गोष्ट तशी जुनी, सिनेमा शिकण्याच्या दिवसातली

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आतासारखं इंटरनेट आणि गुगल नावाची हुकमी हत्यारं सोबत नसण्याचा नव्वदीचा काळ. पत्रकारिता आणि संवादशास्त्र असं भारदस्त नाव असणारा पीजी कोर्स करत असण्याचा काळ. अनेक विषयांतून एक स्पेशल सब्जेक्ट निवडायचा होता. तोपर्यंत जनसंपर्क आणि जाहिरात हेच आपल्याला आवडतं हे ठामपणानं माहित होतं आणि त्यातच स्पेशलायझेशनही करायचं होतं. मात्र, पहिल्या वर्षी हळूच हा सिनेमा नावाचा विषयही आला. हळूहळू यात गोडी वाटायला लागली. सिनेमा शिकायचा असतो, जे दिसतं त्यापलिकडेही सिनेमात बरंच काही असतं जे आवर्जून शिकलं पाहिजे असं वाटायला लागलं. मग जनसंपर्क मागे पडून स्पेशलायझेशनला फ़िल्म घेतलं. सुरवातीचे रोमॅंटिक दिवस लगेचच उतरले कारण या विषयावर भरपूर काही शिकवतील अशी पुस्तकं मराठीत नव्हती आणि त्या काळात आपल्याला इंग्रजी झेपतच नाही असा ठाम न्यूनगंड होता. आमच्या डिपार्टमेंटचा जीवही तसा छोटाच होता आणि सिनेमा शिकणारे विद्यार्थी तर त्याहून कमी. पहिल्या वर्षी चारजणं होतो आणि मास्टर्सला तर मी एकटीच. तोकडे संदर्भ आणि मर्यादित लायब्ररी या बळावर सिनेमा शिकताना थकायला व्हायला लागलं आणि खरं सांगायचं तर गंमतही वाटत होती. एक असा विषय जो खरं तर आयुष्याचा जवळपास अविभाज्य भाग होता पण तो शिकायला संदर्भच नव्हते पुरेसे. पहिल्या वर्षी तर फ़िल्म शिकविणार्‍या फ़ॅकल्टिचाही आनंदच होता. एकतर बरेच आठवडे कोणी नव्हतंच. मग एक सर येऊ लागले. शिकवणं कमी आणि गप्पा जास्त होत्या. हळूहळू कळलं की सरांनी जॉकी नावाच्या एका मराठी मालिकेत एक्स्ट्राचं काम केल्याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. मग लक्षात आलं की आता इथून पुढे आपलं आपल्यालाच या विषयाला भिडलं पाहिजे. जिथून जे मिळेल ते वाचण्याचा सपाटा लावला. पुढच्या वर्षी मात्र कुंडलीतले ग्रह चांगले जोरावर होते. अनुभवी, अभ्यासू नारकर सर फ़ॅकल्टी म्हणून मिळाले. खरं सिनेमा शिकणं इथून सुरू झालं. तुलनेनं छोटा आवाका असणार्‍या छोट्या शहरातल्या एका छोट्या डिपार्टमेंटमधल्या एकुलता एक विद्यार्थी असणार्‍या या वर्गाला सुरवात झाली. अंधार्‍या खोलीतल्या पडद्यावर दुनियाभरातल्या सिनेमांचे तुकडे दाखवत सर सिनेमाची भाषा शिकवायला लागले. ही नवी वर्णमाला खूपच अमेझिंग होती. आतापर्यंत जे शिकलो त्याहून वेगळं काहीतरी शिकतोय आणि असं काहीतरी शिकणारे आपण इथे तरी एकमेव आहोत हे जाणवून लई भारीवालं फ़िलिंग यायचं. 😉 
सत्यजीत रेंचे सिनेमे पूर्वी दूरदर्शनवर रविवारी दुपारी लागायचे ते त्या वयात बहुतेकदा रटाळ वाटुनही पाहिले होते. एकाच संथ लयीत चालणारे ते सिनेमे कधी संपणारच नाहीत असं वाटत असायचं. कळायचं तर ओ की ठो नाही. पण मोठ्यांच्य बोलण्यातून रेंच्या बद्दलचा आदर ऐकून वाटायचं आपण नक्कीच काहीतरी वेगळं आणि ग्रेट बघतोय. मला समोर जे चाललंय त्यातलं काहीएक कळत नाहीए हे सांगायला संकोच वाटायचा आणि मग तास न तास नुसतेच डोळे रुतवून त्या छोट्या पडद्याकडे बघत बसण्यावाचून पर्याय नसायचा.
आता आमच्या या दगडी भक्कम इमारत असणार्‍या या ह्युमॅनिटी डिपार्टमेंटमधल्या दुसर्‍या मजल्यावरच्या त्या थंड अंधार्‍या वर्गात बसून पुन्हा रेंचे सिनेमे बघताना नजर बदलली होती. हळूहळू सिनेमा कसा बघायचा, हे कळत चाललं होतं आणि लहानपणी रटाळ वाटलेला तोच सिनेमा आता काहीतरी वेगळीच अनुभूती देत होता. सिनेमा चालू असताना मधेच तो पॉज करून सर बोलायला लागयचे. प्रत्येक फ़्रेम समजावून सांगत अमूक असंच का आणि तमूक तसंच का, हे स्पष्ट करायचे. सरांच्या तासाला बेल नव्हती हे एक बरं होतं, कारण बोलत राहिले की सर बोलतच रहायचे. मग मधेच भानावर येत, "अंम, चला पुढे", असं म्हणत पॉज मोकळा करायचे.



सिनेमा शिकायचे दिवस भाग एक
 

0 comments: