अ से अभ्यास

आजही इतक्या वर्षांनी जानेवारी महिना उजाडला की नकळत कापरं भरतं. स्वप्नात यायला लागतं की, इकोनॉमिक्सचा पेपर आहे आणि आदल्यादिवशीही आपल्याकडे (पक्षी माझ्याकडे) नोटसच्या नावाखाली चिटोरंही नाही. किंवा वर्षभरात ओसीचं पुस्तक आणयाचंच राहून गेलेलं आहे. पेपर लिहायला बसल्यावर काही म्हणजे काही जाम आठवतच नाहीए आणि या सगळ्यावर वरताण स्वप्न म्हणजे काही वर्षांपूर्वी मला जे वाटलं होतं नां की मी पास बिस झालेय ते खरं नाहीच. अजून पिक्चर बाकी आहे. हे सगळं कमी म्हणून की काय असली सगळी हॉरर स्वप्नं मला पहाटेच पडतात. (पहाटेची स्वप्नं खरी होतात असं म्हणतात नां, माझा तसा काही विश्वास नाही पण...विशाची परिक्शा सांगितलिय कोणी नाही का?) स्वप्न पडून झोपेचं वाट्टोळं झाल्यावर दरदरून घाम येतो, प्रथम डोळे नुसतेच उघडतात मग हळूहळू जाणिव व्हायला लागते आधी स्वत:च्या शरीराची आणि मग आजुबाजुला पसरलेल्या अस्ताव्यस्त तीन शरीरांची. ही जाणिव झाल्यावर स्वत:लाच मग बाजावते की नाही नाही हे सगळं स्वप्न होतं आणि ते संपलं. वास्तव समोर पांघरूणात पसरलं आहे. (हे वास्तव/ वास्तवं, जागं/जागी झालं/झाली की चटाचट चटके. धरो तो चावेगा छोडो तो भागेगा समदाच लोच्या म्हणजे डोळे मिटून परत झोपावं तर उरलेला पेपर लिहावा लागणार आणि जागच रहावं तर आणखि एक छळकुटा दिवस असा फ़िदी फ़िदी हसत पहाटेपासून समोर उभा). तरिही स्वत:च्या टक्क उघड्या डोळ्यांवर जरासुध्दा विश्र्वास न ठेवता मी दूरवर पसरलेल्या नवर्‍याला गदागदा हलवून जागं करते (बिचारा हा इमानदार प्राणी इमानदारीत डिग्रीधारक झालाय तरीसुध्दा माझ्या स्वप्नांचा जाच सहन करतोय) गाढ झोपलेल्या नवर्‍याला जागं करणं हे महापातक असलं तरी ते करून जीव मुठीत घेऊन मी त्याला मला वाईट स्वप्न पडल्याचं सांगते. पूर्वी माझा भेदरलेला चेहरा पाहून तो बिचारा टकटकीत जागा व्हायचा आणि माझी समजूत घालून झोपवायचा. आता इतक्या वर्षांनंतर त्यालाही माझं हे दरवर्षी येणारं स्वप्न माहित झालंय. मी जग बुडल्यासारखं त्याला गदागदा हलवून जागं करते आणि मग तो हं असा हुंकार भरून काय झालं विचारून झोपुनही जातो. (मला भितीयुक्त शंका आहे की, आणखी एखाद दोन वर्षांनी तो, "झोप गं आता उद्या नोटस आणून देतो" असं सांगेल की काय?) आता हे सगळं आजच आठवायचं कारण काय? तर काल टिव्हीवर पारले जी, जी माने जिनियसच्या बिस्कुटांची जाहिरात पाहिली. ती पोट्टं खायला (गिळायला म्हणू?) तरास देतं ती नव्हे, दुसरी, रात्री रात्री जागून अभ्यास केलेली. तर ती जाहिरात आणि आम्ही डिट्टो म्हणजे अगदी सेम टू सेम. जून ते डिसेंबर हे महिने "अ‍ॅकॅडमिक कॅलेंडर"मधून आम्ही स्वच्छेनं हद्दपार केले होते. जे काय असेल ते जानेवारी उजाडल्यानंतर. नवं कॅलेंडर लागलं रे लागलं की आता अभ्यास सुरू हं, टीपी बास झाला असं एकमेकिंना बजावायचो. ग्रुप म्हणाल तर सहाजणिंचा. पण घट्ट मैत्री म्हणाल माझी आणि माझ्या एका जिवलग मैत्रिणिची. तर जानेवारी महिना सिरियसनेसचं बेअरींग घेण्यातच उलटायचा. फ़ेब्रुवारीत वह्या पुस्तकं साफ़सुफ़ व्हायची. फ़ेब्रुवारी संपत आला की कधितरी परिक्षांची चाहूल लागायची. मग चौफ़ेर वारू उधळायचा. नोटस जमव, पुस्तकात डोकं घालून महत्वाची टिपणं काढ, आणखि उत्साह असेल तर ती लिहून काढ असले लघुउद्योग सुरू व्हायचे. खरी गंमत यायची ती टाईमटेबल लागल्यावर. कोणाच्या घरी अभ्यासासाठी रात्री जमायचं यावर तासदोन तास खल केल्यावर एखादा निर्णय लागायचा आणि जेवणं बिवणं आवरून रात्री आपापली वह्या पुस्तकं घेऊन आम्ही जमायचो. आता जमल्या जमल्या लगेचच अभ्यासाला कसं लागणार? मग जरा गप्पा टप्पा झाल्यावर चहा घेऊन अभ्यासाला सुरूवात व्हायची. तोवर घड्याळानं दुसर्‍या दिवसावर टुककन उडी मारलेली असायची. जरा तास दोन तास जातायत तोवर कोणितरी पेंगायला लागायचं, मग पुन्हा एकदा चहा सोबतिला ऑल इंडियावरची जुनी गाणी, हळू आवाजातल्या गप्पा आणि खिदळणं झालं की कोणितरी एक दटावायची की पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं जायचं. जरा अर्धा तास सरला की कोणितरी मावळा धारातिर्थी पडलेलं असायचं. पुस्तक नाकावर घेऊन सपशेल आपटी. मग वातावरण निर्मिती व्हायची आणि एक एकजण हत्यारं खाली टाकून निद्रादेविला शरण जायची. सकाळी हळूच आपल्याला कोणी बघत नाहीए असं पाहून अंथरूणातच पुस्तकात डोकं खुपसून बसलं की नंतर उठणारीला वाटायचं बाप रे! ही रात्रभर जागीच आहे की काय? हे असं सगळं परिक्षेच्या दिवसापर्यंत चालायचं.प्रत्येक विषयासाठी सहा सहा दिवस केलेली विभागणी प्रत्येक विषयासाठी सहा तास या गतीवर यायची. परिक्षा सुरू झाली की आणखिनच धमाल. तीन गाड्यांवर सहाजणी जायचो तेंव्हाही गाडीवर मागे बसलेली एकजण जाता जाता महत्वाचं काही तरी वाचून दाखवायची. जिनं जिनं ते आधिच वाचलेलं असेल त्या मनात उजळणी करायच्या आणि ज्यांनी ते यापूर्वी नजरेखालून देखिल घातलेलं नसेल त्यांच्या पायाखाली ढुम्म्म!!! मग अगदी महत्वाचे दोन तीन मुद्दे उजळले जायचे. (हे मुद्दे लक्षात ठेवण्याचे आमचे असे काही युनिक मार्ग होते. त्यात मूळ मुद्दा बाजुला असायचा आणि भलत्याच उपमांनी तो लक्षात रहायचा. मला अजूनही एक मॉडेल आठवतं ज्याची डायग्राम कशी आहे हे सांगताना माझ्या बहाद्दर मैत्रिणिनं सांगितलं की, बियरचा ग्लास खिडकीत ठेवला तर कसं दिसेल? तशिच आहे डायग्राम. भले हो! इथे कोणाच्या बापसानं बियरचा ग्लास भरून खिडकीत ठेवला होता? पण इमॅजिनेशन असलं जबरी की विचारूच नका. तर त्यावर कडी म्हणजे हिच डायग्राम त्या दिवशी पेपरात विचारली. योगायोगानं आमची आडनावं एकाच अद्याक्षरापासून सुरू झालेली असल्यानं ही महान मैत्रिण माझ्याच वर्गात होती. पेपर वाचल्या वाचल्या तिन एक्सायटेड होऊन मला ग्लास ग्लास असं कुजबुजत्या स्वरात सांगितलं. तिची ही कुजबुज जवळपास अर्ध्या वर्गानं ऐकली आणि नंतरचा एपिसोड मी सांगायलाच नको. असो. तर मुद्दा काय की अभ्यास वगैरे लक्षात ठेवायची आमची आपली एक पध्दत होती) अशा पध्दतिनं इकॉनॉमिक्स म्हणू नका, अकाऊंटस म्हणू नका, ओसी म्हणू नका सगळ्या पाचच्या पाच वर्षांच्या विषयांची आपल्या परीनं वाट लावल्यावर आता अशी स्वप्न यावीत म्हणजे काय? असली स्वप्नं पडली की मला सकाळी सकाळी गाणं म्हणावसं वाटतं, "स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा......"


