हा घ्या टॅग

बरेच दिवस अंबानिंच्या कृपेनं नेट बंद होतं...मध्ये एक दिव जरा धुकधुकी दिसल्यावर ब्लॉग तपासला तर मला टॅगलेलं दिसलं. त्याची उत्तरं "टायपून" "पोस्टेपर्यंत" दोन दिवस गेले. तर मंडळी १ जानेवारीला लिहायला घेतलेलं आत्ता पूर्ण करून प्रसिध्द करतेय (टाळ्या).

....................................................................................


1.Where is your cell phone?

हा प्रश्न ज्यानं तयार केलाय त्याचा मला भयंकर राग आलाय....नवरा चोविस तासात चोवीस हजार वेळा हाच प्रश्न विचारून जीव नको करतो....परत इथेही त्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं? :( असेल बापडा कुठेतरी हॉलबिलमध्ये....किंवा आत बेडवर....किंवा किचनच्या ओट्यावर....बाथरूममध्ये?....बहुतेक टेरेसमध्ये राहिला असेल...किंवा पर्समध्येच असेल, काल बाहेर काढायचा विसरला असेल आणि पर्स मात्र जागच्याजागी म्हणजे कपाटात असेल......किंवा...जाऊदे वाजला की समजेल कुठे आहे ते. विचार करणे न लगे!

2.Your hair?

मस्त काळेभोर आहेत आणि काल रात्री ताजे ताजे बरंगडी झालेत. न्यु इयर साजरं करायला गेलो होतो तिथे केसांवर कलर स्प्रे मारणारा माणूस होता. मग काय उत्साहात बरगंडी कलर फ़वारून घेतला फ़ुकटात. (आता तो धुवायचं काम वाढलं....)

3.Your mother?

..........माझ्या आठवणीत....नेहमीच.....

4.Your father?

....मी लहान असताना सुट्टीसाठी एकही दिवस कुठे पाठवायचे नाहीत आणि आता फ़ोन करायलाही आळस करतात....आमची जाम भांडणं होतात यावरून. पण माझ्या सारख्या मुलिला जन्म दिला यातच त्यांचं सगळं मह्त्म्य आलं की!!!

5.Your favorite food?



कुरकुरीत डोसा...नाही नाही फ़्लपी इडली....गरमागरम वरणभात...शाबुदाण्याची लुसलुशीत खिचडी...गावोगावी मिळणारे सुप्रसिध्द अस्सल टपरीछाप वडापाव.....डॉमिनोजचाच पिझ्झा.....

6.Your dream last night?

मला स्वप्न डेलीसोपसारखी पडतात म्हणजे कालच्या स्वप्नाचा पुढचा भाग आजच्या स्वप्नातसुध्दा दिसतो. पण एक स्वप्न मात्र कित्येक वर्षं पडतंय आणि दरवेळेसच मी तितक्याच तत्परतेनं "नाही नाही हे खरं नव्हतं स्वप्न होतं" असं स्वत:ला समजावत जागी होते. ते स्वप्न म्हणजे उद्या अमूक ढमूक पेपर आहे (जास्त करून तो पेपर इको किंवा ओसीचा असतो) आणि माझ्याकडे त्याची एक ओळही लिहिलेली नाही. मला अर्थात घाम फ़ुटलेला आहे. (हे स्वप्न नवरयाला सांगितलं की तो म्हणतो वेळच्यावेळेस अभ्यास केला की अशी स्वप्न पडत नाहीत. करायचा त्यावेळेस इमानदारीत अभ्यास केला नाहीस आता भोग फ़ळं)

7.Your favorite drink?

सोलकढ, सोलकढी आणि सोलकढीच. इथे नो कनफ़्युजन.

8.Your dream/goal?

भरपूर खर्च करूनही नवरयाचा बॅंक बॅलन्स इनटॅक्ट ठेवायचा.(कठीण आहे नां)


9.What room are you in?

टेरेसमध्ये...अंबानिंच्या किरपेने....घरात कनेक्टिव्हिटी नाही फ़क्त टेरेसमध्ये आहे....तन्वीनं आळशी म्हणून डिवचल्यामुळं चांदण्यात बसून लिहितेय...


10.Your hobby?

सतत बदलत असते पण तरिही बडबड करणे……………..

(सेम पिंच तन्वी...:))

11.Your fear?
अजिबात तयारी नसताना परत एकदा इकॉनॉमिक्सचा पेपर सोडवावा लागणार आहे.....

12.Where do you want to be in 6 years?
माणसांतच.

13.Where were you last night?
आता याचं उत्तर काय द्यायचं? रोज रात्री सभ्य माणसं आपापल्या घरातच असतात नां? (म्हणजे असावीत बहुदा)
14.Something that you aren’t?
फ़ुकटची मुजोरी सहन करू शकत नाही
15.Muffins?
ही भानगड माहित नाही

16.Wish list item?
साऊथ अमेरिका बघायचीय.

17.Where did you grow up?
सांगली

18.Last thing you did?
डायपर बदलला

19.What are you wearing?
गडद पिंक आणि फ़िका पिंक (शी ही काय भाषा झाली????असो. भावना समजून घ्या)

20.Your TV?
सध्या माझ्या कुंकवाच्या मातेचा मुक्काम इथे असल्यानं हर्षवर्धन आणि त्याच्या बायका, अर्चना आणि मानव, लाली, छोट्या, मोठ्या मधल्या, धाकल्या "बहू" थोडक्यात जे जे तापदायक ते सगळं ठणठणा लागतंय, मध्ये मध्ये फ़िलर म्हणून कितरेत्सु, शिनचॆन, मारूकोचेन, मि. बीन ही तापदायक मंडळी आहेतच.

21.Your pets?
नायबा. एकेकाळी कबुतर, माकड, ससा असे प्राणी पाळून झालेत. माकडाच्या एपिसोडनंतर असले प्रकार अजिबात बंद केलेत.

22.Friends?
चिक्कार आहेत. जवळचे म्हणजे अगदी खासमखास अगदी मोजके आहेत पण मित्रमंडळ म्हणाल तर तोटाच नाही. अगदी शाळेपासूनच्या सगळ्यांसोबत आजही व्यवस्थित संपर्कात आहे.

23.Your life?
मस्त आहे की! (कामवाल्या अलिकडे न सांगता फ़ारच दांड्या मारतात ही एक गोष्ट सोडली तर)


24.Your mood?
नेहमिच छान असतो मात्र बिघडला की समोर असेल त्याची धडगत नाही. (तशी मी प्रेमळ बिमळ आहे पण कोणी पंगा घेतला तर मग नादच करायचा नाही....)

25.Missing someone?
हम्म....माझा पुण्यातला सगळा ग्रुप. गेले ते दिन गेले.....टी ब्रेकमध्ये चना जोर गरम खाऊन यायचो ते तर जास्तच मिसिंग. प्रतिभा, आरती, चंद्रन, कौस्तुभ, संगिता (चरचरीत फ़ोडणिची अंबाडीची भाजी, आय लव्ह यु संगिता.), पिल्लू पराग....सगळे सगळे.....

26.Vehicle?
आहे नां मग , काळी काळी कुळकुळीत इंडिका (आम्ही तिला प्रेमाने बिप्स म्हणतो)

27.Something you’re not wearing?
पट्ट्या पट्ट्याचा नाडी लोंबकळणारा लेंगा

28.Your favorite store?
असं काही नाही. मी शॉपोहोलिक आहे (गर्व से कहो हम हिंदू है च्या सेम टू सेम चालीवर) त्यामुळे कॉर्नवरच्या भैय्याच्या छाटछूट किराणामालाच्या दुकानापासून चकाचक ब्रॅण्डेड दुकानांपर्यंत कुठेही "शॉपू" शकते. असं फ़ेव्हरीट बिवरीट काही नाही.

29. Your favorite color?
पिच, मिल्की पिंक, मस्टर

30.When was the last time you laughed?
हे काय आत्ताच दहा मिनिटांपूर्वी

31.Last time you cried?

आज दुपारीच. दातसुध्दा न फ़ुटलेल्या लेकाला भरवताना त्यानं क्रेयॉनचा पुठ्ठा, खेळण्यातल्या सश्याचा कान, गिफ़्ट रॅपरचा तुकडा असं सगळं तोंडात घालून दाखवलं पण खपून केलाला पेज नावाचा पदार्थ फ़ुर्रकन माझ्या तोंडावर (थोबाडावर म्हणू का?) उडवत तो माझ्या कमाल उष्णतेची मोजदाद करत होता. (म्हणजे खरं तर रडणं हा तसा दैनंदिन कार्यक्रम आहे. दोन दोन पोरं शिफ़्टमध्ये या ना त्या कारणानं रडवतच असतात.)
32.Your best friend?
ऑफ़कोर्स नवरा. प्रचंड सहनशिल मित्र आहे माझा. ऑफ़िसमधल्या गोष्टींपासून सटर फ़टर गॊसिपपर्यंत सगळं सहनशिलतेनं ऐकतो वेळप्रसंगी त्यावर सल्ले बिल्लेही देतो.
33.One place that you go to over and over?
प्रशांत पाणीपुरीवाला
34.One person who emails me regularly?
ऑर्कुवरची बरीच मंडळी नियमितपणानं फ़ॉरवर्डस पाठवत असतात बाकी रोज म्हटलं तर ऒफ़िसवालेही करतात.
35.Favorite place to eat?
पुण्यातलं मथुरा, ठाण्यातलं कोर्टयार्ड


आता मी कोणाला टॅगु? कोई है क्या????
 

