Showing posts with label shimla. Show all posts
Showing posts with label shimla. Show all posts
शिमला-५
.....ड्रायव्हरनं एका दुकानापुढे गाडी उभी केली. दुकानात तोबा गर्दी. कोण काय करतंय काही कळत नव्हतं. भाजीबाजारासखा गोंधळ माजलेला. हवेत प्रचंड गारठा आणि थंडगार वारं सुटलेलं होतं. हे दुकान होतं रोहतांगमध्ये बर्फात घालायचे कपडे, स्किईंग्ज आणि शुज भाड्यानं मिळण्याचं. अखेरीस आम्ही आम्हाला साजेसे आणि मुख्य म्हणजे बसणारे कपडे घालून पुन्हा गाडीत बसलो. आता कपड्यांनी आम्ही चांगले जाडजूड झालेलो होतो त्यामुळे गाडीत दाटी झाली. आम्ही सगळे चंद्रमोहिमेला चालल्यासारखे दिसत होतो. अखेरीस मधल्या रस्त्यावर मी ते चिलखत काढून टाकलंच. आता कालपासून बर्फाचे दूरवर दिसणारे डोंगर अगदी कवेत आल्यासारखे दिसत होते. अधून मधून चक्क बर्फाचे कडे रस्त्याच्या बाजुला उभे होते. इतक्याजवळ बर्फाचा अख्खा डोंगर पाहून खुळावल्यासारखं होत होतं. हळू हळू बर्फाच्या भिंतिंचं प्रमाण वाढायला लागलं. चेकपोस्टजवळ गाडी थांबली. खालच्या बाजुला बर्फातले खेळ चालले होते. इथे वेळ घालविण्यापेक्शा बर्फात खेळायला लागू असा विचार मांडला जाऊ लागला. पण आमच्यासोबत आलेल्या गाईड कम प्रशिक्शकाचं दुकान झिरो पोईंटवर होतं शिवाय ड्रायव्हर महाशयना आमच्या गुडियाला बडफ की गुंफा दाखवायची सुरसुरी आली होतीच. अखेर दोन अडीच तास तिथे घालविल्यावर आम्हाला ओके सिग्नल मिळून आम्ही रोहतांगच्या रस्त्याला लागलो. ह्रद्य कमकुवत असणार्यांनी इकडे तिकडे न बघता नाकासमोर बघत जावं असा सगळा रस्ता. एकाचवेळेस दोन गाड्या समोरा समोर आल्या तर दरीकडेची गाडी अगदी दरीकडेला झुकलेली दिसायची आणि तो अर्धा मिनिट श्वास घ्यायलाही सुचायचं नाही. आता हवेतला गोठलेपणा वाढत चालला. दूर टोकाकडे बोट करून गाईड म्हणाला अपने को उध्धर जाना है जी. त्यानं दाखवलेल्या दिशेनं पाहिलं तर आकाशा, डोंगर एकच झालेलं. जसं काही पांढरा शुभ्र पडदाच कोणितरी उभा केला होता. आता त्या पांधरट ओल्या पडद्याकडे आम्ही चाललो होतो. जसे पुढे जाऊ तसे रस्ता दिसत होता. अचानकच पुढच्या गाड्या वळायला लागलेल्या दिसल्या. पोलिस दिसले. म्हटलं काय झालं? तर रस्त्यात एक भला दांडगा हिमनग ढासळला होता. रस्ताभर बर्फाचा चिखल झाला होता. गाड्या रुतत होत्या. अखेर सगळ्या गाड्या मागे वळविल्या. म्हटलं आता काय? गाईड म्हणाल उतरा इथेच. आता आलोच आहोत. सगळे खाली उतरलो. आता खरी गम्मत चालू झाली. रस्त्यावरुन वर चढून जायचं होतं. पहाताना सोप्पं वाटत होतं पण पाय ठेवल्यावर समजलं. पाय ठेवला की तो आत रुततच नव्हता परत खाली घसरायचा, पायात भले मोठे गम शुज आणि थंडिनं बधिरता आलेली त्यामुळे पायाच्या संवेदना जवळपास गेलेल्या होत्या.