गल्ली गणपती आणि सिनेमा



गणपतीसमोर फ़िल्मी गाणीच वाजवायचा तो काळ होता. आतासारखी एका गल्लीत दहा बारा मंडळं नसण्याचा तो काळ होता. अवाढव्य दहा दहाफ़ुटी गणेशमूर्ती हा केवळ काही मंडळांचाच मक्ता असण्याचा तो काळ होता. घरचे गणपती गेले की आप्तेष्ट, नातेवाईकांसोबत सार्वानिक मंडळांचे देखावे बघण्यासाठी प्लॅनिंग करुन रात्र रात्र पायपिट करत ते बघण्याचा सोहळा साजरा करण्याचा तो काळ होता. दुपारी निवडणं टिपणं करत वाड्यातल्या बायका आणि संध्याकाळी ऑफ़िसहून आल्यावर चहा घेत गप्पा मारत शेजारपाजारच्या काकांचा देखाव्यांच्या चर्चेचा तो काळ होता. वर्गणी मागायला आलेल्या दादा लोकांना वडिल हटकून विचारत,”यंदा काय देखावा?” त्यावर दादालोक उत्साहानं माहिती पुरवत आणि वडिल लोक त्यांना तितक्याच उत्साहानं सल्ले देत. घरच्या बायापड्यांचा आणि चिल्लरपार्टिचा जिव्हाळ्याचा प्रश्न असायचा,” यावेळेस पिक्चर कोणते दाखवणार” यावर दादालोक कॉलर जरा ताठ करत यादी देत मग ती नावं ऐकून वर्गणी देणार्‍या गृहिणीच्या डोळ्यात चमक यायची.एका वर्गणीत चारपाच सिनेमे बघायला मिळणं ही चैनच होती.
गणपतीचं हे एक मेगा आकर्षण असायचं. गल्लीत व्हिसीआर वर दाखविले जाणारे सिनेमे. तेंव्हा चर्चेत असणारे, नविन आलेले पिक्चर बघायला मिळणं तेही फ़ुकटात ही सुखाची परमावधी असायची. दुसर्‍या दिवशी शाळेत पेंगुळल्या डोळ्यानं गेलं तरिही डबा खायच्या सुट्टीत, काल आमच्या गल्लीत अमूक पिक्चर दाखवला, आज तमूक पिक्चर आहे , अशा गप्पा रंगायच्या. काही गल्लीत अगदी लेटेस्ट पिक्चर असायचे तर काही गल्लीत जरा जुने. लेटेस्टवाले जरा हवेत असायचे, कॉलर टाईट करुन तर जुनेवाले बिचारे.पण एक होतं,कोणिही कोणाच्याही गल्लीत जाऊन पिक्चर बघू शकत असे. किंबहुना,  पाच दिवसातल्या गल्ली बोळातल्या सिनेमांचं टाईम टेबल बघून कोणत्या दिवशी कोणत्या गल्लीत पिक्चर बघायला जायचं याचं प्लॅनिंग व्हायचं. साधारण नऊ वाजता जेवणं खाणं पटापट आवरुन आधी आम्ही पोरं टोरं सतरज्या, तरट असं काखोटीला मारुन गल्लीत जाऊन मोक्याची जागा पटकावून बसायचो. मागून झांकपाककरुन येणार्‍या आया, मावशा,काकवांची जागा धरुन ठेवणं हा एक मोठा पराक्रम करावा लागायचा, तो वेगळाच. कारण एकतर या बायका कधीच वेळेत यायच्या नाहीत आणि मग दुसरी एखादि काकू येऊ बसायला लागली की,” ओ काकी आमच्या आईची जागा पकडलीय तिथं” असं सांगितलं की ती काकू हमखास चार शब्द सुनवायची. झेपेल तितका डिफ़ेन्स करुन शक्य होईल तितकी ही जागा पकडून ठेवणं हे फ़ारच मोठं पराक्रम करण्यासारखं काम होतं. सिनेमा जस्ट सुरु झाला की या बायका घाईत येऊन गर्दीत जागा करुन बसता बसता विचारायच्या,” कधी झाला गं पिक्चर चालू?” मग मघासची ती आपण जिच्याशी वादी प्रतिवादी खेळून दमलेलो असायचो ती काकू जरा सरकल्यासारखं करत आईला जागा देत म्हणायची,” फ़ार काय नाही, आताच पाट्या पडल्यात’ पण कधी कधी सिनेमा बराच पुढे गेल्यावर जर आई आली तर मात्र तिला आधीची स्टोरी कुजबुजत्या आवाजात सांगितलि जायची,” ही व्हिलनची बाई आहे बरं का… ती झिन्तमान आता येईल बघ… अमिताभच्चनची आई म्हणजे ती निरुपाराय आहे… असं धावतं वर्णन केलं जायचं.
