आमचा पहिला वहिला युथ फेस्टिव्हल

आमच्या डिपार्टमेंटनं आजवर कधिही युथफेस्टिव्हलमध्ये भाग घेतला नव्हता. त्यावर्षी आमच्यातलं "टॆलेण्ट" विभागातल्या एका उत्साही सरांच्या लक्षात आलं आणि ठरलं की युथ फेस्टिव्हल मध्ये यंदा आमच्या विभागाची टिम पाठवायचीच. दुसर्या एकाउत्साही सरांनी एकांकिका लिहायचं शिवधनुष्य उचललं. कलाकारांची निवड झाली. अर्थात अस्मादिक त्यात होतेच. ऐनवेळेस सगळं ठरल्यानं खुपच घाई झाली पण आम्ही माघार घ्यायला तयार नव्हतो. होस्टेलमधून खास परवानगी मिळवून तालिमीसाठी सगळ्याचजणी जायला लागलो. रात्री दहा साडेदहा पर्यंत तालमी चालू झाल्या. इथे भ्रष्टाचार करून मेलेले आणि नंतर स्वर्गात जाऊन तिथेही हा रोग पसरवणारे राजकिय नेते आणि त्यांच्या मागोमाग स्वर्गात गेलेल्या त्यांच्या बायका असा सगळा सावळा गोंधळ कथेत होता. सगळं धमाल जमलं होतं. त्यात सगळे हौशी कलाकार असल्यानं तालमिंच्यावेळेस धमाल यायची. इतकं सगळं करून, रात्री जागल्यानं पित्त वाढवून घेउनही काही फायदा झाला नाहीच. निवडचाचणित आम्ही बाहेर फेकलो गेलो.तरीही आम्ही शस्त्रं टाकली नाहीत. त्याच कथेत फेरफार करून दुसर्या एका स्पर्धेसाठी नाव दिलं. तिथेही आम्हाला फुटाची गोळी दिली. आता तर आमच्यावरचा अन्याय दूर करण्याचा किडा जोरात चावला. त्याच कथेत फेरफार करून तिथल्यातिथे तासाभरात आम्ही पथनाट्य बसवलं आणि चाचणीसाठी उभे राहिलो. इथे चक्क आमची निवड झाली कारण दुसरं कोणी आलेलंच नव्हतं. काही का असेना, आम्ही "आत" होतो हेच आमच्यासाठी महत्वाचं होतं. आता तालमी चालू झाल्या. पूर्वीचा बाज बदलून थोडं लाऊड करताना खुपच गंमती जमती व्हायला लागल्या. संवाद बोलताना मध्येच पुर्वीचा सूर धरला जाऊ लागला. हे सगळं घोटवत बसायला वेळही नव्हता कार अवघ्या काही दिवसांवर युथफेस्टिव्हल येउन ठेपला होता. अखेरच्या दिवशी आम्हाला एक चांगली बातमी समजली की आमची एकांकिकेसाठीही निवड झालेली आहे. एकच स्क्रिप्ट आम्ही दोन ठिकाणी दोन पध्दतिंनी सादर करणार होतो. आम्ही सगळे स्मिता पाटील, नासिरूद्दीन शहा यांचे बाप असल्यानं अभिनय करायला डगमगत नव्हतो. सांगा फक्त काय करायचंय? या आवेशात होतो. कळस म्हणजे युथफेस्टिव्हलच्या दिवशीही सकाळी एका मैत्रीणीच्य घराच्य गच्चीवर आमची तालिम रंगली होती. तिच्याच घरातलं कपाट उघडून ऐनवेळेस आम्ही कपडेपट बनवत होतो. कारण आमच्याकडे साड्या वगैरे आणि मुलांकडे झब्बे असायचं काही कारणच नव्हतं. त्यातून सगळेच होस्टेलवर रहाणारे त्यामुळे उत्साहाच्याभरात कपड्यांचं काय करायचं या मुख्य मुद्द्याकडे दूर्लक्ष झालेलं होतं. मैत्रीणिच्या आई, भाऊ आणि वडिलंनी उदार मनानं त्यांची कपाटं आम्हाला उघडून दिली म्हणून बरंय नाही तर पुढार्यांच्या बायका थेट जिन्समध्ये स्वर्गात गेल्या असत्या. एकिकडे संवादांची तालिम चालली होती तर दुसरीकडे ब्लाऊज दोन इंच धरावं की तीन याचा खल चाललेला होता. ते सगळं ऐकणं खुपच मौजेचं होतं. एकिकडे भारतातल्या भ्रष्टचारावर आसूड ओढले जत होते आणि त्याचवेळेस पलिकडे लांब पायजमा जरा आखुड कसा करता येईल याबाबत चर्चा चालू होती. आमच्यामते आमची तयारी झकास झालेली होती. सगळं सामानसुमान घेउन आम्ही नाट्यगरुहात पोहोचलो. तिथे आमच्यासाठी टाळ्या वाजवायला आलेली आमची दोस्त मंडळी हजर होती ती आम्हाला पाहून युरेका युरेका करत धावत आली आणि म्हणाली होत कुठे तुम्ही? म्हटलं कां? तर त्यांनी सांगितलं की ऐनवेळेस वेळापत्रकात बदल करून एकांकिका सकाळी घेतल्या आणि संध्याकाळी पथनाट्य आहे. त्यातून आमच्या गटाची एकांकिका पहिलीच होती आणि चार पाच वेळा आमचं नाव पुकारून अखेर पुढच्या गटाला बोलविण्यात आलं होतं. आता आत शेवटची एकांकिका चालू होती. पाय गळले काय करावं सुचेना. आमच्या मित्रमंडळानं आम्हाला सगळीकडे शोधलं होतं. आम्ही मात्र रंगीत तालिम करत होतो. ते तर झालंच आणि मग लक्षात आलं की, अरे देवा! कपड्यांची तासभर केलेली टाचाटाची फुकटच गेली म्हणायची. आम्ही संयोजकांना विनंती करून पाहिली पण काही उपयोग झाला नाही. अखेर संध्याकाळच्या पथनाट्यावर लक्ष केंद्रीत केलं. एव्हाना डोक्याचा भुगा झालेला होता. काही सुधरत नव्हतं. नक्की काय करायचं हा गोंधळ झाला होता तो वेगळाच. दोन दोन गोष्टी एकाचवेळेस करायला गेल्यानं संवादांची सरमिसळ झालेली होती. आम्ही अखेर रंगमंचावर गेलोच आणि पथनाट्य म्हणून आम्हाला जे योग्य वाटलं ते सादर करून परतलो. निकाल बिकाल ऐकायचं धाडसही केलं नाही. हे सगळं झालं तरी एक गोष्ट मात्र नक्की झाली की विभागात आम्ही एक इतिहास बनविला.आमची पहिलीच बॆच होती जी युथफेस्टिव्हलमध्ये गेली. तिकडे काय झालं याला इतरांच्या लेखी फार महत्व नव्हतं. असतं तरी काय फरक पडला असता म्हणा.....:)
 

