कारण आपण सगळेच प्रेमात पडतो

लाजवाब गाणं, व्हिडिओ. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. इतक्या सुंदर पावसाळी दिवसाला थॅन्क्यु नको म्हणायला? म्हणूनच हे गाणं.

 

it's the time to...

बघता बघता पिल्लू वर्षाचं झालं की! मग म्हटलं होऊनच जाऊदे एक धमाल मस्ती.













 

सोमणकाका


भुकेल्यावेळेला गरमा गरम अन्न समोर यावं याहून दुसरं सुख नाही, ते अन्न प्रचंड रूचकर असावं हा तर कळस आणि असं अन्न कोणीतरी पाटावर बसवून आयतं आग्रह करकरून वाढावं हा तर सुखाचा परमावधी. बायकांच्याबाबतीत तर अगदी "होय्योहोय्यो"च. दरवर्षी सुट्टीसाठी सांगलीला गेलं की हे सुख अवघ्या हाकेच्या अंतरावर उभं असतं. नरसोबाच्या वाडीला दत्तदर्शनला जायाचं जायाचं म्हणत जाण्याचं आणखी एक कारण आहे इथलं "सोमण भोजनालय". देवदर्शन झालं की सोमणांकडच्या पंगतीला जाऊन बसायचं हे एक रूटिन झालंय. कसलाही बडेजाव नाही की चकचकीत भांड्यांचा देखावा नाही. साध्या ताटांमधून अगदी घरगुती पध्दतीचं सात्विक जेवण मात्र अगदी वाफ़ाळतं ही सोमणांची खासियत आहे. दहाच्या पहिल्या पंगतीला जा नाहीतर दोनच्या शेवटच्या, प्रत्येक पंगतीत वाफ़ाळता वरणभात आणि तव्यावरचीच गरम पोळी ताटात येते. रोज घरात जेवतो तेच वरण भात, आमटी, भाजी, पोळी कोशिंबिरीचं जेवण पण त्याला चव अगदी खास माहेरच्या घरातली. (यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, म्हणजे माहेरच्या पाण्यातच अशी चव की आई, आजी, मावशी कोणिही पाण्याला फ़ोडणी घातली तरी खाणार्‍यानं ओरपून खाल्लं पाहिजे [ विशेष सूचना-नवरेमंडळींनी याच्याशी सहमत असलंच पाहिजे, पुढच्यावेळेस वाटीतल्या पाण्यात डाळ असावी अशी इच्छा असेल तर]) वाडीला जायचं आणि स्वीट डिश म्हणून इतर काही खायचं याला काही अर्थ नाही. इथे गोड या शब्दाला समानार्थी शब्द आहे, बासुंदी/खवा. वाटी उपडी केल्यावरही क्शणभर विचारकरून ताटात पडते अशी घट्ट बासुंदी....अहाहा महाराजा जिभेचं कैवल्य हो! दुसरं म्हणणं नाही. आता तुम्ही म्हणाल की यात वेगळं काही नाही सगळ्या घरगुती खानावळीत असंच घरगुती जेवण मिळतं. पण थांबा इतरत्र आणि सोमणकाकांचं भोजनालय यात एक मोठ्ठा फ़रक आहे.स्वत: सोमण जातीनं ताटं वाढत असतात आणि अगदी आगत्यानं जेवू घालतात. आग्रह करकरून जेवायला वाढणारा हॉटेलवाला मी तरी अजुनही कोठेही पाहिलेला नाही. (हे जर अनप्रोफ़ेशनल वागणं असेल तर मी म्हणेन काका तुम्ही असेच अनप्रोफ़ेशन रहा)खरं तर त्यांना हॉटेलवाला किंवा खानावळवाला म्हणणंच चुकीचं आहे. ते फ़क्त "वाडीचे सोमणकाका" आहेत. अर्थात काका या शब्दावर जाऊ नका तसे काका म्हणण्याइतके ते वयस्कर नाहीत पण हे प्रेमाचं संबोधन आहे.
गेल्या गेल्या दारातच "तुमची किती माणसं" असं चेहर्‍यावर हसू आणून विचारतात आणि मग सांगतात,"दर्शन झालं? नाही नां, मग दर्शन करून या तोवर तुमची पानं तयार ठेवतो." हे ही वेटिंगच पण सांगण्याची पध्दत किती घरगुती! लोकंही इकडे तिकडे न बघता, त्यांच्या दारातल्या कट्ट्यावरच मस्त गप्पा जमवून बसतात. आपला नंबर आला की पुन्हा स्वत: सोमण आपल्याला बोलवायला येतात. पानावर माणसं बसली की स्वत: वाफ़ाळता भात वाढत प्रत्येकाला आवर्जून पोटभर जेवायची "तंबी" देतात. "काका पोटभर जेवा. आधीच उशिर झालाय आता निवांत खाऊन घ्या", "ताई आजच्या दिवस डाएटिंग विसरायचं काय?","मावशी अहो ती बासुंदीची वाटी ताटाबाहेर काय ठेवलीय? घ्या ती ताटात. एका वाटीनं काही शुगर बिगर वाढत नाही. डॉक्टरला सांगू नका पाहिजेतर." "ए छोट्या दंगा बंद आता ताटात लक्श. आईला जेवून द्यायचं आणि ताटात काही टाकायचं नाही. आवडलेलं न लाजता मागून घ्यायचं" हे असं आग्र्ह करकरून ते शेवटच्या घासापर्यंत वाढत असतात. अखेर मन आणि पोट रल्यावर ढेकरासोबत "अन्नदाता सुखी भव"चा आशिर्वाद नकळत येतो. आजपर्यंत शेकडो, हजारोंनी दिलेल्या या पोटभर आशिर्वादामुळे सोमणांच्या दारापुढची रांग कधिही गेलं तरी कमी झालेली दिसत नाही.

