आई नावाच्या बाईची गोष्ट


आई झाल्यावर बाईला काय काय होतं? तर अनेक गोष्टी पॆकेजडील सारख्या "एक" के साथ मुफ़्त म्हणून मिळतात. या सगळ्या मुफ़्त गोष्टींची ही गंमत.

बघा हं कल्पना करा की तुम्ही एक हिंदी सिनेमा बघताय. एक कशाला? आपण जोधा अकबरच बघुया नां. यात शहेनशाह ची एंट्री झाल्यावर काय होतं? म्हणजे पडद्यावर तो आला रे आला की मागे ढॆंटे ढॆंटे असं म्युझिक वाजतं. पण समजा असलं काही म्युझिक बिझिक न वाजता सरळ शांतपणानं तो आला तर? किंवा फ़ॊर दॆट मॆटर हिंदी सिनेमातून पार्श्वसंगीत नावाची गोष्ट गायब झाली तर? मग काय मजा? नाही का? बुटांचा ठाक ठाक आवाज न येता गब्बरसिंग आला तर तो गब्बर कसा वाटेल? पहाडीवर फ़िरायला आलेला टुरीस्ट नाही का वाटणार? तर या सगळ्याचा आणि आई होण्याचा संबंध काय? तर हिंदी सिनेमा बॆकग्राऊंड म्युझिकशिवाय अधुरा आहे आणि आई नावाची बाई "आई गं<<" या बॆकग्राऊंडशिवाय अधुरी आहे. आई झाल्यावर आणि मूल बोलायला लागल्यावर सतत कानात "आई" "आई<<" "आ<<ई<<" अशा विविध पट्ट्यातला जप घुमायला लागतो. सुरवातिला कौतुकानं बाळाच्या प्रत्येक "आई"ला लाडीक हो म्हणणारी आई नंतर नंतर बाळाचा "बाळ्या" होईपर्यंत प्रतिक्शिप्त क्रियेसारखी "ओ" म्हणायला लागते. नंतर म्हणजे बाळ्या किंवा बाळी सहा सात वर्षांची होईपर्यंत आई या जपाला इतकी "इम्युन" होऊन जाते की जवळपास आतून कान बंद करून घेण्याच्या दैवी चमत्कारापर्यंत पोहोचते. बालमानसशास्त्र सांगतं की मुलांच्या सगळ्या गोष्टी दरवेळेस मन लावून ऐका आणि त्याकडे खरोखरच लक्श द्या. इथे एक छोटासा प्रॊब्लेम हा आहे की, नेमका कुरीयरवाला आलेला असतो आणि कमोडवर इतकावेळ "शी होत नाहीए गं आई ऊठू कां" चा धोशा लावलेला बाळ्या/बाळी हाकांवर हाका मारायला लागतात. एक कुरीयर घेऊन त्याच्याकडच्या चिटोर्यावर सही "मारून" ते घेऊन हातभर अंतरावरच्या ड्रॊव्हरमध्ये ठेवून दार बंद करायला जितकी मिनिटं लागतात त्या तेव्हढ्या मिनिटांमध्ये "आई" "आई" असं सहस्त्रनाम परायण झालेलं असतं. आई नावाची बाई ते पाकिट ड्रॊव्हरमध्ये कोंबून धावत आत जाते तर बाळ्या/बाळी तिला अत्यानंदानं सांगतो,"मला होतेय शी, पण तू इथे थांब" (ते जे कोंबलेलं पाकिट असतं ना ते या आई नावाच्या बाईला रात्री आठ वाजता जाम मनस्ताप देतं. म्हणजे या बाईचा नवरा घरी आला की तो ड्रॊव्हर उघडतो ते पाकिट बघतो आणि बाईला म्हणतो ही पाकिट ठेवायची काय पध्दत झाली? यानंतर बाईचा फ़्युज उडतो आणि तो कसा उडतो हे विस्तारानं सांगायची गरज नाही)

महिन्याचं सामान भरायला बाई नावाची सवत्स धेनु जाते. आत गेल्याबरोबर सोबतची खोंड उधळतात. ही बिचारी हातातल्या यादीत बघत बघत सामान भराभर भरत असते आणि तिची खोंड ’आई’ "आई" करत दिसेल त्या गोष्टीचा हट्ट करायला लागतात. "आई बार्बी घेऊ"?,"आई माझी नोट बुक संपत आलीय घेऊ"?, "आई बेल्ट घेऊ"?,"आई योगर्ट घेऊ"?"आई ज्युस घेऊ"? असा दिसेल त्या गोष्टीचा हट्ट करायला लागतात. त्यावेळेस आई काय करत असते? तर मागून भुणभुण, पिरपिर, चिरचिर करणार्या पोरट्याकडे फ़ारसं लक्श न देता आणि समोरच्या रॆकवरचं लक्श जराही विचलित होऊ न देता पोरांना तंब्या देत असते. "कशाला हविय बार्बी? घरात ढिगानं आहेत ना? आधी त्या व्यवस्थित ठेवायला शिक", "नोट अजुन संपलेली नाहीए नां, ती आधी संपू दे मग बघू","योगर्ट नको. परवा खोकला झाला होता माहितिये नां". कधी धाकानं, कधी लाडानं आणि कधी समजवून ती पोरांना या मायापाशातून बाहेर काढते. विशेष म्हणजे या सगळ्याची रिपिट टेलिकास्ट दरच महिन्याला होतात. आई नावाच्या बाईची केव्हढी ही सहनशिलता. हेच चुकून बाबा नावाच्या माणसासोबत या खोंडांना नुसतं साधं दही आणायला पाठवलं तरी सोबतिला एक दोन बाहुल्या, मोटारी, पुस्तकं, कुकिज, केक असलं काय काय घरी येईल याचा नेम नसतो.असो. या विषयावर सविस्तर नंतर कधीतरी.