त्यामुळे घसरत खाली आल्यावरच समजायचं की आपण घारलोय. पुढच्या चार आठजणांची सर्कस पाहिल्यावर युक्ती केली गाईडकडून स्किईंगसाठी असणारी स्टिक घेतली आणि ती रुतवून वर चढलो. हीच युक्ती मागे येणार्या सगळ्यांनी वापरली. वर आलो तर नजर जाईल तिकडे बर्फ आणि नाकासमोरुन वहाणारं बर्फ. गाईडनं सटासट फोटो काढायला सुरवात केली. बर्फाचे गोळे बिळे एकमेकाला मारुन झाले, बर्फाचा किल्ला करुन झाला आणि मग जवळ दगडासारखं काही तरी दिसत होतं त्यावर टेकलो तर गाईड म्हणाला चलो मॆडमजी चलते है. म्हटलं आता कुठं चलते है बाबा. झालं नां? तो म्हणाला नहीं अभ्भी हमारी दुकान कहां है? वहां चलो. बर्फ के गेम खेलेंगे. त्याला विचारलं की कुठं आहे दुकान? त्यानं समोर बोट करुन दाखवलं. धुकट हवेमुळं फार लांबचं दिसत नव्हतं. म्हणून गेलो त्याच्या मागे. जरा पंधरा मिनिटं चाललो(चाललो कसले? खरं तर चढलो) तर आमच्यातले निम्मे ढेपाळले. बाकिचे गाईडला और कितना दूर विचारत चालतच राहिले. तो आपला सतत समोरच बोट दाखवत होता. अखेर डोंगराच्या टोकावर आलो. मग म्हणाला आता खाली उतरायचं. करतो काय. उतरलो. तर आम्ही परत रस्त्याला लागलो होतो. मधला बर्फाचा कडा कोसळलेला भाग वगळून त्यानं आम्हाला चक्क ट्रेक करत आणलं होतं. बहाद्दरच म्हणायला हवा. नाही तर आमच्यातल्या रडक्या शिपायांकडे पाहून एखाद्यानं तिथेच सोडलं असतं. मग रस्त्यावरुन परत एकदा मघाच्याप्रमाणे वर चढलो. आता कधी येईल तेव्हा येईल तो झिरो पोईंट असं म्हणत त्याच्या मागोमाग चालत राहिलो. जरा चढून वर आलो तर लोकांच्या दंग्याचे आवाज यायला लागले. समोर पाहिलं तर एका ओळीत टपर्या दिसायला लागल्या होत्या. टपर्या ओलांडून आलो आणि बघतच राहिलो. समोर बर्फाचं विस्तिर्ण मैदानच पसरलं होतं. लोक मजेत बर्फातले खेळ खेळत होते, खिदळत होते. गाईडनं मग स्किईंग करुन दाखवलं. बघून वाटलं सोप्पंच तर आहे. पण त्याच्या शुजमध्ये पाय घातले, अजून लोक केलं होतंच आणि तो सूचना देतच होता की पाय वर! कसं बसं सावरत उठले. आता मात्र गाईडनं धोका पत्करला नाही. स्किईंगच्यामगे त्यानं पाय ठेवला आणि हळू हळू पुढे झुकुन जायला सांगितलं. हळू हळू कुठलं? गाडीनं एकदम पाचवा गियर टाकल्यासारखी सुसाट उतारावरुन सुटले. म्हटलं संपलं आता. राम बोलो. आजुबाजुनं स्नोबाईक्स सुसाट येत होत्या, कुठे ते स्लिजवाले धावत येत होते, घोडे होते या सगळ्यात मी आणि माझ्यासारखे सुसाटलेले स्किईंगवाले. अखेर तो क्शण आलाच! सरसरत जात असतानाच काय झालं माहित नाही, जरा उजवीकडे आपोआप वळल्यासारखं झालं आणि धडाम! पाय वर, स्टिक एक वर एक खाली पाठ टेकवून सपशेल पलटी मारली. आता तर उठायचिही शक्ती नव्हती. कारण एकदम सुसाट आल्यामुळे, ते ही अजाणता, गाळण उडालेली होती त्यात अचानकच पलटी खाल्यानं भेदरुनच गेले. पण किरकोळ दिसणार्या गाईडनं उठवून उभं केलं आणि परत एकदा आमची शिकवणी चालू झाली. आता कसलंही थ्रिल अनुभवायची इच्छा रहिली नव्हती. म्हटलं बाबा, झालं तेव्हढं बास झालं, आता इथुन जाते साधेपणानं चालत. तर हा ऐकायलाच तयार नाही. मला लहानपणिचा प्रसंग आठवला. सायकल चालवायला शिकत असताना पहिल्यांदाच अशीच पडले होते, गुडघे फुटले होते, भावाला म्हटलं आता बास बाबा, जाते इथुन चालत घरी. तर हा ऐकायलाच तयार नाही. घरी जायचं तर