केकच्या.......ची टांग
मी काही अगदीच वाईट्ट सुगरण नाही (वाईट आणि सुगरण? वाक्यरचना फ़ारच वाईट झाली नाही! भावना महत्वाच्या त्या पोहोचल्या की झालं) हं तर मी काही अगदीच वाईट स्वयंपाक बनवत नाही. मुळात मला स्वयंपाकाची म्हणजे रोजच्या पोळी भाजीची नाही तर वेगवेगळे पदार्थ बनवण्याची दांडगी हौस आहे. या हौसेपायी मी झाडून सगळ्या चॆनेलवरचे आणि कोणत्याही भाषेतले रेसपी शो बघते. परवा काय झालं, झी बंगलीवर एक रेसपी बघत होते, नवरा काहीतरी सांगत होता त्याला म्हटलं एक मिनिट थांब रे ऐकू दे जरा तर तो चाटच पडला. मी बंगाली रेसपी शो "ऐकत" होते यावर त्याचा विश्वास बसला नाही की आता ही मराठी पोरगी बंगाली भाषेतला रेसपी शो बघून त्याच्या मराठी तोंडात कोणता पदार्थ घुसडेल याची त्याला धास्ती वाटली? कोण जाणे? असो. तर मुद्दा हा आहे की मला हे असं काही बाही (नवर्याच्याभाषेत सांगायचं तर "काहिच्या बाही")करून बघायला आवडतं. मागच्या एका लेखात मी सांगितलं होतंच त्याप्रमाणे सगळया पदार्थाना मी काबुत ठेवू शकते पण माझ्या पाककौशल्याच्या कुंडलीतल्या राहू केतू असणार्या ढोकळा आणि केक या दोन पदार्थांवर माझं काहीही कौशल्य चालत नाही. अनेकदा भिष्मप्रतिद्न्या करूनही हळूच हे पदार्थ करून बघण्याचा मोह टाळताही येत नाही हा आणखी एक वांधा.
बरेच दिवस झाले केकची उचकी लागली नव्हतीच. त्या दिवशी नेमकं काय झालं की सहजच बोलताना केकचा विषय निघाला. जाम उत्साही अ नं तिच्या नवर्याच्या वाढदिवसाला स्वत: केक करून वरून तो डेकोरेट वगैरे करून पेश केला होता. (हाऊ रोमॆंटिक). तर केक बनविण्याचा हा रोमॆंटिक कीडा सगळ्यांनाच चावला. एकेकीचा "घडणारा" केक बघून (उगाचच) आत्मविश्वास (फ़ाजिल) आला की, यावेळेस बहुदा आपल्यालाही केक जमेल. इस्टंट केक बनविण्याचं मिश्रण आणल्यामुळे तर आत्मविश्वासाचा पतंग जास्तच फ़डफ़डत होता. एरवी मी केक बिक बनवायचा असेल तर दुपारच्यावेळेस गुपचुप बनवून बघते. म्हणजे समजा बिघडला (समजायचं काय? तो बिघडतोच)तर त्याची वाट लावणं सोपं जातं शिवाय मी केक केला होता हे या कानाचं त्या कानाला समजत नाही. यावेळेस मला काहीच करायचं नव्हतं, केक मिश्रण बनविणार्या कंपनिनं तो सगळा व्याप आधीच करून ठेवलेला असल्यानं मला फ़क्त मिश्रण फ़ेसून मायक्रोमध्ये ठेवायचं होतं. त्यामुळे पहिल्यांदाच मी साक्शात केक बनविणार असल्याची जाहिरात करून ठेवली. यावेळेस केक बनविण्याची वेळ संध्याकाळची ठेवली, ऒफ़िसमधून थकून आलेल्या नवर्याला जरा खुश करावं हा हेतू. सगळं सामान व्यवस्थित जमवून पाकिटावर दिलेल्याप्रमाणे क्रुती केली. सोबत धीर देण्यासाठी आणि चियरअप करण्यासाठी मैत्रिणींची फ़ौज होतीच. सगळं केलं आणि केक मायक्रोमधे ठेवला. म्हटलं चला आत अवघ्या दहा मिनिटांनंतर स्वत:च्या हातनं बनविलेला गरमा गरम ताजा केक खायला मिळणार. दहा मिनिटांनी त्याला मोठ्या आशेनं बाहेर काढला तर साहेब अजून कच्चेच होते. मग