तळ टीप- १-सगळं लक्ष जेवणात असल्यामुळे फ़ोटो काढायचा राहून गेला.
२-लेखाला समर्पक फ़ोटो न सापडल्यानं हा लावला आहे.
३-फ़ोटोवरून गैरसमज नसावा. लेखात वर्णन केलेलं जेवण प्रत्यक्षात जेवून आले आहे.
४-प्रकाशचित्र सौ.-one hot stove
 

टू इज (पसारा) कंपनी



सुट्टी म्हटलं की "आई आता काय करू" आणि "आई भूक" या दोन राक्शसांचा सामना करणं आलं. जरा पंधरावीस मिनिटं एखाद्या खेळात रमतील तर ते नाही. बरं यांचे खेळ म्हणजे ढीगभर पसारा. तो नंतर आवरता आवरेना असा प्रकार होतो. दिवसच्या दिवस पोरं घरात म्हणजे उच्छाद नुसता. त्यांचा तरी काय दोष म्हणा. आपणच त्यांना ढीगभर अटी घालतो, उन्हात खेळायचं नाही, सतत टीव्ही बघायचा नाही, दुपारच्यावेळेत उगाच कोणाच्या घरात घुसून दंगा करत बसायचं नाही मग सतत घरात बसून त्या बिचार्‍यांनी तरी काय करावं म्हणा. मग सुरू होते उचका पाचकी. हे उचक ते उचक असं करत खेळ रंगतात त्यानंतरचा तो पसाराआवरताना चिड चिड होते खरी, पण पोरं डोकेबाजपणानं खेळताना बघितली तरी काय मज्जा येते म्हणून सांगू. त्यातून पोरांना जन्माला घालताना "त्यानं" जणू काही क्रिएटिव्हीटीच्या नळाखालीच उभी केली होती, इतकी यांची डोकी चालतात. आपण दिलेल्या एका खेळातून पोरं जे विविध डोकेबाज खेळ खेळतात त्याला तोड नाही. आता हेच बघा नां सानू-शमुचं "फ़ार्म विले" किती रंगात आलंय. ताईबाईंच्या बरोबरीनं शमुडीसुध्दा कामाला लागलीय. समजत तर काही नाही पण हे उचक ते उचक करत अख्खी खोली खेळण्यानं भरून टाकून किती मदत करतोय बिचारा.


मॅकॅनोमधले ठोकळे वापरून ताईनं बैलगाडी बनवलीय. खेळण्यात बैलोबा नसल्यानं बिचार्‍या गाईला गाडीला जुंपलंय. एरवी कोल्ह्यांपासून शेताचं रक्शण करावं लागतं पण आमच्या शेतात मात्र कोल्हा, गाढव ही दोस्तमंडळी आहेत.
बैलगा्डीी सैर करायला शेतकरीणबाईंबरोबर त्यांचं बाळसुध्दा चालंलय. शेतकरीणबाई म्हणजे ताई (पुढे गाडी हाकणारी) आहे आणि मागे लंगोट घालून पहुडलेलं बाळ म्हणजे शमु आहे. गाडीत जो चाराआहे तो आंब्याच्या पेटीतून आणून आईला (पक्षी अस्मादिकांना)कामाला लावून भारा बांधलेला आहे.
इथंपर्यंतचा खेळ सौहार्दपूर्ण वातावरणात चालला होता पण शमुलाही खेळावसं वाटलं आणि ताईची बैलगाडी (नव्हे गायगाडी) अशी टांगा वर करून पडली. तिचा गोंधळ आणि याचं टाळ्या पिटत तिच्याकडे खिदळत बघणं यात फ़ार्मविले संपलं (एकदाचं आणि हुश्श)

 

