Showing posts with label छ छोटम. Show all posts
Showing posts with label छ छोटम. Show all posts

गेला पेशन्स कुणीकडे?

आईशप्पथ मला नां माझ्या आजीचं अलिकडे जाम कौतुक वाटायला लागलंय. माझ्या आजीला एक नाही दोन नाही, तर सगळी मिळून मोजून आठ मुलं. पुन्हा सगळी शिकली बिकली छान. एकापाठोपाठ एक आलेल्या पोरांना तिनं कसं काय वाढवून मोठं केलं असेल, याचं राहून राहून कौतुक वाटतंय. आमची इथे दोन पोरातच छप्पर उडायची वेळ आलीय. तर मंडळी या पोस्टचा विषय एव्हाना समजला असेलच. सकाळ जशी चढत जाते तसे चढत्या क्रमानं डोक्यावरचे केस अनुक्रमे वैतागानं, चिडचिडीनं आणि अखेरीस संतापानं ताठ उभे रहायची वेळ येते. आमचा हा मॉर्निंग शो शांतपणानं पहाणार्‍या सासुबाई कपालभाती करत करतच म्हणतात, "अगं किती वैतागता गं पोरांवर? पोरंच ती. ती असं वागणार नाहीत तर कोण? चिडू नये असं सारखं सारखं त्यांच्यावर. बरं तर बरं तुमच्या मदतीला निदान बायका तरी आहेत, आमच्यावेळेस आम्ही एका वर्षाचं अंतर असणारी तीन तीन मुलं कोणाच्याही मदतीविना कशी मोठी केली असतील? मुलं मोठी झाली आता नातवंडं आली तरी आम्ही अजून उभे आहोत. तुमचं आत्ताच असं मग आमच्याएव्हढं झाल्यावर कसं होणार? (आता संयमासाठी अनुलोम विलोम करण्याची वेळ माझी असते). जे सासुबाईंचं तेच माझ्याही घरच्यांचं. एकूण सगळ्यांच्या मते आजच्या पिढीत पक्षी माझ्यात (असं थेट बोलण्याची हिंमत कोण दाखवणार नाही का?)पेशन्स नावाची गोष्टच नाहीए. त्यामुळेच मला आजकाल प्रश्नच पडायला लागलाय, "हे पेशन्स म्हणजे काय असते रे भाऊ"? या प्रश्नाला जे उत्तर सापडलं त्याचा मतीतार्थ असा आहे,
१-घड्याळाचा काटा पटापट पुढे चालला असताना रजईत गुरफ़टून झोपलेल्या पिल्लांना शाळेसाठी दर अर्ध्या मिनिटानं एक हाक या रेटनं वेळेत उठवणं म्हणजे पेशन्स.

२-कपभर दूध, आपलं पातेलंभर रक्त आटवून त्यांना प्यायला लावणं म्हणजे पेशन्स.

३-आदल्या रात्रीसापासून घसा खरवडून सांगुनही स्कूल बॅग भरलेली नसताना अखेरच्या क्षणाला ती आपण चपळाईनं भरणं म्हणजे पेशन्स (बाय दी वे, पोरांची स्कूल बॅग भरणं ही सहासष्टावी किंवा सदुसष्ठावी कला म्हणून मान्यता देण्यात यावी असा माझा आग्रह आहे)

४-बारा वीस अशी अगदी ठोक्याला दारात उभी रहाणारी स्कूल बस तुमच्या नशिबात असेल तर किमान बारा एकोणीसला आपण पायर्‍या उतराव्यात या किमान अपेक्षेला फ़ाट्यावर मारणारी पोरं बसमध्ये नेऊन बसवणं म्हणजे पेशन्स.

५-वेणी घालायला बसल्यावर, "पण आई माझी ब्लॅक रिबिन काल हरवली" असं निष्पापपणानं सांगणार्‍या लेकीवर न खेकसणं म्हणजे पेशन्स

६-शनिवार रवीवार आरामात घालवल्यावर सोमवारी सकाळी सव्वाअकरावाजता शाळेत बाईनी अमूक प्रोजेक्ट बनवून आणायला सांगितलाय असं थंडपणानं सांगणारी लेक आईला सुपरवुमन समजते यात तिचा काय दोष? पुन्हा हे प्रोजेक्ट म्हणजे अमकी स्टिकरं चिकटवा तमक्या प्रिंट मारा, क्लेपासून अमकं आणि ढमकं काहीतरी बनवा असले वेळखाऊ असतात. (हा मुद्दा जरा विस्तारानं सांगायचा मोह होतो आहे)(म्हणजे सिन कसा? तर सकाळी अचानकच लेकीला आठवतं की, रेसलर्सची माहिती आणि फ़ोटोग्राफ़्सचा प्रोजेक्ट सांगितलाय. [इकडॆ आपली वेळेशी कुस्ती सुरू होते]मग इकडे दप्तरात सगळं कोंब, तिकडे ते करत असतानाच नेट चालू करून गुगल्यावर माहिती शोध, ते करताना धाकटं पिल्लू चारवेळा बटनांवर हात मारून वैताग आणत असतं. मध्येच शाळेत जाणार्‍या लेकीला जेवायला वाढणं आणि ते ती पटापट खाईल हे पहाणं असलं अत्यंत कौशल्याचं कामही करावं लागतं. ती जेवत असतानाच तिच्या वेण्या घालतानाच धाकटं येऊन मागून ड्रेस ओढत, "आई च्ची च्ची" म्हणून दात काढून हसतं. अधीक माहितीसाठी- च्ची च्ची म्हणजे शी प्रकरण. तर तो उपक्रम पार पडल्यानंतर लगेचच भरपाई म्हणून त्याला खाऊ घालण्याचं काम, जे घरातून चारी ठिकाणी धावत करावं लागतं, अंगाशी येतं. इतकं होईपर्यंत ते प्रिंट ब्रिंट सगळं बदबदा टेबलवरून खाली आलेलं असतं. ते निटपणानं ठेवून शुज पासून रूमालापर्यंत सगळं शोधून काढून, अगदी ट्रेजर हंट खेळल्यासारखं,लेकीला तयार करून धाकट्याला काखोटीला मारून अखेरीस तिला बसमध्ये बसवून हात हलवून हुश्श करत परत यावं तर शु रॅकवर ती प्रोजेक्ट फ़ाईल तशीच बिचार्‍यासारखी पडलेली असते. की पुन्हा धावाधाव सुरू. हाताला येईल ती पॅंट आणि त्यावर हाताला येईल ते टॉपसारखं घालून शाळेकडे गाडी पिटाळावी लागते. बसवाल्याला गाठून फ़ाईल लेकीपर्यंत पोहोचवण्याचं काम पारपडेपर्यंत दिवस डोक्यावरून पुढे गेलेला असतो.) तर हे सगळं तोंडाचा पट्टा सुरू न करता शांतपणानं करणं म्हणजे पेशन्स.

७- शाळेचे शुज घातल्यानंतर त्याचा तुटलेला बेल्ट, क्लिप किंवा असलंच काही दुरूस्त करण्यासाठी बस येण्यापूर्वी दोन मिनिटं कोपर्‍यावरच्या कॉबलरकाकाकडे (हे लेकीनं दिलेलं नाव) धावत सुटणं आणि हे सगळं शांतपणानं पार पाडणं म्हणजे पेशन्स राखणं.

असो. तर मंडळी, माझ्यासारखाच थोड्याफ़ार फ़रकानं सगळ्यांचा पेशन्स कणाकणानं संपत असणार याची मला खात्री आहे. एकवेळ या यादीत भरच पडेल पण कमी नाही होणार. पुन्हा गंमत काय आहे माहितीय कां, या सगळ्या घडामोडीत नवरा कधीच मोडत नाही. चुकून एखाद्या दिवशी तो असेल तर तोही वर आपल्यालाच सांगणार, "अगं किती चिडचिड करतीयस, हॅव सम पेशन्स" त्याला कळकळीनं सांगावसं वाटतं की मी ढीग हॅवींग रे पेशन्स पण ते आणायचे कुठून तो पत्ता सांग नां.
 