एक विशेष सूचना

रूममधल्या पसार्याविशयी सांगताना जरा जास्त्च लिहिलं गेलं बहुदा आणि पोस्ट करताना ब्लोगलाही जरा जास्त्च झालं असावं. त्यामुळे अखंड लेखाचे तुकडे करून पोस्ट करावे लागले :) तर प्रथ अध्यापासून पित्ताच्या गोष्टीपर्यंत सलग वाचावे.
चू.भू.दे.घे.
 

रूम नं. १६ मधला "मेस" प्रथम अध्याय

......तर आमच्या रूममध्ये जवळपास अख्खं हाॅस्टेल ठिय्या मारून असायचं. याचं कारण म्हणजे, आमची रूम हाॅस्टेलमधे आल्या आल्या पहिलीच होती. डिपार्टमेंटपासून तंगडतोड करून आलेले थकलेले जीव घटकाभर टेकायला म्हणून रूममध्ये डोकावायचे. कोणी स्टडीमधून उशिरा परत यायचं आणि तोपर्यंत मेसवाली मावशी भांडी वाजवायच्या तयारीत असायची त्यामुळे भुकेले जीव पोळ्या तोडायला धाव घ्यायचे. घरातलं तूप, लोणचं चटण्यांसोबत मेसमधलं  पोळी नामक रबर खायचा प्रयत्न केला जायचा. प्रत्येकीचं लोणचं तूप वेगळं. हाॅस्टेल इकडे तीन मजले आणि तिकडे चार शिवाय चार विंगमधे  पसरलेलं. मग केवळ तूप लोणच्याची डबडी आणण्यासाठी इतकं चालणं जीवावर यायचं.
तिसऱ्या मजल्यावर रहाणाऱ्या पोरी त्यांच्या तुपा-लोणच्याच्या बरण्या आमच्याच खोलीत ठेवून जायचा. रोज इतकं "ओझं" उचलून आणायचे न्यायचे कष्ट वाचावेत म्हणून आमच्या "कोठी घरात" ही सगळी रसद साठवली जायची. बरं हेच नाही तर, कोणाचे इस्त्रीवाल्याला द्यायचे कपडे कोणाचे इस्त्रीचे आलेले कपडे..... असं सग्गळं  पोटात आनंदानं पचवून आमची खोली खऱ्या  अर्थानं नांदतं गोकूळ  होती. बरं, हे सगळं आमच्या खोलीत पडू द्यायला आमचं मोठं मन हे मुख्य कारण असलं तरिह एक उपमुख्य कारणही होतं. कारण हे जे इस्त्रीचे आलेले कपडे होते ते अक्षरशः लाईफ सेव्हर होते. काय व्हायचं की, बऱ्याचदा (म्हणजे खरंतर रोजच) आंघोळीहून  येईपर्यंत उशिर झालेला असायचा मग समोरच्या इस्त्रीहून आलेल्या गठ्यातून साधारण आपल्या अंगात जाईल असा ड्रेस उचलून तो चढवून धावत डिपार्टमेंट गाठायचो. गठ्ठ्यावर अडीचरूपये ठेवून जाण्याइतकं सौजन्य दाखवण्याइतक्या समंजस सगळ्याचजणी होत्या म्हणून बरंय. आमच्यात एक अलिखित करार होता, ड्रेस कोणाचा आहे बाहेर सांगायचं नाही. काही ड्रेस तर कमालिचे संशयास्पद होते. वर्गात हा ड्रेस नक्की कोणाचा आहे? यावर चर्चा व्हायची.  तर ते एक असो.
संध्याकाळी जेवणं झाल्यावर अड्डा जमायचा. हातात सगळ्यांच्या पुस्तकं असायची मात्र आज कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये काय झालं याचे अपडेटस दिले-घेतले जायचे. "लफड्यांचे" अपडेट घेतले जायचे. जमलेली, जमू घातलेली आणि जमून तुटलेली प्रकरणं हा तर फेव्हरीट विषय. नऊ साडेनऊला मॅडम राऊंडला यायच्या. त्यावेळेस आम्ही सगळ्या अभ्यासात बुडून गेलेल्या असायचो. मॅडम यायच्या आणि बाकिच्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या खोलित हकलायच्या. "ए कन्या, चल आता रूमवर पळ, मी आईचा फोन आला तर सांगेन हं नुसती नाटकं चाललीत अभ्यसाची"  असं अनुनासिक स्वरात त्या सांगायच्या तेंव्हा आम्ही घाबरल्याचं नाटक मस्त वठवायचो. सगळ्याजणी आपापल्या खोलीत गेल्यासारखं करायच्या. पुढच्या खोल्यांपुढून जाताना मॅडम नुसत्याच, रूम १५,रूम११,रूम१०नअशी आरोळी द्यायच्या की आतून पोरी आहे मॅडम असं सांगायच्या.
आता कळतंय, पोरींना वाटायचं भोसलेमॅडमला गंडवलं पण खरंतर मॅडमलाही हे माहितच असणार पण ती गंडवलं गेल्याचं नाटक छान वठवायची. चार घरच्या चार पोरी कुटुंबापासून लांब केवळ शिकायला आल्यात तर राहू देत एकमेकीला धरून हे कळण्याइतकी क्यूट होती आमची भोसलेमॅडम. (छायाचित्र सौ. गुगल)

.
 