असो. आता पोस्टमध्ये न बसलेला मुद्दा जो सांगितल्यावाचून दी एंड होणं शक्यच नाही.-एका वर्षी इकॉनॉमिक्सच्या पेपरच्या आदल्या दिवशी दिव्या भारतीनं उडी मारून जीव दिला आणि आम्ही अख्खी रात्र तिला श्रध्दांजली देत बसलो. पहाटे पहाटे कोणितरी दु:खद धक्क्यातून सावरलं आणि दहा वाजता पेपर द्यायला जाण्याची आठवण करून दिली. त्यानंतर आमचं जे रॉकेट झालेलं होतं ते आयुष्यभर विसरणं शक्य नाही.

मुद्दा क्रमांक दोन- या पोस्टसाठी "कोई लौटा दे...."चा टॅग चिकटवला असला तरी मला हे असले दिवस परत फ़िरून अजिब्बात नकोयत. हां त्यावेळेसची धमाल चालेल पण बाकिचं आता परत नको.
 

पुन्हा एकदा ए फ़ॉर अ‍ॅपल

दोन तीन महिन्यांपूर्वी शमिनं उत आणला होता अगदी. घरभर पसरलेली खेळणी कमी पडत होती म्हणून आजोबांचा चष्मा, आजिची औषधं, ताईचा अभ्यास, सगळ्यांच्या चपला....अगदी दिसेल त्यावर तुटून पडत होते महाशय. सकाळी गुडबॉयसारखा सहाला वगैरेच उठून बसायचा मग तेंव्हापासून सगळ्यांना वात आणत सुटायचा. सगळं घर भिंतीवरचं घड्याळ विसरून गेलं होतं. याच्या मागे धावताना आम्ही सगळे आणि घड्याळाचे काटे यांची शर्यत लागत होती. अखेरीस सकाळ संध्याकाळच्या फ़ेर्‍यांनी त्रासलेल्या आजोबांनी,"आता याला अडकव बाई कोठेतरी" असं फ़र्मान काढलं. दुधात साखर म्हणजे सोसायटीतच असलेल्या शाळेत गोडोबा आवडीनं आपण आपले जात होते. एक दिवस पाहिलं तर चक्क दीडएक वर्षाची मुलगी शाळेत दिसली. मग त्याचदिवशी सगळे सोपस्कार पार पाडून अ‍ॅड्मिशन घेऊन आले. चार पाच दिवसात पिल्लू शाळेत जायला लागलं. एकच तासाची शाळा पण सगळेजण हुश्श म्हणून श्वास घ्यायला लागले. सुरवातिची रडारड संपल्यावर रितसर प्लेस्कूल सुरू झालं.....सानुच्यावेळेसही असाच संभ्रम पडला होता की शाळा कधी सुरू करावी? मग एक दिवस असंच अचानक जाऊन तिला शाळेत घातलं. पहिल्या दिवशी तिला शाळेत सोडून आल्यावर मीच घळघळा रडले होते. सानु चार दोअन महिन्यांची असतानाच या नव्या शहरात रहायला आलेलो......आयुष्यात पहिल्यांदाच चोविस तास घरात बसायचं होतं.....घरकाम....इवलुसं बाळ.....सगळं आवरेपर्यंत कंटाळून जायला व्हायचं...अगदी एकटं वाटायचं कधी कधी....मग हळू हळू पिल्लू बोलायला लागलं, खेळायला लागलं...त्यानंतर कंटाळा कुठच्या कुठे पळून गेला. दिवसरात्र आमची जोडगोळी सतत एकत्र असायची. तिला गोष्टी सांगताना, तिच्याशी खेळताना, मस्ती करताना दिवस भुर्रकन उडून गेले. दोन वर्षांपासून नव्या शहरात रहाताना तो इटुकला जीव माझा सख्खा सोबती कधी बनला समजलही नव्हतं. ज्या दिवशी ती माझं बोट सोडून शाळेत गेली त्या दिवशी ती खुष होती आणि माझ्याच आत तुटत होतं. काही दिवसांनी दोघिही रूळलो. तिची शाळा माझ्यासाठी पुन्हा नवा अनुभव घेऊन आली. तिच्यासाठी फ़्लॅशकार्डस बनवताना, गंमत खेळ बनवताना माझं बालपण पुन्हा एकदा नव्यानं मला अनुभवायला मिळत होतं. काय काय करत होतो आम्ही...गाणी म्हणत नाचायचो, दुकानातलं पुस्तक नको तू माझ्यासाठी मला हवं तसं पुस्तक बनव असा हट्ट केल्यावर खास तिच्यासाठी गोष्टींचं पुस्तक बनवलं तेंव्हा तर धमालच केली दोघिंनी. सानू, मी आणि आमची गोष्टीतली "दुरिया" आमची गट्टी अजुनही तशिच आहे, अगदी खास.....परवा सीडीवर एबीसी गाणं लागलं होतं आणि माझ्या पिल्लानं ’आई अ‍ॅप्प्पल’ असं बोट करून दाखवल्यावर लक्शात आलं की अरेच्चा! हे पिल्लुही झालं की मोठं. त्याची शाळा म्हणजे आजवर आमच्यासाठी फ़ारसं सिरियस अफ़ेयर नव्हतं. मात्र त्यानं अ‍ॅप्पल दाखवलं आणि तो "शाळेत" जातोय याची जाणिव झाली.
 