आंबाआख्यान





काल झी वर लिमयेकाका आंब्यापासून घरी बनवायच्या रेसपिज दाखवत होते. "आंबा स्पेशल" एपिसोड असल्यानं हाताला लागेल ते पदार्थ आणि आंब्याची पेटी घेऊन आंबा स्पेशल सुरू झाली. पहिल्याचपदार्थात घालायला आपल्या हापूस सोबत ग्लासभर (छोटासाच ग्लास बरं का, ते पटियाला वगैरे नाही (पटियाला: कर्टसी: सिंग इज कींग:)) कसलंस मद्य, मिरच्या, नारळाचं दूध....बाई गं.....अहो हे पदार्थ पाहिले आणि वाटलं या सगळ्याच्या मिश्रणातन जे काही बनू पहातंय ते पहाण्यापेक्षा "पवित्र रिश्ता" बघायला काय हरकत आहे? गेला बाजार निदान सांस भी कभी बहू थी सुध्दा परवडेल.
मला नां कमालच वाटते लोकांची. म्हणजे निरनिराळे पदार्थ करून बघणार्‍यांची. करा की बाबांनो तुम्हाला कशात काय घालायाचं ते घालून काय हवं ते करा. पण या राजस फ़ळाचा हा असा पाण उतारा नका करू. ज्याच्या नुसत्या वासानं छातची निर्वात पोकळी भरून निघावी, ज्याच्या केवळ एका रसाळ तुकड्यानं जिभेचं कैवल्य व्हावं, ज्याच्या दर्शनानंही बेहोश व्हायला व्हावं (ज्याच्या दर्शनानंही किलोभर वजन वाढावं :() त्या आंब्यापुढे इतर पदार्थांची काय मिजास? ज्याच्या नुसत्या असण्यानच इतर घटक पदार्थांचा उ्ध्दार होतो तिथंयाच ्यात त्याच्यात मिसळून त्याला बिचार्‍याला बापुडवाणा का करून टाकतात कोण जाणे?
आईस्क्रीममध्ये आंब्याच्या फ़ोडी इथं पर्यंत ठीक आहे पण भातात आंबा, पिठात आंबा, दूध, दही दगड आणि माती. हे म्हणजे दिसला आंबा की घाल कशात तरी आणि बनव नवी पाककृती असं झालं.
हे असं भाता बितात आंबा घालून काहीतरी बनवण्यापेक्षा मला सोपी कृती माहितिय, मस्त वासाचा गोजिरा आंबा घ्यावा, तो धुवावा (बरं असतं पोरा टोरांना हायजिन बियजिन सांगायला), नंतर (जर पेशन्स असतील तर) सुरी घेऊन आंब्याचे अवघे दोन तुकडे करा(भारी नजाकतीचं काम आहे हो!) (पुन्हा पेशन्स असतील तर) डिश मध्ये हा आंबा घ्या, जवळपास कोणी नाही असं बघा आणि डोळे मिटून हाणा.(जास्तिची आणि अर्थात अगाऊ (पणाची) सूचना- कृपया आंबा खाताना, मोबाईल स्वीच ऑफ़ ठेवा आणि डोअरबेल बंद ठेवा)आंबा खायला इतका सोप्पा असताना त्याला ढवळायचा, शिजवायचा, थापायचा, बडवायचा....सांगितलंय कोणी? मुळात समोर घमघत असलेला आंबा ठ्वून असल्या पाककृती करणार्‍यांचंच मला कौतुक वाटतं. कोठून आणतात इतका पेशन्स वगैरे काय की. आम्हाला म्हणजे साधा पातेलंभर आमरस करायचा म्हटला तरी मनावर, उरावर, जिवावर जडशिळ धोंडा ठेवावा लागतो.आंब्याचा रस काढणार्‍या हातांना मनातल्या मनात हज्जारदा दटावावं तेंव्हा कुठे वाटीत आमरस पडतो. (सोप्पं नाही हं हेसुध्दा)
आजच्या घडीला मला विचाराल की, जगी सर्वसुखी असा कोण आहे? तर त्याचं उत्तर म्हणजे आंबा खाणार्‍यांना (खाऊ शकणार्‍या.) सर्वसु्खीचा किताब द्यायला हवा.
 

फ़ावल्या वेळेत


 

रब ने बना दी जोडी!!