रूम नं १६ मधला "मेस" भाग २

........
जुनं आणि नवं अशा दोन इमारतींमध्ये हाॅस्टेल विभागलं होतं. आम्ही जुन्या इमारतीत रहायचो. या दोन इमारतिंना फरशा घातलेल्या पायवाटेनं जोडलं होतं. मॅडमची रूम नव्या इमारतीत होती. रात्रीचा राउंड झाला की,  दोन्ही इमारतींच्या मुख्य दरांना कुलुपं लावली जायची. चूकून तिकडची मुलगी इकडे किंवा इकडची तिकडे गेलेली असेल आणि मॅडम आलेली समजलं नसेल तर हमखास अडकून पडायला व्हायचं. किंवा कधी कधी मुद्दामच अडकून राहिल्याचं नाटक व्हायचं. आमच्या खोलीत अडकणारयांची संख्या लक्षणीय  होती आणि दिवसेंदिवस त्यात भरच पडत होती. त्यातून आम्ही पडलो हुश्शार मुली. मॅडमच्या हातात सापडायला तयार नाही.
पण हर कुत्ते का दिन आता ही है! एक दिवस मॅडम लवकर गेल्या, आम्ही मस्त ट्रॅन्झिस्टर लावून क्रिकेटची काॅमेंट्री ऐकत होतो. सचिन मस्त फाॅर्ममध्ये होता .मॅडम गेल्या असं वाटल्यानं गाफिल होतो, अंगावर पांघरूणं घेउन रेडिओ ऐकत होतो, जवळपास पुस्तकं वगैरे काही नाही आणि अचानकच दार टकटक वाजलं, एका पारूनं उठून बिनधास्त दार उघडलं तर बाहेर साक्षात अटीवर हात ठेवून मॅडम उभ्या. झाली का पंचाईत!
ही त्यांना आत घ्यायला तयार नाही, दारातून फुटाची गोळी द्यायच्या प्रयत्नात आणि आत आम्ही ट्रान्झिस्टर बंद करण्यासाठी पांघरूणाच्या आतून चाचपडत होतो, सगळ्यांनी एकदमच हालचाल केल्यानं तो एव्हढासा ट्रॅन्झिस्टर पांघरुणांच्या आणि उशांच्या ढिगाऱ्यात गायब तर झालाच पण इतका वेळ हळू आवाजात चाललेली काॅमेंट्री कोणाचा तरी हात बटनाला लागल्याने मोठ्या आवाजात ऐकायाला यायला लागली. आता  आम्हाला हॅण्डसअप करण्यावाचून पर्यायच राहिला नाही. मॅडम आत आल्या आणि त्यांनी आम्हाला उठून उभं रहायला सांगितलं, आम्ही धडपडत कशाबशा कोणी काॅटवर तर कोणी खाली अशा  उभ्या राहिलो. त्याबरोबर काॅटवरची पांघरूणं अर्धी खाली, अर्धी वर अशी लटकायला लागली. मॅडम म्हणाल्या इथे आत्ता रेडिओचा आवाज येत होता, कुठे आहे तो? पटकन द्या नाहीतर मी रेक्टरना सांगेन. आम्ही सगळ्याजणी जिवाच्या अकांतानं काॅट चाचपडायला लागलो रेडिओ सापडेना. मग मॅडम जातीनं शोधकार्यात सहभागी होण्यासाठी सरसावल्या तर त्यांचं पहिलं पाऊल आंघोळिच्या मगात अडकलं(एका पारूचा हा मग होता. तो मग म्हणजे एक छोटी बादलीच होती), त्यातून सावरत पुढे आल्या आणि मगातून पाय काढताना आधार म्हणून दारातल्या फडताळाला पकडलं तर कसा कोण जाणे धक्का लागून लोणच्याचा बाटला खाली पडला. त्याच्याकडे बघताना त्यांना खालच्या कप्यात ठेवलेली घासायची भांडी आणि धुवायच्या कपड्यांचा ढीग दिसला. तिथून अबाऊट टर्न मारेपर्यंत मॅडम ट्रॅन्झिस्टर आणि काॅमेंट्री साफ विसरल्या होत्या. आता त्यांनीच काॅमेंट्री द्यायला सुरवात केली. अगं अगं काय गं हे?