अबक ही एक टीम आहे. यांची वेळ पडेल तशी कॉम्बिनेशन्स बनतात म्हणजे कधी ब आणि क यांची टीम अ ला हैराण करते, म्हणजे खरं तर नेहमीच. कधी अ आणि ब मिळून क चा क्लास घेतात तर कधी रितसर रॅगिंग घेत मनोरंजन करवून घेतात. कधी अ आणि क ची टीम असते, (ब च्या मते हीच खरी टीम आहे ज्याबद्दल ब च्या मनात रितसर खुन्नस आहे बरं का!) अरे हो, अबक कोण ? सांगायचं राहिलं नां, तर मंडळी अ म्हणजे साक्षात अस्मादिक, अर्थात आई नावाची बाई, ब म्हणजे बेबी अर्थात थोरली पाती. शब्दश: पाती कारण आम्ही सध्या टीन एजर टीन एजर खेळतोय त्यामुळे हार्मोन्स यथेच्छ धुमाकुळ घालतायत. कधी लाडात येत बच्चा बच्चा खेळायचा मूड तर कधी, कमॉन आय एम यंग ऍडल्ड नाऊ असं सुनावलं जातंय. क म्हणजे धाकलं पातं ज्याला इतरजण लाडानं कळकुटं म्हणतात. बारिक बारिक काड्या करत रहाणं हा आवडता छंद असणारं. सध्या पेशवा सिरियल डोक्यात असल्यानं श्रीमंत चिमणाजी शर्मन सरकार आहेत.
तर या श्रीमंतगिरीमुळे परवा झालेला किस्सा, श्रीमंतांची स्कूलला जायची वेळ झालेली होती. साडे अकराची घातक वेळ होती.....नेमका ऑगी कॉक्रोच टिव्हीवर अवतरलेला.....अजून शूज पॉलिश राहिलंय....जेवण राहिलंय....बॅग अर्धीच भरलीय.....जेवण समोर वाट बघतंय...आणि श्रीमंत मणी मोजत जेवतायत....बारा दहा चा शाळेच्या बससाठी खाली उतरायचा मुहूर्त आहे....आई नावाच्या बाईची नेहमीची संवांदाची फ़ैर सुरू झालेली आहे....."हे बघ उशिर झाला तर मी स्कूलमधे सोडायला येणार नाही. बुडव आज स्कूल मग उद्या नोट लिहून देते टिचरला की शर्मन ऑगी बघत होता म्हणून बस चुकली आणि म्हणून स्कूलला आला नाही....चालेल का? (पोरगं माझ्याकडे दूर्लक्ष करून ऑगी काय म्हणतोय हे तोंडाचा आ करून ऐकत असतं) ......अरे आवर की.....रोज पळापळ करतच जायचं का शाळेत? आवर...सानू टिव्ही बंद कर तो...कितीवेळा सांगितलं शाळेच्या वेळात टिव्ही लावत जाऊ नको....बंद कर तो डबा आधी....(एकूण चार कानांवरून वारं जातं. नेहमीसारखं माझं ऐकलेलं नसतं त्यांनी. काय करतील बिचारी रोजच दिवसातून पंचवीसएकवेळा आई जर तेच ते बोलत असेल तर त्या बिचार्या पोरांनी तरी कितीवेळा मन लावून ऐकायचं, नाही का?),,,,काय चाललंय हे? मी वेडी आहे का एकटीच बडबडायला?" आवाज टीपेला गेल्यावर चार डोळे माझ्याकडे प्रश्नचिन्ह घेऊन बघतात. शेवटी मीच जाऊन खटकन टिव्ही बंद करते आणि इतर दोन पात्रं आपापलं ओरिजिनल काम करायला लागतात. म्हणजे ताटाकडे बघत जेवायला लागतात. आता त्यांना मागच्या अर्ध्या तासात न समजलेलं समजायला लागतं,
"काय गं हे? आजही पालेभाजीच? शी बाबा किती बोअर आहेस तू."- बेबी
"तेच तर नां. कालही पालेभाजीच होती आजही. ताई, आई सारखी सारखी हीच भाजी का करते?" -श्रीमंत
"रोज रोज कुठे? काल सकाळी भेंडी नव्हती का केली? आणि रविवारी पनीर कोणी खाल्लं रे?"- बिचारी आई
"मग काय झालं? आज बटाट्याची भाजी करायची नां"-बेबी
"हे बघ जे केलंय ते गपचूप खायचं. सगळं जीभेसाठी नाही, कधीतरी काहीतरी तब्येतीसाठीही खायचं असतं" बिचारी आणि वैतागलेली आई. यानंतर अर्थात एक पॉज. मग मधेच दोन घासांनतर श्रीमंत शांतता भंग करतात,
"सानूताई बाबा किती लकी आहे नां"- श्रीमंत
आई आणि ताईला कळतच नाही की आता बाबा का बरं लक्की? आईच्या उरात बारीक धडकी, आता बहुतेक हा म्हणणार की आई बाबाला भाज्या खाण्यावरून कधीच रागवत नाही पण हे सांगून थांबणार नाही पुढे कोणत्या कारणांवरून रागवते याची यादी ऐकवणार. म्हणून आई सावध होत त्याला विचारते
"का रे? बाबा का लकी?"
"मग काय तर. तो सारखा सारखा ऑफ़िसच्यासाठी मिटिंग असतात तेंव्हा हॉटेलमधे जेवतो आणि सारखा पनीर खातो. मी ही मोठा झाल्यावर बाबासारखा बनणार"
आईला मनातून गार वाटतं . की , चला पोरगा बाबासारखं बनणार म्हणतोय आणि आमचा बाबा तसा गुणी पोर आहे. पण हे गार वाटणं अर्धा सेकंद टिकतं कारण पोर पुढे बोलतं,
"मी मोठा झालो की बाबासारखा बनणार म्हणजे मग मीही ऑफ़िसमधे जाणार आणि असंच मिटिंगला गेल्यावर रोSSSSSSSSSज पनीर खाणार"
यावर बेबी डोळ्याच्या कोपर्यातून हसत माझी रिऍक्शन बघत असते, श्रीमंत शांतपणानं पोळीचा तुकडा भाजी पोळीला लागणार नाही याची काळजी घेत अगदी अलगद भाजीत बुडवतात आणि तोंडात टाकून रवंथाला बसतात. मी त्यांच्याकडे रागा्नं बघते आणि दूर्लक्ष करून पुढच्या कामाला लागते. आई इतकी शांतपणानं कामाला लागलेली अर्थातच ब ला मान्य नसतं. ती हळूच काडी सरकवते,
"बरं का शमी तू पण लकीच आहेस....माझ्यापेक्षा"
"का? मी का लकी? "-श्रीमंत
"बघ नां, हे असं मी केलं असतं तर आईनं मला मोठं लेक्चर दिलं असतं. तुला ती फ़ारतर ओरडते पण मारत नाही. तुझ्याएव्हढी मी होते नां तेंव्हा आईनं मला खूप मारलंय....ती तुझी स्केल आहे नां त्यानंही......तुला बघ एकदाही मारलं नाही...."
श्रीमंतांना पुन्हा एकदा नव्यानं धक्का बसलेला असतो. खरंतर ताईबाईंनी हा गळा बरेचदा काढून झालाय तरिही सोयीनं त्यांना धक्के बसतात. माता नं तू वैरिणी असे भाव डोळ्यात आणून ताईची कड घेत श्रीमंत व्याकूळपणे बोलतात,
"आई....व्हेरी बॅड....तू का गं सानूताईला मारलंस? बिचारी"
आता घड्याळ्याच्या काट्यानं अकरा पन्नास वाजवून टाकलेले असतात. घटिका जवळ आलेली असते आणि आई नावाच्या बाईच्या डोक्यावरची बर्फ़ाची लादी वितळायला लागलेली असते.
ती श्रीमंतांच्या बाजूला जाऊन उभी रहाते आणि करारीपणानं म्हणाते,
"हो नां. ताई म्हणतेय ते बरोबरच आहे. तू खूप लकी आहेस. कधीच धपाटा खाल्ला नाहीस नां? पण आज बहुतेक लकी असण्याचा शेवटचा दिवस आहे कारण अजून बरोबर पाच मिनिटांनी तुलाही मार पडणार आहे."
ही धमकी बरोबर लागू पडते आणि बरोबर बाराच्या ठोक्याला श्रीमंत पाठीवर दप्तर लटकवून तयार असतात.
सकाळ सत्र इथे संपतं मात्र अबक तिघांच्याही मनात एक एक प्रश्न ठेवून.
अ- सकाळपासून घसा खरवडून आवरा आवरा म्हणलं तरी आवरत नाही आणि नेमकं शेवटच्या दहा मिनिटांतच रोजच ,सगळं कसं काय पटकन आवरलं जातं?
ब- हा रोजच आईच्या मारापासून कसा काय वाचतो? आईला त्याचं बोलणं गोड आणि कुचीकुची का वाटतं? हा आईचा मार खाणार तरी कधी?
क-मी रोजच वेळेतच आवरून स्कूलमधे जातो तरिही आई मला ऑगी का बघून देत नाही? आणि मुख्य म्हणजे रोजच पनीर का करत नाही?