कृष्ण धवल ते ब्लॅक व्हाईट

कशी गंमत असते नां...सगळं फ़िरून फ़िरून वर्तुळातच संपतं किंवा नव्यानं सुरू होतं....एक जमाना होता ब्लॅक व्हाईट फ़ोटोंचा....म्हणजे त्या काळात तसेच असायचे फ़ोटो...आता तसे इफ़ेक्ट असतात. परवा आवरावरीत जुना अल्बम सापडला आणि ते सगळे फ़ोटो त्यातला इनोसन्स पाहून मज्जा वाटली.
                                                    माझ्या लहानपणी फ़ोटो काढणं ही जवळपास चैन होती...पुन्हा फ़ोटोही अगदी टिपिकल असयाचे...स्टुडिओतल्या भिंतभर चित्रासमोर उभं राहून काढलेले....कधी एखादा अलिशान बंगला असायचा...कधी तळ्याच्या काठचा निसर्ग....सगळ्यांच्या अल्बममधे हेच आणि असेच फ़ोटो. शिवाय फ़ोटोवर  स्टुडिओचा शिक्का आणि खाली कृष्णधवल असं लिहिलेलं.  लग्नकार्यात, मुंजीत फ़ोटोफ़्राफ़र बोलवला जायचा मग करवलीचा तोरा बघायलाच नको. नव्या परकर पोलक्यात किंवा साडीत मिरवणारी करवली प्रत्येक फ़ोटोत असायची. मी भावंडात नंबर तीन आणि धाकटी मला जाम मज्जा वाटायची की मला तीन तीन वेळा फ़ोटो झळकायचा चान्स मिळणार...दोन लग्नं      आणि एक भैय्याची मुंज...धाकटं असल्याचा हाच काय तो फ़ायदा एरवी सगळ्यांना छाळयला मीच मिळायची ही गोष्ट वेगळी...असो. तर त्यावेळेस खोट्या चकचकीत सोनेरी बिंदीची जाम फ़ॅशन आली होती. म्हणजे कपाळावर भांगामधून खाली आलेली बिंदी कपाळावरून कानाच्या मागे दोन्ही बाजूंना हुकनं लावली जायची. नाकात एक रिंग तिही कानामगे केसात हुकनं? अडकवायची. किती ते त्या बिंदीचं कौतुक असायचं विचारूच नका. हे कौतुक आईनं पहिल्यांदा मला आणलं आणि मग बाहुली सजवतात तसं मला सजवंल....(तेंव्हा मजा वाटली होती आता फ़ोटो बघून अगं आई गं वालं फ़िलिंग येतं)....तर मग नवा फ़्रॉक...नवे सॉक्स...नवे सॅंडल...डोक्याला इलॅस्टिकचा नवा हेअरबॅंड या सगळ्यावर ती सुप्रसिध्द चमकिली सोनेरी बिंदी घालून मला मावशिनं स्टुडिओत फ़ोटो काढायला नेलं. लाकडी घोड्यावर बसवून वगैरे फ़ोटो काढला...हा सगळा कौतुक सोहळा बघून भैय्याला अर्थातच पोटात कळा यायला लागल्या....त्याचं रूसणं घालवायला मग माझ्या बाजूला एका खुर्चीवर त्यालाही बसवलं...(बाय दि वे त्याच्या शर्टवर गोगलगायींचं प्रिंट होतं...यक्क) तरिही साहेबांचे गाल फ़ुगलेले कारण एकट्याचा फ़ोटो नव्हता नां म्हणून. असा तो फ़ोटो आज अल्बममधे पाहिला की गंमत वाटते. नंतर कितीतरी फ़ोटो काढले...आता तर उठता बसता मोबाईलवर फ़ोटोच फ़ोटो पण त्या फ़ोटोची मजा वेगळीच.
नंतरच्या काळात मग कोणाकोणाकडे कॅमेरे आले. त्यातली रिळं, सेल आणि एक डोळा मिटून दुसर्‍या डोळ्यानं बघत बरोबर चौकट साधत काढलेले फ़ोटो . सगळंच भारी प्रकरण होतं. सधन असण्याचं एक चिन्ह म्हणजे घरात कॅमेरा असणं. एकच रोल पुरवून पुरवून वापरला जायचा. संपला की तो "धुवायला" टाकणं आणि फ़ोटो डेव्हलप होऊन धी मिळतील याची उत्सुकतेनं वाट बघणं, हा एक मनोरंजक कार्यक्रम असायचा. त्यावेळेस हे फ़ोटो धुणं प्रकरण म्हणजे ज्याच्या त्याच्या कौतुकाचा विषय. फ़ोटो धुतात म्हणजे नेमकं काय करतात याची मला जाम उत्सुकता..दादांनी सांगितलं होतं की एक डार्क रूम असते (म्हणजे काय देव जाणे..पण डार्क रूम असं म्हणलं तरिही भिती वाटायची)-आणि तिथे बरंच काही केल्यानंतर फ़ोटो मिळतात...त्याकाळातही भैय्याला जवळपास सगळ्यातलं सगळं कळायचं असं त्याला वाटायचं आणि आम्हालाही वाटावं असा अर्थातच त्याचा आग्रह असायचा. त्याचा दादांच्या या सांगण्यावर अज्जिबात विश्र्वास नव्हता. त्यानं चांगला हुशारकिचा आव आणत सांगितलं की फ़ोटो धुतात म्हणजे आई कपडे धुते तो निरमा एका मोठ्या टबमधे घालून फ़ेस करतात मग आपला रोल त्यात भिजवून ठेवतात. दोन चार दिवस मुरवत ठेवला की ती गुंडाळी आपोआप उलगडते आणि खटाखट टबबाहेर फ़ोटो पडतात. फ़ोटो मिळायला जितका वेळ लागायचा ते लक्षात घेता भैय्याचं हे लॉजिक पटायचं. मग अभिमानानं ऊर भरून यायचा असा हुश्शार भाऊ मिळाला म्हणून! जाता जाता सहज एक आठवण- रेडिओमधू आवाज कसा ऐकू येतो तर म्हणे मी सकाळी उठायच्या आत माणसं लहान होतात आणि पटापटा रेडिओत जाऊन बसतात आणि रात्री मी झोपले की बाहेर येतात...मग मी हट्टच धरला एका दुपारी दाखवच मला ती माणसं, मग काय रेडिओ खोलला आणि त्यातला स्पिकर दाखवला, याच्या खाली बसतात म्हणे...वर काय तर हात नको लावू लांबून बघ नाहीतर बाहेर येतील आणि मग दादा आपल्याला मारतील. पटलं होतं मला हेही. कारण बघा की स्पिकर कसा गोल घुमटासारखा होता...साधारंण अंगठ्याइवढी माणसं म्ह्णली तरी सहज बसतील असं वाटलं. असो. पुढे आकाशवाणीत जायला लागल्यावर उगाचच हे सगळं आठवून गंमत वाटली आणि मनात विचार आला आत्ता या क्षणाला आपला आवाज ऐकूनही कोणीतरी भाऊ कोण्यातरी निष्पाप लहान बहिणीला अशाच पुड्या सोडत असेल....खी खी खी!
 तर मग ते फ़ोटो धुवून आले की अल्बममधे लावणं हे आणखि एक भारी काम. एक अख्खा रविवार यात जायचा. त्यावेळेस वाटायला लागलं की हॅ या काळ्या पांढर्‍या फ़ोटोत काही मजा नाही मस्त मस्त रंगीत फ़ोटो आले पाहिजेत. यथावकाश तो रंगीत फ़ोटो देणारा कॅमेराही आला. आधीच्यापेक्षा जास्त सुटसुटीत...मस्त वाटायचं रंगीत फ़ोटो बघून. मग वाटायला लागलं की प्रत्यक्षातले रंग आणि फ़ोटोच्या रंगातली तफ़ावत जाऊन डिट्टो फ़ोटो आले पाहिजेत. आम्ही कॉलेजला जाईपर्यंत हेही तंत्र आलं. छान छान गुळगुळीत कागदावरचे प्रिंट मस्त वाटायचे.
