उन्हाच्या तलखीत भाजून निघत असताना अचानकच गार वारा सुटतो.....पावसाचा गंध वाऱ्यावर बसून अलगद अंगणात उतरतो.....लहानपणी अशी हवा आली की वाऱ्यावर उडणारे भुरूभुरू केस आवरत आणि उगाचच फ़ुटणारं खुदुखुदु हसणं अंगणभर शिंपत, गोल गोल राणी म्हणत आम्ही अंगणात फ़ेर धरत असू तर वडिल माणसं आकाशाकडे मान वर करून बघत अंदाजानं एखादी दिशा पकडत आणि म्हणत, ’पाऊस पडलेला दिसतोय कुठेतरी’....आता अशी हवा गॅलरीतून हळूच टु बीचके च्या भिंतीमधून झुळझुळते आणि दुसऱ्याच क्षणाला वॉटस ऍपवर समजतं कोणत्या शहरातल्या कोणत्या गल्ल्यांमधून पाऊस कोसळतोय :) आजही अशीच पावसाळी हवेची गार संध्याकाळ अचानकच पसरली आणि इतकं छान वाटलं....घराबाहेर पडलं तर बहावा आपलं इंग्लीश नाव सार्थक करून समाधानानं डुलत होता....रस्ता भरून सोनेरी पाकळ्यांचा सडा पडलेला होता. निसर्गाचं किती बरं असतं नां, तो देतो त्या मापात पाप नसतं...भरभरून फ़क्त देणं आणि देणंच् त्याला माहित असतं.....आता रस्त्याच्या कडेनं सावलीची पालखी धरून उभा असलेला बहावा....रस्त्याच्या दोहोबाजूंनी उभ्या असणाऱ्या या झाडाचं नाव खरं तर अनेक वर्षं मला माहितही नव्हतं....बहावा माहित होता....त्याची माहिती होती पण वाटेत सोन्याच्या पायघड्या पडलेल्या असताना मात्र मी माझ्याच घड्याळाला बांधलेल्या कासऱ्यानं गरगर धावत होते आणि आज त्यानं माझ्या पावलांखाली हे सोनं उधळलं होतं.......आपले डोळे उघडतातच की कधीतरी....माझेही उघडले......किती वर्षं तुझ्याकडे न पहाताच धावले रे मी या सड्यावरून.... म्हणून मन कळवळून आलं......शांतपणानं समोर पहुडलेला रस्ता, त्याच्या दोहो बाजूंनी उभी बहाव्याची छत्री आणि त्यानं मनसोक्त शिंपलेला सडा....त्यानं आज नमवलंच अखेर.....सगळं विसरून मग रस्ताभर नुसतीच फ़िरून आले....तो ओला वारा, ती सोनेरी संध्याकाळ आणि मनात झिरपलेली शांतता.....थॅन्क्यु रे बहाव्या....!
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
Mast!
Masta !
Khup chan
Mast...
Mast...
Post a Comment