मुली नां तुम्ही? उद्या संसाराला लागाल तर अशा रहाणार का? वेळच्यावेळी भांडी घासत जा, कपडे धुवत जा. आणि या इतक्या बाटल्या इथे का ठेवल्यात? अख्ख्या हाॅस्टेलच्या तुपाच्या आणि लोणच्याच्या बरण्या कशाला गोळा करून ठेवल्यात? (ही एक वेगळीच भानगड होती) अगं रूम आहे की कचरा कोंडाळं? रहावतं कसं तुम्हाला? अस म्हणत कशा बशा त्या टेबलपर्यंत पोहोचल्या. आता त्यांना बसा म्हणायचं तर खोलितल्या एकुलत्या एका खुर्चीवर असणाऱ्या फाईलचा ढीग, पुस्तकांचा गठ्ठा आणि ओढण्या, स्कार्फ, रूमाल सलवारी या सगळ्यांच्या प्रेमालाप दूर करणं भाग होतं. सवयीनं नेमकं एकीनं जे नको करायला तेच केलं. तिनं गुड गर्ल बनायच्या नादात खुर्चीवरचा सगळा ढीग उचलून पटकन काॅटच्या कोपऱ्यात फेकला. थंड होत आलेल्या मॅडम पुन्हा बरसो बरसो रे मेघा करत कडाडायला लागल्या. त्यांनी आता  कामालाच लावलं. सगळे कपडे घडी घालायला लावले. ते हॅन्गरला लावायला लावले. पुस्तकं जिथल्या तिथे गेली, खोली झाडून साफ झाली. हे सगळं होत असताना तिकडे बिचाऱ्या सचिनची विकेट पडून आपल्या टिमची गळती चालू झाली होती. रेडिओ चालूच होता . आता मॅडमच्या लक्षााात आलं की, त्या कशासाठी आत आल्या होत्या. त्यांनी खबदाडात पडलेला रेडिओ उचलून तो बंद केला. मला म्हणाल्या कोणाचा आहे गं कन्ये हा? मी म्हटलं काय की. आमच्या रूममध्ये होता कोणीतरी ठेवलेला.
मॅडम- असा कसा ठेवला? नियम माहित नाहीत? रेडिओ लावायचा नसतो. आता रेक्टरनी मला विचारलं तर काय सांगू? इतक्यात एव्हढ्या थंडीतही एका पारूची दिमाग की बत्ती पेटली. तिनं घाई घाईत सांगितलं, मॅडम कोणाला माहित नाही पण ,दुपारी मीच हा गावातल्या काकांकडून आणला होता. आम्ही या शहिद व्हायला निघालेल्या भीडूकडे साश्रु नयनांनी बघतच राहिलो. पण तिनं हुशारीला जगात  आम्ही कोणी तोंड उघडून माती खाण्यापूर्वी लगबगीत सांगितलं की, "मॅडम आम्हाला क्रिडाच्या बातम्या कव्हर करायला सांगितल्या आहेत. आता आम्ही कुठे जाणार? म्हणून आज अनायचे मॅच होती तर सर म्हणाले रेडिओ ऐका आणि उद्या न्युज आयटम बनवा." अक्षरश: भरून आलं तिच्या हुशारीमुळे. आम्ही हो त हो मिसळण्यात माहिर होतोच. मॅडमची समजूत कशी बशी काढली खरी पण एक धडा मिळाला,  अन्ना,  चोबीस घंटा चोकन्ना रेहेने का! (छायाचित्र सौ. गुगल)
 

रूम नं. १६ मधला "मेस" : काॅमेण्ट्रीचा शेवट

मॅडमचाही बिचारीचा जीव होता आमच्यावर, तिलाही पटलं. त्या म्हणाल्या,"काय तरीच बाई तुमच्या डिपार्टमेंटचा जगावेगळा अभ्यास. फार डोकं चालवावं लागतं नाही? इतर कन्या पुस्तकातून बघून अभ्यास करता पण तुमचं तसं नाही.  अगं पण आधी माझी आपली नाॅमिनल परवानगी घ्यायची नाही का? समजा आत्ता माझ्याऐवजी रेक्टर मॅडम आल्या असत्या आणि त्यांनी तुम्हाला विचारलं असतं की मला माहित आहे का म्हणून तर?" आम्ही साळसूदपणानं म्हणालो,"साॅरी मॅडम. आम्हाला माहितच नव्हतं की ,अशी परवानगी घ्यायची असते. इथून पुढे असं नाही होणार" तेव्हढ्यात संधी साधून एकजण म्हणालीच की "मॅडम आम्हाला गरज पडली तर आम्ही ट्रॅन्झिस्टर आणू शकतो ना?" मॅडम म्हणाल्या"आणा, पण उगाच सगळ्याजणींना जमवून बसू नका आणि आवाज तुमच्यापुरता ठेवा" सगळ सेटल झालंय असं वाटत असतानाच मॅडमचं मागे लक्ष गेलं, त्या ओरडल्या "काय गं चंदे तू यांच्या रूममध्ये काय करतेयस?" चंदा म्हणाली,"मी कुठे काय करतेय? तुमचा आवाज आला म्हणून आत आले." मॅडम कडाडल्या"माझा आवज ऐकून आत कशाला यायला हवंय? इथे काय चाललंय?पळ इथून" चंदा साळसूदपणानं म्हणाली,"मी इथेच नाही सगळीकडे जाऊन तुम्हाला शोधून आले. माझं गजराचं घड्याळ बंद पडलंय आणि रूमपार्टनर नाहीए, उद्या मला पहाटे उठायचंय. तुमच्याशिवाय दुसरं कोणी उठवेल यावर माझा विश्वास नाही. म्हणून ते सांगायला तुम्हाला शोधत होते. इथे तुम्ही पेटला होता. मध्ये बोलले असते तर माझ्यावरच रागवला असता म्हणून तुमचं संपायची वाट बघत होते." मॅडमला अर्थातच गहिवरून आलं. चंदाची सुटका झाली. तिच्यामागे असणारी "सू" दिसली तिच्यावर मॅडम खेकसल्या "तू गं कन्ये? तुझा काय निरोप?" बावरलेली सुवर्णा गप्पच उभी राहिली. तिच्या मदतिला आम्ही धावलो,"मॅडम सू ला आम्ही बोलवलं, तिला हे खेळाबिळातलं टेक्निकल समजतं नां? आम्हाला इतकं डिटेलमध्ये समजत नाही. बिचारीला आज लवकर झोपायचं होतं पण आमच्यासाठी बसलीय डोळे उघडे ठेवून" मॅडमला पुन्हा एकदा गहिवर आला. असं एक एक करत काहींना लटकावं लागलं
तर काही जणी सलामत शिरानिशी आपापल्या रूममध्ये गेल्या. जाताना मॅडम धमकी द्यायला विसरल्या नाहीत की ,उद्या जर खालच्या कप्यातला कपड्यांचा आणि भांड्यांचा ढीग स्वच्छ झाला नाही तर.....?असो. दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी लवकर येउन हे सत्कार्य उरकून टाकलं. जाऊदे आज काय आणि दोन दिवसांनी काय, कपडे धुवावे लागणारच होते नां!

..................
 

नॊक नॊक........रूम नं.१६.

माझी ऎसिडिटी
मला पित्ताचा त्रास सर्दी पड्शासारखा सतत व्हायचा. त्यातून मेसचं जेवण चालू झाल्यावर तर ही व्याधी मुक्कामालाच आली. एक दिवस मी डोकं गच्च बांधून आई गं ऊई गं करत झोपले होते आणि माझी पारू डोक्याला झंडू बाम लावून देत होती. मॆडम माझा आवाज ऐकून आत आल्या आणि काय होतंय म्हणून विचारायला लागल्या. डोकं पित्तानं दुखतंय समजल्यावर त्यांनी माझ्या पारूला त्यांच्या रूममध्ये नेलं आणि छोट्या वाटीत मोरावळा दिला. आम्ही तोअर्थातच वाटून खाल्ला. त्याची चव इतकी अप्रतिम होती की तो पुन्हा पुन्हा खावासा वाटायला लागला. मग आठवड्यातून एक दोन वेळा लोकाग्रहास्तव मला पित्ताचा भयंकर त्रास व्हायला लागला. तो ही नेमका केम्पसमधला दवाखान बंद झाल्यावर. आमचा मोरावळ्याचा खुराक व्यवस्थित चालू होता. एक दिवस मी स्टडीत अभ्यास करत होते. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं त्यामुळे जाम भुक लागली होती म्हणून कॆंटिनमधून वेफर्स आणले आणि खात खात गप्पा मारत मारत मी आणि दुसर्या विभागाची एक मैत्रीण रमत गमत टिवल्या बावल्या करत येत होतो. होस्टेलमध्ये येताना आपापली पत्रं आलीत कां हे चेक करून येण्याचा प्रघात असल्यानं आम्ही पोस्ट बघत उभ्या होतो. इतक्यात समोरून मॆडम आल्या. मी गप्प बसावं की नाही? नको तिथं आणि नको त्यावेळेस बोलायची खोड नडली मॆडमचं लक्श नव्हतं तरी मी उगाचच त्यांना चढवायचं म्हणून हाक मारून म्हणाले,"मॆडम आज काय मस्त साडी नेसलाय. काय विशेष? गजरा तर घमघमतोय." मॆडम माझ्याकडे बघून ओरड्ल्या "अगं कन्ये आत्ता थोड्यावेळापूर्वी तुला उलट्या होत होत्या नां? आणि आता वेफर्स काय खात बसलीस?" मला कळेचना की मला कधी बाई उलट्या झाल्या?"मी म्हटलं नाही. आज मला काही धाड भरली नाहीए. मी मस्त आहे की" यावर मेडम फणफणत गेल्या. मी चकीत झाले आणि रूममध्ये आल्यावर ही ब्रेकिंग न्युज आणि मॆडमचं विअर्ड वागणं उत्साहाच्या भरात बाकिच्या पारूंना सांगितलं. त्यावर सगळ्याजणींचं एकमत होउन त्यांनी तारस्वरात मला हाक मारली"ए, मंद. अगं मघाशी आम्हाला मोरावळा खायचा होता म्हणून आम्हीच मॆडमला सांगितलं होतं की मोरावळा द्या. छ्या, काय गरज होती, नाही म्हणायची? तसंही आठवद्यातून चार दिवस डोकं धरून बसलेली असतेसच नां? ऒक ऒक करत असतेसच की, आमच्यासाठी आजच्या दिवस खोटी खोटी ओक ओक केली असतीस तर काय बिघडलं असतं?" असो. त्यादिवसापासून आमचा हा घरगुती उपाय कायमचाच बंद झाला. आजही मोरावळा पाहिला की माझा त्यावेळेस नसलेला पित्ताचा त्रास आणि तुरट गोड मोरावळा बोटानं चाटून चाटून खाणं आठवतं.......
 

रूम नं. १६.....

