मंजुचा व्हर्च्युअल स्वाईन फ़्ल्यु
सध्या सगळ्यांचं सगळं बरं चाललं असलं तरी बाप्पा येण्याआधी काही दिवस चांगली तंतरली होती. का? म्हणून काय विचारताय? अहो तो छळू स्वाईन फ़्ल्यु नव्हता का पिसाळला!मे महिन्याची सुट्टी आनंदात गेली, उशिरानं का होईना आलेल्या पावसाचं भजी बिजी खाऊन सेलिब्रेशनही झालं. चला आता प्रतिवर्षाप्रमाणे वाहत्या नाकांच्या पोरांची सर्दी तापादी दुखणी काढायची म्हणून आयांनी पदर खोचला. तेव्हढ्यात अचानकच खुसखुफ़ुसत घेतलं जाणारं स्वाईन फ़्ल्युचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झालं. मुळात ही नक्की काय भानगड आहे हेच सामान्यांना माहित नव्हतं. ते असण्याचं काही कारणही नव्हतं. अशाच सामान्य जीवजंतुंपैकी एक आमची मंजू. मधले दोन चार दिवस ज्यावेळेस या तापानं ताप दिला होता त्याचवेळेस नेमका हिचा पोट्टा आधी दोनदा शिंकला आणि मग सक्काळी सक्काळी खोकलाही. या पोट्ट्याहून लहान आणखी एक पोट्टं घरात रांगत होतं त्यामुळे बाईसाहेबांची घाबरगुंडी उडाली नसती तरच नवल. त्यातून मंजुचं कॆरॆक्टर म्हणजे, साधं निरूपद्रवी डोकं जरी बारीक दुखायला लागलं तर थेट ब्रेन ट्युमरपर्यंत जाऊन पोहोचणारं. मग तब्बल दोनदा शिंका आणि तीन चारदा खोकला तिला टेन्शन द्यायला पुरेसा होता. त्याचवेळेस विविध वाहिन्यांवरून याबाबतच्या बातम्यांचा मारा चालला होता. पुण्यातल्या बातम्या तर "सेन्सेक्स"च्या धर्तीवर देत होते. घरातून बाहेर पडलो तर अगदी शंभर टक्के हा ताप आपल्याला घेरणार याबाबत तिची खात्रीच झाली. पण करणार काय? पोराला दवाखान्यात तर घेऊन जायलाच हवं होतं. मग तिनं एक शक्कल लढविली, दवाखाना अगदी बंद व्हायच्या वेळेस जायचं ठरवलं म्हणजे पेशंटची गर्दी नसेल (हो आपल्याला काही झालेलं नसायचं आणि तिथल्या गर्दीत कोणाला असलं काही झालेलं असेल तर? उगाच रीस्क नको) तिथे ती गेली मात्र तिला समजलं की अगदी सेम टू सेम शक्कल अनेकांनी लढवली असल्यानं दवाखान्यात बरीच गर्दी होती. तिथे बिनधास्त खोकणारी मंडळी पाहून तर तिला घामच फ़ुटला. अर्थात तिथले बहुतांश लोक मंजूसारखेच घाबरलेले असल्यानं सगळ्यांनी धरू की नको करत नाकावर रूमाल धरला होताच. अखेर मंजुची त्या वातावरणातून सुटका झाली. पोराला साधं निरूपद्रवी इन्फ़ेक्शन झालेलं होतं. काही दिवस औषधं घेतल्यावर ते बरं होणार होतं. डॊक्टरनी इतकं सांगुनही हिच्या मनातून शंका पूर्ण गेलेली नसल्यानं तिनं उच्च कोटीची काळजी घ्यायचं ठरवलं. आता काळजी म्हणजे किती घ्यावी? दिवसातून चार पाचदा धुण्याचं मशिन चालू झालं (याचा परिणाम अर्थातच या महिन्याच्या बिलावर लगेचच दिसला). तासा तासाला अंगावरचे कपडे मशिनमध्ये जायला लागले. डेटॊलच्या बाटल्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या. मोबाईल, रिमोट, दारांची, हॆंडल क्लिनिकल स्पिरीटनं पुसणं सुरू झालं. दर वीस मिनिटांनी मोजून पंधरा सेकंद हात धुण्याचा प्रोग्रॆम सुरू झाला. घराची सफ़ाई म्हणू नका, धुलाई म्हणू नका, धुप म्हणू नका. तिनं स्वच्छतेचा झंजावातच आणला. हे सगळं कमी म्हणून तुळस घालून उकळलेलं पाणी पिण्याची सक्ती, च्यवनप्राश खाण्याची सक्ती या मुळे घरचे बेहाल झाले. यथावकाश पोराचा खोकला गेला मात्र सतत पाण्यात राहून आणि सतत धुळ झटकत राहून हिलाच शिंका यायला लागल्या. सगळ्यांनी समजावुनही तिच्या मनातला शंकासुर जाईना. अखेरीस गणपतीच्या सामान खरेदीनिमित्त घाबरत घाबरत ती घराबाहेर पडली, यथावकाश त्यांच्या आगमनामुळे त्यांच्या दिमतीत हे सगळं विसरलीही आणि घरच्यांनी हुश्श केलं!
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
स्वाईन फ्लूचा असाच अनेकांनी धसका घेतला होता.तुम्ही सांगितलेली मंजुची गोष्ट अगदी कुठल्याही घरांमध्ये फिट्ट बसावे असंच आहे.तुमचे बाकीचे ब्लॉग ही छान आहेत.मला सर्वात अवघड वाटणारा ललित लेखन हा प्रकार तुम्हाला चांगलाच जमतो.या पुढच्या ब्लॉगबद्दलही शुभेच्छा.
@ onkar
thanks
सगळी स्फुटे छान आहेत...
फार छान आणि ओघवती शैली आहे... असेच लिहित रहा अन म्ही असेच वाचत राहू...
धन्यवाद... :)
hehe... very true and i know the hidden truth too! really liked the way you've written all ur blogs.. it engages the reader instantly! great!
Post a Comment