खिडक्या
............रात्री झोपता झोपता विषय सुचला म्हणून सक्काळी सकाळी लिहायला घेतला तर आता सुरवात कुठून करायची हेच समजेनासं झालंय. कित्ती विचार दाटीवाटीनं उभे आहेत....मी आधी, नाही मी आधी असं चाललंय सगळं........निमित्त कशाचं? तर रात्री झोपताना खिडकी बंद करताना नेहमीप्रमाणे नजर समोरच्या वॉचमनच्या केबिनकडे गेली, तिथे जाग दिसली आणि रोजच्या निश्चिंत मनानं झोपायला गेले.....आणि विचार आला की केवळ त्या खिडकीतून येणार्या उजेडाची ही कसली सुरक्षितता?....पण वाटतं खरं निश्चिंत. मग वाटलं की समजा आपल्या घराला खिडकी नसतीच एकही तर??? तर काय झालं असतं? शी, किती बंद बंद कोंडून ठेवल्यासारखं वाटलं असतं.....कित्ती साधी गोष्ट, आपण घर घेतानाही पहिल्यांदा काय बघतो तर खिडक्यांमधला "व्ह्यु"....खिडकी म्हणजे काय आहे मग? तर मोकळा श्र्वास.....खुलेपणाचा मोकळा ढाकळा अनुभव....नाहीतर सगळं बंद बंद असल्यासारखंच वाटलं असतं....आपल्या नेहमिच्या कामातूनच अगदी सेकंदभाराची नजर बाहेर टाकली तरी कित्ती बरं वाटतं, आयुष्य वहातं असल्यासारखं....खरं तर खिडकीतून रोज काही ग्रेट दिसत नसतं...रोजचाच नजारा सगळा... पहाटे येणार्या दुधाच्या व्हॅन, त्यांच्यानंतर गाड्या पुसायला येणार्या मुलांची लगबग....त्यांचे अगदी ठरलेले कपडे, डोक्याला बांधलेले उलटे रूमाल.....पेपरवाले, दूधवाले, कामवाल्या बायकांची इकडून तिकडे चाललेली धावपळ, चहाच्या कपासोबत, ताज्या वर्तमानपत्रासोबत, भाजी चिरताना, डबा भरताना हात कामात आणि नजर सवयीनं अधून मधून बाहेर......मग सुरू होते शाळेच्या बसची ये-जा.... अगदी मिनिटाच्या हिशोबावर घड्याळाचा काटा सांभाळत येणार्या बस आणि त्यात चढणारी मुलं....काही बस येतात आणि निघतात तर काही कर्कश्श हॉर्न वाजवत ताटकळत उभ्या.....वेळेत येणारी बस आणि उशिरा पोहोचणारी तीच मुलं.....हे असंच दहावीपर्यंत चालणार बहुतेक.....नेहमिच्यातला एखादा चेहरा आणि त्याला सोडायला येणारी आई दिसली नाही की डोळे आणि मन नोंद घेऊन ठेवतं.....काय झालं बरं? आज शाळेला का दांडी?....ऑफ़िससाठी धावत पळत बस गाठणारे नेहमिचे "तसे ओळखिचे" चेहरे....सकाळ चढत जाऊन बारा साडेबारापर्यंत सुस्तावते....थोडावेळापुरता तुरळक बसचा, रिक्षांचा आवाज...एखादा खडखडत जाणारा ट्र्क, रिक्षा बोलवण्यासाठी वॉचमनची वाजलेली शिट्टी....चार वाजून दिवस उतरायला लागला की परत परतिची सुस्त धांदल....बसमधून मळलेले, चुरगळलेले युनिफ़ॉर्म घालून उड्या मारून बाहेर पडणारी खिदळती मुलं....हातात भाज्यांच्या पिशव्या सांभाळत त्यांना न्यायला आलेल्या आया.....बसमधून, रिक्षामधून परतणारी ऑफ़िसवाली मंडळी.....खेळायला बाहेर आलेली सुळसुळणारी छोटी छोटी पोट्टे मंडळी.......सायकल, फ़ूटबॉल....हसण्याचे, गप्पांचे आवाज, गाड्यांचे बाईकचे इकडून तिकडे, तिकडून इकडे सततचे येणे जाणे......अगदी रात्री बारा एक वाजेपर्यंत असणारी वर्दळ......हे सगळं डोळ्यातून मनापर्यंत पोहोचतं खिडकीच्या माध्यमातून.....अशी सतत बाहेरच्या जिवंत जगाशी बांधून ठेवणारी ही खिडकीच नसती तर?......
....अशिच आणखी एक बांधून ठेवणारी खिडकी......कॉम्प्युटरवर काम करता करता नजर खालच्या खिडकीत जाते.....कोणी ना कोणी या खिडकीत अधून मधून डोकावत असतं....अगदी भिंतीपलिकडे असणार्या मैत्रिणीपासून सातासमुद्रापलिकडच्या मैत्रिणीपर्यंत.....जुन्या शाळुसोबत्यांपासून भावंडांपर्यंत.....मामा, काकांपासून नेटवर ओळख जालेल्या "चिल्लर पिल्लर" पर्यंत.....कोणी ना कोणी घंटी वाजवून हाय हॅलो करत असतं.....कधी मजा मस्ती, कधी हवापाण्याच्या गोष्टी तर कधी अगदी आतला संवाद.....या सगळ्यांशी गप्पा मारता मारता काम कसं युं संपून जातं....काम संपल्यावरही गप्पांचा फ़ड इतका रंगुन जातो की खिडकी बंद करणं अगदी जिवावर येतं.......सगळं मित्रमंडळ एका टिचकीच्या अंतरावर ठेवणारी ही खिडकी कट्टा गप्पांचा फ़ड मस्त रंगवून ठेवते.....रात्री अपरात्री काम करतानाचा एकटेपणा चुटकीत घालवणारं हे मंडळ असं खिडकीतून डोकावत रहातं आणि घड्याळाचा काटा कुठे चाललाय याच्याशी देणं घेणं रहात नाही.....कधी कधी मात्र या खिडकीत कोणी डोकावतच नाही....आलं तरी गप्पा जमत नाहीत.....खिडकी उघडीच असते....सगळे आपल्या कामात व्यग्र असतात....अशावेळेस मिनिटा मिनिटाला कोणी आलं कां म्हणून खिडकीवर टिचकी पडते.....या दोन खिडक्यांत डोकावणं हा दैनंदिनिचा भाग बनलाय......या पोस्टचा अखेर काय असावा म्हणून कधिची विचार करतेय....मग विचार केला की ज्याची सुरवातच नाही केली त्याचा शेवट तरी कशाला? अखेर हा काही ललित लेख वगैरे नाही....मनात डोकावलेले विचार उतरवावेसे वाटले इतकंच......
Labels:
शेंडा ना बुडखा
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
सुंदर.. खिडक्यांशिवाय खरंच किती एकटं वाटेल... खर्या आणि वर्च्युअल जगात.. मस्त लिहिलंय
वा! खिडक्यांचे कनेक्शन सहीच! खरेच, या खिडक्या नसत्या तर सगळे कोंडून, गुदमरुन गेलो असतो नं... !
भापो गं!
Kharch Manachyahi Khidkya ashach asayla havyat
Post a Comment