पुरानी जिन्स

परवा घरी गेले तर वरुन एक मोठा खोका काढून त्यातलं तुला हवंय ते घे आणि बाकीचं टाक तरी आता असा पिताश्रीनी आदेश दिला. किती वर्षं सांभाळायचं हे? काय करता मग खोका उघडून बसले. ही माझी इस्टेट आहे. यात शाळेपासून कॊलेजपर्यंतचं अख्खं जग आहे. पत्ते कसे पिसतात नां तशा पिसून पिसून ठेवलेल्या आठवणी. माझी डोळ्यांची उघडझाप करणारी बाहुली, माझा सगळ्यात आवडता फ्रॊक, कसली कसली कात्रणं, पहिले पहिले छापून आलेले लेख, आवडती मासिकं, पत्रं, शुभेच्छापत्रं.....माझं कोवळं जग होतं त्या खोक्यात. हाताला एक डायरी लागली आणि पुढची उचकापाचक थांबवून डायरी उघडली. त्यात काय होतं हे माहित असूनही आणि असंख्यवेळा वाचून झालेली असूनही पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटणारी ती माझी डायरी म्हणजे माझ्या सगळ्यात सुंदर दिवसांची सोबतीण आहे. विद्यापिठात पूर्ण दोन वर्षं जिनं माझ्यासोबत घालवली ती माझी "सगुणा". तिचं नाव मी खरंच सगुणाच ठेवलं होतं. एक तर आकार इतका सुटसुटीत की घेउन फिरता यायची आणि तिचा इंचन इंच काही ना काही खरडून पावन केलेला होता. म्हटलं तर फुटकळ म्हटलं तर खुप काही उराशी बाळगुन असणारी.या माझ्या सगुणानं माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणिंची अक्शरं अजुनही जपून ठेवली आहेत. लेक्चर बोअर झालं की आम्ही यातून एकमेकाला निरोप पास करत असायचो. ती आमची संदेशवाहक होती. त्यावेळेस आम्हाला सगळ्यांनाच कवितांचा किडा चावलेला होता आणि चंद्र्शेखर गोखल्यांनी त्याला चाळवला होता. जे बोलायचं ते कवितेतच अस जणू नियम बनून गेला होता. त्यातले ते संदेश वाचत वाचत  किती लेक्चर मी परत ऐकली. एका पानावर कोणाचं तरी अक्शर होतं, चहाला जायचं का? पुढे उत्तर-कोण उदार होणार आहे? मध्येच कोणीतरी-ए मी पण कटात आहे, आज कोणाला तरी छान दिसावं लागणार त्याशिवाय चहा मिळणार नाही, कोणाला पकडायचं पण, शमाला सांग- तू चालू कर आम्ही सामील होतो, चालेल, हा पिरपिर गेला की बाहेर पडू, अरे पण आता बाईच लेक्चर आहे, असू दे की, प्रेझेंटेशनची तयारी करायला चाललोय म्हणून सांगू. चालेल. असा तो चहाकटाचा मसुदा इतक्या जणांच्या अक्शरात कोरला गेलाय की बहुदा त्या लेक्चरनंतर मॆडमना पटवून त्यांना बरोबर घेउनच आम्ही चहाला गेलोलो असणार.  होस्टेलवरच्या भयंकर जेवणावरही आम्ही कवीत केली होती, त्याला चाल लावली होती, हिची चाल तुरु तुरुची 
मेसमधून चालू झालेली कवीता बाथरुमपर्यंत गेलेली होती. डायरीच्या एका पानावर मार्शल कॆलुहानचं मॊडेल आणि त्याच्या शेजारीच विमान उडालं हा संदेश, म्हणजे हे मॊडेल कोणाच्यातरी डोक्यावरुन गेलेलं होतं. इतकंच नाही तर लेक्चर देताना कोणिही काहीही गंमतशीर वाक्य(म्हणजे आमच्या द्रुष्टिनं) बोललं की त्याची लगेचच नोंद होत असे. आमच्या वर्गात एक मुलगा होता. 
त्याचा आवाज किशोरकुमारसारखा होता, युथफेस्टिव्हलल आम्ही बसविलेल्या पथनाट्यात त्यानं सूत्रधाराची भुमिका केलेली होती. त्यात त्याला सतत गाणी होती, तिही टिपेच्या सुरात आणि लोकसंगीताच्या बाजात. एकदा रिहर्सल झाल्यावर आम्ही बसलो होतो आणि 
त्याला त्याचं आवडतं किशोर कुमारचं "पल पल दिल के पास" हे गाणं म्हणायला लावलं तर त्यानं चुकून त्याच सुरात म्हटलं. 
काय हसलो होतो, गडाबडा लोळायची वेळ आली. 
त्याचा बिचारयाचा आयुष्यभरासाठी ते गाणं म्हणायचा कॊन्पिडन्सच गेला. 
कोणीतरी हा ऐतिहासिक प्रसंग चुकवला  असावा कारण डायरीतून तो
असंख्य अक्शरात वर्णन झालेला होता. .....
कितीतरी आठवणी जाग्या झाल्या.....त्याच डायरीत शेवटी कॊलेज संपल्यावर
सगळ्यांनी आवर्जुन लिहिलेल्या एकत्र असतानाच्या आठवणी....
सगळंच पुन्हा कॆम्पसमध्ये घेउन जाणारं....
दोन वर्षांत घरची आठवण येउन कितीतरीवेळा रडले असेन; पण त्यानंतरघरी परतल्यवर, सगळ्यांच्या वाटा पसरल्यावर जितक्यावेळा
ती डायरी वाचली तितक्यावेळा डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.....त्याच डायरीच्या शेवटच्या पानावर कोणीतरी भावनाविवश होउन
 हे अखखं गाणं लिहिलं आहे, "पुरानी जीन्स और गिटार....यादे बस यादे रह जाती है...
कुछ छोटी छोटी दो बाते याद आती है..." मला ही जीन्स मनापासून आवडते कितिही पुरानी झाली तरी.:)) आय मिस यु ऒल.....:(
 

