मस्त दिवस

....आज सकाळी उठायचा कंटाळा आला होता. तरिही हिय्या करून उठले आणि पंधरा मिनिटात आवरून टेरेसवर धूम ठोकली. (अलिकडे आम्ही टेरेसवरच विकएंड योगा क्लास सुरू केला आहे. एक गुरूजी येऊन शिकवतात आणि अधून मधूनजोक बिकही सांगतात. सक्काळी सक्काळी तेव्हढीच मजा.) तर वर गेले आणि दुसर्‍याच सेकंदाला उठतानाचा कंटाळा गायब झाला. आज चक्क धुकं पसरलं होतं. एरवी डोंगरावरची झाडं, दूरवरचे हायटेन्शनचे टॉवर आणि बाजुच्या रोहाऊसेसची रांग अगदी चित्रासारखी ठळक दिसते आज सगळी मंडळी धुक्याच्या दाटसर कॅंडी फ़्लॉसमध्ये गायब झाली होती. टेरेसवर पाय ठेवला आणि तो ओलसर श्र्वास नाकपुड्यातून थेट मनात आणि डोळ्यातून सगळीकडे पसरत गेला. तोंडातून अगदी सहजणानं आलं,"वॉव्व, चक्क धुकं" (थॅन्कु नवरोजी दामटून उठवून क्लासला पाठवणी केल्याबद्दल. लोळत पडले असते तर दिवसाची ही अशी मस्त सुरवात कशी झाली असती?) सहाजिकच क्लास मस्त झाला. शवासन तर ग्रेट (गुरूजी हे फ़ारच छान करवतात, जवळपास संमोहित अवस्थेत [सेल्फ़ हिप्नॉटिझम] मनातले विचार बाजुला होऊन जो एक नवेपणा मिळतो तो झकास) डोळे उघडल्यावर पुन्हा एकदा तोच नजारा समोर आल्यानं शवासनातली शांतता मनात उतरली. घरी येईपर्यंत तसा उशिरच झालेला होता, आज डब्बा प्रकरण नसल्यानं रमाबाईंनी साहेबांच्या फ़र्माईशीवरून कांदेपोहे अगदी मूडमध्ये येऊन केले होते. त्याचा दरवळ दाराबाहेरच नाकात शिरला, क्या बात है, मिसेस कुलकर्णी तुमचा आजचा दिवस बाप्पाजिंनी अगदी "डिझायनर" करून टाकलेला दिसतोय.....शनिवारची सुट्टी पोरं गाढ झोपेत हसत साजरी करत होती....एरवी ऊठा ऊठाची भुपाळी म्हणत तासभर त्यांना जागवण्यात जातो, आज विचार केला जाने दो, एंजॉय करने दो. माझा मनसोक्त पेपर वाचून झाला आणि मग छोटा हूड रॉबिन दारातून खिदळत बाहेर आला. झोपेतून आज स्वारी न रडता बाहेर म्हणजे झोप झकास झाल्याचं लक्षण.....मग त्याच्या दादासोबत आत जाऊन भरपेट मस्ती (बाय दी वे माझा मुलगा माझ्या मुलिला अजुनही दादाच म्हणतो) करून मंडळी दिवसभर पिडायला फ़ुल्ल चार्ज झाली. सानू सायकल धुवायला खाली गेली तर शमु पण तिचं शेपूट धरून खाली जाण्यासाठी तयार झाला. एरवी अशा धांदलिच्या वेळेत तो खाली जायचा हट्ट धरून बसला की मला जाम वैताग येतो पण आजच्या दिवसाची गोष्टच वेगळी होती. विचार केला की चला आज आपणही खाली जाऊ. सगळा जामा निमा करून आम्ही सायकली धुवायला खाली उतरलो. पोरांनी काय एंजॉय केलं सगळं. शर्मनसाठी तर चक्क सरप्राईजच होतं. एरवी आई पाण्यात खेळू नको म्हणून ओरडत असते आणि आज चक्क पाण्यात खेळायला मुभा मिळाली म्हटल्यावर त्यानंही मापात पाप न करता मनसोक्त सायकल धुवून काढली. थोड्यावेळानं मलाही गंमत वाटून सुरवातिला त्याला मदत म्हणून आणि नंतर त्यात मजा यायला लागली म्हणून सायकल घासून पुसून लख्ख केली. काय मजा आली म्हणून सांगू! कित्ती वर्षांनी सायकल बियकल धुतली!......गेले काही दिवस एकेठिकाणी जरा ठणकावून नकार द्यायचा होता.....नको तिथे मुखदूर्बळपणा दाखवल्यानं नेहमी मी गोत्यात येते....आजच्या दिवसाच्या एनर्जिनं तो नकारही ठामपणानं कळवला आणि वाटलं, अरे कित्ती सोप्पं होतं हे, मी आपली उगाचच धड इकडे ना तिकडे करत हेलपाटत होते. गुड "नकाराचं सामर्थ्य यायला हवं" असले मथळे देऊन छापलेले लेख आठवले आणि नर्मदेतला पाषाण आपण आहोत हे समजलं.....असो. तर आजचा दिवसच इतका छान होता की वाटलं मी आज जे मनात आणेन ते करून दाखवेन.....संध्याकाळी याच मस्त मुडमध्ये चक्क आपणहून पोट्टेकंपनिला मॅगीचे नुडल्स खाऊ घातले. एरवी नुडल्स म्हटले की चवताळणारी मी आज आपणहून ते खाऊ घालतेय म्हटल्यावर पहिल्यांदा सानू जरा बिचकली (माझी आपली शिक्षेची पध्दत आहे, एखादी खुपवेळा सांगुनही नाही ऐकली तर मग आपणही तसंच वागायचं. ही मात्रा बर्‍याचदा लागू पडते) मग मात्र कंपनी तुटून पडली. खाताना म्हणाली की,"ओह, आई आज सॅटरडे ट्रीट म्हणून तू मॅगी केलीस"? (आमच्यात करार झालाय की आठवड्यातले पाच दिवस तिनं मी जी करेन ती भाजी चुपचाप खायची आणि शनिवार, रविवारी तिच्या आवडीच्या भाज्या आणि पदार्थ करायचे).....त्याच आनंदाच्या झटक्यात चक्क मुलांच्या बांबा न मागता चहाही मिळाला. तो पण आश्चर्यचकीत झाला.
 

3 comments:

हेरंब said...

वा मस्त मस्त दिवस एकदम.. आणि एवढा मस्त की आज चक्क तू एवढी झक्कास पोस्टही टाकलीस इतक्या दिवसांनी !! सही जवाब :)

भानस said...

कंटाळ्याने सुरवात करुनही दिवस मस्त गेला की. सहीच! फ्रेश झाले बघ!

शिनु said...

हेरंब, हो बाबा होतं असं आजकाल.:))

परिचित, धन्यवाद.


भानस, धन्यवाद, खुप खुप धन्यवाद आणखी एक दिवस आणखी छान जाण्यात तुमचाही सगळ्यांचा मोठा हातभार आहे. तुमच्या अशा मस्त मस्त प्रतिक्रीया मिळाल्या की मी एकदम हॅप्पीसिंग होऊन जाते.