आपल्या हिंदी सिनेमावाल्यांचा एक आवडता संवाद आहे, "जोडीया तो ऊपरवाला बनाता है". आपल्या आजुबाजुला नजर टाकली तर या (न वापरताच जन्मापासूनच गुळगुळीत असलेल्या नव्या पन्नास आणि पंचवीसपैशाच्या नाण्यासारखं)गुळगुळीत वाक्यामधली सत्यता वावरताना दिसेल. तो जो कोणी ऊपरवाला आहे त्याचं "मॅचमेकींग डिपार्टमेंट" सॉलिडच आहे. प्रत्येक नवरा-बायकोच्या जोडीत एक चंमतग सापडेल. म्हणजे नवरा कटकटी असेल तर बायको शांत. बायको पीर्पीर्र करणारी (पिरपिरची सुपरलेटिव्ह डिग्री) असेल तर नवरा कानात बोळे घालून वावरत असल्यासारखा. नवरा हौशी तर बायकोला चिंतांचा डोंगर उपसायला आवडत असणार.(रूकावट के लिए खेद है....)इथे उदाहरण पेरायचा मोह होतोय. लग्नाच्या एका वाढदिवसाला माझ्या ओळखितल्या जोडप्यातल्या नवर्यानं (अरे या नवर्या तला र आणि या योग्य पध्दतिनं लिहायची आयडिया कोणीतरी सांगारे हा नवरा दरवेळेस असा उमटताना पाहून कोण दु:ख होतंय) बायकोला सरप्राईज द्यायच्या उद्देशानं महागडा ड्रेस आणला तर तो पाहिल्यावर बायकोची पहिली प्रतिक्रीय होती-"अगं बाई, आता याला दरवेळेस ड्रायक्लिनला द्यावं लागणार, घरी धुता नाही येणार रे" (नवर्याच्या रोमॅंटिक गिफ़्ट्वर बायकोची इतकी वस्तुस्थितीनिष्ठ प्रतिक्रीया मी तरी अजून ऐकली नाही). बर्याच घरात (पक्षी घराघरात) उलट चित्र असतं. बायकोची महाप्रचंड हौशी असते आणि नवरा डोक्यावर लादी घेऊन वावरत असल्यासारखा थंड. पुन्हा एक उदाहरण पेरण्याचा मोह आवरत नाही. हे अर्थात अस्मादिकांचं आहे. मागे एकदा एका प्रदर्शनात लाकडी राजस्थानी झरोका मला जाम आवडला, म्हटलं घ्यायचा का रे? तर नवरा शांतपणानं म्हणाला, "अगं पण आपली खिडकी तर किती मोठी आहे". यावर त्याच्याकडे हा आला कुठून? असा कटाक्ष टाकून त्याला विचारलं,"तुला काय वाटलं हा एकच झरोका मी आपल्या घराच्या ऍक्च्युली खिडकीला लावणार आहे? बरं तसा लावायचा म्हटला तरी मग मी एकच घेऊया कसा म्हणेन? जितक्या खिडक्या तितके झरोके मागेन नां? पुन्हा आपण फ़्लॅटमध्ये रहातो हवेलीत किंवा स्वतंत्र बंगल्यात नाही. मग हा झरोका खिडकीला लावायला मला हवाय असं तुला वाटलंच कसं" यावर आधिच्याच शांतपणानं (वरून भोळेपणाचा वगैरे आव आणून) हा कसा म्हणतो,"काय नेम बाई तुझा. तुला कसली हौस फ़ुटेल (हो तो हौस फ़ुटली असंच म्हणतो) कोणी सांगावं. कोणत्या तरी साईवर घर सजवायचं काहीतरी पाहिलं असशिल तर मला कसं कळणार"? असो. तर काही जोडप्यात नवर्याला साहसकार्य आवडतं तर बायको आपली जिवाला भिऊन असते. म्हणजे बीचवर गेलं तरी हा आत आता चालत जातो आणि काळजाचे ठोके बिके चुकवत किनार्यावर स्वत:च्या चपला, पर्स आणि नवर्याचे कपडे सांभाळत बसलेली असते. एकाला गतिचं आकर्षण तर दुसर्याला संथ लयिचं, एकाला बोलायला आवडावं तर दुसर्याला गप्प रहायला. या सगळ्या विरोधाभासातसुध्दा एक छानशी लयच असते, म्हणून तर अशी दोन टोकं पकडून असणारी जोडपी वर्षानुवर्षं छान गुण्यागोविंदानं नांदतात. पाण्यात दूरवर चालत जाणार्या नवर्याला माहित असतं की किनार्यावर दोन डोळ्यातलं काळीज आपली अतीव काळजी करत बसलंय म्हणून तर एका टप्प्यावर पावलं किनार्याकडे वळतात. सतत चिंता करणर्या बायकोवर चिडत ती मोकळी व्हावी यासाठी नवरा तिला सुखाचे, आश्चर्याचे धक्के देतच रहातो. निरनिराळ्या हौसांचे (?) झटके येणार्या बायकांच्या नवर्याना ती हौस पुरवण्यात मजाही येतच असते फ़क्त अगं अगं म्हशीसारखा..... प्रकार असतो.
बघा जरा टाका आजुबाजुला नजर आणि शोधा अशा जोड्या.





(citra sau.-weddingabc.net)