जर्नलिझम नुकतंच झालं होतं. तरूण भारतमधे नवी नवी नोकरी सुरू झाली होती आणि एक दिवस आमचे फ़ोटोग्राफ़र त्यांचा डिजिटल कॅमेरा घेऊन आले. इकडे फ़ोटो क्लिक केला की तिकडे सेकंदात बघायला मिळणं हे चमत्काराहून कमी नव्हतं. शिवाय आता फ़ोटोसाठी ताटकळणं संपलं. बातमी आणि फ़ोटो एकत्रच येत होतं त्यामुळे तमाम उपसंपादक खुष झाले. अजून ही नवलाई संपत नाही तोपर्यंत घरोघरी छोट्या बॉक्स सारखे डिजिकॅम आले. छोटे छोटे व्हिडिओ करता येणं हे तर सोने पे सुहागा होतं. शिवाय ते मेमरी कार्ड, रिचार्जेबल सेल वगैरे एकूण प्रकरण भन्नाट होतं. झूम बिम करता येणं म्हणजे तर कहरच. हवे तितके आणि हवे तेंव्हा फ़ोटो हा डिजिकॅमचा सर्वात मोठा फ़ायदा. मग हे कॅमेरे अजून स्मार्ट सुटसुटीत झाले. सेल ऐवजी चार्ज करता येण्याजोगे फ़ोटोसाठी वेगवेगळे फ़िल्टर असणारे, मोड असणारे आले. रंगीत फ़ोटो आणखी छान दिसायला लागले. त्याच दरम्यान मोबाईलमधेही कॅमेरे आले आणि ड्जिकॅमचा तोरा जरा कमी झाला. आता तर मोबाईलमधे कॅमेरा कसला यावर त्याचा म्हणजे मोबाईलचा तोरा अवलंबून. प्रवासाला जाताना कॅमेरा घ्या ही कटकट जवळपास बंद झाली. त्याच बरोबर फ़ोटोच्या प्रिंट काढणही तुलनेनं कमी होत चाललं आहे. जे काही आहे ते मेमरी कार्डमधे. फ़ोनच्या मेमरीमधे...उत्साहात पन्नास पन्नास फ़ोटो काढायचे मग मेमरी कार्ड फ़ुल असा मेसेज यायला लागला की धपाधप डिलिट करायचे....
आता मोबाईलचे फ़ोटो आणखि इंटरेस्टिंग करणारी ऍप आलीत या ऍपमधे ब्लॅक व्हाईट किंवा व्हिंटेज वगैरे इफ़ेक्ट पाहिले की मजा वाटते. जिथून सुरू झालो तिथेच येऊन पोहचल्यासारखं वाटलं....त्यावेळच्या फ़ोटोत मोठे गॉगल आणि बेलबॉटम होत्या...आजही मोठे कॅट आय गॉगल आणि पलाझो आहेत...फ़रक काहीच नाही.....
हे लिहिता लिहिता आठवलं मागे म्हणजे साधारण दोन एक वर्षं झाली असतील एक उपक्रम चालला होता..आपल्याकडचा एखादा असा जुना फ़ोटो त्याच्या तपशिलासहित आणि त्या काळातल्या त्या आठवणीसहित आपण संकेस्थळाला पाठवायचा....इतका सुंदर विचार जिच्या मनात आला ती ग्रेट आणि तिच्या या उत्साहात सहभागी होत आपल्याला त्या काळात घेऊन जाणारेही ग्रेट...खूपच छान संकेतस्थळ आहे हे..आता याचे काहीच तपशिल आठवायला तयार नाहीत...कोणाला काही माहिती असेल तर कॉमेण्टमधे नक्की शेअर करा...मला मिळाली की एक स्वतंत्र पोस्ट त्यावरही...नक्की...
असो, तर कप्पा आवरता आवरता जुना अल्बम सापडला त्यातून तो बिंदीवाला जुना फ़ोटो बाहेर पडला आणि हे सगळं लिहावं असं वाटलं....
 

0 comments: