निरोप


तर व्हीसीआरनं आता अधिकृतपणे निरोप घेतलाय. व्हीसीआरची नेमकी ओळख कधी झाली आठवत नाही पण अगदी सुरवातीच्या काळात जेंव्हा कोणाकडे टीव्ही फ़ारसे नसायचे तेंव्हा टीव्हीसहित व्हीसीआर भाड्यानं देणारी व्हिडिओ पार्लर होती. तासावर भाडं असायचं मग कॉण्ट्रेब्युशन निघायचं आणि आजूबाजूच्या चार दोन कुटुंबात मिळून तो भाड्यानं आणला जायचा. खरं तर ही मजा त्याही आधीपासून सुरू व्हायची.  म्हणजे कधीतरी गप्पा मरता मारता विषय निघायचा की खूप दिवस झाले कॅसेट नाही आणली. मग चर्चा व्हायची की कोणता पिक्चर आणूया, हा की तो, तो नको हा असं करत करत चर्चेअंती दोन चार पिक्चर ठरायचे. मग गावात ठरलेला व्हीसीआरवाला असायचा. त्याच्याकडे जाऊन हे सगळं आणणं हे दादालोकांचं काम. काय भाव खायचे, जणू काही कुबेराचा खजिनाच घेऊन आलेत. कोणाचीतरी मोटारसायकल असायची त्यावर डबलसिट जाऊन हे धूड घरी यायचं, आलं की आम्हा पोराटोराना बाजूला बाजूला व्हा करत हकललं जायचं. आम्ही आपले लांबूनच त्याची प्रतिष्ठापना भक्तीभावानं डोळे मोठे थोरले उघडे ठेवून बघायचो. टी व्हीचं कनेक्शन झालं की खर्र आवाज करून टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या मुंग्या यायच्या. मग कॅसेट व्हीसीआरच्या तोंडात घातली की आधी क्षणभराची शांतता आणि मग गुलाबी, जांभळा निळा, हिरवा असे उभे पट्टे यायचे. मनातून आनंद उचंबळून बाहेर येतोय का काय वाटायचं. मग कॅसेट बरोबर लागतेय का याची तपासणी व्हायची. बहुतेकदा ती बरोबर असायचीच पण कधी खराब निघाली तर आता या कॅसेटचे पैसेच द्यायचे नाहीत असं तावातावानं एकमतानं ठरायचं.

तेंव्हा शेजार पाजारची घरही आपलीच असायची त्यामुळे आपलं आणि परकं हा भेदभाव नव्हता. खरं तर बैठ्या घरांची कॉलनी. एका घरातून दुसर्‍या घरात जायचं आपलं फ़ाटक उघडून शेजारच्याच फ़ाटक उघडून जावं लागायचं अर्थात आम्ही पोरं टोरं कपांऊंडवरून उड्या मारायचो ते वेगळं पण सांगायचा उद्देश इतकाच की दोन घरातलं अंतर बरंच असलं तरिही मनात अंतर अज्जिबात नव्हतं. आता फ़्लॅट सिस्टिममधे दोन घरात फ़क्त समाईक भिंत असते तरिही मनातलं अंतर......असो. तर ज्या दिवशी पिक्चरचा प्लॅन बनायचा त्या दिवशी रोजच्यापेक्षा लवकर जेवणं व्हायची. कोणातरी एकाच्या घरात हा प्रोग्रॅम असायचा मग सगळे पटापटा आवरून ठरलेल्या वेळेत जमा व्हायचे. कोरम पूर्ण झाला तरीही एखादी काकू मागचं आवरण्याच्या नादात उशिरा पोहोचायची मग आल्या आल्या बसत कुजबुजत विचारायची,
"ए खूप वेळ झाला?"
"छे गं, आत्ताशी पाट्या झाल्या."
"हां मग ठीक. नंतर मला सांग हां स्टोरी"
सगळे सेटल होत त्या छोट्याशा पडद्यावर चाललेल्या गोष्टीत गुंग व्हायचे. एक कॅसेट संपली की एक ब्रेक असायचा. मग दुसरी कॅसेट. ती अर्धी मुर्धी होईपर्यंत पोराटोरांच्या विकेट पडलेल्या असायच्या. कोणी जागा मिळेल तिथे कलंडलेलं असायचं तर कोणे आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेलं असायचं. दुसरा पिक्चर संपला की कोणी कोणी रजा घेऊन जायचे आणि दर्दी लोक पुन्हा ताजे होत तिसरी कॅसेट लावायचे. आम्ही तर एकदा सलग सहा पिक्चर बघून रेकॉर्ड केलं होतं. तेही बाजीगरसारखे त्याकाळातले केसी बोकाडिया छाप पिक्चर.
सकाळी डोळे जड आणि अंग चिंबलेलं असायचं पण स्वस्तात भरपूर पिक्चर बघितल्याचं समाधान इतकं असायचं की शरीराचा त्रास जाणवायचाच नाही. हे सगळं म्हणजे    नुसतेच पिक्चर बघणं नव्हतं . खूप गमती जमती घडायच्या. एकदा अख्खा मैने प्यार किया रिवाईंड मोडमधे पाहिला आणि हसून हसून आडवे झालो. एक आठवण परिंदा नावाच्या त्या काळातल्या बोल्ड सिनेमाची. बहुतेक एका जुन्या ब्लॉगमधे मी ही आठवण सांगितली आहे पण व्हीसीआर के नाम पे और एक बार, तर असाच कॉण्ट्री करून परिंदा आणलेला. यात माधुरी आणि अनिल कपूरचा एक हॉट सिन आहे. खरं तर त्यावेळेस या कारणामुळंही हा सिनेमा चर्चेत होता. पण त्यावेळेस ही असली चर्चा फ़क्त सिनेनियतकालिकातूनच व्हायची. वर्तमापत्रं त्यावेळेस केवळ बातम्या छापत आणि मोबाईल, सोशल नेटवर्किंगचे चोचले नसल्यानं बहुतेक जनता निरागस असायची. अशीच निरागस जनता व्हीसीआर मधे परिंदाची कॅसेट घालून भक्तिभावानं सिनेमा बघत होती. ज्या दादा लोक्सनी कॅसेट आणली होती त्याना अर्थात या सिनची कल्पना होती. कितिही तरूणसुलभ भावना म्हणल्या तरिही बापा आणि काका लोकांसमोर (खरं तर सोबत) असे हॉट सिन बघण्याइतकं धाडस नसल्यानं तो सिन साधारण कधी आहे याची रेकी करून झालेली होती त्यामुळे तो सिन येण्याआधी पटकन एकजण उठला आणि सिनेमा फ़ॉरवर्ड करायला लागला. ज्यांना हे सगळं का होतंय हे माहित होतं ते संकोचानं गोरेमोरे होत गप्प राहिले मात्र ज्यांना माहित नव्हतं ते बुचकळ्यात पडले. एक दोघांनी विचारलंही की काय झालं रे त्यावर फ़ॉरवर्डवाल्या दादानं थातूर मातूर उत्तर दिलं मात्र एक काका फ़ारच वैतागले होते त्यांनी थेट परेड घ्यायला सुरवात केली.
"थांब आधी. थांब म्हणतो नां. कॉण्ट्रीब्युशन सगळं घेताना नां रे? मग हे असं पळवता कशासाठी. मला बघायचा आहे सगळा सिनेमा. घ्या आधी मागे परत"
झालं सगळाच गोंधळ. भरीतभर म्हणजे हे सिनेमा बघणं चालू होतं कॉलनीत असणार्‍या गणपती मंदिरात. शेवटी कॅसट मागे घेतली आणि दादा लोकांनी पळ काढला. सगळा सिनेमा यथावकाश बघून झाल्यावर ते काका पुन्हा भडकले
"हे असले पिक्चर बघण्यासाठी पुन्हा पैसे मागाल तर खबरदार"
अशी तंबी देऊन ते गेले. माझं ते अडनिडं वय होतं. खूप काही न कळणारं आणि थोडं बहुत कळणारं पण आजही ही आठवण आली की एक खुसुखुसु हसू मनात येतंच.
जर्नलिझमला असताना एक प्रेझेंटेशन द्यायचं होतं. त्यासाठी माधुरीचा मृत्युदंड तातडीनं बघणं आवश्यक होतं. हॉस्टेलवर हे सगळं करणं शक्य नव्हतं. एकतर नव्या सिनेमाच्या कॅसेट इतक्या लवकर मिळायच्याही नाहीत. दुसर्‍या दिवशी प्रेझेंटेशन होतं. डिपार्टमेंट संपल्यावर संध्याकाळी धावत पळत राजारामपुरी गाठली मित्राच्या ओळखिनं कशीबशी कॅसेट मिळवली. मिळेल त्या बसनं सांगली गाठेपर्यंत आठ वाजले होते. दुकानं आठ सव्वा आठलाच बंद व्हायची. एव्हाना घरात टीव्ही आला असला तरिही कॅसेट बघायला व्हीसीआर भाड्यानं आणणं भाग होतं. स्टॅंडवरून उतरल्या उतरल्या धावत ओळखिच्या व्हीसीआरवाल्या दादाचं दुकान गाठलं आणि गयावया करत व्हीसीआर घेतला. त्यातही नेमका त्याचा व्हीसीआर भाड्यानं गेलेला मग नंतर आणून देतो असं त्यानं सांगितलं आणि त्याच्या शब्दावर भरवसा ठेवत मी घरी पोहोचले. घरातल्याना कळेचना की ही अशी न सांगता अचानक मधल्या दिवशी का आणि कशी आली? बरं मी आले ते माझ्याच नादात. व्हीसीआर मिळेल नां? मिळाला तरी कधी तो सिनेमा बघायचा कधी त्यावर लिहायचं आणि पुन्हा पहाटे उठून कोल्हापूर गाठणं भाग होतं. घरातल्याना मुळात जर्नलिझमच नवं प्रकरण त्यातून आपली मुलगी सिनेमा शिकतेय हे तर आणखिनच भलतं वाटायचं म्हणजे सिनेमात शिकायचं काय असतं हेच त्याना कळायचं नाही आणि आता मी छातीशी कवटाळून ती कॅसेट घेऊन आले होते. अखेर व्हीसीआर आला आणि मी हुश्श करत कॅसेट घातली. सिनेमा बघायला दादाही सोबत बसले. मग मी लिहायला घेतल्यावर सारखे विचारत राहिले की आता नेमकी काय लिहिणार तू. मग हे लिहून काय करणार. मग मुद्दे काढता काढता त्याना मी सांगत राहिले. मला नारकर सरानी जितकं शिकवलं होतं त्यातलं मला जे जसं समजलं होतं ते तसं सांगत राहिले. सांगता सांगता मलाही कळत गेलं की मी वेगळ्या नजरेनं सिनेमा बघायला लागले आहे. दादानाही हे नवं होतं, कौतुकानं म्हणाले,"च्यामारी शिल्प्या आम्ही राव इतकी वर्षं टाईमपास करत सिनेमे पाहिले त्यात इतका विचार असतो, तंत्र असतो, सिनेमाची पण भाषा असते असा विचारच केला नाही. तुझ्यामुळं हे सगळं समजलं" माझ्याकडं कौतुकानं बघत राहिले आणि मी त्यांच्याकडे समाधानानं कारण आपली मुलगी नेमकं काय शिकणारेय हे न समजताही त्यानी मला हवं ते शिकायची परवानगी दिली होती . माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर असे अनेक सिनेमे त्यानी माझ्याकडून समजून घेत उमजून पाहिले पण त्या रात्रीची गोष्टच वेगळी. ते प्रेझेंटेशन नेमकं काय होतं याचे तपशिल आता आठवत नसले तरिही ही आठवण मात्र कायमची लक्षात आहे. दादांनी कौतुकानं पाठीवरून फ़िरवलेल्या हातासहित.