सायकल घेउनच अशी तंबीच दिल्यावर डोळ्यातून पाणी काढत जीव मुठीत घेउन सायकल कशी बशी घरी आणली. तेच आठवलं आत्ता. आत्ता अगदी पाणी नाही आलं पण काकुळतिला येउन परत आले आणि मग हुश्श झालं. खुर्चिवर बसकण मारल्यावर मात्र गाईड खो खो हसायलाच लागला. इतक्या मनोरंजनानंतर हसायलाच येणार नां? सगळेचजण असेच पडण्यात गुंग होते. कोणी फोटो काढत होतं. एक सलमान खान तर शर्ट काढून बर्फावर झोपून पोझ देत होता. एव्हाना चक्क उकडायला लागलं होतं. थोडिशी पोटपुजा करुन आम्ही परतिच्या वाटेला लागलो. परतिची वाट तीच होती. आता बच्चेकंपनिचे पाय दुखायला लागले होते म्हणून स्लेजवाल्याला ठरविला. मी म्हटलं मी चालत येणार तर सगळे आग्रह करायला लागले. म्हटलं तेव्हढाच व्यायाम. नाही तरी आता परत बर्फात चालण्याचा योग लवकर थोडाच येणार आहे? पण खरं सांगायचं तर त्या स्लेजलाच मी घाबरले होते. कसलं काय ते? अखेर मला बसावंच लागलं. उतारावरुन सरसरत खाली आलो आणि अगदी शेवटच्या क्शणाला व्रात्य स्लेजवाल्यानं स्लेज तिरकी करुन आम्हाला हिमालयापुढे नतमस्तक व्हायला लावलंच. धडपडत उठलो तर आमच्या मागून अशीच बरीच मंडळी किंचाळत लोटांगण घालत होती. त्यांचं धडपडणं बघून मात्र जाम हसायला येत होतं. एव्हाना वेळकाळाचं भान राहिलं नव्हतं. गाडीत बसलो आणि घड्याळ पाहिलं तर चार वाजले होते. महत्वाचा टप्पा संपला होता. रुख रुख लागली होती. खरं सांगायचं तर एकदा हा निसर्ग पाहिल्यानंतर काहीच बघावसं वाटत नव्हतं.
शिमला-३
.......दुसर्या दिवशी डोळे उघडले आणि खिडकीचा पडदा बाजुला करुन बाहेर पाहिलं आणि शप्पथ सांगते इतकी अप्रतिम सकाळ बहुदा आयुष्यात पहिलीच असेल. काल रात्री अंधारात आम्ही शिमल्याच्या केवळ रस्त्यावरुन आलो होतो आज शिमला डोळ्यासमोर असं उभं होतं. अप्रतिम. सुंदर जे काही काठवतील ते शब्दही तोकडे पडावेत असं सुंदर द्रुष्य समोर दिसत होतं. समोर खोल हिरवीकंच झाड्यांच्या टोप्या घातलेली दरी, त्यात असणार्या दोन चार घरांच्या तुरळक वस्त्या, त्यात काम करणारे स्थानिक लोक, स्वच्छ कोवळा सूर्यप्रकाश, पाखरांची चिलचिल, सगळं एखाद्या कल्पनेतल्या कॆन्व्हासमध्ये चितारल्यासारखं.....इतकं छान प्रसन्न पूर्वी कधी वाटलं होतं आठवेचना. त्याच उत्साहात, रजईत हरवलेल्या बापलेकीला वरुन माझ्याही रजईत लपेटून एकटिच छान भटकायला निघाले. पावसानं सगळं छान धुतलं गेलं होतं. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवाईच दिसत होती, मनात आतवर झिरपत जाणारा शांतपणा होता, कोठेही कसलिही घाई दिसत नव्हती की जाणवत नव्हती. सगळं निवांत होतं, माणसंही फार दिसत नव्हती म्हणजे नव्हतीच त्या शांत रस्त्यावर बहुदा मी एकटिच होते. तंद्रीत किती दूर चालत गेले समजलंच नाही. अखेर लक्शात आलं की अरे आता परतायला हवं. परत आले आणि हॊटेलचा फेरफटका मारुउन आले. टेकडिच्या कुशित लाडानं विसावलेलं आमचं हॊटेल इतकं गोंडस दिसत होतं. तसं पहायला गेलं तर चार मजली होतं पण एकावर मजले नव्हते तर टेकडिच्या उतारानं ते मजले विसावले