टु इज कंपनी
आपल्या आईबाबांच्यावेळेस प्रत्येक जोडप्याला सरासरी तीन मुलं असायचीच. गेला बाजार दोन मुलं तरी असायचीच, फ़ारच क्वचित एकच अपत्य असायचं. आता आपल्या पिढीत एकच मूल असण्याकडे कल वाढतोय. दुसरं मूल अजिबातच नको असणार्यांची संख्या बक्कळ आहे. मला स्वत:ला "एकाला एक" असणारा चौकोन जास्त आवडतो. मागे एकदा एकदा मिपावर यावर मस्त चर्चा झालेली होती. माझ्या ग्रुपमध्येही बरेचजण असे एकुलते एक होते. मात्र आम्ही आमच्या भावंडासोबत जे "शेअर" करायचो ते सगळं अशी एकुलती एक असणारी "मिस" करायची. दंगाधुडगुस आणि धिंगाणा घालायला आम्हाला "कंपनी" शोधावी लागायची नाही. मित्र मैत्रिणी आले गेले मात्र आम्ही भावंडं आजही एकमेकाचे कट्टर शत्रु आणि घट्ट मित्र आहोत. शत्रुत्व शब्दाशी ठेचकाळला नां? पण खरंच आहे लहानपणापासूनची "सिबलिंग रायव्हलरी" आजही अगदी इनटॆक्ट आहे. आम्हाला पोरं झाली तरी अजुनही आम्ही तू घरात जास्त लाडका होतास किंवा होतीस म्हणून चक्क ब्लेमगेम करत असतो. आपापल्या संसारातले आनंद आणि कटकटीही शेअर करायला एक भावंड लागतंच. म्हणून आजही नवरात्र संपतंय न संपतंय तोवरच सांगलीला जायचे वेध लागतात. दसरयाच्या शुभेच्छा देतानाच दिवाळीचं काय ठरलं हा प्रश्न असतोच. मीच काय दरवर्षी तिकडे यायचं आता यंदा तुम्ही सगळे इकडे या म्हणून तणतणताना न कळत तिकडे काय काय घेऊन जायचं याची यादीही मनात तयार होत असते. बॆगेतून नक्की काय निघाल्यावर मनुसाहेब खुश होतील आणि "आत्तीट" म्हणून अत्यानंदानं लाडात येतील याचे विचार सुरू होतात.
आपल्या आईवडिलांनी आपल्याला भावंड आणताना ाअपल्यानंतर एकमेकाला आधार होतील असा विचार करून कुटुंब विस्तारलं. आता आपल्या पिढीत मात्र हा विचारच लुप्त झालाय.
मागे एकदा एका सिनियर कलिगनं मुलं नसण्याचं किंवा होऊ न देण्याचं कारण सांगितलं होतं की, "आम्ही दोघंही कामानिमित्त सतत घराबाहेर असतो, आईवडिल कायमचे येऊन रहायला तयार नाहीत मग मूल कुठेतरी पाळणाघरवाल्यांवर सोपविण्यापेक्शा नसलेलंच बरं, कशाला ऊगाच पोरवड्यात अडकायचं" तिचं हे मत मला जोर का धक्का देणारंच होतं. आपल्या इच्छेनं मूल नको असणारं हे माझ्या पहाण्यातलं पहिलंच जोडपं होतं. त्यानंतर अर्थात असे बरेच "व्यस्त" लोक भेटले. मुलांना द्यायला वेळ नाही म्हणून, दोन मुलं वाढविण्यासाठी जितकी लागते तेव्हढी मानसिक तयारी नाही, त्या अनुषंगानं कराव्या लागणारया तडजोडी करण्याची तयारी नाही किंवा एकाच मूलावर बक्कळ पैसा खर्चून त्यालाच मोठ्ठ बनविण्याचा विचार करणारे आपण थोडेसे याबाबतीत स्वार्थी झालोत का? मुळात आजच्या मुलांना भावंडाची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं?
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
जेव्हा एखाद्या प्रदेशातली लोकसंख्या कमी असते आणि मुलांच्या शारिरिक, मानसिक, बौद्धिक इ. पोषणासाठी आवश्यक असलेले सर्व स्त्रोत पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात, तेव्हा साहजिकच लोकांचा नैसर्गिक कल हा जास्त मुले होण्याकडे असतो. अशा वेळी समाजात जास्त मुले होण्य़ाला प्रोत्साहन दिले जाते.
पण जेव्हा एखाद्या प्रदेशातली लोकसंख्या जास्त वाढलेली असते आणि मुलांच्या शारिरिक, मानसिक, बौध्दिक इ. पोषणासाठी आवश्यक असलेले सर्व स्त्रोत पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात, तेव्हा साहजिकच लोकांचा नैसर्गिक कल हा कमीतकमी मुले होण्याकडे असतो. अशा वेळी समाजात कमी मुले होण्य़ाला प्रोत्साहन दिले जाते.
पूर्वी आपल्या देशात जास्त मुले होण्याला प्राधान्य दिले जात होते, पण आता भारताची लोकसंख्या वाढतच चाललेली असल्याने, हळूहळू लोकांचा कल कमी मुले असण्याकडे किंवा मुल नकोच ह्या मानसिकतेकडे झुकत चालला आहे. पण रशियासारख्या देशात मात्र जन्मदर कमी असल्याने, तिथल्या नागरिकांना जास्त मुलांना जन्म देण्यासाठी रशियन सरकार प्रोत्साहन देत आहे. थोडक्यात सांगायचे तर ह्या गोष्टी परिस्थितीवर अवलंबून असतात. पण लोकसंख्येचा दर स्थिर ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबात दोन मुले असतील, तर तो आदर्श जन्मदर ठरतो.
जिथे मुलांना भावंडे असतात तिथे ती बर्याच गोष्टी भावंडांबरोबर शेअर करतात, हे खरे आहे. पण जेव्हा मुलांना सख्खी भावंडे नसतात तेव्हा अशी मुले आपल्या नात्यातील भावंडाबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर शेअरिंग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच हल्लीची लहान मुले प्ले ग्रुप, शाळा, छंदवर्ग यामध्ये जास्त रमतात.
@ D D
हं खरंय.
पण तरीही मला वाटतं की, सवंगड्यांशी शेअर करणं आणि भावंडांशी शेअर करणं यात फ़रक नक्कीच आहे.
Post a Comment