खूप आधीची गोष्ट आहे. फ़ेसबुकनं अजून बाळसं धरलं नव्हतं. त्यावेळेस ब्लॉगवर सगळी मंडळी खूप ऍक्टिव्ह असायची. म्हणजे कदाचित मी त्या वेळेस जास्त ऍक्टिव्ह होते. नियमित लिखाण आणि सगळ्या ब्लॉगना नियमित भेटी देणं व्हायचं आणि मग कॉमेण्ट बॉक्समधे गप्पा रंगायच्या. किती छान छान मित्रमंडळी दिली या ब्लॉगनं....आणि खूप छान आठवणिही. अशीच एक आठवण आहे गाण्यांच्या खो खो ची. आपल्या आवडत्या गाण्याचा स्वैरानुवाद करायचा तो खेळ. मला खो बसला आणि सुचेना कोणत्या गाण्याला निवडावं...मग अचानक कुठून तरी डोक्यात "हजार ख्वाईशे ऐसी" मधलं बावरा मन घुसलं आणि ठाणच मांडून बसलं....लिखाणाची माझी आपली एक पध्दत आहे, मला खूप विचार करून, टिपणं काढून रवंथ करत लिहायला जमत नाही. जे जसं मनात येतं ते तसं त्या वेळेस लिहणं मला जास्त आवडतं. मग बरेचदा ते जरा फ़सलेलंही असतं तरिही मला असंच लिहायला जमतं. या गाण्याचंही असंच झालं. पिन बसलीच होती मग काय झर झर जे सुचत गेलं ते लिहित गेले आणि पोस्टही करून टाकलं....
कॉलेजमधला मित्र यशवंत अनेक वर्षांनी पुन्हा एकदा संपर्कात आला (वॉटस कृपा) . तुझं काय चाललंय माझं काय चाललंय या गप्पा चालू असतानाच मी ब्लॉग लिहिते याचा उल्लेख झाला आणि मग कधीतरी ही कविता मी त्याला वाचायला दिली.....त्यानंतर दुसर्याच दिवशी सकाळी वॉटसऍपच्या खिडकीत हा ऑडिओ येऊन बसला होता. माझ्या शब्दांना यशवंतनं त्याच्या दमदार आवाजात सादर केलंय. माझेच शब्द हे असे ऐकताना खूप छान वाटलं. धन्यवाद यशवंत. ऐकून सांगाल नां कशी वाटतेय?https://sites.google.com/site/aathawani/audio-songs
0 comments:
Post a Comment