होते. त्यामुळे प्रत्येक मजल्यापुढे टेकडिचा एक तुकडा होता. बाहेरुनही वरपर्यंत जाता येत होतच आणि आतूनही सोय होती. मी त्या क्शणी हॊटेलच्याच प्रेमात पडले. ज्यानं कल्पकता वापरुन ते बांधलं होतं त्याचं खरंच कौतुक वाटलं. एव्हाना नवर्याची सकाळ झाली होती आणि डोळे चोळत मला शोधत तो आमच्या खोलीबाहेर फिरत होता. मी वरुन त्याला हाक मारुन मी वर असल्याचं सांगितलं. चार चार पायर्या एकदम ओलांडत धावत तो वर आला. शिमल्याची लोभस सकाळ पाहून त्यानं डोळे विस्फारले की मी चक्क त्याच्या आधी उठून अशी आवरुन सावरुन ताजी उभी होते म्हणून कोण जाणे. पण त्याचा चेहरा लगेच खुलला. कित्येक वर्षांनंतर दोघेच अशी छान सकाळ अनुभवत होतो. प्रसन्न वातावरणाचा मनावरही लगेचच परिणाम होतो. जशी मी त्या हॊटेलच्या त्याच्या आजुबाजुच्या नजार्याच्या प्रेमात पडले होते तसाच तो ही पडला होता. तिथल्या तिथे आम्ही निर्णय घेतला की पुढच्यावेळेस केवळ शिमल्यातला निवांतपणा भरुन घ्यायला यायचं आणि याच हॊटेलमध्ये रहायचं. एव्हाना आम्हाला आमच्यातल्या तिसर्याची आठवण झाली. आम्ही खाली गेलो तरी बाबाच्या लेकीचे डोळे उघडले नव्हते. तिला उठवून सगळ्यांचं आवरुन मग कुफ्री पॊईंट बघायला गेलो. तिकडे जाण्यासाठी घोड्यावरुन जावं लागणार होतं. पहिल्यांदा जाम भिती वाटली पण हिय्या करुन बसलेच. दगडांनी खचाखच भरलेल्या वाटेवरुन घोडं वर चढायला लागलं आणि कढी पातळ झाली. कधी एकदा वर पोहचू असं झालं. अखेर वर गेलो. तिथे तासभर टाईमपास केला. लेकीला भूक लागली. म्हटलं आता हिला काय द्यायचं तर एकदम चिरपरिचित वास आला. लेक तर धावतच गेली. त्या टोकावरच्या टपरीत चक्क दोन मिनिट मध्ये तैय्यार होणारं मॆगी बनत होतं. ती पहिली भेट होती. हिमाचलमध्ये कोणत्याही कड्याच्या अगदी टोकावरही दो मिनिट मॆगी मिळतं याचं नंतर आश्चर्य वाटणं बंद झालं पण तिचं इतक्या टोकावरचं पहिलं दर्शन मात्र चकीत करणारं होतं. सकाळपासून छान कोवळं ऊन अंगावर घेतलेल्या पहाडिवरचं वातावरणं काही मिनिटांत बदललं. आकाश काळंभोर झालं. थंडगार बोचरं वारं वहायला लागलं. बरोबरचा गाईड खाली उतरण्याची घाई करायला लागला. आम्हीच त्याला थोपवत होतो. त्यावरचं त्याचं वाक्य एकमदम मस्त होतं,"ओ मॆडमजी पहाडी का मौसम और बंबई का फॆशन का कुछ भरोसा नहीं. कब बदले पताही नहीं चलता". त्याच्या या वाक्यावर यथेच्छ फिरक्या घेतच आम्ही माघारी फिरलो. उतरण जास्त भयान होती. पण एव्हाना घोड्यावरचा माझा अविश्वास कमी झाला होता. भिती घालविण्यासाठी जोरजोरात गप्पा टप्पा करत आम्ही उतरलो. गाडीत बसतच होतो की पावसानं झोडपायला सुरवात केली. गाईडचं म्हणणं शब्दश: पटलं. मिनिटभरापूर्वी छान हवा होती आणि आता तुफानी पाऊस. वाटेतच जाताना एका ठिकाणी जेवलो आणि चुपचाप हॊटेलवर जाऊन बसलो. आत्ताशी निम्मा दिवस सरला होता आणि अवेळी आलेल्या पावसानं आमच्या उत्साहावर पाणी टाकलं होतं. देव करो हा अवेळी आलेला पाऊस त्याचं बरसणं आटोपतं घेवो असं घोकत. खिडकीबाहेर डोळे चिकटवून बसलो.....