मैत्री बित्री सब झूठ

किती दिवस झाले काही लिहिलं नाही कारण काही लिहावसं वाटलं नाही. मनात असुनही....आपण आपली मानलेली माणसं जेव्हा आपल्याला फाट्यावर मारतात तेव्हा चीड येते. का वागतात अशी माणसं? मैत्रीतही जेव्हा कोणी कॆलक्युलेशन्स बघतं तेव्हा तर संताप संताप होतो. अरे? तुम्हाला गरज असेल तेव्हा आम्ही आमची कामं टाकून तुमच्या मदतिला धावायचं आणि गरज संपली की मात्र तुम्ही लगे़चच आपल्या कोशात शिरायच? मला सतत असे अनुभव आल्यानंतर आता वाटायला लागलंय की कदाचित मीच माणसं ओळखायला चुकतेय का? सहज समोरच्यावर विश्वास टाकून मैत्रीत गुरफटतेय का? समोरचा आपला फायदा करुन घेतोय हे समजत असुनही स्वत:ला आवरता येत नाही म्हणून स्वत:चाच राग येतो कधी कधी. का असतात माणसं अशी. आहात नां तुम्ही कॆलक्युलेटेड मग रहा नां तुमच्या घरात बंद. आधी मैत्रीचं नाटक करायचं, गोड गोड बोलायचं, मी खुप नशिबवान की मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून भलावण करायची आणि आपलं काम झालं की पाठ फिरवायची. अशा माणसांना एकांतवासाचा शापच मिळायला पाहिजे. म्हणजे हे असे समोरच्याचा फायदा घेणार नाहीत. कधी तरी कोणी तरी असा घाव देउन जातं आणि मग मैत्रीवरचा विश्वासच उडतो. मैत्री बित्री सगळं झूठ आहे. खरं तर अशी सगळी नातीच खोटी आहेत. आहे तो फक्त फायदा. जो तो इथे स्वत:चा फायदा फक्त बघत असतो. एखाद्या पासून काहीच फायदा नसेल तर त्याच्याशी मैत्री सोडाच; पण तोंडओळखही कोणी ठेवत नाही आणि एखाद्याची आपल्याला गरज पडू शकते हे ल़क्शात आलं की त्याला जोडून ठेवलं जातं. अशा माणसांना मिळतातही माझ्यासारखी मैत्रीवर विश्वास असणारी मूर्ख माणसं.
 