गेला पेशन्स कुणीकडे?

आईशप्पथ मला नां माझ्या आजीचं अलिकडे जाम कौतुक वाटायला लागलंय. माझ्या आजीला एक नाही दोन नाही, तर सगळी मिळून मोजून आठ मुलं. पुन्हा सगळी शिकली बिकली छान. एकापाठोपाठ एक आलेल्या पोरांना तिनं कसं काय वाढवून मोठं केलं असेल, याचं राहून राहून कौतुक वाटतंय. आमची इथे दोन पोरातच छप्पर उडायची वेळ आलीय. तर मंडळी या पोस्टचा विषय एव्हाना समजला असेलच. सकाळ जशी चढत जाते तसे चढत्या क्रमानं डोक्यावरचे केस अनुक्रमे वैतागानं, चिडचिडीनं आणि अखेरीस संतापानं ताठ उभे रहायची वेळ येते. आमचा हा मॉर्निंग शो शांतपणानं पहाणार्‍या सासुबाई कपालभाती करत करतच म्हणतात, "अगं किती वैतागता गं पोरांवर? पोरंच ती. ती असं वागणार नाहीत तर कोण? चिडू नये असं सारखं सारखं त्यांच्यावर. बरं तर बरं तुमच्या मदतीला निदान बायका तरी आहेत, आमच्यावेळेस आम्ही एका वर्षाचं अंतर असणारी तीन तीन मुलं कोणाच्याही मदतीविना कशी मोठी केली असतील? मुलं मोठी झाली आता नातवंडं आली तरी आम्ही अजून उभे आहोत. तुमचं आत्ताच असं मग आमच्याएव्हढं झाल्यावर कसं होणार? (आता संयमासाठी अनुलोम विलोम करण्याची वेळ माझी असते). जे सासुबाईंचं तेच माझ्याही घरच्यांचं. एकूण सगळ्यांच्या मते आजच्या पिढीत पक्षी माझ्यात (असं थेट बोलण्याची हिंमत कोण दाखवणार नाही का?)पेशन्स नावाची गोष्टच नाहीए. त्यामुळेच मला आजकाल प्रश्नच पडायला लागलाय, "हे पेशन्स म्हणजे काय असते रे भाऊ"? या प्रश्नाला जे उत्तर सापडलं त्याचा मतीतार्थ असा आहे,
१-घड्याळाचा काटा पटापट पुढे चालला असताना रजईत गुरफ़टून झोपलेल्या पिल्लांना शाळेसाठी दर अर्ध्या मिनिटानं एक हाक या रेटनं वेळेत उठवणं म्हणजे पेशन्स.

२-कपभर दूध, आपलं पातेलंभर रक्त आटवून त्यांना प्यायला लावणं म्हणजे पेशन्स.

३-आदल्या रात्रीसापासून घसा खरवडून सांगुनही स्कूल बॅग भरलेली नसताना अखेरच्या क्षणाला ती आपण चपळाईनं भरणं म्हणजे पेशन्स (बाय दी वे, पोरांची स्कूल बॅग भरणं ही सहासष्टावी किंवा सदुसष्ठावी कला म्हणून मान्यता देण्यात यावी असा माझा आग्रह आहे)

४-बारा वीस अशी अगदी ठोक्याला दारात उभी रहाणारी स्कूल बस तुमच्या नशिबात असेल तर किमान बारा एकोणीसला आपण पायर्‍या उतराव्यात या किमान अपेक्षेला फ़ाट्यावर मारणारी पोरं बसमध्ये नेऊन बसवणं म्हणजे पेशन्स.

५-वेणी घालायला बसल्यावर, "पण आई माझी ब्लॅक रिबिन काल हरवली" असं निष्पापपणानं सांगणार्‍या लेकीवर न खेकसणं म्हणजे पेशन्स

६-शनिवार रवीवार आरामात घालवल्यावर सोमवारी सकाळी सव्वाअकरावाजता शाळेत बाईनी अमूक प्रोजेक्ट बनवून आणायला सांगितलाय असं थंडपणानं सांगणारी लेक आईला सुपरवुमन समजते यात तिचा काय दोष? पुन्हा हे प्रोजेक्ट म्हणजे अमकी स्टिकरं चिकटवा तमक्या प्रिंट मारा, क्लेपासून अमकं आणि ढमकं काहीतरी बनवा असले वेळखाऊ असतात. (हा मुद्दा जरा विस्तारानं सांगायचा मोह होतो आहे)(म्हणजे सिन कसा? तर सकाळी अचानकच लेकीला आठवतं की, रेसलर्सची माहिती आणि फ़ोटोग्राफ़्सचा प्रोजेक्ट सांगितलाय. [इकडॆ आपली वेळेशी कुस्ती सुरू होते]मग इकडे दप्तरात सगळं कोंब, तिकडे ते करत असतानाच नेट चालू करून गुगल्यावर माहिती शोध, ते करताना धाकटं पिल्लू चारवेळा बटनांवर हात मारून वैताग आणत असतं. मध्येच शाळेत जाणार्‍या लेकीला जेवायला वाढणं आणि ते ती पटापट खाईल हे पहाणं असलं अत्यंत कौशल्याचं कामही करावं लागतं. ती जेवत असतानाच तिच्या वेण्या घालतानाच धाकटं येऊन मागून ड्रेस ओढत, "आई च्ची च्ची" म्हणून दात काढून हसतं. अधीक माहितीसाठी- च्ची च्ची म्हणजे शी प्रकरण. तर तो उपक्रम पार पडल्यानंतर लगेचच भरपाई म्हणून त्याला खाऊ घालण्याचं काम, जे घरातून चारी ठिकाणी धावत करावं लागतं, अंगाशी येतं. इतकं होईपर्यंत ते प्रिंट ब्रिंट सगळं बदबदा टेबलवरून खाली आलेलं असतं. ते निटपणानं ठेवून शुज पासून रूमालापर्यंत सगळं शोधून काढून, अगदी ट्रेजर हंट खेळल्यासारखं,लेकीला तयार करून धाकट्याला काखोटीला मारून अखेरीस तिला बसमध्ये बसवून हात हलवून हुश्श करत परत यावं तर शु रॅकवर ती प्रोजेक्ट फ़ाईल तशीच बिचार्‍यासारखी पडलेली असते. की पुन्हा धावाधाव सुरू. हाताला येईल ती पॅंट आणि त्यावर हाताला येईल ते टॉपसारखं घालून शाळेकडे गाडी पिटाळावी लागते. बसवाल्याला गाठून फ़ाईल लेकीपर्यंत पोहोचवण्याचं काम पारपडेपर्यंत दिवस डोक्यावरून पुढे गेलेला असतो.) तर हे सगळं तोंडाचा पट्टा सुरू न करता शांतपणानं करणं म्हणजे पेशन्स.