तर या व्हीसीआरनं अशा कित्येक खोडकर, हळव्या आठवणी दिल्या आहेत. म्हणूनच आता तो निरोप घेतोय, आठवणींच्या पानात कायमचा जातोय तर त्याला एक इमोशनल बाय तो बनता है ना?
माझ्या मुलांना कदाचित हा व्हीसीआर आता गुगलवर बघायला मिळेल अगदी रंगीत फ़ोटोंसहित पण त्यासोबतच्या माझ्यासारख्या अनेकांच्या  आठवणी समजणारही नाहीत. त्या कॆसेट लायब्ररीज, घरपोच कॆसेट देणारा मुलगा आणि घरातच व्हीसीआर असण्यातली प्रतिष्ठा, काहीच त्यांना समजणार नाही. चालायचंच नाही का? आज मला माझे दादा त्यांच्या घरातल्या ग्रामोफ़ोन आणि त्यावरच्या सैगलच्या तबकड्यांचं कौतुक सांगायचे त्याचं मोल कळतंय. कधी काळी ग्रामोफ़ोन होता आज व्हीसीआर आहे उद्या आणखि काही. ही सगळी म्हटलं तर उपकरणं आणि म्हटलं आठवणी बनवून गेलेली पानं.

 

2 comments:

मिलिंद कोलटकर said...

मस्त! मजा आली. आता तर शिडी-डिव्ही ला इतिहासजमा करायची वेळ आलीय. सहा महीन्यापूर्वीच सगळ्या शिड्या संगणकावर घेतल्या. आणि अक्षरश: टाकून दिल्या. तेवढाच एक कप्पा मोकळा झालाय! गमंत अशी की फीतीवर पुन: लिहिता यायचं. भावाच्या लग्नाची फीत अशी कायमसाठी पुसली गेलीय!
एका खूप अपरूप असलेल्या गोष्टीच्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद!!

शिनु said...

ब्लॉगवर स्वागत मिलिंद.
मनापासून धन्यवाद 😊
खरंय. सीडी पेनड्राईव्हही आता लवकरच निरोप घेतील.