तर घरी, दारी, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आईच्या कानात "आई" सतत घुमत रहातं. आई झाल्यावरच्या पॆकेजमध्ये हा सततच्या हाकांचा कधी हवा हवासा तर कधी जीव नको करणारा साऊंड ट्रॆक मोफ़त मिळतो.


आई नावाच्या बाईचा "व्हायवा"





मूल बोलेपर्यंत त्याच्या तोंडातले शब्द ऐकण्यासाठी आई अगदी आतुर होते. सुरवातिचे बोबलकांद्याचे दिवसही मौजेचे असतात नंतर सुरू होते आई नावाच्या बाईची आयुष्यभराची "व्हायवा" दगड मातीपासून अगदी कोणत्याही विषयातल्या प्रश्नांना उत्तर देणंयाची तिची तयारी अवासिच लागते. हा प्रकार कंपलसरी या प्रकारात आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीतली माहिती असो अथवा नसो उत्तरं द्याविच लागतात. त्यात सामाजिक, कौटुंबिक, साहित्यिक, भौगोलिक, रासायनिक, ऐतिहासिक अशा जगातल्या नव्हे या भुतलावरच्या यच्चयावत विषयांचा समावेश असतो.(आता समजलं का आईला, "आई माझा गुरू" का म्हणतात?) उदाहरणादाखल हे प्रश्न पहा,

-प्रुथ्विच्या आत काय असतं?
-ढगांच्या पलिकडे काय असतं?
-चिमणी पोळ्या कशा लाटते?
-सायकलचं चाक पंक्चर का होतं? आणि ते पंक्चर काढतात म्हणजे काय करतात?
-माणसं का मरतात?
-मेल्यावर माणसं कुठे जातात?
-तू कधी म्हातारी होणार नाहीस ना?
-आपल्या फ़ॆमिलतले सगळे म्हातारे झाल्यावर मरणार का?
हे तर सहज आठवले तसे सांगितलेले प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न कोणत्याही वेळेस दाणकन येतात आणि त्यांची संभाव्य धोक्यांची शक्यता लक्शात घेऊन उत्तरं द्यावी लागतात. म्हणजे कोणाचं तरी ऒपरेशन झाल्यावर जर "ऒपरेशन म्हणजे काय"? असा प्रश्न विचारला तर आपल्या घरात हाती असणार्या साहित्यानिशी असलं ऒपरेशन होणार नाही याची काळजी घेऊन नेमकीच माहिती द्यावी लागते. याशिवाय अनेक भयानक सेन्सॊर्ड प्रश्नांना बाळबोध उत्तरं देताना जी काय तारांबळ उडते ती फ़क्त आईलाच ठाऊक. बरं दटावून गप्प करावं तर आजकालच्या पोरट्यांचं तसं नाही नाही म्हटलं, टाळलं की जास्त चिकित्सा. त्यामुळे करता काय द्या उत्तरं द्या. आई व्हायची हौस होती फ़ार. बसा आता आयुष्यभरच्या तोंडी परिक्षेला. एका वाक्यात, सविस्तर, सुदाहरण सगळ्या प्रकारच्या प्रश्नातून जावं तेंव्हा आई माझा गुरू वचन घडतं. बाबा नावाचा माणूस मात्र या परिक्षेतून कायम एटीकेटी घेऊन पसार होतो. एकतर पोरं त्यांना फ़ार प्रश्न बिश्न विचारायच्या भानगडीत पडत नाहीत. त्यातून विचारलेच एकदोन प्रश्न तर उत्तर नीट मिळेल याची गॆरंटी बाप नावाच्या प्रोडक्टवर मिळत नसल्यानं पोरं तसली रिस्कच घेत नसावीत. दुसरा मुद्दा असा की मुलांना कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायला हवं याचा प्रत्येक आईचा एक "युनिक" नियम असतो. गंमत म्हणजे बाबकडून तसं उत्तर दिलं जाईल याची गॆरंटी जगातल्या जवळपास सगळ्याच आयांना नसावी मग चुकिचं द्न्यान देण्यापेक्षा (आईच्यामते चुकिचं हं) नकोच ते असा साधारण पवित्रा. त्यामुळे घरात चित्र काय? तर आई माझा गुरू आणि पोरं-बाप उनाडलेले बॆंकबेंचर्स. बघा या सगळ्यांना चुचकारत फ़टकारत हाकणं म्हणजे कठीण आहे की नाही? तर आई नावाच्या बाईला पोरं झाली की साक्षात "जी के" बुक होण्याची संधी मिळते.


सध्यापुरतं थांबते. बाकिचं नंतर.





(citra sou.-greywolf)
 

14 comments:

aativas said...

एकदम झकास.. लिहित रहा अशाच..

meg said...

Patla ekdam! Nusta ashtavadhani nahi tar sahasravadhani honyacha ha soppa (!?) upaay.. ekda tari aai houn paha... nahi ka?

Deepak said...

छान लेख!
"बाबा नावाचा माणूस मात्र या परिक्षेतून कायम एटीकेटी घेऊन पसार होतो." - अगदी कबुल.

शिनु said...

@ above all

thanku.

तुमच्या प्रतिक्रिया उत्साह वाढवतात. keep reading.

शिनु said...

@ भुंगा

व्वा! मान्य केल्याबद्दल धन्यवाद :) मग आता पुढच्यावेळेस ऎटीकेटी नको काय? :p

शिनु said...

@ meg

:)

खरंय अगदी. "एकदा तरी आई होऊन पहा"

लग्न पहावं करून, घर पहावं बांधून आणि आई पहावं होऊन. :)

Durga Moghe said...

एकदम सही...
आई होणे सोपे नसते असं म्हणतात, पण म्हणजे नक्की काय त्याची झलक तू दिलीस...
असे अनेक प्रसंग येऊन जातात, पण तू ते खूपच छान पद्धतीने मांडले आहेस... मस्त, आवडलं!

शिनु said...

Durga moghe

thank u.

keep reading

Mandar Joshi said...

I TAG you on my blog

Unknown said...

अगं कुठेय तुझा टॅग...लिही ना लवकर आळशी कोणिकडची.....

संवेदना said...

अग काय मस्त लिहीतेस तु.आता भानस अन सहज बरोबर तुझीपण मी फॅन.

हेरंब said...

खूपच छान. अपर्णाने लिंक दिल्याने इकडे आलो. खूप आवडली पोस्ट. सध्या तरी आम्ही सुपात आहोत पण लवकरच जात्यात येऊ तेव्हा अशा पोस्ट्सचा उपयोग होईल.
शक्यतो एटीकेटी न घेण्याचा विचार आहे. बघू कसं जमतंय :)

शिनु said...

@ heramb

Welcome on my blog and thanku. keep reading.

by the way all the best for your upcoming venture. :)

Ketaki Abhyankar said...

मुलांना पडलेले प्रश्न फार आवडले. जास्त करून "चिमणी पोळ्या कशी करते?"

यावरून एक किस्सा आठवला, मुलांच्या कन्सेप्ट्स काय काय आणि कशा कशा असू शकतात याचा..
माझ्या मैत्रिणीचा मुलगा नर्सरीत आहे सध्या. त्याची एक आवडती टीचर आहे जी गरोदर होती.
त्याचे आईला प्रश्न: (सगळे प्रश्न बोबडे वाचा.. तो पूर्ण बोबडकांदा आहे)
मुलगा: आई, तुझं पोट कमी आणि मेरी टीचरचं पोट इतक मोठं का?
आई: अरे तिला न छोटंसं बाळ होणार आहे, ते आहे तिच्या पोटात.
मुलगा: (चेहेऱ्यावर अशक्य गोंधळल्याची भावना) बाळ पोटात असतं? मी पण टीचर च्या पोटातून आलो का?
आई: हो बाळ पोटात असतं पण ते आईच्या..तू माझ्या पोटातून आलास.
मुलगा: (कन्सेप्ट जराशी पटल्यासारखी दाखवून) बरं बरं..मग ती ते "ऑक्क" करून (म्हणजे उलटी काढल्याची कृती करून दाखवून) तोंडातून काढणार का?
आई, बाबा आणि घरातले सगळे अवाक!!!

काही महिन्यांनी, त्या टीचर परत शाळेत आल्यावर,
मुलगा: आई (एकदम खुशीत हाक) ओळख बघू?
आई: (रोजच अशी काहीतरी प्रश्नमंजुषा असल्यामुळे चेहेऱ्यावर प्रचंड उत्सुकता आणून) काय बरं? सांग ना तूच.. प्लीज..
मुलगा: अगं, आज मेरी टीचर आली शाळेत. तिला काही बाळ नाही झालं, तिच्या साडीवर मोठ्ठे मोठ्ठे गोल होते (ती सुट्टीवर जाण्यापूर्वी नेसलेल्या साडीवर पोलका डॉट्स असणार) त्यामुळे तीच पोट मोठ्ठं होतं.. आता नाहीये मोठ्ठं..
(कम्प्लीटली इल्लोजिकल)