७- शाळेचे शुज घातल्यानंतर त्याचा तुटलेला बेल्ट, क्लिप किंवा असलंच काही दुरूस्त करण्यासाठी बस येण्यापूर्वी दोन मिनिटं कोपर्‍यावरच्या कॉबलरकाकाकडे (हे लेकीनं दिलेलं नाव) धावत सुटणं आणि हे सगळं शांतपणानं पार पाडणं म्हणजे पेशन्स राखणं.

असो. तर मंडळी, माझ्यासारखाच थोड्याफ़ार फ़रकानं सगळ्यांचा पेशन्स कणाकणानं संपत असणार याची मला खात्री आहे. एकवेळ या यादीत भरच पडेल पण कमी नाही होणार. पुन्हा गंमत काय आहे माहितीय कां, या सगळ्या घडामोडीत नवरा कधीच मोडत नाही. चुकून एखाद्या दिवशी तो असेल तर तोही वर आपल्यालाच सांगणार, "अगं किती चिडचिड करतीयस, हॅव सम पेशन्स" त्याला कळकळीनं सांगावसं वाटतं की मी ढीग हॅवींग रे पेशन्स पण ते आणायचे कुठून तो पत्ता सांग नां.
 

आमच्या सोसायटीत बॉम्ब.....!!!