शिमला-२
......टिम्बर ट्रेलवरुन निघालो आणि हवेतला गारवा वाढतच चालला. हिमाचलमध्ये आलो आहोत हे जाणवायला लागलं. शेवटी तर बॆगमधून शाली आणि स्वेटर निघालेच. आम्ही गेलो त्याच्या दोन दिवस आधी शिमल्यात पाऊस हजेरी लावून गेला होता त्यामुळे तर नेहमिपेक्शा जास्तच गारठा जाणवत होता. एव्हाना रात्र म्हणावी असा अंधार पडला होता. गच्च झाडांची गर्दी अंधारात जास्तच भितीदायी वाटत होती. अधून मधून घरं दिसायला लागली, मग रस्त्याकडेला लावलेल्या गाड्या दिसायला लागल्या आणि शिमल्यात पोहोचल्याचं समजलं. हिमाचलमध्ये जिथे जिथे गेले तिथे अगदी ठळकपणानं दोन गोष्टी दिसल्या एक हिमालयाची शिखरं आणि दुसर्या प्रचंड संख्येत असणार्या गाड्या. रस्त्याच्याकडेला कठड्याप्रमाणे गाडया ओळित लावून ठेवल्या होत्या. आम्हाला पोहोचेपर्यंत बराच उशिर झालेला असल्यानं शिमलावाले डाराडूर झालेले होते. एव्हाना रात्रिचे अकरा वाजले होते, आमचं हॊटेल एजंट नक्की कोणत्या भागात केलंय काही माहित नव्हतं. अशा किर्र रात्री पावसानं धुतलेल्या आणि गारठून रजईत गुडूप झालेल्या शिमल्यात आम्ही आमचं थोर हॊटेल शोधत होतो. एखादा माणूस दिसतोय का पहात होतो. आत्तापर्यंत एक गोष्ट स्वच्छ समजली होती की ज्या ड्रायव्हर महाशायांवर आम्ही माहितगार म्हणून विसंबलो होतो ते ही आमच्याइतकेच नवखे होते. त्यामुळे पत्ता शोधण्याची जबाबदारी आमच्यावर आली. आणि अखेर त्या थंडगार रात्री आम्हाला समोरुन एक अख्खा माणूस येताना दिसला, तो टप्प्यात आल्या आल्या झप झप सगळ्यांनिच काचा खाली करुन त्याला एकाचवेळेस शंभर एक प्रश्न विचारले. तो बिचारा थंडित पटपट पावलं उचलत हात चोळत घर गाठायला चालला होता आणि आमच्या कचाट्यात सापडला. अखेर त्याला सगळ्यांच्या प्रश्नातला एकच कॊमन शब्द समजला "कुफ्री रोड". बहुदा तो हुशार असावा त्यानं सांगितलं की आगे सिध्दे जाके लेफ्ट मारो जी. सुटलो एकदाचे म्हणत पुन्हा एकदा गाडी चालली. सिध्दे जात असतानाच ड्रायव्हरनं दिलेल्या सुचनेप्रमाणे सगळ्यांची डोकी डाव्या बाजुला वळून हॊटेलचा बोर्ड कुठे दिसतोय का शोधत होती. सगळा लेफ्ट संपला, तुरळक दिसणारी हॊटेल संपली, रस्ता खाली उतरला तरी काही दिसेना. अखेर एका चौकात आल्यावर ड्रायव्हरनं अधिकृतरित्या जाहिर केलं,"ओ सरजी मुझे डाऊट है की हम रस्ता भुल गये....शायद. अब आगे जाने का मतलब ही नही है. आप एक काम करो जी वु हॊटलवाले को फोन करके पता पुछो". आमच्यापैकी बुकिंगवगैरेची जबाबदारी ज्याच्यावर होती त्याच्याकडे सगळे अपेक्शेनं पहायला लागले. तर चष्म्याच्या आडून लुकलुकत्या निष्पाप डोळ्यानं त्यानं सांगितलं की,"होटल का नंबर तो नहीं है. उसने बताया कुफ्री रोड बोलेगे तो ड्रायव्हर समझ जाएगा". सगळेजण त्याच्या या बोलण्यावर जितक्या संयमात त्याच्यावर डाफरता येईल तितक्या संयमात डाफरले. मग