सुरवातिला काही समजायचं नाही. चार ठिकाणांहून आलेल्या आम्ही चौघीजणी नवी नवरी कशी सासरच्या घरातला अंदाज घेत वावरत असते तशा एकमेकीला पारखत होतो. हळूहळू मस्त चौकडी बनली. आमच्या समोरची रूम होती तिच्या शेजारीच फोन होता, जिथे पोरींचे फोन यायचे. आमचा बहुतांश मुक्काम याच खोलीत असायचा, ज्या मुलींची प्रकरणं चालू असायची त्या जरा बाजुला सरकून फुसूफुसू बोलत असायच्या. त्यांच्या दुर्दैवानं त्या ज्या बाजुला सरकायच्या तिथे आमची खिडकी यायची. आम्हाला यांची फुसफुस थेट ऐकायला यायची. ज्या दिवशी हा शोध लागला त्यादिवसापासून आम्ही टिव्ही पहायला जाणं बंद केलं. कारण सिरियलच्या वेळेतच अशा मुलिंचे फोन नेमके यायचे. हे गूढ आम्हाला पहिल्यांदा उलगडलं नाही मग लक्शात आलं की रेक्टर मेडम त्या मालिका पहाण्यात गुंग असायच्या त्यामुळे कोणाचा फोन, कुठून, किती वेळ अशा चौकशा व्हायच्या नाहीत. नाहीतरी त्या मालिका पहाण्यात काही रस नसाय़चाच उगाच टिवल्या बावल्या करत बसण्यापेक्शा हे मनोरंजन आम्हाला बरं वाटलं. हळू हळू आमच्या रूममधली लोकसंख्या वाढायला लागली. मग नुसतंच एकतर्फी ऐकण्याऐवजी इकडून उत्तरं द्यायचा नवा खेळ चालू झाला.
एक कन्नड भाषिक मुलगी फोनवर सतत "येन्नं" "येन्न" करत असायची, एक दिवस सगळ्यांनी ठरवून गंमत करायची ठरली. ती येन्नं म्हणाली की आम्ही इकडून आलो आलो म्हणून ओरडायचो. पहिल्यांदा या टारगटपणावरून नाही म्हटलं तरी आमची आणि इतर मुलींची खिटपिट झाली पण
 आम्ही साळसूदपणानं त्यांना म्हणायचो, मग मेडमच्या खिडकितला फोन इथंपर्यंत आणून कशाला बोलता? सारखं आम्हाला तुमचं सगळं ऐकत बसावं लागतं नां? त्यावर त्या चपापायच्या. त्यांनी अत्यंत हळू आवाजात बोलून पाहिलं पण आजुबाजूला इतका आवाज असायचा की त्यांनाच काही समजायचं नाही अखेर आमच्याशी मैत्री करण्यावाचून त्यांना पर्यायच राहिला नाही आणि अशारितिनं आमचा संसार बहरत गेला. नंतर नंतर अख्ख्या हॊस्टेलच्या प्रेमप्रकरणांचा एनसायक्लोपेडिय तयार झाला आणि आम्ही निरोपही घेउन पोहोचवायला लागलो.  एखादी मुलगी मॆडमच्या खोलीत "मटा" म्हणजे महाराष्ट्र टाईम्स निवांतपणानं वाचत बसली की ओळखावं आज तिचा फोन येणार आहे. कारण फोन आल्यावर जर ती मुलगी तिथे नसेल तर मामा जाऊन तिला हाक मारून येईपर्यंत मॆडम फोन कट करायच्या आणि परत फोन लागणं हे जवळपास मल्लिकानं पौराणिक सिनेमा करण्याइतकं कठीण काम होतं. म्हणून मग कोणत्या दिवशी कधी फोन येणार आहे हे आधीच निश्चित करून मग त्यावेळेस तिथे थांबणं जास्त सोयिचं असायचं. त्यातही आम्ही भोचकपणा करणं सोडायचो नाही. एखादीची गंमत करायची असली की ती पेपर वाचताना आम्ही तिथे जायचो आणि तिला म्हणायचो, पेपर पाठ करू नको, दोन पानं इकडे दे. असं करत तिच्याकडे एखादंच पान रहायचं आणि अखेर ती जाम ऒकवर्ड व्हायची. आमची खोली म्हणजे खिदळण्याचा अड्डा बनतोय हे मॆडमच्या लक्शात यायला फार दिवस लागले नाहीत कारण त्यांच्या ऒफीस आणि आमच्या खोलीत एका की रूमचं अंतर होतं फक्त. त्या योग्य संधीची वाट पहात होत्या आणि ती त्यांना दिली सचिननं........
 

रूम नं. १६

हा आमचा पत्ता. जिथे आम्ही कधीच नसायचो. तिथे असायचा आमचा पसारा. होस्टेलचे दिवस धमाल होते असं नुसतं म्हणून चालणार नाही. काहीतरी भन्नाट सांगायलाच हवं नाही का? तर मी तिथे बाड्बिस्तरा हलविण्यापूर्वी इतर तिघीजणीं सेट झाल्या होत्या. मी तरंगत कधीतरी महिन्याभराने रहायला गेले. कारण मला रूमच मिळालेली नव्हती आणि तोपर्यंत माझा रूम द्याल कोणी एक रूम म्हणून नटसम्राट झाला होता. अखेर आणि एकदाची मला रूम मिळाली. बादलीत पुस्तकं, गादीच्या गुंडाळीत बारीक सारीक सामान सुमान आणि एक बॆग इतक्या मोठ्य सरंजामासहित रूम नं. १६ चं मी माप ओलांडलं. पावसाची रीप रीप चालू होती. "पारू" ला शोधायला अख्खं डिपार्टमेंट तुडवावं लागलं आणि ती चार इंचाची किल्ली घेउन मी खोलीत प्रवेश कर्ती झाले. ओळख पाळख झाली आणि माझ्या पारूकडून सगळ्यांनी चहा घेतला कारण तशी पध्दतच होती म्हणे. समोरा समोरच्या दोन खोल्यात आम्ही चारजणी रहायचो. शिस्त विचाराल तर सगळ्याजणी वरचढ, कमी कोणी नाही. म्हणजे आमच्या रूममध्ये आल्या आल्या बादलीत पाय जायचा आणि समोरच्या खोलीत गेलं की भांड्यात इतका फरक सोडला तर तपशिल सारखाच. कपड्यांचं प्रेम तर विचारू नका. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की वर्ष संपल्यावर सामान भरताना साधारणपणे मॆचिंग होणार्या जोड्या बनवून बॆगा भरल्या. कोणाचं काय कळायलाच मार्ग नाही. सलवार एकिची, टॊप सुदरीचा आणि ओढणी भलतीच कोणाची तरी असं आवरून आम्ही धावतपळत डिपार्टमेंट गाठायचो. सक्काळी सक्काळी पाच सहा वाजेपर्यंत उठलं तर गरम पाणी आंघोळीला मिळायचं. त्यावर मोठ्या मनानं पाणी सोडून आम्ही कोमट पाण्यावर समाधान मानून घेतलं. मध्येच कधी तरी अफवा उडाली की दुसर्या मजल्यावरच्या गिझरला दहा वाजेपर्यंत पाणी असतं. आम्ही खुशीत बादल्या हलवत गेलो आणि कसलं काय फाटक्यात पाय. थंडगार पाण्यानं आंघोळ करून खाली आलो. नंतर कधीही त्या फंदात पडलो नाही. चुकून कधी गरम पाणी मिळालं तर दचकायला व्हायचं.
 