कसलं भारी!!!

Alice in Wonderland - If I had a World of my o...Image by Brandon Christopher Warren via Flickr


शुक्रवार म्हणजे लेकीच्या दप्तरातून घरी करण्यासाठी वर्कशिट येण्याचा दिवस. या शु्क्रर्वारी मशरूमचं चित्र होतं आणि नेहमीप्रमाणे ते रंगवून बिंगवून त्यासंदर्भातली पाच वाक्य लिहायची होती. कसंतरी करून तिच्या वयाला समजतील आणि पचतील इतपत चार वाक्यं सांगितली एक राहिलं होतं म्हणून म्हटलं की लिही, मला हे खायला खूप आवडतं. खल्लास! आमच्या अभ्यासाला ब्रेकच लागला. कन्यारत्न म्हणालं की,"मला मशरूम आवडत नाही मग मी असं कसं लिहिणार"? म्हटलं, "अगं लिहायचं असतं नुसतं." यावर क.र.-"असं कसं लिहिणार? मी कधी खाल्लेलच नाही तर ते आवडतं असं कसं लिहिणार आणि खोटं बोलायचं नाही असं मिस नेहमी सांगते, मी मिसला चीट नाही करू शकत"?(होय हो माझी लेक चक्क "शकत बिकत" असलं तुफ़ानी मराठी बोलते. म्हणजे मी खेळायला जाऊ? असला साधा सुधा प्रश्न ती "मी खेळायला जाऊ शकते का"? असा विचारते). मी-"मिसना काय माहित तू मशरूम खातेस की नाही? लिही पटपट आता", क.र.-"मिसला नाही पण मला माहित आहे नां" (मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफ़लं उचलणार नाही असाच बाणा अगदी) "मग तुला काय लिहायचं ते लिही" माझी शरणागती. कुठून मेल्या या मशरूमचा शोध लावला असं झालं.
पोरांच्या मेंदूत काय पाखरं भिरभिरत असतात काही सांगता येत नाही. मागे एकदा ओठांचा चंबू करून मन लावून चित्र रंगवत होती "काय गं काय रंगवतेयस" विचारल्यावर म्हणाली,"ऎप्पल" हातात खडू हिरव्या रंगाचा दिसत होता म्हणून विचारलं,"ऎप्पल रंगवतेयस मग हातात ग्रीन कलर कसा?" तर आता या आईचं करू काय अशा नजरेनं बघत तिनं शांतपणानं सांगितलं,"ऎप्पल अजून कच्चं आहे नां" म्हटलं बरोबर आहे माझे आई कच्च्या सफ़रचंदाचं चित्र काढू नये असा काही नियम नाही.
रोज झोपताना गोष्टिंचा रतीब घालाव तेंव्हा कुठी या बाईसाहेब डोळे मिटणार. रोज रोज गोष्टी सांगून सांगून कंटाळा आला एक दिवस लायब्ररीत चांदोबा दिसला आणि अगदी हौसेनं आणला. चला आता आठवडाभर तरी निश्चिंती असा विचार करून रात्री झोपताना त्यातली कोणती गोष्ट सांगू असं विचारलं, रंगीत चित्रं बित्रं बघून चिमणी भारीच खुष झालेली होती. पानं उलटवून बघून झाल्यावर त्यातली विक्रम वेताळाची गोष्ट सांगण्याची फ़र्माईश झाली. म्हटलं बघ हं भुताची गोष्ट रात्री झोपताना ऐकशिल आणि मग स्वप्न तसलंच पडेल. पण तिच गोष्ट ऐकायची तिची इच्छा बघून मी ती वाचायला सुरवात केली. एकच पान झालं असेल नसेल तर हिनं "आई ही नक्को दुसरी सांग" म्हणून भुणभुण सुरू केली. वाटलं घाबरली