आता काय याचा खल चालू झाला. येण्यापूर्वी मी त्या होटेलची साईट पाहिली असल्यानं मला हॊटेलचा नसला तरी साईटचा पत्ता पाठ होता. तेव्हढ्या रात्री थंडितही मला कल्पना सुचली की मित्रमंडळिंपैकी रात्री हमखास ऒनलाईन असणार्या कोणालातरी साईटचं नाव सांगून ती साईट उघडायला लावून किमान फोन नंबर तरी मिळवावा. किमान माझ्या कल्पनेप्रमाणे तरी ही अगदी वर्ल्ड बेस्ट आयडिया होती पण ही कल्पना मांडल्या मांडल्या नवर्याचा जो "लूक" मिळाला त्यावरुन सुद्न्यास अधिक सांगणे न लगे समजून मी गप्प राहिले. आमचं हे सगळं मागे चालू होतंच तोपर्यंत ड्रायव्हर महाशयांनी गाडी वळवून परत पावली जायला सुरवातही केली होती. येताना ज्या ठिकाणी तुरळक हॊटेल दिसली होती तिथे परत एकदा नीट पहायचं ठरवलं तर यंदा आम्हाला आमच्या डाव्या बाजुला ते हॊटेल चक्क सापडलं. हॊटेलचं मूळ नाव मध्यात लहान अक्शरात आणि वर खाली इतर काही असल्यानं आमच्या नजरेतून ते सुटलं असावं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मघाशी तो जो थंडिनं काकडलेला मनुक्श होता त्यानं बरोब्बर उलट्या बाजुला वळायला सांगितलं होतं. अंत भला तो सब भला म्हणत आम्ही होटेलकडे जाणार्या रस्त्याकडे वळलो. रस्ता संपेना आणि हॊटेल दिसेना म्हटल्यावर वैतागलेल्या ड्रायव्हरनं विचारलच "सरजी ये होटेल आपको किसने सुझाया"? म्हटलं कप्पाळ आमचं. इतक्यात आम्ही अगदी हॊटेलच्या दारातच आलो. फटाफट उड्या मारत सगळेजण खाली उतरले. होटेलच्या रिसेप्शनमध्ये झोपलेली मंडळी बिचारी उठून बसली आणि हसतमुखानं आम्हाला सामोरी आली. तोंडानं काही म्हणत नसली तरी मनात त्यांच्या काय आहे वाचायला येतच होतं. दार उघडून आत आलो आमच्या मागोमाग होटेलचा केयरटेकर कम मॆनेजर जो कोणी होता तो स्वत: सामान घेउन आला. त्याला विचारलं, "खाने को क्या मिलेगा"? तो म्हणाला,"किचन तो कब का बंद हो गया मॆडमजी, चाहिए तो सॆंडविच बन सकता है" मनात म्हटलं"ई मध्यरात्री सॆंडविच कोण तोडणार"? कल्पनेनंही अंगावर काटा आला. पण वरुन साळसूदपणानं म्हटलं,"भैय्या साथ में चोटे बच्चे है, कम से कम उनके लिए तो चावल घी दो" त्यानं फारसा भाव दिला नाही. म्हटलं नाही तर नाही पण खडा तर मारुन पाहिला. एव्हाना परत एकदा नवर्यानं त्याचा वर्ल्ड फेमस तुच्छ ’लूक’ देउन झाला होता. मिही सराईतपणानं त्याला उलट लूक दिला. इतक्यात दार वाजलं आणि तो केयरटेकर कम मेनेजर आत आला आणि प्रचंड अपराध केल्यासारखा चेहरा करुन म्हणाला, ’मॆडमजी अभी आपको हम सिर्फ तवा रोटी, दाल, मिक्स सब्जी और सादा राईस दे सकते है, चलेगा’? त्याला म्हटलं,’चलेगा? दौडेगा’. त्या बोलण्यानंतर अर्धा पाऊण तासानं आम्ही सगळे जेवायला बसलो होतो मध्यरात्री बाराच्याही पुढे कितीतरी वाजले होते, आजुबाजुला हुडहुड थंडी होती आणि त्या तशा थंडित आमच्यासमोर गरमागरम