 

प्रुथ्वीच्या आत काय असतं गं आई?

काल लॆपटॊपवर काम करण्यात गुंग असतानाच मागून अचानकच प्रश्न आला, "दुनियाच्या आत काय असतं गं आई?" मी मागे पाहिल,ं इतकं सुंदर मराठी आमच्या घरात एकच माणूस बोलतं आणि ते बोलतं कमी प्रश्न जास्त विचारतं. शक्यतो आम्ही चिलखतं घालूनच वावरतो. कारण कधी प्रश्नांचा मारा चालू होईल सांगता येत नाही पण गनीम कधी ना कधी खिंडीत सापडणारच नां? तर आजही मला बरचसं काम हातावेगळं करायचं असल्यानं मी या "प्रश्नासुराला" तिच्या आवडिची पुस्तकं पसरुन दिली होती, तिच्या आवडत्या सिडी बाहेर काढून ठेवल्या होत्या, भातुकली मांडून दिली होती आणि खाऊही दिला होता शिवाय हंगामा लावून दिलं होतं आणि कधी नव्हे ते चक्क शिनचॆन बघायची परवानगी दिली होती. काहीही कर पण दोन तीन तास शांतता दे बाई असा या तयारीमागचा हेतू होता. मला काही काम होतं म्हणून मी प्रुथ्वीच्या अंतरंगाची चायाचित्रं असणारं संकेतस्थळ उघडलं होतं. त्यात पथ्वीचं चायाचित्रही होतं. आणि मी हे करत असताना नेमका शिनचॆनमध्ये ब्रेक आला होता. गनीम बरोबर प्रश्नासुराच्या तावडीत सापडला. त्यात परवा सुट्टीत नेहरु प्लॆनेटोरियमला भेट झाल्यानं बेसिक नॊलेजमध्ये मोलाची भर पडली होतीच. तर हा वर सांगितलेला प्रश्न सटकन आल. करता काय. काम बाजुला ठेवलं आणि तयारीत बसले कारण आता किमान अर्धा तास तरी भुगोलापासून खगोलशास्र्त्रापर्यंतच्या व्हायवाला तोंड द्यावं लागणार होतं. शिवाय आदर्श बालसंगोपनावर नितांत विश्वास असल्यानं मुलांच्या जिद्न्यासा मारायच्या नाहीत हा नियम घालून घेतलेला. इथं तर फाजिल चौकशा नव्हत्या. मग वयवर्ष साडेचारच्या मेंदुला झेपेल इतपत सोप्या भाषेत प्रुथ्वी कशी असते हे समजावून झालं. हाताशी इंटरनेट होतंच म्हणून सरळ चार दोन संकेतस्थळं उघडली आणि तिला सूर्यमंडलाची माहिती दिली. सगळ्या ग्रहांशी ओळख करुन दिली त्यातली आपली प्रुथ्वी म्हणजे प्रश्नासुराची "दुनिया" तिनं लग्गेच ओळखली. माझ्या प्रेमाला मग उधाणच आलं. मनाशी ताडल्याप्रमाणं तासभर व्हायवा