सिनेमा के साईड इफेक्ट

फिल्मचा अभ्यास जोरात चालू होता. चांगला सिनेमा शिकता शिकता वाईट सिनेमाही समजत गेला. यात सगळंच गंभीर आणि अभ्यासपूर्ण असायचं असंही नाही. बर्याचदा गंमती जमतीही घडायच्या. त्यातून आम्ही माधुरी आणि अमिताभ, अनिल कपूर, शाहरुख, अमीर 
असल्या मसाला नायक नायिकांचे पंखे त्यामुळे  कसेही असले तरी भक्तीभावानं या मंडळीचे सिनेमे बघायची सवय लागली होती. आता या सवयीला धक्का बसण्याचे दिवस आले होते बहुदा. एक दिवस नोटीस फिरली. कसलंसं फिल्मचं वर्कशॊप होतं. भारतीय चित्रपटातलं स्त्रीयांचं शोषण असल्या भयाण नावाचं. आम्हाला पर्याय नव्हता आम्ही "फिल्मवाले" होतो त्यामुळे आम्हाला जाणं भाग होतं. आमच्यासोबत वर्कशॊप ऐच्छिक असल्यानं आणखी काही हौशी मंडळीं सहभागी झाली. पहिल्याच दिवशी सक्काळी सक्काळी व्यावसायिक मसालापटातलं नायिकेचं चित्रण असा विषय होता. समोरच्या पडद्यावर काय सांगायचं तुम्हाला माधुरी अवतरली. बेटा मधलं सैंया जी से चुपके गाण्यावर मुरकणारी माधुरी किती भक्तीभावानं पाहिली होती माहितीए? आताही सकाळीच तिचं दर्शन झाल्यावर सगळे सरसावून बसले. आमच्याकडे हेव्यानं पहता "नॊनफिल्मी" मंडळी, हे असे सिनेमे बघता आणि आम्हाला सांगताना मात्र जडशीळ नावं सांगता, अशा नजरेनं पहात होती. गाणं ऐन मध्यात आलं होतं आणि ते कचकन थांबलं. समोरच्या वक्त्यानं आता त्या गाण्यातलं एक्सप्लोयटेशन सविस्तर समजावून द्यायला सुरवात केली. ते ही चक्क फळ्यावर आक्रुत्या काढून! माधुरी म्हणजे एक रेष, इतर बायका म्हणजे रेषा रेषा आणि अनिल कपूर म्हणजे एक टिंब असं स्पष्टिकरण फळ्यावर अवतरल्यावर"नॊनफिल्मी"मंडळी गांगरली. सेशन होतं दोन तासांचं. दोन तास संपले तेंव्हा माधुरीच्या 
पंधरावीस रेषाअनिलची टींब टिंब आणि त्यानंतर समाचार घेतलेल्या काजोल-शाहरुखच्या जाती हूं मैं जल्दी है क्या? या करन अर्जून मधल्या गाण्याच्या फराफरा ओढलेल्या रेषा आणि वर्तुळ यांनी काळा फळा पांढरा धोप झाला होता. सेशन संपलं आणि बाहेरून वेलदोडा घातलेल्या चहाचा दरवळ आला. आम्ही फाईल उचलत उठलो तरी आमचा एक "नॊनफिल्मी" मित्र तसाच सुन्नपणानं फळ्याकडे बघत बसला होता. त्याला म्हटलं, ऊठ की, संपलं सगळं, काय पहातोयस इतकं? त्यावर तो म्हणाला समोरच्या फळ्यावरच्या माधुरी, काजोल आणि शाहरुख अनिलला शोधतोय. बिचारे गरगर फिरून भोवळ येउन पडले असतील.
त्या सेशननंतरची उरलेली सगळी सेशन चहाच्या टारीवर पार पडली हे सांगणे न लगे! काय? :)