पुन्हा एकदा ए फ़ॉर अ‍ॅपल

दोन तीन महिन्यांपूर्वी शमिनं उत आणला होता अगदी. घरभर पसरलेली खेळणी कमी पडत होती म्हणून आजोबांचा चष्मा, आजिची औषधं, ताईचा अभ्यास, सगळ्यांच्या चपला....अगदी दिसेल त्यावर तुटून पडत होते महाशय. सकाळी गुडबॉयसारखा सहाला वगैरेच उठून बसायचा मग तेंव्हापासून सगळ्यांना वात आणत सुटायचा. सगळं घर भिंतीवरचं घड्याळ विसरून गेलं होतं. याच्या मागे धावताना आम्ही सगळे आणि घड्याळाचे काटे यांची शर्यत लागत होती. अखेरीस सकाळ संध्याकाळच्या फ़ेर्‍यांनी त्रासलेल्या आजोबांनी,"आता याला अडकव बाई कोठेतरी" असं फ़र्मान काढलं. दुधात साखर म्हणजे सोसायटीतच असलेल्या शाळेत गोडोबा आवडीनं आपण आपले जात होते. एक दिवस पाहिलं तर चक्क दीडएक वर्षाची मुलगी शाळेत दिसली. मग त्याचदिवशी सगळे सोपस्कार पार पाडून अ‍ॅड्मिशन घेऊन आले. चार पाच दिवसात पिल्लू शाळेत जायला लागलं. एकच तासाची शाळा पण सगळेजण हुश्श म्हणून श्वास घ्यायला लागले. सुरवातिची रडारड संपल्यावर रितसर प्लेस्कूल सुरू झालं.....सानुच्यावेळेसही असाच संभ्रम पडला होता की शाळा कधी सुरू करावी? मग एक दिवस असंच अचानक जाऊन तिला शाळेत घातलं. पहिल्या दिवशी तिला शाळेत सोडून आल्यावर मीच घळघळा रडले होते. सानु चार दोअन महिन्यांची असतानाच या नव्या शहरात रहायला आलेलो......आयुष्यात पहिल्यांदाच चोविस तास घरात बसायचं होतं.....घरकाम....इवलुसं बाळ.....सगळं आवरेपर्यंत कंटाळून जायला व्हायचं...अगदी एकटं वाटायचं कधी कधी....मग हळू हळू पिल्लू बोलायला लागलं, खेळायला लागलं...त्यानंतर कंटाळा कुठच्या कुठे पळून गेला. दिवसरात्र आमची जोडगोळी सतत एकत्र असायची. तिला गोष्टी सांगताना, तिच्याशी खेळताना, मस्ती करताना दिवस भुर्रकन उडून गेले. दोन वर्षांपासून नव्या शहरात रहाताना तो इटुकला जीव माझा सख्खा सोबती कधी बनला समजलही नव्हतं. ज्या दिवशी ती माझं बोट सोडून शाळेत गेली त्या दिवशी ती खुष होती आणि माझ्याच आत तुटत होतं. काही दिवसांनी दोघिही रूळलो. तिची शाळा माझ्यासाठी पुन्हा नवा अनुभव घेऊन आली. तिच्यासाठी फ़्लॅशकार्डस बनवताना, गंमत खेळ बनवताना माझं बालपण पुन्हा एकदा नव्यानं मला अनुभवायला मिळत होतं. काय काय करत होतो आम्ही...गाणी म्हणत नाचायचो, दुकानातलं पुस्तक नको तू माझ्यासाठी मला हवं तसं पुस्तक बनव असा हट्ट केल्यावर खास तिच्यासाठी गोष्टींचं पुस्तक बनवलं तेंव्हा तर धमालच केली दोघिंनी. सानू, मी आणि आमची गोष्टीतली "दुरिया" आमची गट्टी अजुनही तशिच आहे, अगदी खास.....परवा सीडीवर एबीसी गाणं लागलं होतं आणि माझ्या पिल्लानं ’आई अ‍ॅप्प्पल’ असं बोट करून दाखवल्यावर लक्शात आलं की अरेच्चा! हे पिल्लुही झालं की मोठं. त्याची शाळा म्हणजे आजवर आमच्यासाठी फ़ारसं सिरियस अफ़ेयर नव्हतं. मात्र त्यानं अ‍ॅप्पल दाखवलं आणि तो "शाळेत" जातोय याची जाणिव झाली.
 

6 comments:

mau said...

मस्त !! वाचताना मला माझ्या पिलांची आठवण झाली गं...किती भुर्र दिवस गेले बघ..सुंदर मांडणी...ः)

शिनु said...

@ माऊ
थॅन्कु. कसं असतं बघ नां, इवलुशी दुपट्यात असतात तेंव्हा वाटतं की कधी मोठी होतील, चालतील बोलतील मग बोलायला लागली की वाटतं कधी शाळेत जातील. मग दोन तीन वर्षं गेली की वाटतं, अरेच्चा? ही मोठी कधी झाली? आत्ता आत्ता तर बोलायला शिकली नां?

शिनु said...

@ परिचित

हो नं, आमच्याही घरी तेच आहे इंग्रजीतून मराठी शिकवावं लागतं. मला तर जाम गम्मंत येते. आम्ही मराठीची गोष्टही बोली मराठीत भाषांतर करून सांगतो. :)

Anonymous said...

:)

बयो पुन्हा डोकावलीस गं माझ्या घरात... गौराची शाळाही अशीच आमच्यासाठी ’सिरियस अफेअर’ नव्हतं.... ईशानसाठी अभ्यासाचे नाना प्रकार करणारी मी गौराला गृहित धरतेय की काय असे वाटते बरेचदा.... परवा तर तिने रिमोटला हात लावल्याबद्दल मी तिला रागावले तर नवरोजी म्हणाले ईशान हिच्यापेक्षा लहान असताना हे सगळे कामं करत होता आणि तूला त्याचे कौतूकही होते... हिलाही मोठी होऊ दे आता...

तेव्हा जाणवलं गं... गौरीला मीच मोठी होऊ देत नाहिये.... :(

पोस्ट अगदी पटली गं... धाकलं स्वत:च अस्तित्व स्वत:च दाखवून देतं :)... कधी चटकन मोठी होतात पिल्लं अजिबात समजत नाही :)

शिनु said...

@ तन्वी,
खरंय गं. मुद्दाम नाही पण आपोआप घडतं हे. पहिल्यावेळेस नवलाई असते म्हणून असेल कदाचित पण सगळंच एन्जॊय करण्याच्या मुडमध्ये असतो नां आपण. दुसर्‍यावेळेस मात्र ते सगळं "रूटिन"मध्ये होत जातं.

meg said...

mast... thodi gammat aani thoda vichar karayla lavnara lihilays.

Narayan madhla dialogue aathavala, "Evdhishi hoti karti. Mazya angakhandyavar kheli vadhli... mazya hatani balakmandirat neun basavli hila... chaalli navryachya ghari!"