दोस्तहो ही घटना नुकतीच घडलेली आहे. म्हणजे अगदी ताजी फ़डफ़डीत आहे. हो, हो, होय. अगदी शिर्षकाबरहुकुम घडलेली आहे. आता बॉम्बची घटना मी अशी उद्गारचिन्ह टाकून लिहितीय म्हणून चक्रावला असाल तर आधीच सांगते की ते तसंच सगळं घडलेलं आहे. ओके, तर साधारण दोन एक आठवड्यांपर्वीची गोष्ट..........वेळ रात्रीची कधीतरीची, आमच्या सोसायटीतल्या रस्त्याच्या बाजुला असणा‍र्‍या फ़्लॅटमधल्या "क" ला गाडी थांबल्याचा आवाज आला....घटना दूर्लक्ष करण्यासारखी असल्यानं (कारण दर अर्ध्या तासाला धावणार्‍या बशांसकट अशा अनेक गाड्या येत जात असल्यानं अशी एखादी गाडी थांबली त्यात दखल घेण्याइतका उत्साह "क" मध्ये नाही) "क"न दूर्लक्ष केलं....वेळ अगदी सकाळची कधीतरीची, "क" चहाचा कप घेऊन टेरेसमध्ये उभी, खाली रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्‍या एका गाडीजवळ तीन बॅगा, एक हॅण्डबॅग आणि एका कॅरीबॅगचा गोतावळा तिला दिसला. आता इतक्या सकाळी कोण आलं किंवा कोण चाललं याचं स्त्रीसुलभ कुतुहल म्हणून हिनं इकडं तिकडं पाहिलं. कोणीच दिसलं नाही म्हणून उत्सुकता जास्त चाळवली गेली. मात्र नेहमीप्रमाणे सकाळची लगीनघाई असल्यानं ती आत निघून आली. नव‍र्‍याचा डबा देऊन पोराला बाथरूममध्ये उभा करून काहीतरी आणण्यासाठी ती परत टेरेसमधये आली तर सामान जसं होतं तसंच तिथेच. आता मात्र हिच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळलायला लागला. पहिल्यांदा बॅगा बघितल्याला चांगले दोन तास उलटून गेले तरी त्या जशाच्या तशा बघून काय भानगड असावी असावी? हा विचार डोक्यात घुमायला लागला. अगदीच सहन न झाल्यावर तिनं वॉचमनला विचारलं त्यालाही या बॅगांची काय भानगड ते समजत नव्हतं. एव्हाना अशा बेवारस बॅगा असल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. बरं गाडीच्या दाराला खेटून असलेल्या बॅगा पाहून बॅगा आणि गाडीचा काहीतरी संबंध आहे याची सगळ्यांची खात्री पटली. गर्दीतल्या कोणी काकांनी गाडी कोणाची आहे याचा तपास करण्याची सूचना केली. आता इतक्या इमारतींमधन ही गाडी कोणाची ते ही रस्त्याच्या बाजुला लावलेली गाडी कोणाची हे कसंशोधायचं याचं कोडं सगळ्यांना पडलं होतं. इतक्यात वॉचमनला आयडियाची शक्कल सुचली. त्यानं गाड्या पुसणार्‍या सगळ्या पोरांना बोलावून ही गाडी कोण पुसतं? असा प्रश्न केला. हातभर अंतर ठेवून पोरं गाडी बघून आली आणि सगळ्यांनीच सांगितलं की आमच्यापैकी कोणीच ही गाडी पुसत नाही. त्यातल्या त्यात एका स्मार्ट पोरानं (याला इथं उभा असणार्‍या सगळ्या गाड्या कोणत्या इमारतीतल्या आहेत हे माहित होतं म्हणे) ही गाडी इथली म्हणजे अख्ख्या सोसायटीतल्या कोणाचीच नसल्याचं छातीठोकपणानं सांगितल्यावर आणखिनच गोंधळ उडाला. आता "क"च्या डोक्यात वीज चमकली, म्हणजे रात्री झुपकन येऊन गाडी थांबल्याचा आणि दारं खटाखट उघल्याचा जो आवाज झालेला होता तो याच गाडीचा होता की काय? यात भर म्हणजे समोरच्या इमारतीतल्या वॉचमननं सांगितलं की मध्यरात्री म्हणे एक रिक्षावाला बराचवेळ संशयास्पदरितिनं रिक्षा थांबवून उभा होता. यानं त्याला हटकलं तर दोघांची बाचाबाची झाली आणि त्यानं भाडं आहे म्हणून आलो आहे असं सांगितलं. मध्यरात्री कोणाचं भाडं याचं उत्तर देणं त्यानं टाळलं आणि तो भर्रकन निघून गेला. रात्रीच्या मंद प्रकाशात त्याचा नंबर टिपून घेणं वॉचमनला जमलं नव्हतं.... आता जमलेल्यांच्या डोक्यात संशयाचं जाळं तयार व्हायला लागलं. सगळेत तर्क जिथल्या तिथे बसत होते. रात्रीचं भाडं लुटलं असेल आणि उरलेलं सामान इथे टाकून रिक्षावाला पसार झालेला असेल यावर बहुतेक सगळ्यांचं जवळपास एकमत झालं. बॅगांची दूरूनच तपासणी करणार्‍या एका काकांच्या ल्क्षात आलं की त्या बॅगांना एअरपोर्टचे टॅग लावलेले होते. त्यावर असणार्‍या मोबाईल नंबरवर फ़ोन लावला तर हा फ़ोन सध्या बंद आहे असं उत्तर मिळालं. झालं! आता मात्र मनात असणार्‍या संशयावर संशयच उरला नाही. सोसायटीच्या सेक्रेटरीला फ़ोन करून सगळा सांगितल्यावर त्यांनी वॉचमनकरवी बॅगा दूर फ़ेकून देण्याविषयी सुचवलं. वॉचमन बॅगा फ़ेकणं दूरच पण त्यांच्याजवळपास फ़िरकायलाही तयार नाही. न जाणो त्यात बॉम्ब वगैरे असेल तर? आता काकालोकच पुढे सरसावले आणि त्यांनी अत्यंत सावधानतेनं सामानासोबतची प्लॅस्टिकची बॅग तपासली. त्यात कपड्यांबरोबरच पुस्तकं आणि एक ट्रान्झिस्टर, घड्याळ होतं. हा नक्कीच काहीतरी घातपाताचा प्रकार असावी की काय अशी शंका सगळ्यांच्याच मनात दाटायला लागली. आता घड्याळात चांगले अकरा वगैरे वाजले होते म्हणजे हा सगळा गोंधळ सुरू होऊनही बराचवेळ झालेला होता. एव्हाना कोणीतरी सरळ पोलिसांना फ़ोन केलेला होता. दूरून पोलिस येताना पाहून सगळे एका बाजुला झाले. पोलिसांनी तिथे जमलेल्यांना माहिती विचारायला सुरूवात केली......सगळेजण आपापलं व्हर्जन उत्साहात सांगत होते.......सगळा घोळका बोलता बोलता गेटपाशी गेला.....आता बॅगांवरून लक्ष उडालं होतं आणि पोलिस काय करतात याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती.....रस्ता क्रॉस करून साधारण पस्तिशीची कन्यका ????? रात्रीच्याच वेशात (म्हणजे स्लिपरपासून डोक्याच्या क्लिपपर्यंत सगळं अस्ताव्यस्त आणि बिनमॅचिंगचं घालून) फ़राफ़रा आली आणि दोन हातात चार बॅगा उचलून पुन्हा अबाऊट टर्न करून चालायलाही लागली......उपस्थित मंडळी अचंबीत होऊन बघतच राहिली. हा काय प्रकार आहे? आम्ही सगळेस काळपासून नाष्टाबिष्टा न करता इथे डोक्याला कल्हई करत बसलो आहोत आणि आता अचानकच ही बाई येऊन सगळं चंबुगबाळं आवरून आपाण त्या गावचेच नसल्यासारखे दाखवत चक्क निघून जाते म्हणजे काय? अर्थात पोलिसांनी तिला हटकलं आणि थांबवल्यावर तिनं त्याला "येस???" असा केवळ लूक दिला हो....घ्य्या आता, हे म्हणजे रोम जळतंय आणि.....अशातला प्रकार झाला की नाही? तिच्या सोबत असणार्‍या गृहस्थांना काय घडलं असावं याचा बहुदा अंदाज आला असावा. ती मघासची येस लूकवाली कन्यका जशी झोपेतून आल्यासारखी आली तशीच झोपेतच चालल्यासारखी निघून गेली आणि तिच्यासोबतचे गृहस्थ मागे राहिले. गेटपाशी उभा असणारा घोळका पुढे सरसावला आणि पोलिस काय विचारतात आणि नक्की काय भानगड आहे हे जाणून घेण्याच्या कमाल उत्सुकतेनं कानात पंचप्राण आणून उभा राहिला......झालं. संपला की किस्सा. :)) त्या संशयित बॅगा झोपाळलेली कन्यका घेऊन गेली याचाच अर्थ त्यात बॉम्ब नव्हता हा उघडच आहे नां.




बरं बरं ठिक आहे, सांगते काय झालं होतं ते, ती झोपाळलेली सुंदरी होती नां तिचा पतीपरमेश्वर रातीच्याला अम्रेकीला उडाला होता. त्या महान आत्म्यानं जरा ज्यादाच घेतलं होतं....सामानसुमान......तर हिनं एअरपोर्टावर भराभर बाहेर टाकलेलं सामान आणि जास्तीच्या ब्यॅगा (वाचक हो माणसांच्या तीन तीन बॅगा जास्त होतात???कमालच आहे) सोबत आणल्या आणि रात्री परत आल्यावर त्यांनी बॅगा गाडीबाहेर तर काढल्या पण उचलून घरी घेऊन जायच्या विसरल्या....(अग्गो बाई गंमतचाय किनई) आणि गंमत म्हणजे घरी गेल्यावरही साधा अगदी इतकुसा देखिल संशय आला नाही की बाई गं, आपण एअरपोर्टवर घेतलेल्या बॅगा कुठे गेल्या असाव्यात बरं ? (अग्गो बाई कमाल आहे किनई) आणि सगळ्यात भारी गंमत म्हणजे झोप बिप झाल्यावर भल्या पहाटे अकरा वाजता समजलं की; अय्या, काल रात्री आणलेलं सामान तर रस्त्यावरच राहिलं की!!....(टाळ्या) आणि त्याहून भारी गंमत म्हणजे आपल्या गाडीभोती हे सगळे सभ्य लोक जमाव करून काय करतायत याचिही गंमत समजलीच नाही. असो. तर यानिमित्तानं आमच्या सोसायटीतल्या दक्ष नागरिकांचा आणि आपल्या बुडाखाली साक्षात बॉम्ब आहे हे समजल्यावरही ज्यांना ते हलवावसं वाटलं नाही त्यांचा साक्षात्कार झाला. त्याचबरोबर अशा आणीबाणीच्यावेळेस संपर्क साधल्यावर पोलीस तात्काळ धावतात (म्हणजे धावत आपल्यापर्यंत पोहोचतात) हेही समजलं, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला नवरा परदेशी गेल्यावर कितिही भारी दु:ख झालं तरी सोबतचं सामान घरात घेऊन येण्याइतकं दु:ख सावरण्याची मानसिक ताकद प्रत्येकीन अंगी आणली पाहिजे हे समजलं (अग्गो बाई, मी तर नवर्‍याला टाटा बाय बाय केल्यानंतर एकदाही बॅग सोडाच पण रूमाल सुध्दा विसरले नाहिए.....) असो. कोणीतरी म्हणजे तो आपला शाहरूख म्हणून गेलाय नां, "ऐसी बडी बडी शहरों ऐसी छोटी छोटी बाते होती है".