झाला आणि शंकासुराच्या शंका कमी झाल्या. मला अलिकडे या प्रश्नांना थोपवायचा अक्सीर इलाज सापडला आहे. बेसिक माहिती दिल्यानंतर मी तिला सांगते तू बिग होशील आणि फर्स्ट मध्ये किंवा सेव्हन्थमध्ये जाशील तेव्हा टिचरच हे सगळं तुला शिकवतील. तुम्हाला बुक देतील नां त्यात हे सगळं असतं. याचा दुहेरी फायदा होतो. एक तर शाळेच्या आणि होमवर्कच्याबाबतीत काही कटकट रहात नाही कारण लवकर मोठ्ठं होउन सेव्हन्थमध्ये जायचं असतं नां? आणि दुसरा फायदा म्हणजे शंका कमी होतात. सगळं झाल्यावर मला अचानकच आठवलं की मी साधारण दुसरी तिसरीला असताना आईला असंच प्रुथ्वी कशी असते हे विचारुन भंडावून सोडलं होतं. आई शिक्शिका असल्यानं तिनं मला छान समजावून सांगितलं. शेवटी हे ही सांगितलं की प्रुथ्वी गोल असते. शाळेत नेउन मॊडेल दाखवलं. हे सगळं मला जाम नवं होतं. मला आजही शंका आहे की जर प्रुथ्वी गोल आहे तर आपल्याखाली असणारी(म्हणजे चेंडुच्या दुसर्या उलट बाजुला असणार्या देशातली माणसं) उलटी पडत कशी नाहीत? म्हणजे ती माणसं खाली डोकं वर पाय अशी उभी आहेत का? शेवटी मी आईला म्हटलं की,"आई गं, मला धावत जाऊन प्रुथ्वीच्या खाली वाकून बघायचंय" आई म्हणाली,"जा हं. मोठ्ठी झालीस की जा. म्हणजे वाकून बघताना पड्णार नाहीस" आजही सगळं पुराण ऐकून झाल्यावर प्रुथ्वीच्या पोटात काय काय असतं याची यादी ऐकल्यानंतर शंकासूरानं अखेरची घोषणा केली,"आई आपण आपल्या किचमधला नाईफ घेउन दुनिया चिरुन पाहुया का आत काय आहे?" पहिल्यांदा दचकलेच. म्हटलं डायरेक्ट चिरफाडीची भाषा? पण मग हसायलाही आलं. म्हटलं चिरुया हं पण आता मला जरा काम आहे नां, ते झालं की मग किंवा सण्डेला करुया का? तर शंकासूर टाळ्या वाजवून म्हणाला"हे ढिंक टिका. मस्त चालेल. सण्डेला मॊलमध्ये जाउया नको, त्यापेक्शा हे काम करु. आणि आत्ता बाबुपण झोपलाय नां? तो उठला की त्यालाही ही आयडिया सांगुया का?" कपाळाला हात लावायचा राहिला. इतक्यात परत शिनचॆन लागलं आणि गनीम सुटला. कधी नव्हे तो शिनचॆन लागल्याचा मला जाम आनंद झाला.
 