15 comments:

Unknown said...

मस्त गं एकदम सही झालाय टॅग..........फोनचे उत्तर, नवऱ्याची सोशिकता समदं शेम टू शेम....
आहे गं बाई म्येंदू लय शेम आहे.....
(अर्थात तो आहे हे त्या आपल्या गणितांसारखे मानायचे आधि ....आधि असा काही अवयव आपल्या शरिरात डोक्यात{गुडघ्यात नवे} आहे असे मानू...मग पुढचे सोडवू...........)
माझा नवरा मला या मुद्द्यावर अतिगोड गैरसमज म्हणतो....आणि लेक सांगते जाउ दे मम्मा त्याच्याकडे लश्क नको देउ......

जबरी झालाय टॅग...म्हणजे मी आळशी म्हणाले की तुम्ही कामाला लागता तर...हरकत नाय...अब ये अपना जबाबदारी है!!!!!!!!!!!!!!

अनिकेत said...

ऑसम, सही लिहीलं आहेस, प्रत्येक उत्तर आवडलं

आनंद पत्रे said...

काय जबरी लिहिलेय!
प्रत्येक उत्तराला हसुन हसुन मुरकुंडी वळली....
मस्त!

अपर्णा said...

मजा आली हं वाचायला...तुझं माझं १८ नंम्बर शेम टू शेम हाय.........आणि बाकी सगळी उत्तर पण जबरा आहेत...:)

शिनु said...

@ tanvi

धन्यवाद....आपण दोघी शेम म्हणजे नवर्यांची सोशिकतापण शेमच आली ्की.....:)

शिनु said...

@ अनिकेत
धन्यवाद तुमच्या ्प्रतिक्रीया उत्साह वाढवतात.


@ aanad
धन्यवाद

संवेदना said...

सही लिहलय ग.तु सांगलीची का?मी मिरजेत होते दहावीपर्यँत.

शिनु said...

@ संवेदना

धन्यवाद. your responce means a lot. keep reading


मी सांगलीचीच. पण मिरजेशीही कनेक्शन घट्ट आहे. तू मिरजेत कोणत्या सालात होतीस? मेल कर.

शिनु said...

@ अपर्णा

धन्यवाद. तन्वीबरोबरच आता आपलंपण सेम पिंच

keep reading

Lakshmi -Celebrations said...

Hi shinu,
Came to your blog through colors dekor.Interesting blogs you have and all of them in marathi.love the language marathi coz i studied in pune and even if i hear it ,memories of my college days come running to me .goodwork.keep it up.

शिनु said...

@ Lakshmi

hi, it's really pleasure to me that u liked my blog. thanx, your suggetions are always welcome. Keep reading.

कृष्णा.....घोडके said...

फारच छान लेख लिहला आहे .तुझा ब्लोग सुद्दा आवडला,खुप सुंदर सजावला आहे.

शिनु said...

@ Kalpana


:) thanku. keep reading

भानस said...

सगळीच उत्तरे मस्तच आहेत. ते," TV-सध्या कुंकवाच्या मातेचा मुक्काम..." भन्नाटच. हाहा....आणि ती कार्टुन मंडळीही जबरीच बॊ... अग हळूहळू ते डेक्सटर, पॊवर पॊप गर्ल्स आणि कोण कोण येतील आणि असे काही डोके उठवतील.... तयारीत राहा गं.:) अग तू ठाण्यात राहतेस का हल्ली? ठाण्याचा उल्लेख केला आहेस...

शिनु said...

@ भानस

अगं त्या पॉवरपफ़ गर्लस असतातच की अधून मधून पण तो कोण कॉक्रोच आहे त्यापेक्षा हे प्रकरण परवडतं.

या गोंधळामुळे होतं काय की मी आत काम करत असते आणि मला बाहेरचे टीव्हीचे आवाज फ़क्त ऐकू येत असतात. आणि टीव्ही बघण्यापेक्षा ते जास्त इंटरेस्टिंग वाटतं कधी कधी. म्हणजे कसं ऐकू येतं माहितिय? "अर्चना मैं तुमसे शादी नही कर सकता, जो भूल सचिनने की है उसकी सजा मुझे भुगतनी पडेगी"..."अरे ये क्या कर रहे हो? मुझे क्यों सजा दे रहे हो, मुझे छोड दो जियान"..."सानु माझा चॅनल का बदललास? लाव माझं पवित्र रिश्ता," आपण जागचे हललो तर दुअसरी पार्टी रिमोट घेईल म्हणून दोघी आपापल्या म्मगे रिमोट दडवून टीव्ही बघत असतात. :) मी तर जाम मधे पडत नाही. घाला काय गोंधळ घालायचा तो. :)