एखादी कोणी आली नसेल तर दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळेत भाज्या निवडता निवडता, दुपारची शिवणा टिपणाची कामं करता करता स्टोरी सांगितली जायची. या दुपारच्या स्टोरी टेलिंगची एक मस्त आठवण आहे. झालं काय होतं की, सांगलीत तेंव्हा स्वरुप टॉकीज नव्यानं चालू झाल होतं. त्याकाळातलं ते टकाटक टॉकीज (टाकी) होतं. याचा लाल चुटूक मखमलीचा पडदा सिनेमा चालू होण्या आधी अलगद गोल गोल चुण्या होत वर जायचा आणि सिनेमा संपला की खाली यायचा.सिनेमापेक्षा त्या पडद्याचं आकर्षण जास्त असायचं त्यामुळे आम्हाला तो वर जाण्याआधी खुर्चीवर जाऊन बसायचं आणि तो जमिनीला टेकला की मगच खुर्चिवरुन उठायच असायचं. तर अशा या स्वरुपला लावारीस सिनेमा लागला होता आणि घरी दादांना न सांगताच आई मला घेऊन तो सिनेमा बघायला गेली होती. दादांकडे लुब्रेपणा करशिल तर बघ, अशी ताकीद दिल्यानं मी गप्प राहिले होते पण दादांना सगळं सांगायची सवय असल्यानं मी शेवटी म्हणलंच की, दादा आज आम्ही सिनेमा बघितला पण आईनं तुम्हाला सांगायचं नाही असं सांगितलंय (मुलं निरासग असतात, देवाघरची फ़ुलं असतात वगैरे ) झालं. दादांचे चष्म्यामागचे वटारलेले डोळे आणि आईचे खाली झुकलेले पण नंतर माझ्याकडे खाऊ की गिळू असं बघणारे डोळे मी कधीच विसरु शकणार नाही. दुसर्‍या दिवशी दुपारी अर्थातच लावारिसची स्टोरी हा बायकांचा टॉक ऑफ़ द डे. माझी आई प्रचंड भारी स्टोरी टेलर होती. तिची स्टोरी ऐकली की सिनेमा बघायचीच गरज रहायची नाही. (तेंव्हा स्पॉयलर वगैरे काही मानलं जायचं नाही, कारण मुळात बहुतेकांना सरसकट सिनेमे बघायला जमायचं नाही त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवली जायची) तिनं स्टोरी सांगायला सुरवात केली… अमताभच्चन हा जिव्हाळ्याचा विषय असल्यानं बायका हातातले गहू निवडायचे विसरून देहभान हरपून स्टोरी ऐकत होत्या… स्टोरी सुरू झाली आणि मी,” आई… ते सांग नं”…असं हळूच म्हणलं, माझ्याकडे दूर्लक्ष करत आईनं स्टोरी चालूच ठेवली…मी अधून मधून नेटानं, आई… ते सांग नं… असं म्हणत राहिले. शेवटी वैतागून आईनं विचारलंच, “काय?” मी उत्साहात (आईनं हे सांगितलं नाही पण माझ्या लक्शात होतं या रुबाबात) सांगितलं की,” अगं तो पडदा असा…खाली आला… ते राहिलंच नं सांगायचं?” यावर काल आईनं खाऊ का गिळू केलेले डोळे आज गुणाकार होत दहा बारा झाले होते. मला अजूनही कळलं नाहीए की आईसकट सगळ्या काकवांना का बरं त्या दिवशी माझा राग आला होता? तर ते एक असो. बॅक टू गणपतीतले पिक्चर, मिस्टर नटवरलाल पासून सदमा पर्यंतचे सगळे सिनेमे त्या छोट्या पडद्यावर आणि रस्त्यावर तरट पसरुन बघितलेत. ना महागड्या पॉपकॉर्नची फ़ुकटची ऐश न एसीतली गुबगुबीत खुर्ची. उलट बरेचदा गणपतीत थंडी असायची कारण त्यावेळेस ठरलेल्या नक्षत्रांना पाऊस पडायचा. आतासारखा अवेळी आणि उतावळा नसायचा तो. मग थंडी असली की घरुन चादर घेऊन जाऊन ती लपेटून तरटावर बसून नेटानं बघितलेले प्यार झुकता नहीं, परिंदा असे सिनेमे आठवले की आता गंमत वाटते. सिनेमा गल्लित आल्यावर लहानपणी गल्लीत पाहिलेले सिनेमे आठवले आणि लिहिल्यावचून रहावलं नाही

#random_cinematic_memories