोवर  स्टुडिओचा शिक्का आणि खाली कृष्णधवल असं लिहिलेलं.  लग्नकार्यात, मुंजीत फ़ोटोफ़्राफ़र बोलवला जायचा मग करवलीचा तोरा बघायलाच नको. नव्या परकर पोलक्यात किंवा साडीत मिरवणारी करवली प्रत्येक फ़ोटोत असायची. मी भावंडात नंबर तीन आणि धाकटी मला जाम मज्जा वाटायची की मला तीन तीन वेळा फ़ोटो झळकायचा चान्स मिळणार...दोन लग्नं      आणि एक भैय्याची मुंज...धाकटं असल्याचा हाच काय तो फ़ायदा एरवी सगळ्यांना छाळयला मीच मिळायची ही गोष्ट वेगळी...असो. तर त्यावेळेस खोट्या चकचकीत सोनेरी बिंदीची जाम फ़ॅशन आली होती. म्हणजे कपाळावर भांगामधून खाली आलेली बिंदी कपाळावरून कानाच्या मागे दोन्ही बाजूंना हुकनं लावली जायची. नाकात एक रिंग तिही कानामगे केसात हुकनं? अडकवायची. किती ते त्या बिंदीचं कौतुक असायचं विचारूच नका. हे कौतुक आईनं पहिल्यांदा मला आणलं आणि मग बाहुली सजवतात तसं मला सजवंल....(तेंव्हा मजा वाटली होती आता फ़ोटो बघून अगं आई गं वालं फ़िलिंग येतं)....तर मग नवा फ़्रॉक...नवे सॉक्स...नवे सॅंडल...डोक्याला इलॅस्टिकचा नवा हेअरबॅंड या सगळ्यावर ती सुप्रसिध्द चमकिली सोनेरी बिंदी घालून मला मावशिनं स्टुडिओत फ़ोटो काढायला नेलं. लाकडी घोड्यावर बसवून वगैरे फ़ोटो काढला...हा सगळा कौतुक सोहळा बघून भैय्याला अर्थातच पोटात कळा यायला लागल्या....त्याचं रूसणं घालवायला मग माझ्या बाजूला एका खुर्चीवर त्यालाही बसवलं...(बाय दि वे त्याच्या शर्टवर गोगलगायींचं प्रिंट होतं...यक्क) तरिही साहेबांचे गाल फ़ुगलेले कारण एकट्याचा फ़ोटो नव्हता नां म्हणून. असा तो फ़ोटो आज अल्बममधे पाहिला की गंमत वाटते. नंतर कितीतरी फ़ोटो काढले...आता तर उठता बसता मोबाईलवर फ़ोटोच फ़ोटो पण त्या फ़ोटोची मजा वेगळीच.
नंतरच्या काळात मग कोणाकोणाकडे कॅमेरे आले. त्यातली रिळं, सेल आणि एक डोळा मिटून दुसर्‍या डोळ्यानं बघत बरोबर चौकट साधत काढलेले फ़ोटो . सगळंच भारी प्रकरण होतं. सधन असण्याचं एक चिन्ह म्हणजे घरात कॅमेरा असणं. एकच रोल पुरवून पुरवून वापरला जायचा. संपला की तो "धुवायला" टाकणं आणि फ़ोटो डेव्हलप होऊन धी मिळतील याची उत्सुकतेनं वाट बघणं, हा एक मनोरंजक कार्यक्रम असायचा. त्यावेळेस हे फ़ोटो धुणं प्रकरण म्हणजे ज्याच्या त्याच्या कौतुकाचा विषय. फ़ोटो धुतात म्हणजे नेमकं काय करतात याची मला जाम उत्सुकता..दादांनी सांगितलं होतं की एक डार्क रूम असते (म्हणजे काय देव जाणे..पण डार्क रूम असं म्हणलं तरिही भिती वाटायची)-आणि तिथे बरंच काही केल्यानंतर फ़ोटो मिळतात...त्याकाळातही भैय्याला जवळपास सगळ्यातलं सगळं कळायचं असं त्याला वाटायचं आणि आम्हालाही वाटावं असा अर्थातच त्याचा आग्रह असायचा. त्याचा दादांच्या या सांगण्यावर अज्जिबात विश्र्वास नव्हता. त्यानं चांगला हुशारकिचा आव आणत सांगितलं की फ़ोटो धुतात म्हणजे आई कपडे धुते तो निरमा एका मोठ्या टबमधे घालून फ़ेस करतात मग आपला रोल त्यात भिजवून ठेवतात. दोन चार दिवस मुरवत ठेवला की ती गुंडाळी आपोआप उलगडते आणि खटाखट टबबाहेर फ़ोटो पडतात. फ़ोटो मिळायला जितका वेळ लागायचा ते लक्षात घेता भैय्याचं हे लॉजिक पटायचं. मग अभिमानानं ऊर भरून यायचा असा हुश्शार भाऊ मिळाला म्हणून! जाता जाता सहज एक आठवण- रेडिओमधू आवाज कसा ऐकू येतो तर म्हणे मी सकाळी उठायच्या आत माणसं लहान होतात आणि पटापटा रेडिओत जाऊन बसतात आणि रात्री मी झोपले की बाहेर येतात...मग मी हट्टच धरला एका दुपारी दाखवच मला ती माणसं, मग काय रेडिओ खोलला आणि त्यातला स्पिकर दाखवला, याच्या खाली बसतात म्हणे...वर काय तर हात नको लावू लांबून बघ नाहीतर बाहेर येतील आणि मग दादा आपल्याला मारतील. पटलं होतं मला हेही. कारण बघा की स्पिकर कसा गोल घुमटासारखा होता...साधारंण अंगठ्याइवढी माणसं म्ह्णली तरी सहज बसतील असं वाटलं. असो. पुढे आकाशवाणीत जायला लागल्यावर उगाचच हे सगळं आठवून गंमत वाटली आणि मनात विचार आला आत्ता या क्षणाला आपला आवाज ऐकूनही कोणीतरी भाऊ कोण्यातरी निष्पाप लहान बहिणीला अशाच पुड्या सोडत असेल....खी खी खी!
 तर मग ते फ़ोटो धुवून आले की अल्बममधे लावणं हे आणखि एक भारी काम. एक अख्खा रविवार यात जायचा. त्यावेळेस वाटायला लागलं की हॅ या काळ्या पांढर्‍या फ़ोटोत काही मजा नाही मस्त मस्त रंगीत फ़ोटो आले पाहिजेत. यथावकाश तो रंगीत फ़ोटो देणारा कॅमेराही आला. आधीच्यापेक्षा जास्त सुटसुटीत...मस्त वाटायचं रंगीत फ़ोटो बघून. मग वाटायला लागलं की प्रत्यक्षातले रंग आणि फ़ोटोच्या रंगातली तफ़ावत जाऊन डिट्टो फ़ोटो आले पाहिजेत. आम्ही कॉलेजला जाईपर्यंत हेही तंत्र आलं. छान छान गुळगुळीत कागदावरचे प्रिंट मस्त वाटायचे.
जर्नलिझम नुकतंच झालं होतं. तरूण भारतमधे नवी नवी नोकरी सुरू झाली होती आणि एक दिवस आमचे फ़ोटोग्राफ़र त्यांचा डिजिटल कॅमेरा घेऊन आले. इकडे फ़ोटो क्लिक केला की तिकडे सेकंदात बघायला मिळणं हे चमत्काराहून कमी नव्हतं. शिवाय आता फ़ोटोसाठी ताटकळणं संपलं. बातमी आणि फ़ोटो एकत्रच येत होतं त्यामुळे तमाम उपसंपादक खुष झाले. अजून ही नवलाई संपत नाही तोपर्यंत घरोघरी छोट्या बॉक्स सारखे डिजिकॅम आले. छोटे छोटे व्हिडिओ करता येणं हे तर सोने पे सुहागा होतं. शिवाय ते मेमरी कार्ड, रिचार्जेबल सेल वगैरे एकूण प्रकरण भन्नाट होतं. झूम बिम करता येणं म्हणजे तर कहरच. हवे तितके आणि हवे तेंव्हा फ़ोटो हा डिजिकॅमचा सर्वात मोठा फ़ायदा. मग हे कॅमेरे अजून स्मार्ट सुटसुटीत झाले. सेल ऐवजी चार्ज करता येण्याजोगे फ़ोटोसाठी वेगवेगळे फ़िल्टर असणारे, मोड असणारे आले. रंगीत फ़ोटो आणखी छान दिसायला लागले. त्याच दरम्यान मोबाईलमधेही कॅमेरे आले आणि ड्जिकॅमचा तोरा जरा कमी झाला. आता तर मोबाईलमधे कॅमेरा कसला यावर त्याचा म्हणजे मोबाईलचा तोरा अवलंबून. प्रवासाला जाताना कॅमेरा घ्या ही कटकट जवळपास बंद झाली. त्याच बरोबर फ़ोटोच्या प्रिंट काढणही तुलनेनं कमी होत चाललं आहे. जे काही आहे ते मेमरी कार्डमधे. फ़ोनच्या मेमरीमधे...उत्साहात पन्नास पन्नास फ़ोटो काढायचे मग मेमरी कार्ड फ़ुल असा मेसेज यायला लागला की धपाधप डिलिट करायचे....
आता मोबाईलचे फ़ोटो आणखि इंटरेस्टिंग करणारी ऍप आलीत या ऍपमधे ब्लॅक व्हाईट किंवा व्हिंटेज वगैरे इफ़ेक्ट पाहिले की मजा वाटते. जिथून सुरू झालो तिथेच येऊन पोहचल्यासारखं वाटलं....त्यावेळच्या फ़ोटोत मोठे गॉगल आणि बेलबॉटम होत्या...आजही मोठे कॅट आय गॉगल आणि पलाझो आहेत...फ़रक काहीच नाही.....
हे लिहिता लिहिता आठवलं मागे म्हणजे साधारण दोन एक वर्षं झाली असतील एक उपक्रम चालला होता..आपल्याकडचा एखादा असा जुना फ़ोटो त्याच्या तपशिलासहित आणि त्या काळातल्या त्या आठवणीसहित आपण संकेस्थळाला पाठवायचा....इतका सुंदर विचार जिच्या मनात आला ती ग्रेट आणि तिच्या या उत्साहात सहभागी होत आपल्याला त्या काळात घेऊन जाणारेही ग्रेट...खूपच छान संकेतस्थळ आहे हे..आता याचे काहीच तपशिल आठवायला तयार नाहीत...कोणाला काही माहिती असेल तर कॉमेण्टमधे नक्की शेअर करा...मला मिळाली की एक स्वतंत्र पोस्ट त्यावरही...नक्की...
असो, तर कप्पा आवरता आवरता जुना अल्बम सापडला त्यातून तो बिंदीवाला जुना फ़ोटो बाहेर पडला आणि हे सगळं लिहावं असं वाटलं....
 

आमचा तो बाब्या

आमचा नां एक बाब्या होता. म्हणजे कोणी छोटा मुलगा नाही तर आमचा बाब्या नावाचा एक बोका होता. या बाब्याचे एक एक प्रताप म्हण्जे एक एक किस्सा आहे. या बाब्याला एक विचित्रच सवय होती तो चक्क कपडे खायचा. म्हणजे उंदरानी कपडे खाऊन वात आणल्यामुळं याला पाळलं तर यानं उंदरांना व्ही आर एस देउन ते काम आपल्याकडेच घेतलं. उंदीर, झुरळं याच्या मिशीसमोरुन जायची पण हां त्यांच्याकडे "हुंगुनही" पहायचा नाही. त्यानं आपल्या राज्यात सगळ्यांना अभय दिल्यानं सगळे किटक-प्राणी आमच्या घरात निर्भयपणानं वावरायचे. एकदा तर यानं कमालच केली. झालं काय की शेजारच्या पाटलांच्या दीपकनं पॆंटच्या खिशातून अंडी आणली होती, त्यातल एक फुटलं म्हणून त्यानं पॆंट धुवायला टाकली, तेव्हढ्या वेळात हा तिथे गेला आणि मागचा तो खिसाच त्यानं कुतरडला. ती पॆंट नंतर टाकवेनाही आणि घालयचिही पंचायतच नां? आम्ही एकदा जेवत असताना हा आपला शांतपणानं रगात डोकं खुपसून झोपला होता. आम्हाला वाटलं की बिचर्याला थंडी वाजत आहे म्हणून झोपला असेल. जेवणं झाली, सगळी आवरा आवर झाल्यावर अंथरुणं घालून आम्ही झोपायला गेलो तर अंधारात बाबांचा जोरात आवाज आला,"बाब्या<<<" आम्ही सगळे दचकून उठलो आणि खटाखट लाईट लावून काय झालं म्हणून बाबांकडे पहायला लागलो, समोरचं द्रुष्य पाहून एक क्शण सगळे चुपचाप उभे होते आणि मग बाबांसहित सगळेच खो खो हसायला लागले. 
बाब्यानं कुरतडलेल्या रगाच्या ताज्या ताज्या भोकातून बाबांचा रागीट चेहरा बाहेर डोकावत होता. ते द्रुष्य कमालिचं विनोदी होतं. आजही ते ऐतिहासिक रग आमच्याकडे आहेत. 
त्यांचं काय करावं न सुचल्यानं बरेच महिने ते तसेच पडून होते. 
मग मोठ्या भावाला एक कल्पना सुचली 
आणि त्यानं त्या दोन फाटक्या रगांचा मिळून एक धड रग बनविला. 
आजही घरी येणार्या पाहुण्याला तो रग दिसला की ते हमखास प्रश्न विचारतात,"अरेच्चा! हा रग असा काय?", मग त्याला बाब्याचं सगळं पुराण सांगावं लागतं. 
हे ऐकल्यावर पुढचं वाक्यही प्रत्येक पाहुणा न चुकता बोलतो,"अरेच्चा? मग तुम्ही त्याला इतके वर्ष घरात ठेवलंच कसं?" आता तुम्हीही सांगा आपल्या घरात जर असा व्रात्य बाब्या असेल आणि
 तो आपलाच मुलगा असेल तर त्याला आपण सोडून देतो? मग या बाब्याला तरी कसं सोडणार?  
या आणि त्या बाब्यात फरक असेलच तर इतकाच आहे की आमच्या बाब्याला दोन पाय जास्त होते आणि हो एक शेपुटही होतं. म्हणून काय झालं? तो "आमचा बाब्या" होता. 
एक दिवस बाहेर भटकायला गेला तो परत आलाच नाही.
 

हॆलो टोन



आजकाल कोणाच्याही भ्रमणध्वनीवर म्हणजे सोप्या मराठीत सांगायचं तर मोबाईलवर फोन करा. तुम्हाला पलिकडून ट्रिंग ट्रिंग अशी रिंग ऐकू येणं जवळपास दूर्मिळ म्हणण्याइतकं दुरापस्त झालंय. अलिकडे हेलोट्युन्स लावायची फॆशन आहे. म्हणजे आपण नंबर फिरवला की पलिकडून थेट गाणंच ऐकायला येतं. कोणी कोणतं गाणं लावावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, यामुळे काय भयानक विनोद होतात हे एकदा पहाच. एका मैत्रिणिच्या मोबाईलवर कित्येक महिने आंखो में तेरी अजब सी अजब सी अदाएं है, असं गाणं होतं. एक दिवस म्हटलं संपल्या बाई सगळ्या अदा, आता तरी बदल की गाणं. एकिला कधिही फोन करा तिच्या मोबाईलवर कायमची आरती चालू असायची,"ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे" महिनोन महिने नुसतीच आरती ऐकून वैताग आला. तिला म्हटलं आता बास झाली आरती. मंत्रपुष्प म्हण आणि प्रसाद वाट. यावर कडी म्हणजे फॆमिली डॊक्टरांच्या मोबाईलवर आये हो मेरी जिंगदी में तुम बहार बनके हे गाणं होतं. आता बोला. इकडे आम्ही "लोटापरेडला" वैतागून डॊक्टरची अपॊईंटमेंट घेण्यासाठी फोन कारावा तर ते म्हणतायत आये हो बहार बनके? कसली बहार अन कसलं काय? एकिच्या फोनवर होतं,"कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम". हिला सकाळी फोन करा नाहीतर रात्री हिचा पाळणा आपला सततचा हलता. राम जोजवून जोजवून इतका झोपवल्यावर पुढच्या रामायणाचं काय होणार? ही गाणी परवडली पण "ते" गाणं नको. कोणतं? तेच ते फेमस "कोंबडी पळाली तंगडी धरुन". आमच्या एजंटच्या मोबाईलवर हे गाणं होतं. या एजंटनं अगदी रितिप्रमाणं आमचे पैसे घेउन आम्हाला वर फसवलंही होतं. त्याचा जाब विचारायला फोन करावा तर याची कोंबडी आपली सतत तुरुतुरु इकडून तिकडे पळतेय. वात आणला नुसता या कोंबडिनं. एखाद्याला तावातावानं भांडायला किंवा शिव्या घालायला फोन करावा आणि पलिकडून जगजितसिंगचं "तु ही माता, तु ही पिता है......हे राम हे राम" ऐकू यावं यापेक्शा डोक्याला दुसरा ताप नाही. एक तर अख्खी रामधून होईपर्यंत पलिकडचा फोनच उचलत नाही आणि त्यानं उचलल्यावर आपण तोपर्यंत शिव्याच विसरलेलो असतो. आहे की नाही गंमत. कशाचा कशाला संबंध नसताना तर ही गाणी ऐकली की भयंकर विनोदी वाटतं. आता रोज चिरलेली निवडलेली भाजी देणारा भाजिवाला असतो, आपल्याला दोन चार दिवस भाजी नको असते म्हणून आपण त्याला फोन करावा तर याच्या मोबाईलवर ऐकू येतं,"हमे तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना". आता त्याचा आणि आपला काय संबंध? पण हे गाणं ऐकावं लागतं नां? इस्त्रीवाल्याला कपडे घेउन जा बाबा म्हणून निरोप देण्यासाठी फोन करावा तर त्याच्या फोनवर थेट ’डोली में बिठाके, सितारों से सजाके ले जाएगा एक रोज तुझे सावरियां’ असं ऐकल्यावर नाही म्हटलं तरी दचकायला होणारच नां? त्याच त्या गाण्यांना वैतागुन मध्यंतरी मी चक्क तामिळ ट्युन लावली तर लोक दचकून फोन कट करायला लागले. त्यांना वाटायचं की चुकिचा नंबर फिरवला की काय? मग परत नंबर फिरवून मूळ मुद्दा राहिला बाजुला आधी या ट्युनवरुनच झापायचे. अखेर करणार काय लोकआग्रहास्तव बदललं ते गाणं. बाय दी वे तुमची हॆलो ट्युन कोणती आहे?