माझ्याच आमचा तो बाब्याचा हा संक्शिप्त उतारा.
 

आमचा तो बाब्या

आमचा नां एक बाब्या होता. म्हणजे कोणी छोटा मुलगा नाही तर आमचा बाब्या नावाचा एक बोका होता. या बाब्याचे एक एक प्रताप म्हण्जे एक एक किस्सा आहे. या बाब्याला एक विचित्रच सवय होती तो चक्क कपडे खायचा. म्हणजे उंदरानी कपडे खाऊन वात आणल्यामुळं याला पाळलं तर यानं उंदरांना व्ही आर एस देउन ते काम आपल्याकडेच घेतलं. उंदीर, झुरळं याच्या मिशीसमोरुन जायची पण हां त्यांच्याकडे "हुंगुनही" पहायचा नाही. त्यानं आपल्या राज्यात सगळ्यांना अभय दिल्यानं सगळे किटक-प्राणी आमच्या घरात निर्भयपणानं वावरायचे. एकदा तर यानं कमालच केली. झालं काय की शेजारच्या पाटलांच्या दीपकनं पॆंटच्या खिशातून अंडी आणली होती, त्यातल एक फुटलं म्हणून त्यानं पॆंट धुवायला टाकली, तेव्हढ्या वेळात हा तिथे गेला आणि मागचा तो खिसाच त्यानं कुतरडला. ती पॆंट नंतर टाकवेनाही आणि घालयचिही पंचायतच नां? आम्ही एकदा जेवत असताना हा आपला शांतपणानं रगात डोकं खुपसून झोपला होता. आम्हाला वाटलं की बिचर्याला थंडी वाजत आहे म्हणून झोपला असेल. जेवणं झाली, सगळी आवरा आवर झाल्यावर अंथरुणं घालून आम्ही झोपायला गेलो तर अंधारात बाबांचा जोरात आवाज आला,"बाब्या<<<" आम्ही सगळे दचकून उठलो आणि खटाखट लाईट लावून काय झालं म्हणून बाबांकडे पहायला लागलो, समोरचं द्रुष्य पाहून एक क्शण सगळे चुपचाप उभे होते आणि मग बाबांसहित सगळेच खो खो हसायला लागले. 
बाब्यानं कुरतडलेल्या रगाच्या ताज्या ताज्या भोकातून बाबांचा रागीट चेहरा बाहेर डोकावत होता. ते द्रुष्य कमालिचं विनोदी होतं. आजही ते ऐतिहासिक रग आमच्याकडे आहेत. 
त्यांचं काय करावं न सुचल्यानं बरेच महिने ते तसेच पडून होते. 
मग मोठ्या भावाला एक कल्पना सुचली 
आणि त्यानं त्या दोन फाटक्या रगांचा मिळून एक धड रग बनविला. 
आजही घरी येणार्या पाहुण्याला तो रग दिसला की ते हमखास प्रश्न विचारतात,"अरेच्चा! हा रग असा काय?", मग त्याला बाब्याचं सगळं पुराण सांगावं लागतं. 
हे ऐकल्यावर पुढचं वाक्यही प्रत्येक पाहुणा न चुकता बोलतो,"अरेच्चा? मग तुम्ही त्याला इतके वर्ष घरात ठेवलंच कसं?" आता तुम्हीही सांगा आपल्या घरात जर असा व्रात्य बाब्या असेल आणि
 तो आपलाच मुलगा असेल तर त्याला आपण सोडून देतो? मग या बाब्याला तरी कसं सोडणार?  
या आणि त्या बाब्यात फरक असेलच तर इतकाच आहे की आमच्या बाब्याला दोन पाय जास्त होते आणि हो एक शेपुटही होतं. म्हणून काय झालं? तो "आमचा बाब्या" होता. 
एक दिवस बाहेर भटकायला गेला तो परत आलाच नाही.
 

आता आठवतही नाही......

आज पुन्हा आभाळ भरुन आलंय
अगदी त्या दिवशीसारखंच
तसंच गच्च दाटून आलेलं....

मागे वळून पाहिलं तेव्हा समजंलच नाही
नभ बरसतायत की डोळे
पापणीवर ट्पोरी फुलं होती उमलली
गालावरुन वहात होतं ते पाणी की अश्रु?
आता आठवतही नाही...

रस्ता पुढे होता, पावलं मात्र मागेच रेंगाळली
तुझ्या हातात गुंफलेली बोटं सुटली तरी कधी?
तुझी पाठमोरी सावलीही मला माझी भासत होती
वळून पाहिलं होतंस कां रे एकदा तरी...
आता आठवतंही नाही...
आजही पुन्हा तसंच दाटून आलंय आभाळ....गच्च

तुलाही आठवतो का तो दिवस?
गच्च अंधारलेल्या भर दुपारी
घेतला होता निरोप.....
काय म्हणाला होतास त्यावेळी
आता आठवतही नाही...
ओठ थरथरले होते ते कशानं
दाटलेल्या हुंदक्यानं की
शब्दांनी साथ सोडल्यानं
काहीच आठवत नाही.....

आज पुन्हा एकदा सगळं आठवतंय
अंधुकसं....त्या दिवशिच्या दुपारसारखं
कारण आजही आभाळ तसंच आहे गच्च दाटलेलं....