पहाडी जेवणाची भांडी होती. व्वा व्वा! स्वर्गिय सुख यालाच म्हणतात की काय कोण जाणे. मघाशी,"आधी रात को खाना क्या खाएंगे? ब्रेड जाम खाके सोते है" म्हणणारी मंडळी भक्तिभावानं रोट्या चापत होती. ज्या अर्ध झोपलेल्या लेकिच्या नावावर हा घाट जमवून आणला होता तिनंही जणू माझी लाज राखण्यासाठी अगदी न कुरकुर करता व्यवस्थित जेवण केलं. त्यावर तिच्या बाबाकडे मी विजयी नजरेनं बघत आणि इतरांना मराठी समजत नव्हतं याचा ऎडव्हानटेज घेत तिथल्या तिथे म्हटलंच की बघ केवळ माझ्यामुळे तुझी भुकेली मुलगी ब्रेड जाम न खाता गरम गरम जेवण जेवतेय. यावर त्यानंही माझा आगावुपणा मान्य करत सगळ्यांच्यावतिनं जोरात म्हटलं, ’थॆंक्यु मॆडमजी, आपकी वजह से ये खाना नसिब हुवा’ यावर सगळ्यांनी संमतिची मान डोलवायचे कष्ट घेतले आणि पोटभरल्याचे ढेकर देत, कल सात बजे मिलेंगे म्हणत गुड नाईट केलं......
(अपूर्ण)
शिमला-१
यंदा सुट्टीत शिमल्याला जायचं जायचं जपत असताना अगदी जायचा दिवस येउन ठेपला. पॆकिंगचा गदारोळ, निरोपाचे फोन उचलतच पहाटे पहाटे विमानतळ गाठलं. शेवटच्या क्शणापर्यंत कसलं गं पॆकिंग करता नेहमी नेहमी ची कटकट ऐकतच घर सोडलं. वेळ गाठली आणि हुश्श झालं तर विमान तब्बल पंचेचाळीस मिनिटं उशिरानं उडलं. दिल्लीत उतरल्या उतरल्या घाणेरड्या वासानं डोकं उठलं कदाचित ही पुढच्या वैतागाची नांदी होती. बाहेर आलो तर हातात फलक घेउन आमचे सारथी महाशय उभे होते. त्यांच्यासोबत गाडीपाशी आल्यावर लक्शात आलं की माणसांच्या तुलनेत गाडी लहान आहे. इथुन पुढे दीड तास एजंट, सारथी अशा फोनच्या फैरी झडल्या. ही गाडी रहित करुन सरळ दोन स्वतंत्र गाड्या कराव्यात का? अशिही व्यापक चर्चा झाली. अखेर जाऊदे आता वेळ नको घालवायला असं म्हणून पदरी पडलेली गाडी पवित्र करुन घ्यायचं ठरलं. एक पिल्लू मांडिवर आणि दुसरं दोन सिटच्यामध्ये बॆग ठेवून त्यावर विराजमान करण्याचं सर्वानुमते ठरलं. बांधाबांध होउन अखेर निघालो. आमचे सारथीमहाशय फारच सावधपणानं गाडी चालविणारे निघाले. डिचक्यांव डिचक्यांव करत आमचा प्रवास चालू झाला. मध्ये कधीतरी कंटाळवाण्या प्रवासात जेवायला थांबलो तर ते हॊटेल चक्क अती उत्तम निघालं. क्या बात है! म्हणत जेवणावर तुटून पडलो. आता पुढचा प्रवास चालू झाला. मजल दरमजल करत पिंजौर गार्डनला पोहोचलो. प्रथम दर्शनी ताजमहालसारखं वाटत होतं. तिथे तासभर काढून पुन्हा एकदा गाडीला स्टार्टर दिला. शिमल्यातली पाईन झाडांच्या गर्दितली हिमशिखरं कधी एकदा पहातोय असं झालं होतं. पण गाडी तर आपल्याच नादात चालली होती. एरवी गाडिचा वेग कबूत ठेवावा अशा मताची मी आज मात्र चालक फारच हळू गाडी चालवतोय म्हणून कुरकुरत होते. माझ्या या कुरकुरीवर पतिराजांनी नजरेनच स्पिडॊमिटरकडे बघ असं सांगितलं. काटा शंभरच्या मागेपुढे झुलत होता. श्शी! शंभरच्या वेगाला गाडी