तळ टीप- आग्गो बाई एक गंमत सांगायचीच राहिली. तुम्ही विचार करत असाल नां (नसेलच केला. माहितीय नां तुम्हाला,एकदा सांगायला बसले की मी काही म्हणून काही सांगायचं बाकी ठेवणार नाही. एक वेळ पान संपेल पण तळ टिपा आणि हे मेले कंस काही संपायचे नाहीत.) तर "ती" गाडी सोसायटी आणि परिसरातल्या कोणाचिही नाही असं गाडी पुसणार्‍यांनी छातीठोकपणानं कसं काय सांगितलं? तर गाडीच्या मालकिणबाई इथे राहणार्‍या नव्हत्याच मुळी त्या माहेरवाशिण होत्या.
ओके फ़ायनली संपल्या सगळ्या गंमती. गोष्ट छोटीच होती पण त्यातून जी गंमत दोन तीन तास अनुभवली (लोकांनी) ती शेअर कराविशी वाटली म्हणून हे शब्दांचं भेंडोळं उघडलं बरं.
 

ना नन्नाचा पाढा

वैताग, चिडचिड, फ़्रस्ट्रेशन आणि सगळं काही......अरे एखाद्याच्या नशिबात अडचणी याव्यात म्हणजे किती? गेले कित्येक दिवस बोटं किपॅड बडवण्यासाठी आसुसली होती; पण बाशिंगबळ जड असलेल्या पोरीच्या लग्नात अडचणी याव्यात तशा एकामागोमाग अडचणीच अडचणी. विषय तर किती सुचले होते पण बटणं बडवायचा योग काही केल्या येत नव्हता.
धाकले अंबानी म्हणजे तर रूसल्या जावयाच्या वरताण झालेत. एकवेळ रूसलेल्या नवरदेवाला घोड्यावर बसवता येईल पण अंबानिचा सिग्नल मिळणं कठीण झालंय (सरळ अर्थ काढा, अर्थाचे अनर्थ नकोत). नेटकनेक्टचं डबडं बदललं, आणि लॅपटपचं डोकं भडकल्यासारखी अचानकच हार्डडिस्क उडाली. सगळे यच्चयावत आळशी, चोर आणि महामुर्ख आमच्या राशीत दाटीवाटीनं बसलेले असल्यानं आम्हीही डोक्यावर दगड पडल्यासारखे अशाच लोकांकडे कामांसाठी जातो. लॅपटॉप आपल्याकडे होता याचं विस्मरण जवळपास झालं होतं इक्ते दिवस तो दुरूस्त करणार्‍यानं घेतले. बरं तो आला तर कसा तर डॉनमधल्या स्मृती गेलेल्या शाहरूखसारखा डोकं करकरीत रिकामं असल्यानं पुन्हा बरहा टाका, यांव टाका त्यांव टाका असं करेपर्यंत बरेच दिवस गेले. दरम्यान विषय सुचत होते पण एकतर बालबुध्दी बनलेला कॉम्प्युटर आणि एकामागेएक (सिध्दीविनायकाला लोकं कशी रांग लावून उभी असतात नां तशीच) आलेल्या "डोमेस्टिक अडचणी"......वात आला. सगळ्याचा. एक दिवस भल्या पहाटे साधारण नऊ दहा वाजता सगळं जमून येऊन लिहिण्याचा चानस आला तर कन्यारत्न लाडात येऊन गळ्यात पडताना नेमका अंबानिना धक्का लागला आणि हाय रे दुर्दैवा पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्न....हरिदासाची कथा मूळ पदावर येऊन अनुक्रमे अमुक ठिकाणची ब्रॅन्च तमुक ठिकाणची ब्रॅन्च करत एकदाची बोट सर्व्विस सेंटरच्या धक्क्याला लागली. (इथे पुन्हा एकदा वरचं वाक्य वाचा, तेच ते-सगळे यच्चयावत महामुर्ख, आळशी आणि चोर..वगैरे वगैरे)ती बया म्हणजे, सर्व्हिस ठेसनवाली ....(बायका उगाचच आणि निर्थक अखंड बडबडतात असा तमामत पुरूष मंडळीचा लाड्का आरोप सिध्द करायला बसल्यासारखी ती तारस्वरात आणि उगाचच मारक्या म्हशीसारखी अंगावर आल्यासारखी बोलत होती. देवा कसं व्हायचं रे स्त्री जातीचं)...तर तिनं एक चपटं डबडं हातात दिलं (बाय दि वे, त्याचवेळेस मला समजलं म्हणजे सर्व्हिस ठेसन सुंद्रीनं तसं सांगितलं की म्हणे अशी बिघडलेली यंत्र आपण ज्या स्थितीत त्यांना देतो त्याच स्थितीत ते आपल्याला ते परत करतात. म्हणजे कसं तर आता आमचं यंत्र त्याच्या वॉरंटीत होतं म्हणून मग दुकानवाला पोट्ट्या आमच्या खिशाची दया येऊन म्हणाला की हे म्हणे बदलून दुसरं मिळेल, नवं. तर ते देताना त्याची टोपी आम्ही दिली नाही म्हणून स. ठे. सुं. नं पण टोपी का बदला टोपीसे लेत आम्हाला टोपी न घालताच "नवं" यंत्र दिलं. तिला विचारलं की अगं बाई, हे नवं आहे तर त्याचे बाकीचे अवयव कुठेत? तर म्हणाली तुम्ही जस देता तसं कंपनी तुम्हाला देते. असो. माणून अनुभवातून शिकतो म्हणतात नां, आता पुढच्यावेळेस टोपीच काय हातमोजे, पायमोजेसुध्दा घालून यंत्र दुरूस्तीला देईन) असो. तर दुर्दएवाचे दशावतार म्हणजे रिक्शावाल्याच्या खिशात तीन तीन खेपांचे तीनशे रूपये आणि तीन तीन वेळा त्या स. ठे. सुं. चा किणकिणारा आवाज ऐकूनही हे यंत्र आमच्या लॅपटॉपबरोबर नांदायलाच तयार नाही. तेव्हा नवरोबाला ठणकावून सांगितलं की, "बाबा रे आता बास झालं तुझं हे गाढवी प्रेम आपुनका व्होडाफ़ोनच सही है." आता तुम्ही म्हणाल की हे आधीच नाही का करायचं पण इतकं सरळ असेल तर आमचं नशिब कसं? आमचं धाकटं न्यु अराईव्हल म्हणजे कुंबळे बिंबळेला कोळून प्यायल्यासाखं हातात दिसेल त्या वस्तूला बॉल आणि जमिनिला पिच समजून बॉलिंग टाकत असतं. त्यातून अशी टाकाटाकी करायला त्याला प्रचंड आवडणारी गोष्ट म्हणजे अस्मादिकांचा मोबाईल. मोबाईल टाकून टाकून त्याची इतकी वाट लागली की साक्शात मोबाईलसुध्दा तो मोबाईल आहे हे विसरून गेला. आधी बटणं, मग डिस्प्ले असं करत करत बिचार्‍यानं अखेर बॉडी टाकली. त्यानंतरचा हॅ्ण्डसेट दुसर्‍या कंपनिचा घेतला मारे ऐटीत पण हाय रे रामा त्याच्यावरून नेट कनेक्ट होईना. (लोकांना नेटची हौस किती असते नां) मग अखेर घरात आवरावरी करताना असाच एक जुना सेट सापडला त्यात कार्ड घातलं आणि जोडलं तर जमलं की राव! आत्ता या क्षणाला मला काय लिहू आणि किती लिहू असं झालंय. स्मृती गेलेल्या डॉन्याची स्मृती परत आल्यावर त्याला कसं किती बोलू आणि काय बोलू झालं नां तसंच होतंय. तर मंडळी बर्‍याच दिवसांनी लिहितेय त्यामुळे जरा जास्तच उत्साह फ़ुटलाय. काय चुकलं बिकलं असंल तर माफ़ी करा आणि घ्या सांभाळून.