परत दोन मिनिटं ठेवला, पुन्हा तेच. परत एखादा मिनिट ठेवला तरी तेच. बरं एव्हाना झालं काय होतं की केक वरून भाजलेला आणि आतून पातळढाण राहिला होता. त्यामुळे कितीवेळ ठेवायचा यावर एकमत होत नसल्यानं मिनिट लावून सारखा बाहेर काढून त्याच्यात सुरी खुपसून बघितलं जात होतं. बिचार्याला आम्ही इतक्यांदा भोसकलं की त्यामुळेच त्याला बहुदा आतून जाळी पडली असावी. त्यात परत कोणी म्हणत होतं की केक हलका झालाय तर कोणी म्हणत होतं तो बसलाय. असं करून अखेरीस कंटाळून जाऊदे आता जसा झालाय तसा खाऊ म्हणून केक बाहेर काढला. एव्हाना इतकी मेहनत झालेली होती की त्याला आयसिंगनं सजवायचा उत्साह ओसरला होता. त्यामुळे तो प्रोग्रॆम रहित करून नुसताच केक खायचं एकमतानं ठरवलं. केकचं भांडं बाहेर काढलावर पहिला धक्का बसला तो त्यानं बदललेल्या रंगामुळे. पाकिटावरच्या माहितीनुसार आमचा केक क्रीम रंगाचा व्हायला हवा होता. प्रत्यक्शात मात्र तो चॊकलेटी आणि काळ्याच्यामध्ये लटकला होता. आधी मेला स्वत:ला भाजून घ्यायला तयार नव्हता आणि आता मात्र....जाऊदे म्हणत दु:खाचा तो पहिला धक्का पचवत त्याला कापायल घेतला तर तो आतून इतका फ़ुसफ़ुशीत झाला होता की त्याला कापायचा कस हाच प्रश्न पडला. अखेर हातानच तुकडा तुकडा मोडत त्यातलं काय घडलंय काय बिघड्लंय यावार सधक बाधक चर्चा करत ते केक म्हणून जे काही होतं ते संपवलं. इतकं सगळं होईपर्यंत जेवणाची वेळ येऊन ठेपली होती आणि स्वयंपाक तयार नव्हता म्हणून बाहेरून मागवून जेवलो. परत एकदा फ़सलेल्या केकच्या नावानं बोटं मोडून झाली, नवर्यानं ढेकर देत सांत्वनपर चार शब्द बोलले, सगळं नेहमीप्रमाणेच झालं आणि परत म्हणून केकच्या वाट्याला जायचं नाही असं आणखी एकवार ठरवून टाकलं.(आमचा केक फ़ारच वाईट झाल्यानं त्याचं उट्ट म्हणून या लेखासाठी खास हा सुंदरसा फ़ोटो गुगल्याच्या सौजन्यानं शोधून काढला.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
Shinu,
कधीतरी मीही लिहयेचो. करियारचय मागे धावता धावता माज़यतला लेखक , कवी कधी हरवला कल्लेच नाही. तुज़े आर्टिकल वाचून त्या आठवणी ज्यगा ज़यला.
सर्वप्रथम मला तुझ्या ब्लॉग तू जसा सजवलायस ना ते फ़ार आवडले (उगाच template म्हणून त्यातली नजाकत घालवुया नको) आणि लेखन शैलीही खूप छान ओघवती आहे...माझी category पण तशी वाईट सुगरण नाही टाइप पण इथं केक मिक्सचा केक conventional oven मध्ये पाकिटावरच्या सुचनेप्रमाणे केला की बरा होतो असा अनुभव. तुला केक करायचा किडा पुन्हा चावला तर लक्षात असु दे.
@
अनामिकजी
thak you,
लिहिते व्हा :)
@
अपर्णा
ब्लॊगच्या रूपड्याबद्दल आवर्जून प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद
दुसरं म्हणजे तुझ्या टीपबद्दलही धन्यवाद. हाय रे कर्मा!!!! तू सांगितलेल्या मार्गावर चालुनही मी केक बिघडविण्याचा विक्रम याआधीच केलेला आहे. असो माणसानं नेहमी आशावादी असावं नाही का?
:)
Post a Comment