बिबरली की काय? म्हणून दुसरी एक गोष्ट वाचायला सुरवात केली. दोन मिनिटानं ही गोष्टही नको म्हणून पिरपिर चालू. आता मात्र वैतागच आला. म्हटलं ही नको ती, काय चाललंय काय? तर एव्हढुसं तोंड करून म्हणाली की,"आई हे मराठी मला समजतच नाहीय" मला ही गोष्ट "आपल्या मराठीत सांग" अक्शरश: मराठीतली गोष्ट मराठीतच भाषांतरीत करायची वेळ आली. तिचंही खरंच आहे म्हणा. आपणच म्हणजे माझ्या पिढीतले जवळपास सगळेच पालक शुध्द मराठी न बोलता त्यात हिंदी इंग्रजी शब्दांचा मुक्त वापर करतात. त्यात आता ही पोरं शाळेत इंग्रजी, मित्र मैत्रिणीत हिंदी आणि घरात मराठी बोलत असल्यानं सगळीच सरमिसळ. तेंव्हापासून मराठी पुस्तकं मराठीतच वाचायची आणि कठीण शब्द तिला समजणार्या भाषेत सांगायचे आम्ही ठरवलं आहे. त्यानिमित्तानं निदान मराठी शब्द कानावरून तरी जातील.
भाषेवरून आणखी एक गंमत आठवली. सोसायटीतली तमाम पटेल, अरोरा, अय्यर, शर्मा बच्चेमंडळी त्यांना मराठीत निबंध लिहून आणायचा झाला की आमच्या घराची बेल वाजवतातच आणि "आंटी प्लिज हेल्प करो नां" अशी गळ घालतात. मी एक नियम केलाय की मी सांगायचं आणि त्यांनी लिहायचं शिवाय झाल्यावर वाचून दाखवायचं.
रविवारी तीन विषय घेऊन ही भुतावळ आली. १- आजच्या जमान्यातलं स्त्रीचं स्थान,२-माझे आवडते प्रेक्शणिय स्थळ,३-अपंग व्यक्त आणि "मी"यातलं संभाषण. निबंध क्र.१ ची सुरवात "न स्त्री स्वातंत्र्य मर्हती"नं लफ़्फ़ेदार केली. पण वाचताना अरोरा कन्येची भलतीच तारांबळ उडाली. पुन्हा "च" चा उचार आपण दोन पध्दतीनी करतो तर हे एकाच. जे "च"च तेच "ज"चं. "ळ"ची भानगड तर विचारायलाच नको. पंजाबी उच्चारातनं आजच्या स्त्रीचं मराठीतून स्थान ऐकताना गंमतच वाटत होती. विषय क्र २- लिहिताना दक्शिणी कन्येनं पहिल्याच वाक्याला बल्ल्या घोळ घातला, माझे आवडते प्रेक्शणिय स्थळच्या ऐवजी, माझे प्रेक्शणिय स्थळ असं लिहून तिनं भलतंच मनोरंजन केलं. बरं पुन्हा यांच्या शाळेत काय म्हणे हे लिहून आणलेलं भर वर्गसमोर वाचूनही दाखवायचं असतं म्हणून लिहून काम भागत नाही तर "प्युअर मराठीत" लिहिलेलं कसं वाचायचं हेही शिकवावं लागतं. मला मजाच येते हा भाग वेगळा पण यांच्या मास्तरीणबाईंचीही हे सगळे निबंध ऐकताना जाम करमणूक होत असणार नाही?



एक विशेष सूचना- १-लेखाला ड्कवलेल्या फ़ोटोचा संबंध लेखाशी असेलच असं नाही.
२-हे आपलं उगाचच सगळे म्हणतात की लेखासोबत फ़ोटू बिटू असला की जरा बरं वाटतं म्हणून.
३-"भुंग्या"नं त्याच्या ब्लोगवर झिमट्याची युक्ती सांगितलेली होती, म्हटलं चला यानिमित्तानं वापरून पाहू. तेंव्हा इथून पुढच्या लेखात विषयाशी फ़टकून असणारे फ़ोटे असतील तर बिचकू नका.