ता.क. - लॅपटॉपचा पडदा प्रकाशमान झाल्या झाल्या सत्यवान आणि तन्वीबाईंना मस्त ब्लॉगचं बक्षिस मिळाल्याचं वाचलं. लय भारी मंडळी हो! मज्जा. अभिनंदन तुम्हा दोघांचं आणि जिंकलेल्या सगळ्यांच.
 

खो चं उत्तर

तन्वीनं सुरेल खो दिलेल्याला इतके दिवस झाले. पण माझी अवस्थाही तिच्यासारखीच झालेली होती. गाणं कोणतं निवडावं हे ठरवणं प्रचंड मुश्किल काम होतं. मात्र एक नक्की केलं होतं की हिंदीच गाणं निवडायचं. अख्खं युट्युब पालथं घालून झालं. अरे हे तर आपलं जाम आवडतं म्हणत अनेक गाणी डोक्यात घोळवली पण त्यांचं भाषांतर करणं पापच वाटायला लागलं. "शाम से आंख में नमी सी है, आज फ़िर आपकी कमी सी है" अशा गाण्यांच्या वाट्याला जाण्याचं अचाट धाडस या सुरेल खोमुळे करावसं वाटलं आणि "त्या" गाण्यातली "सादगी" तितक्या टेचात उतरवणं शक्य नाही पहिल्याच ओळीत समजल्यावर पायउतार होऊन जरा स्वस्थ बसणं बरं असा विचार केला. मात्र ही उचकी जात नव्हती. एक दिवस अचानकच हे गाणं बुवा कुक्क केल्यासारखं समोर आलं आणि बस्स पुढं सगळं "वेड लागलं मला वेड लागलं" असं झालं. दिवस रात्र हेच विचार सतत डोक्यात. पुन्हा या गाण्यातले शब्दही किती साधे आणि ग्गोड. मग ठरवलं की "ती" भावना आपल्यात कशी झिरपलीय तेच उतरववावं. मूळ गाण्यात तीन कडवी आहेत इथे मी काम जराआटोपतम घेतलंय (नेहमीप्रमाणे गाडी जरा थांबली आहे पण आता पुन्हा थोडं थांबून मग तीसरं कडवं पूर्ण करण्याइतका धीर धरवत नाहीए, सो मंडळी माफ़ी असावी)




बावरा मन

उधाणलेल्या वेड्या मनाच्या आभाळवेड्या आशा
वेड्या वेड्या स्वप्नांच्या मंद धुंद रेषा...


मनबावरी धडधड आणि श्वांसांचे हिंदोळे
बावर्‍या आशेचे एक तोरण कोवळे
कोवळ्या पालवीतला एक धुमारा वेडा
वेड्या वेड्या स्वप्नांच्या मंद धुंद रेषा....

वेड्या श्वासांच्या लयीला एक वेडुला ताल हवा
मोगरीच्या कळ्यांवर डुलणारा मस्त वेडा थेंब हवा
हवाहवासा वेडेपणा करणारा एक शहाणा निमिष हवा
वेड्या वेड्या स्वप्नांच्या मंद धुंद रेषा...


(मी या खेळात लेट लतीफ़ असल्यानं सगळ्यांनी सगळ्यांना खोकवून झालंय मी कोणाच्या पाठीत धपका घालू? श्री ताईला खो देतेय.)

(गुस्ताखी माफ़) ज्या मूळ गाण्यावरून वरचा वेडेपणा करण्याचा मोह झाला ते हे गाणं. "हजारो ख्वाईशे ऐसी" असल्या भन्नाट सुंदर नावाच्या चित्रपटातलं.
Bavra Mann Dekhne Chala Ek Sapna
Bavra Mann Dekhne Chala Ek Sapna



Bavre Se Mann, Ki Dekho Bavri Hain Baatein
Bavre Se Mann, Ki Dekho Bavri Hain Baatein
Bavri Se Dhadkaane Hain, Bavri Hain Saansen
Bavri Si Karwaton Se, Nindiya Door Bhaage
Bavre Se Nain Chaahe, Bavre Jharokhon Se, Bavre Nazaron Ko Takna.
Bavra Mann Dekhne Chala Ek Sapna



Bavre Se Is Jahan Main Bavra Ek Saath Ho
Is Sayani Bheed Main Bas Haathon Mein Tera Haath Ho
Bavri Si Dhun Ho Koi, Bavra Ek Raag Ho
Bavri Si Dhun Ho Koi, Bavra Ek Raag Ho
Bavre Se Pair Chahen, Baavron Tarano Ke, Bavre Se Bol Pe Thirakna.
Bavra Mann, Dekhne Chala Ek Sapna



Bavra Sa Ho Andhera, Bavri Khamoshiyan
Bavra Sa Ho Andhera, Bavri Khamoshiyan
Thartharati Low Ho Maddham, Bavri Madhoshiyan
Bavra Ek Ghooghta Chahe, Haule Haule Bin Bataye, Bavre Se Mukhde Se Sarakana,
Bavra Mann, Dekhne Chala Ek Sapna
 

हे भलते अवघड असते!!!