इतकी हळू? आता तर हळू हळू सूर्यदेवही कलटी मारायच्या तयारिला लागले होते. त्यांची अशी आवरा सावर चालू असतानाच आम्ही काल्कात प्रवेश केला. आता कुठे शिमल्याच्या बोटावर आल्यासारखं फिलिंग यायला लागलं. हवेतला फुफाट्याचा कोरडेपणा जाऊन थंडावा यायला लागला. हिमाचलमध्ये आल्याचं जाणवायला लागलं. काल्काच्या बाजारपेठेतून गाडी जात असताना तिथली निवांत रेंगाळलेकी संध्याकाळ पहाताना एक प्रकारची गंमतच वाटायला लागली. काय मस्त निवांत संध्याकाळ होती त्या लोकांची, माणसांचे घोळके घराच्या, दुकानांच्या समोर निवांत बसले होते, कोणालाही कसलिही गडबड किंवा घाई दिसत नव्हती. एव्हाना आम्ही टिंबर ट्रेलपाशी आलो होतो. नवरा यापूर्वी तिथे जाउन आल्यानं त्याचा अगदी हट्टच होता की हा अनुभव घ्यायलाच हवा. म्हटलं चल बाबा! तिथे गेलो तर तिथल्या माणसानं विचारलं की "आप सचमुच जाना चाहते हो"? म्हटलं ही काय भानगड? असं का विचारलं यानं? नवर्र्याचं डोकं पोखरत केबलकारपाशी पोचलो. तिकिटं काढली आणि वाटपहायला लागलो. फोटो काढून होईपर्यंत ती आलिच आणि मग तिच्यात बसलो. बंदुकितून गोळी सुटावी तशी ती निघाली सुरवातिला जाणवलं नाही पण मध्येच खाली पाहिलं आणि पोटात गोळ्याचं गाठोडंच आवळलं. बाप रे! आम्ही दोन दर्यांच्यामधोमध लटकत होतो. मनात नाही म्हटलं तरी एका सेकंदासाठी विचार आलाच की, आत्ता या क्शणाला जर काही झालं, म्हणजे वायर वगैरे तुटली तर? कसलं सिमला आणि कसलं बर्फ. इथेच आटोपणार सगळं. हा विचार करेपर्यंतच टॊवर आला आणि डोळेच मिटून घेतले. म्हटलं आता या टॊवरवर जाउन आपण आदळणार....पण त्याला बगलेत घेत ज्या वेगानं केबल सुटली होती त्याच वेगानं ती पलिकडच्या तळावर आली आणि डुलत डुलत स्थिरावली. त्यातून टुण्णकन खाली पहिली उडी मारणारी मिच होते हे काही वेगळं सांगायला नको. आता इथं काय बघायचं असं वाटत असतानाच अंगावर छान थंडगार हव्या हव्याशा वार्याची शाल पांघरली गेली. हॊटेलच्या टोकावर जाउन सूर्यास्त पहात असताना मनात आलं नंतर कधीतरी फक्ता या हॊटेलमध्ये निवांत रहायला यायचं. अशा ठिकाणी हॊटेल बांधणार्याचं मला मनापासून कौतुक वाटलं. मधुचंद्रासाठी जाणार्या जोडप्यासाठी तर हे हॊटेल म्हणजे अगदी आयडियल ठिकाण वाटलं. सारी दुनियासे दूर....हवा तितका एकांत....कोणाची कटकट नाही...कोलाहल नाही..नजर जाईल तिकडे फक्त डोंगररांगा आणि शिरशिरी आणणारा थंडगार वारा....गरजेला हायफाय हॊटेल...उत्तम जेवण...रहाणं उत्तम...मधुचंद्रासाठी जाणार्या जोडप्याला यापेक्शा वेगळं आणखी काय हवं असतं?......हम्म....फारच रोमॆंटिक वगैरे वाटायला लागून पुढची ट्रिप कॆन्सल होण्याआधीच आम्ही पुन्हा एकदा केबलराणीत बसून परतलो. परतिचा प्रवास जरा कमी भितिचा झाला. गाडीत बसून चलो सिमला म्हणत किल्ली फिरवली.....
(अपूर्ण)
Subscribe to:
Posts (Atom)