आईपण निभावायचं आणि तेही डोळस वगैरे ही काय खायची गोष्ट नाही बाबा!! (आता तुम्ही म्हणाल [हे आपलं आम्हीच ठरवायचं]एक तर इक्त्या दिवसांनी उगवल्यानंतर हे काय अचानकच?)तर हुड पोरांचं मदरहुड हे पूर्णवेळाचं काम काही पोस्टायला वेळच उरवत नाही (हे आपलं म्हणायचं बाकी लिहिण्याचा आळस हे खरं कारण, (नवरा ऑफ़िसला जाताना सांगून जातो अमूक वाजता अमूक ठिकाणी ये, म्हणजे त्यानं साडेपाच वाजता बोलवलं असेल तर चार वाजता आवरायला घ्यावं की नाही? (माणशी अर्धा तास या हिशेबाने) आमचं म्हणजे कसं सव्वापाच वाजता आवरून साडेपाच वाजता आटो आटो करत धावायचं मग हटकून उशिर झाल्यावर रिक्षातून उतरतानाच अरे अगदी ऐन निघताना यानं पॉटी केली असं हुकमी कारण पुढे करायचं तसंच हे. असो. तर कंसातून बाहेर मूळ मुद्दा)(नमनाला घडाभर तेल वाहिल्याशिवाय पोस्ट फ़ळत नाही की काय अशी शंका यायला लागलीय मला अलिकडे)तर हे डोळस आईपण म्हणजे सगळी गंमतच आहे. पोरांशी कसं वागायचं आणि कसं नाही याची कसरत म्हणजे हा सगळा बल्ल्या गोंधळ आहे. मी आपले इक्त्या वर्षांच्या अनुभवानंतर काही नियम बनवले आहेत-
१-पोरं काही सांगत असतील तर त्याचा सामान्यपणे जो अर्थ असायला हवा तसा तो कधीच नसतो. म्हणजे उदाहरण लेकीला माझ्यासारखीच लिखाणाची जबरी हौस आतापासून फ़ुटली आहे. आपले जिन्स साक्षात पोरीत उतरलेत म्हटल्यावर कौतुक करणं ओघानं आलंच. थोडा विस्कळीतपण आणि बालसुलभ चुका सोडल्यातर अलिकडे लिखाणाचा पाक जमायला लागलाय. परवा वहितली दोन पानं फ़डफ़डवत माझ्याकडे आली आणि म्हणाली,"आई, बघ मी न्यु स्टोरी लिहिलिय. अबाऊट सिंड्रेला आणि हर किंग" (प्रिन्स नव्हे बरं का!) बरं जमलं होतं सगळं. माझ्या तोंडतून व्वा व्वा ! असं निघणारच होतं तर शेवटच्या वाक्यानं माझा पार लोळागोळा करून टाकला. मला वाटल की "ऍण्ड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ़्टर" असं असेल तर त्याऐवजी माझ्या बोल्ड ऍण्ड ब्युटीफ़ूल फ़ुलानं लिहिलं होतं,"दे मॅरिड ऍण्ड गोन फ़ॉर देअर हनीमून" काय दचकला किनई? मी पण अशीच दचकले होते. मुळात हनिमुनची भानगड हिला कशी काय बुवा समजली हा मूळ मुद्दा, त्यानंतर हनिमून म्हणजे नेमकं काय काय हिच्या डिक्यात आहे हा किडा. आता हिला खडसवावं की कसं या विचारात असतानाच माझ्यातली डोळस आणि चतुर आई जागी झाली. मी ते वाक्य मुद्दामच जोरात वाचलं आणि हनीमून शब्दावर मुद्दामच अडखळत तिलाच विचारलं काय गं लिहिलयस हे? त्यावर आता या आईचं काय करायचं असा लूक देऊन "अगं लग्नानंतर हजबंड वाईफ़ कुठे जातात? हनीमूनला नां? मग ते हनीमून आहे" (ओके, चेहरा बालीश आहे म्हणजे हनीमूनची हिची कन्सेप्ट वेगळी असणार असा विचार करून मी जराशी हुश्श)मग तिला म्हटलं हो का? पण असं तुझ्या बुकमधल्या स्टोरीत नसतच लिहिलेलं. पण हनीमूनला म्हणजे कोठे गेले गं? पुन्हा एकदा मघाचचाच लूक फ़ेकून "अगं हनीमून म्हणजे हिलवर वगैरे फ़िरायला जातात, ते पिक्चरमध्ये नाहीत का दाखवत? स्नोमध्ये किंवा सीमध्ये गाणं म्हणतात तसं गं" (ऐ ढिंग टिका टिकाक टिका, हनीमून म्हणजे छान छान ड्रेस घालून डोंगरावर वगैरे केलेला डान्स असतो फ़क्त. बॉलिवुड रोमान्स झिंदाबाद. :) दोन प्रश्नांची उत्तरं एकदमच मिळाल्यानं माझा जीवच नाही तर अडकलेले पंचप्राण भांड्यात पडले गो बाई!) बघा बरं. तिनं गोश्टीत हनीमून हा शब्द वापरला म्हणून मी "आईसुलभ" प्रतिक्रीया व्यक्त केली असती तर? जे सामान्य द्न्यान अजून नव्हतं कदाचित ते मिळालं असतं.
२-आपण केलेले नियम त्यांच्याबरोबरच आपल्यालाही लागू असतात.-आपण कसेही असलो तरिही आपल्या मुलांनी आपल्याला सदगुणांचा पुतळाच असायला हवं असतं. हे आयडियली ओक्के असलं तरिही हे भावी सदगुणांचे पुतळे आपल्याला कधी जमिनीवर आणतील त्याचा नेम नाही. म्हणून नियम बनविताना ते आपल्यालाही झेपले पाहिजेत एव्हढं लक्षात घ्या म्हणजे झालं. उदाहरणार्थ गोरगरिबांना मदत करावी या एका सुविचारानं आम्हाला प्रत्येक सिग्नलवरच्या येणार्‍या प्रत्येक "गरिब" मुलाला, पोटाला पोर बांधलेल्या बाईला, म्हातार्‍या कोतार्‍यांना पैसे द्यावे लागले.
तर तसे मुद्दे बरेच आहेत विस्तारानं पुन्हा कधीतरी.